मी जिल्हा माहिती अधिकारी रायगड- अलिबाग म्हणून जवळ जवळ १० वर्षे कार्यरत होतो. ही संस्मरणीय आठवण १९९८ सालची आहे. त्यावेळेचे जिल्हाधिकारी आदरणीय श्रीकांत देशपांडे साहेब (आज ते मुख्य निवडणुक अधिकारी आहेत). त्यांनी मला कार्यालयात बोलावून सांगितले, आपणांस उद्या सकाळी ठिक ७ वाजता पाचाडसाठी निघावयाचे आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जन्मदिनाचा कार्यक्रम तिथे होता. त्या कार्यक्रमाचे राष्ट्रसेविका यांच्यातर्फे आम्हांला निमंत्रण होते. मी अर्थातच लगेच होकार दिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघे त्यांच्या लालदिव्याच्या गाडीतून निघालो. अलिबाग ते पाचाड तसे १३० किलोमिटर अंतर आहे. राजमातेच्या समाधीपाशी कार्यक्रम होता. मनातुन खुप आनंद झाला होता. ठिक १०.३० वाजता आम्ही पोहोचलो. पाहुणे मंडळी वाटच पहात होती.
आम्ही वाहनातून उतरताच जोरदार स्वागत झाले. मोठ्या संख्येने शिस्तप्रिय उभ्या असलेल्या राष्ट्रसेविकांनी बँड पथकावर सुमधुर स्वरात स्वागत केले. त्या सर्वांच्या प्रमुख होत्या, आदरणीय लेखिका आणि गायिका योगिनी जोगळेकर. स्वागत झाल्यावर परिचय करून देण्यात आला. दिप प्रज्वलन करून राजमातेच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
प्रमुख वक्ते निनाद बेडेकर यांचे राजमातेवर भाषण झाले. त्यांचे भाषण ऐकुन खूप छान वाटले. जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे साहेब यांनाही बोलावयास सांगितले गेले. त्यानंतर मलाही राजमातेवर बोला म्हणुन सांगण्यात आले. मी सांगितले इतकी मोठी व्यक्ती निनाद बेडेकर सर बोलल्यावर मी काय बोलणार ? खरं तर मी जिजामातेच्या कार्याचा अभ्यास करून गेलो होतो. पण बोललो नाही.
कार्यक्रम खूप सुंदर झाला. आणखी बरीच मंडळी होती. काही महाड, पोलादपुरच्या व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
व्यासपीठावर भारतीय बैठक होती. कार्यक्रम संपल्यावर मी योगिनी जोगळेकर यांच्याशी बोलायचे ठरविले होते. कारण त्या लेखिका पण होत्या. त्यावेळी त्या ७५ वर्षांच्या होत्या. पण खूप तेजस्वी, कणखर वाटल्या. मी त्यांचे साहित्य वाचले नव्हते. काही मासिकातून त्यांच्या कथा वाचल्या होत्या पण आठवत नव्हत्या. मग शेजारी बसलेल्या एका महिलेला विचारले, पण त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर मिळाले नाही.
मग मीच हिंमत करून योगिनीताईंशी बोललो, आपण लेखिका पण आहात…. त्यांनी मला प्रतिप्रश्न केला, तुम्ही माझे साहित्य काही वाचले कां ? मी स्तब्ध झालो. तरी नंतर मला राहावेना. मी पुन्हा म्हणालो, आपण गायिका पण आहात, मी त्यांचे मला आवडणारे नाट्यसंगीतातील एक गाणे ऐकले होते. आणि ते त्यांचेच होते. कारण जळगांव आकाशवाणीवरून दर बुधवारी अर्धातास नाट्यसंगीत लागायचे.
मला खात्री होतीच ते त्यांनी गायिले आहे. मी त्यांना पुन्हा म्हणालो, शांकुतल नाटकातले हे पद आहे आणि तुम्हीच ते गायले आहे. शकुंतला सखीला म्हणते, सखेये अनुसये, थांब जरा मी येते. अशी कां घाई ? हे त्यांना मी सांगितल्यावर त्यांचा चेहरा आनंदाने फुलला. त्यांनी मला म्हटले, नांदेडकर जरा पुढे सरका आणि माझ्या पाठीवर हात ठेऊन म्हणाल्या, राजमातेच्या स्थानी आज मला माझा खरा रसिक भेटला. त्यांना खूप आनंद झाला आणि मी पण परिक्षेत पास झालो. नंतर आम्ही अलिबागकडे प्रयाण केले.

– लेखन : श्रीपाद माधव नांदेडकर. धुळे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
छान आठवणी