शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
शिवसेनाप्रमुख, थोर व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला. तर त्यांचे निधन १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबई येथे झाले. उद्या त्यांची पुण्यतिथी आहे. या निमित्ताने जेष्ठ शासकीय छायाचित्रकार श्री गिरीश देशमुख यांनी जागवलेल्या त्यांच्या काही आठवणी…. कै.श्री बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
मी मुंबईत, माहीम मध्ये शाळेत शिकत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या माहीम मध्ये मेन रोडवर बऱ्याच सभा ऐकल्या होत्या. त्यांच्या भाषणामध्ये मराठी माणसाने नोकरी, धंद्यात पुढे यावे असे नेहमी आम्ही ऐकत होतो.
बाळासाहेबांच्या सभेला नेहमीच गर्दी असे. त्यांचे भाषण सर्वांनाच आवडत असे. त्यांना एक दोन वेळा जवळून बघण्याचा योग आला.
एकदा मनात आले की, बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आपण फोटो काढावा. पण अशी संधी कधी मिळाली नाही. कारण त्यांच्याबरोबर नेहमी शिवसैनिक व पोलीस असे सगळे असायचे. सभा संपली की ते लगेच दुसऱ्या सभेला जात असत. पुढे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ही फक्त भारतातच नव्हे तर जगप्रसिद्ध झाली. बाळासाहेब ठाकरे म्हटले की शिवसेना आणि शिवसेना म्हटले की बाळासाहेब ठाकरे असे समीकरण झालं होतं.
योगायोग कसा असतो, बघा !
जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून फोटोग्राफी चा कोर्स केल्यानंतर मी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात छायाचित्रकार म्हणून नोकरीला लागलो. विविध शासकीय कार्यक्रमांच्या छायाचित्रणाची जबाबदारी माझे वरिष्ठ अधिकारी मला देत असत आणि मी ती नेहमी पूर्ण करत असे.
एकदा माझी ड्युटी वर्षा बंगल्यावर होती. त्यावेळी मुख्यमंत्री होते श्री शरद पवार. त्यांच्याबरोबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो काढण्याचा योग आला. पवार साहेब व बाळासाहेब यांची बैठक संपल्यानंतर बाळासाहेबांना अगदी जवळून बघण्याचा योग आला.
पुढे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याबरोबर मी ड्युटी करताना एक दिवस मंत्रालयामध्ये शंकरराव चव्हाण व बाळासाहेब ठाकरे यांची बैठक झाली. त्यावेळी पण मला त्यांचे फोटो काढण्याचा योग आला.
काही वर्षांनी महाराष्ट्रात शिवसेना- भाजप युतीचे राज्य आले. युतीचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा शिवाजी पार्कवर भव्य शपथविधी सोहळा पार पडला. नंतर मुंबई – पुणे चौपदरी मार्गाचे भूमिपूजन, राजभवनमध्ये दूरदर्शन वर प्रसारित होणाऱ्या माय मराठी कार्यक्रमाचा शुभारंभ माजी पंतप्रधान भारतरत्न कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत झाला. मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करतानाचे, तसेच मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मुख्यमंत्र्यांच्या दालनात बाळासाहेब ठाकरेंची भेट आदीचे मी छायाचित्रण केले.
मला लगेच दोन गोष्टी आठवल्या एकदा मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची मुख्यमंत्र्याच्या दालनातील भेट व शिवसेनेच्या स्वतःचा पहिला मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याबरोबरची भेट. राजभवन येथील शिवसेनेचा विस्तारित मंत्रिमंडळ शपथविधी यावेळी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत सौ मीनाताई ठाकरे उपस्थित होत्या.
नंतर मातोश्रीवर मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समवेत बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो काढण्याचाही मला योग आला. त्याचप्रमाणे आपल्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना निवडून आणल्यामुळे प्रतिभाताई पाटलांचे पती मुद्दामहून बाळासाहेबांना भेटायला मातोश्री बंगल्यावर आले होते, त्यावेळीही मला त्यांचे फोटो काढण्याचा योग आला. अशा प्रकारे बाळासाहेबांचे फोटो काढायचा मला बऱ्याच वेळ योग आला.
लहानपणी मला बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर फोटो काढायची इच्छा होती. ती माझी इच्छा शेवटी एकदा मातोश्री बंगल्यावर पूर्ण झाली.
बाळासाहेबांनी मला अगदी जवळ बोलावले व दुसऱ्या फोटोग्राफरला आमचे फोटो काढायला सांगितले. केवळ माझ्या सरकारी नोकरीमुळे हे मला शक्य झाले.
काही विचारांना जात, धर्म राजकीय विचार यांची बंधने नसतात. असे विचार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे होते. म्हणून तर ते सर्व जात, धर्म, सर्व राजकीय पक्ष यांना जवळचे वाटत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनतेमध्ये त्यांनी स्वतःचे एक स्थान निर्माण केले. भारतातील सर्व राजकीय पक्ष व त्यांचे पुढारी सर्वजण एकच सांगतात, मराठी माणसासाठी झटणारा पहिला माणूस म्हणजे शिवसेनाप्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरे होत. अशा या थोर विभूतीस माझे विनम्र अभिवादन.
— लेखन : गिरीश देशमुख. निवृत छायाचित्रकार, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना सुरेख उजळा दिला.