“माय मराठी”
नवी दिल्ली येथे सध्या ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनाचे वृत्तांत वाचता वाचता आठवला तो महाराष्ट्र शासनाचा दूरदर्शन वर सुरू करण्यात आलेला माय मराठी कार्यक्रम. त्याच्या या काही आठवणी….
राज्यात १९९४ साली सत्तेवर आलेल्या शिवसेना _ भाजपा युती शासनाच्या वचननाम्यातील (निवडणूक पूर्व जाहीरनामा) एक वचन होते, ते म्हणजे “मायमराठी वाहिनी” सुरू करण्याचे. पण “प्रसारण” हा विषय भारत सरकारच्या अखत्यारीतील असल्यामुळे महाराष्ट्र शासनाला स्वतःची अशी वाहिनी सुरू करता येत नव्हती. म्हणून ती सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या माहिती व नभोवाणी मंत्रालयाशी माहिती खात्याचा जवळपास दोन अडीच वर्षे पत्र व्यवहार होत होता. पण काही निष्पन्न होत नव्हते. (विशेष म्हणजे भारत सरकारच्या या धोरणात आजही काही बदल झालेला नाही. एखादी खाजगी व्यक्ती, संस्था स्वतःची वाहिनी सुरू करू शकते आणि करतेही म्हणूनच आज भारतात ९०० हून अधिक दूरचित्रवाणी वाहिन्या आहेत पण कोणत्याही राज्य सरकारला मात्र अजूनही स्वतःची वाहिनी सुरू करता येत नाही! असो)
दरम्यान, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका मुंबई दौऱ्यात त्यांचा दोन दिवस राजभवन वर मुक्काम होता. या त्यांच्या मुक्कामात राज्याच्या केंद्र सरकार कडे प्रलंबित असलेल्या विषयांवर खातेनिहाय बैठका सुरू होत्या. या बैठकांना तत्कालीन राज्यपाल डॉ पी सी अलेक्झांडर, शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे, मुखमंत्री मनोहर जोशी, उप मुखमंत्री श्री गोपीनाथ मुंडे, मुख्य सचिव दिनेश अफझलपूरकर, संबंधित खात्यांचे मंत्री, सचिव, अन्य वरिष्ठ, संबधित अधिकारी उपस्थित राहून धडाधड निर्णय घेतले जात असत.

माहिती खात्याचा केंद्र सरकारकडे एक प्रलंबित विषय होता, तो म्हणजे अर्थातच “माय मराठी वाहिनी” सुरू करण्याचा. त्यामुळे या विषयावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री मनोहर जोशी, माहिती मंत्री श्री प्रमोद नवलकर, मुख्य सचिव श्री दिनेश अफझलपूरकर, माहिती खात्याचे सचिव कॅप्टन अजित वर्टी, माहिती महासंचालक कॅप्टन अशोक देशपांडे, माहिती संचालक सर्वश्री सुधाकर तोरणे, रमेश नेवासकर, दृकश्राव्य शाखेचा (पुढे एका महासंचालक महोदयांनी दृकश्राव्य शाखेचे नाव बदलून ते वृत्तचित्र शाखा केले.हेच नाव आजतागायत चालू आहे.) वरिष्ठ सहायक संचालक म्हणून मी (देवेंद्र भुजबळ) अशी बैठक झाली.
बैठकीची तारीख होती १७ एप्रिल १९९७ आणि वेळ होती सकाळी अकरा वाजता.या बैठकीच्या अनुषंगाने पंतप्रधान यांच्या सचिवांनी तत्काळ दिल्लीत असलेल्या तत्कालीन माहिती व नभोवाणी मंत्रालयाच्या सचिवांना फोन केला. त्यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेअंती असा निर्णय घेण्यात आला की, “प्रसारण” हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्यामुळे राज्य सरकारला स्वतंत्र दूरचित्रवाणी वाहिनी सुरू करण्यास जरी परवानगी देता येत नसली तरी, त्या ऐवजी “मायमराठी वाहिनी” तील वाहिनी हा शब्द काढून फक्त “माय मराठी” या नावाने मुंबई दूरदर्शन केंद्रावरून प्रायोजक तत्वावर (वेळ विकत घेऊन) अर्ध्या तासाचा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार, संध्याकाळी ६ ते ६.३० या वेळेत सुरू करण्यात यावा. याच बैठकीत हा कार्यक्रम महाराष्ट्र दिनापासून म्हणजे १ मे १९९७ पासून सुरु करण्याचा निर्णय ही घेण्यात आला.
“माय मराठी” कार्यक्रम सुरू करण्याचा शुभारंभ म्हणून काही तरी कृती घडायला हवी होती. म्हणून मी आमच्या प्रदर्शने शाखेत एक व्हि एच एस कॅसेट घेऊन गेलो आणि तेथील कलाकाराकडून कॅसेट ला छानसा रंगीत कागद लावून त्या वर “माय मराठी” असे वळणदार, आर्टिस्टिक स्वरूपात लिहून घेऊन पुन्हा दुपारी राजभवनात पोहोचलो.
तो पर्यंत राजभवन मध्ये सुंदर बँक ड्रॉप, मोठी समई अशी सर्व जय्यत तयारी करण्यात आली होती. दीप प्रज्वलन केले. ती कॅसेट पंतप्रधान आणि सर्व उपस्थित मान्यवर यांनी हातात धरून छायाचित्रे काढल्या गेली. टिव्ही कव्हरेज करण्यात आले आणि अशा प्रकारे “माय मराठी” कार्यक्रम १ मे १९९७ पासून सुरु होणार असल्याचे जाहीर करण्यात आले !
या निर्णयानुसार मुंबई दूरदर्शन केंद्राशी आवश्यक ते करार मदार करणे सुरू झाले. खरं म्हणजे, हे फार मोठे दिव्य होते कारण हातात एकही कार्यक्रम (ज्याला बँक म्हणतात) नसताना, कार्यक्रमांची काहीच रुपरेषा (दूरदर्शन च्या भाषेत फिक्स पॉईंट चार्ट) तयार नसल्यामुळे, त्यांचे संहिता लेखन, चित्रीकरण, संकलन या सर्वांसाठी आवश्यक टीम अशी काहीही पूर्व तयारी न करता कार्यक्रम सुरु करण्याचे ठरले होते. पुढे काय काय घडत गेले, कसे कसे घडत गेले हे लिहित बसलो तर त्याचीच एक मालिका होईल ! म्हणून तुर्तास इतकेच…

— लेखन : देवेंद्र भुजबळ. निवृत माहिती संचालक, नवी मुंबई.
— छायाचित्रण : गिरीश देशमुख.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800