अधिकारी झाले मित्र
चंद्रपूर शहरातील डॉ.बबनराव अंदनकर व ॲड.राम हस्तक यांनी त्यांच्या “सन्मित्र मंडळाच्या” रसिकांसाठी १९८३ साली ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या माझ्या एकपात्री कार्यक्रमाचा पहिला प्रयोग आयोजित केला होता. त्यावेळी श्री. चंद्रकांत क्षिरसागर यांची माझी पहिल्यांदाच भेट झाली. श्री. प्रभाकर महाजन साहेब चंद्रपूर जिल्ह्याचे माहिती अधिकारी होते, तर त्यांचे सहाय्यक माहिती अधिकारी होते चंद्रकांत क्षिरसागर ! पुढे त्यांच्या बरोबर सातत्याने भेटीगाठी होत राहिल्या आणि त्यांच्या मनमिळाऊ, लाघवी व अत्यंत साध्या स्वभावामुळे आमच्या ओळखीचे घट्ट मैत्रीत रुपांतर कधी झाले हे दोघांनाही समजले नाही, अर्थात आमचा दुवा होता ‘पत्रकार सुरेश देशपांडे.!’
त्याच्यामुळेच मी क्षिरसागरांच्या कुटुंबाशी जोडला गेलो.
चंद्रकांतच्या सौभाग्यवती ‘नीला’ त्यांच्या प्रमाणेच साध्या व सुस्वभावी, नागपूर तरुण भारतचे माजी संपादक श्री.मामासाहेब घुमरे यांची मुलगी ! नीला वहिनी सुगरण असल्या कारणाने त्यांनी एखादा विषेश पदार्थ बनवला की चंद्रकांत आम्हाला घरी बोलावून खायला घालायचे, मी त्यांच्या कुटुंबाचा एक मेंबर झालो होतो.
नंतर श्री.सुरेश फडणवीस, महाजन साहेबांच्या जागेवर रुजू झाले आणि क्षिरसागरांची बदली झाली. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड गावात सहाय्यक माहिती अधिकारी पदावर ते स्थिरस्थावर झाल्यावर सुरेश देशपांडेंकडे फोन करून त्यांनी मला त्यांच्याकडे बोलावून घेतले. तेथील वीज मंडळात त्यांनी माझा एकपात्री कार्यक्रम आयोजित केला. त्यांच्या घरी मुक्काम करूनच मी तो प्रयोग सादर केला. सर्व वृत्तपत्रांत त्या प्रयोगाची प्रसिद्धी केली. पुसदच्या दै.मतदार मध्ये माझी मुलाखत प्रसिद्ध झाली. त्यामुळे पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यातील शाळांमध्ये माझे ‘ओकार काव्य दर्शन’ या शालेय कार्यक्रमाबरोबरच कांहीं एकपात्री कार्यक्रमही आयोजित झाले, ते क्षिरसागर साहेबांच्या सहकार्यानेच! माहूर गडावरील श्री रेणुका मातेच्या दरबारातही माझा कार्यक्रम सादर झाला.
श्री.रावसाहेब मोहोड अमरावतीचे माहिती अधिकारी असताना त्यांचे सहाय्यक म्हणून क्षिरसागर साहेबांची बदली झाली. मग अमरावती शहरात आणि जिल्ह्यातही माझ्या दोन्ही कार्यक्रमांसाठी त्यांची मदत झाली. प्रामुख्याने दोन्ही जिल्ह्यांतील आदिवासी आश्रम शाळांमध्ये त्यांच्याच सहकार्याने माझे शालेय कार्यक्रम मी विनामूल्य सादर करू शकलो.
पुढे क्षिरसागर साहेबांना प्रमोशन मिळाले आणि ते गोंदिया जिल्ह्याचे माहिती अधिकारी झाले. तिथून ते निवृत्त झाले. दरम्यान मी मुंबईत स्थायिक झालो असलो तरी आजही आम्ही संपर्कात आहोत. आता साहेबांच्या पेक्षा ते माझे चंदू नावाचे घनिष्ठ मित्र आहेत.
इतकेच नव्हे तर त्यांचा मुलगा पीयूष, मुलगी प्रिया, असे सर्वच कुटुंब मला ‘काका’ म्हणून मान देतात.

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट. मुंबई
(सादरकर्ते – ‘कुटुंब रंगलंय काव्यात’)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800