“माहिती”तील आठवणी” मध्ये आपण आज वाचू या.. नांदेड येथील जिल्हा माहिती कार्यालयातील छायाचित्रकार विजय होकर्णे यांच्या आठवणी.
– संपादक
छायाचित्र आज परवलीचा शब्द झालाय. छायाचित्रणाची आवड नसणारा माणूस विरळाच. ते आयुष्याचा अविभाज्य घटक झाले आहे, म्हटले तर वावगे ठरू नये. सिंहावलोकन करतांना किंवा मागे वळून पाहताना छायाचित्रच जसाच्या तसा भूतकाळ उभे करते हे त्याच सामर्थ्य आहे.
जागतिक छायाचित्र दिन कालच साजरा झाला. जगभरातील निसर्ग आणि पर्यावरण प्रेमी छायाचित्रकारांचा हा हक्काचा दिवस. मागील ४० वर्षापासूनन मी विविध शासकीय कार्यक्रम, नैसर्गिक आपत्तीतील मदत कार्य या बरोबरच निसर्ग, पर्यावरण, ऐतिहासिक वास्तू, सामाजिक संदेश स्थलांतरीत पक्षांचा अधिवास, त्यांचे संरक्षण याबाबत जनजागृती करणारी अशी एक ना अनेक छायाचित्रे टिपली आहेत. कृष्णधवल, रंगीत आणि आता मोबाईलच्या युगातही अशी वास्तवदर्शी छायाचित्रे लक्ष वेधून घेतात.
माध्यमाच्या भाषेत बोलायचं तर जे हजार शब्द सांगू शकत नाही ते छायाचित्र नेमकं सांगून जाते.
अर्थात मी किती तरी छायाचित्रण केले असले तरी माझ्या कायम आठवणीत राहिले आहे आणि राहील ते म्हणजे कैलास मानसरोवर यात्रेत केलेले छायाचित्रण.
देवाधिदेव महादेव, श्री शिवशंभू आणि जगनमाता पार्वतीदेवी यांचे परमपवित्र निवासस्थान म्हणजेच कैलास पर्वत.
हे समुद्रसपाटीपासून २२ हजार २८ फुट उंचीवर आहे. बर्फाछादीत स्वयंभू अशा कैलाश पर्वताच्या दक्षिणेस निलम, पूर्वेस क्रिस्टल, पश्चिमेस रुबी व उत्तरेस सुवर्णरुप मान्यता आहे.
लगतच महाराजा मानदाता यांनी तपस्याकरून शोधलेल्या पवित्र जल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानससरोवरची परिक्रमाकरुन तेथील छायाचित्रण करण्याचा माझा मनोदय पूर्ण झाला. या अशा पवित्र ठिकाणचे स्थान महात्म्य आहेच. पौराणिक मान्यतेनुसार कुबेराची नगरी म्हणून ओळखल्या जाते. येथूनच महाविष्णू यांच्या करकमलातून निघालेली गंगा कैलास पर्वताच्या शिखरावर पडते. येथे उमापती महादेव आपल्या जटेतून ती प्रवाहीत करते.
कैलास मानससरोवरला जाण्यासाठी बराच खर्च लागतो. शिवाय प्राणवायुचा अभाव लक्षात घेता वर्षभर मानसिक, शारीरीक, आर्थिक तयारी करुनच या सकारात्मक उर्जा देणाऱ्या ठिकाणाचे छायाचित्रण करण्याचा निश्चय सार्थकी ठरला आणि धन्य झालो. माझ्या आजवरच्या छायाचित्रण संचितामध्ये एक मोठी अलौकिक भरच पडली आहे.
हा प्रवास मोठा लांबपल्याचा खडतर असलातरी आम्ही नांदेडहून हैद्राबाद- लखनौ-नेपाळगंज, सिमीकोट, हिल्सा या मार्गाने नेपाळ चिनच्या सिमेवरुन तिबेटकडचा हा प्रवास बस, रेल्वे, छोटे विमान, हेलिकॉप्टर, या माध्यमातून पूर्ण करत चिनच्या बसद्वारे मानस सरोवर परिक्रमा पूर्णकरुन कैलास परिक्रमा घोड्यावरुन तर कांही सहकाऱ्यांनी ती पायी पूर्ण केली.
भारत-नेपाळ-चिन या सिमावर्ती भागात मानस सरोवरकडे जाण्यासाठी ज्या उंच उंच पर्वत रांगा, नद्या, हिमशिखरे या निसर्गरम्य परिसराचे छायाचित्रण करताना विमान व हेलिकॉप्टरचे कुशल पायलट यांची मदत झाली. मोठ-मोठ्या दऱ्या, कपारीतून प्रवास करणारे हेलिकॉप्टर चित्तथरारक अनुभव देऊन गेले. हवाई प्रवासात आडवे येणारे धुके-ढग, उंच पर्वताच्या मधोमध राईड करत जाणारे हेलिकॉप्टर छायाचित्रण करतांना तेथील निसर्गरम्य परिसर, पर्यावरण छायाचित्र काढण्यास जेवढे परावृत्त करत होते तेवढेच ते जिकीरीचेही होते.
हा अनुभव आजपर्यंतच्या छायाचित्रण कारकर्दीत प्रथमच अनुभवला. समुद्र सपाटीपासून २ हजार ८०० ते ३ हजार ८०० मीटर उंचीवरुन घेण्यात आलेली ही छायाचित्रे माझ्यासाठी तरी दुर्मीळच होती. या नवनिर्मितीच्या आनंदाने मन भारावून गेले आहे.
यापुर्वीही अमरनाथ यात्रेचा पायी, घोड्यावरुन व हेलिकॉप्टरने छायाचित्रण करण्याचा अनुभव गाठीशी होताच. शिवाय अमेरिकीतील ग्रँड कॅननच्या केलेल्या हवाई चित्रीकरणापेक्षाही नेपाळ ते चिनच्या सीमा भागातील नदी मार्गाने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून केलेले छायाचित्रण हा प्रवास अलौकीकच होता.
छायाचित्रण क्षेत्रात काम करतांना निसर्ग, पर्यावरण, पक्षी यांची ओढ नेहमीच राहिलेली. स्वच्छ, सुंदर निसर्ग व पर्यावरणात देव मानणारा मी एक छायाचित्रकार.
यावर्षी कैलास मानस सरोवरच्या यात्रेच्या निमित्ताने भारत, नेपाळ, चिन, तिबेट येथील हिमशिखरे उंच-उंच पर्वतरांगा व तेथील जनजीवन.
आशिया खंडातील चार प्रमुख नद्या यात प्रामुख्याने ब्रम्हपुत्रा, सिंधु, सतलज, कर्नाली (घागरा)चे हवाई छायाचित्रण मात्र ह्या नद्या समुद्रसपाटीपासून 22 हजार फुट उंचीवर उमापती कैलाशाचे निवास असलेल्या कैलाश पर्वताचे छायाचित्र करताना या देवभुमीतील सकारात्मक ऊर्जेचा परिणाम तर प्रकृतीवर झालाच आणि येथे येऊन छायाचित्रण करण्याच्या दृढ संकल्पनेची कार्यसिद्धी झाल्याचे समाधान लाभले.
असे मानण्यात येते की, महाराजा मानधाता यांनी मानस सरोवराचा शोध घेतला आणि त्याच किनाऱ्यावर तपश्चर्याही केली. अशा या पवित्र मानस सरोवरमध्ये स्नान, लिंगपुजा, अभिषेक हा प्रसंग अवलौकीक होता. माझी आई नर्मदाबाई होकर्णे यांनी मी मानससरोवरला जाण्यापुर्वी लिंगपुजा व अभिषेकांसाठी लागणारे साहित्य सोबत दिले. त्यात काय होते हे जरी मला माहीत नसले तरी परत आल्यानंतर आईचाही संकल्प पूर्ण झाल्याचे समाधान तिच्या शब्दात सांगतांना ती म्हणाली की, तुला पुजे व आरतीसाठी ज्या वाती तयार करुन दिल्या होत्या, त्या ७०० पदऱ्याच्या वातीने दरवर्षी श्रावण महिन्यात महादेवाला आरती करते. हा उपक्रम ती माझ्या जन्मापुर्वी पासून करते. यावर्षी केलेल्या त्या सातशे पदराच्या वातीची आरती कैलास मानससरोवरमध्ये माझ्यासह आमच्या सर्व सहकार्यांनी केली असे सांगितले. तेंव्हा तिचाही संकल्प पूर्ण झाला.
३२० कि. मी. क्षेत्रात पसरलेल्या मानससरोवर परिसरात छायाचित्रण करतांना एकच इच्छा होती की, या परिसरात अनेक महान विभूतीनी छायाचित्रण केलेले आहे. त्यांची अनेक पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. माझीही अशीच प्रार्थना होती की, या पवित्र देव भुमीत इतरांपेक्षा कांही वेगळे छायाचित्र काढता आले पाहिजे. अशी एकांतात मनोमन भावना व्यक्त होत असतांना क्षणार्धातच तेथील निसर्गरम्य वातावरणात बदल घडवून येत असल्याचे दिसून आले. हे पाहतच आपला छायाचित्र संग्रह करुन ठेवण्याचा धर्म विसर न पडु देता ते टिपत राहिलो. टिपतांना कळत नव्हते की, मी कशा कशाचे फोटो काढत आहे. काय काढू, काय काढू नये, काही राहून जाईल ? का याचा भ्रम होत होता.
मानससरोवर परिसरात अनेकांना अनेक दृष्टांत झाल्याचे ऐकले, तसेच वाचले होते. आपल्यासमोर काय घडेल याची माहिती नसतांनाच त्याही वेळचे फोटो मिळविण्याची प्रार्थना जणु कैलासाने तेथेच पूर्ण करुन दिली आणि अचानक कैलास मानससरोवराच्या मध्यभागी साक्षात परमेश्वर अवतरावा, असे भव्य इंद्रधनुष्यच उतरले. एका छायाचित्रकाराला यापेक्षा काय मोठे हवे ? या सप्तरंगी धनुष्यात मला जणु त्यावेळी माझ्या चाहत्या परमेश्वराने दर्शनच दिल्याचा भाव झाला. हा प्रसंग मी माझ्या या तोडक्या मोडक्या शब्दात कधीच सांगु शकणार नाही पण त्याप्रसंगी झालेला दृष्टांत, मला झालेली अनुभती मात्र मी माझ्या कॅमेऱ्यात टिपण्याची संधी सोडली नाही.
क्षणा-क्षणाला कॅमेरा मोड हा मोटर लावून क्लिक..क्लिक..क्लिक..क्लिक ह्या मला झालेल्या साक्षात्काराच्या सर्व घटना, प्रसंग तो परमेश्वररुपी मानस सरोवरामध्ये समावलेला इंद्रधनुष्य ही आठवण महाप्रसादाप्रमाणेच आपल्या पुढे ठेवत आहे याचे मला समाधान आहे. असे म्हणतात जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे… असाच हा माझा अनुभव मी छायाचित्र रुपांनी आपल्या समोर मांडत आहे.
एक छायाचित्रकार म्हणुन आवर्जुन सांगायचे झाल्यास माझा स्वभाव हा नास्तिक तर नाहीच पण अंधश्रद्धेच्या आहारी जाणाराही नाही. परमेश्वराचे अपार प्रेम, काम हीच पुजा मानणाऱ्या पैकी एक कैलासाच्या सानिध्यात आठवण झाली ती आजोबा सदाशीवअप्पा होकर्णे, वडील वैजनाथअप्पा होकर्णे, काका बालाजीअप्पा होकर्णे, आत्या कमलाबाई झाडबुके यांची. त्यांनी माझे पालन पोषण करुन मला मोठे केलेले आहे. ह्या माझ्या दिवंगत नातेवाईकांची मला कैलासाच्या पायथ्याशी झालेली आठवण म्हणजे खरोखराच ते कैलासास पावले अशीच होती.
आपल्या आयुष्यात आवडीचे शिक्षण आणि आवडीच्याच क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे याला नशिब लागते. तो नशिबवान, भाग्यवान तर मी आहेच यासाठी आई-वडिल, काका-काकु, आत्या-मामा यांची पुण्याई, पत्नी व बंधूची साथ माझ्या पाठिशी आहे. म्हणूनच मी या क्षेत्रात स्वाभिमानाने आणि कर्तबगारपणे काम करु शकतो.
आजपर्यंतच्या कारकिर्दीत खरी साथ मिळाली वरिष्ठ अधिकारी व सहकारी, कर्मचाऱ्यांची. दोन वेळा राज्य शासनाचा केकी मुस पुरस्काराचा मानकरी ठरु शकलो. या पुरस्काराच्या प्राप्तीनंतर दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीने जेंव्हा मुलाखतीसाठी बोलवले तेंव्हा वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देतांना आजपर्यंत काढलेल्या छायाचित्राबद्दल माहिती सांगतांना मुलाखतकर्त्यांनी शेवटी असा एक प्रश्न विचारला की, होकर्णे तुम्ही काढलेला सर्वोत्कृष्ट फोटो कोणता ? मी कोणताही विचार न करता आपण काढलेल्या प्रत्येक छायाचित्राचा विचार करुन आत्मविश्वासाने या प्रश्नाला उत्तर देतांना म्हणालो की, तो फोटो अद्याप काढायचा राहिला. मुलाखतीत एकदम शांतता पसरली. उत्तराचे गांभीर्य प्रश्नकर्त्यांना कळाले होते. मी मात्र स्तब्द्ध झालो. उत्तर दिल्यानंतर मी कांही काळ निरुत्तर झालो. या माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या प्रसंगाचे उत्तर मला सापडले ते येथेच.
कैलासाच्या पायथ्याशी डेरापुक येथे ४ हजार ५६० मीटर उंचीवर मुक्काम केल्यानंतर सकाळी पहिल्या सुर्य किरणाचा कैलास पर्वतावर पडणाऱ्या प्रसंगाचे छायाचित्र घेण्याची धडपड सुरु होती. पहिले सुर्यकिरण हे कैलासावर पडले. कॅमेऱ्याची कळ दाबून चार-पाच क्लिक झाले. पण पाहिजे तसा सुर्यप्रकाश पडतच नव्हता. परमेश्वर माझी परिक्षाच घेतो आहे असे वाटत होते. पण तो जे देतो तेंव्हा छप्पर फाडकेच देतो. क्षेत्र कोणतेही असो हे पवित्र स्थान असे आहे की, येथे आपल्या ज्ञात अज्ञात आठवणीलाही तो जागे करतो. मलाही तेथे तीच अनुभवती झाली. थोड्या वेळातच सुर्याचे सोनेरी किरण कैलासावर पडले. मी तयार होतोच. केंव्हा किरण पडेल आणि मी केंव्हा फोटो काढेल अशी ती माझी इच्छा पुर्ण झाली.
मला पाहिजे ते आणि त्यापेक्षाही अधिक वर्णन करता येणार नाही अशी छायाचित्रे काढता आली. पुन्हा येथेच, अचानक मला काही वर्षापुर्वी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरही मिळाले. जो माझा सर्वोत्कृष्ट फोटो काढायचा राहिला होता तो मिळाला. बस्स यापेक्षा एका छायाचित्रकाराला याहून अधिक काय पाहिजे ? अशी भावना मनात घेत मी माझी पुढील यात्रा येथेच थांबवली आणि कैलासाला चरण स्पर्शकरुन, त्यांचा आर्शिवाद घेऊन आपल्या आयुष्यातील पुढील कार्यासाठी परतीच्या प्रवाशाला लागलो.
जय कैलास.

– लेखन : विजय होकर्णे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान !
Thanks.
आपल्या लेखातून छायाचित्रणातील उत्तुंग दर्शन घडले. खूपच छान
आभार मी फार कमी अनुषगीक लिहण्याचा प्रयत्न करीत असताना आपण माझ्या शब्द चित्राची नोंद घेवुन नव्याने ओळख निर्माण करुन दिल्या बद्दल आभार आपला छायाचित्रकार :विजय होकर्णे नांदेड
9422162022