Sunday, July 6, 2025
Homeलेख"माहिती"तील आठवणी (६)

“माहिती”तील आठवणी (६)

अंजुची धडाडी

प्रिय वाचकांनो, नमस्कार.
“माहिती”तील आठवणीत आपले स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात कार्य करून गेलेल्यांच्या आठवणी आपण यापूर्वी वाचल्यात. त्या सर्व पुरुषांच्या व त्यात पुन्हा सेवा निवृत्त झालेल्यांच्या होत्या. त्या आठवणींना छानच प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार.

त्या सर्व आठवणी पुरुषांच्याच असल्याने, कदाचित आपल्या पैकी काहींना असं वाटण्याची शक्यता आहे की, माहिती खात्यात महिला कामच करत नाहीत की काय ? तर तसे अजिबात नाही.
या खात्यात महिलासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. उलट कामाच्या अनिश्चित वेळा, सुटीच्या दिवशी ऐनवेळी येणारी कामे, सणवारी सुद्धा कामे करण्याची वेळ येणे, यामुळे महिलांसाठी तर हे खाते अधिक आव्हानात्मक ठरते. अर्थात
२५/३० वर्षांपूर्वी महिलांचे प्रमाण खूपच कमी होते. पण आता ते लक्षणीय आहे. असो….

तर आज आपल्याला आठवणी सांगताहेत, नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रात माहिती अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सौ अंजू कांबळे निमसरकर यांच्या….

जगभर कोरोनाचा वाढता प्रार्दुभावाला थांबविण्यासाठी वेगवेगळी पाऊले उचलली जात होती. यातच भारत सरकारने देश भर 24 मार्च 2020 पासून लॉकडाऊनचा निर्णय घेतला. ‘जे लोक जिथे असतील त्यांनी तिथेच राहावे’ त्यांच्या जीवनावश्यक गरजांची सोय शासन यावेळी पुर्ण करेल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते.

व्यवसाय, नोकरी करणा-यांना घरीच राहण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. ज्यांची कामे घरून होत असतील त्यांनी ती कामे घरी राहूनच करावी, केवळ जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, औषधी विक्रेत्यांची दुकानांना यातून वगळण्यात आलेले होते. यासह आवश्यक सेवेमध्ये मोडणा-या अधिकारी, कर्मचारी यांना आळीपाळीने येण्याची सोय लॉकडाऊन असेपर्यंत राहणार होती. ही सर्व व्यवस्था कोरोनाचा संसर्ग होऊ नये, प्रकोप वाढू नये या दृष्टीने करण्यात आलेली होती.

महाराष्ट्र शासनानेही वेगवेगळया उपयायोजना आखून प्रत्येकाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तात्पुरत्या निवा-याची, जेवणाची, आदि सुविधा उपलब्ध करून देण्यात येत होत्या.

अशा बिकट परिस्थितीत माझ्या बाबांचे निधन 15 मार्चला झाल्यामुळे मी दिल्ली येथून नागपूरला आले. प्रथेप्रमाणे सर्व सोपस्कार आटोपून मी 21 तारखेला अमरावती येथे सासरच्या नातेवाईकांकडे आले. रविवार दिनांक 22 तारखेला देशभर ‘जनता कर्फ्युं’ लावण्यात आला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुढे 24 तारखेपासून सुरक्षितेतेसाठी देशभर लॉकडाऊन घोषित केल्यामुळे मला नवी दिल्ली येथे जाता आले नाही. सर्वांनाच घरी रहावे लागत होते.
सरकारी यंत्रणा दिवसरात्र काम करत होत्या.

मी अमरावतीतील यशोदा नगर मध्ये नातेवाईकांकडे अडकून पडली. देशात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असताना मला नुसतं घरी रिकामं बसणं अपराधी पणाचं वाटू लागलं. म्हणून मी घरूनच, म्हणजे अमरावतीच्या घरात बसून शासकीय कामकाज करण्याची परवानगी मागितली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने लगेच मला तशी परवानगीही दिली. लॉक डाऊनमुळे घरीं कामाला मोलकरणी पण येऊ शकत नव्हती. त्यात मी पुन्हा मी सासर च्या घरी होते. दुर्दैवाने आपल्यात आजही सर्व घर कामे सूनेनेच करावीत अशी अपेक्षा असते. त्यामुळे सर्व घरकामासह मी शासकीय कामकाज करू लागले.

मी पाहिले होते की, घराच्या बाजुला असलेली ज्येष्ठ नागरीक पार्वताबाई गडलींग वय जवळपास 65 वर्ष असेल या एकटयाच राहतात. त्यांच्या मागे पुढे कुणीच नव्हते. या कठीण समयी शासनाच्यावतीने त्यांना महिनाभर पुरेल येवढे साहित्य पोलीसांमार्फत घरपोच मिळाले होते. यामध्ये तांदुळ, गव्हाचे पीठ, दाळ, तेल, तिखट, मीठ, चहापत्ती, साखर असे सर्व किराणा साहित्य होते. मी त्यांना शासनाकडून मिळालेल्या मदतीबद्दलची माहिती घेऊन, ती लिहून सर्व प्रसार माध्यमांना दिली.

तिथून पुढे, वातावरण सुरळीत होईस्तोवर मी वरिष्ठांच्या सूचनांनुसार घरी बसूनच काम करत राहिले.
कोरोनाच्या महा भयानक काळात मी नुसती घरी बसून न राहता, मला शक्य ती सेवा बजावू शकले, याचे मला जीवनभर समाधान मिळत राहील.

अंजु निमसरकर

– लेखन : अंजु निमसरकर. माहिती अधिकारी
नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. खरचं अंजू तशी धडाडीचीच आहे. आणि धडाडीच्या माणसाला रिकामपण पचत नाही. म्हणूनच तर तीने परिस्थितीचा फायदा घेतला नाही. याही परिस्थितीत कार्यरत राहीली. अंजू मंत्रालयात असतांना कधीतरी कामानिमित्ताने एडीटींग मधे आली की बोलणे होत असे. वाढदिवसाची शुभेच्छा देण्यासाठी फोनवर बोलणे झाले असता अंजूने वडीलांच्या निधनाची आणि लॉकडाऊनमुळे अडकल्याची आमची चर्चा झाली होती.
    अंजू फेसबूकवरही कायम लिहीत असते. दिल्लीला महाराष्ट्राच्या चित्ररथाची वेगवेगळी चित्रे आणि बाईटस् रेकाॕर्ड असलेला मोबाईल पावसाच्या चिखलात तीच्या हातून पडला नंतर तो चांगला सुकवून चालू करुन निवेदिता मॕडमच्या सोबतीने पाठवलेल्या फोटोंची आठवणही स्मरणात राहणारी अशीच आहे. अंजू ही आठवण पून्हा “न्यूज स्टोरी” मधून प्रसारीत करायला हरकत नाही.
    अंजूला पूढील वाटचाली साठी शुभेच्छा..!

  2. कोरोना काळात घरात नुसते बसून राहण्याऐवजी आपण घरुनच कामाची आस धरली ही गोष्ट प्रेरक आहे. कोणतेही संकट असो त्याची संधी करणे आणि स्वतःला कामात झोकून देणे हा विशेषत्वाने अंगीकारावा असा आपला गुण आहे. सुंदर लेखाबद्दल आपले तसेच आदरणीय मा. श्री भुजबळ साहेबांचे खूप खूप आभार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments