Monday, July 14, 2025
Homeलेख"माहिती"तील आठवणी ( ७ )

“माहिती”तील आठवणी ( ७ )

राजेंद्र मोहिते
“माहिती”तील आठवणीच्या, आजच्या सातव्या भागात आपल्या आठवणी सांगताहेत, बहुतेक सर्व सेवा कोकणातील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये बजावलेले, एक कार्यक्षम, उत्कृष्ट जनसंपर्क असलेले, असे नाव मिळविलेले सहकारी राजेंद्र मोहिते…..

मी, राजेंद्र भार्गव मोहिते रायगड जिल्ह्यातील पेण येथील काका मनोहर चाळीत, माझे वडील कै.भार्गवराव यशवंत मोहिते यांच्या घरात राहत आहे.

माझे शिक्षण चौथी पर्यत शिशूविकास मंदिर पेण येथे तर पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण पेण प्रायव्हेट हायस्कूल येथे, त्यानंतर अकरावी, बारावीचे शिक्षण ज्युनिअर कॉलेज पेण येथे झाले.

एकदा माझे मित्र नितीन वैरागी यांच्याकडे आम्ही सर्व मित्रमंडळी गप्पा मारत बसलो असताना ज्येष्ठ पत्रकार दशरथ कृ.वैरागी यांनी नितीनला विचारले, आपल्या पैकी बारावी पास कोण आहे ? तर लगेच नितीन बोलला, राजू मोहिते आणि त्याने माझ्याकडे बोट दाखविले. त्यामुळे मला 1985 मध्ये दोन महिन्यासाठी तात्पूरत्या पदावर कोकण विभागीय माहिती कार्यालयात लिपिक-टंकलेखक या पदावर काम करण्याची संधी मिळाली. नंतर परत तीन महिने असे, तिथे काम करण्याची संधी मिळाली.

माझे काम बघितल्यावर त्यावेळचे माझे बॉस कै.प्रभाकर पुराणिक, उपसंचालक (माहिती) कोकण विभाग यांनी दि. 21 फेब्रुवारी 1986 रोजी कोकण विभागीय माहिती कार्यालयात लिपिक-टंकलेखक या पदावर मला नव्याने रुजू करून घेतले. त्यानंतर दि. 3 जुलै 1987 रोजी जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे येथे तर जिल्हा माहिती कार्यालय, रायगड येथे सर्वसाधारण सहायक या पदावर दि.11 ऑगस्ट, 1987 रोजी रुजू झालो.

त्यावेळी जिल्हा माहिती अधिकारी कै.अविनाश सोनावणे साहेब हे होते. त्यांच्या कडे बरेच काही शिकायला मिळाले. पहिले म्हणजे कामावर वेळेत हजर राहायचे. जे टपाल येईल त्याचे उत्तर त्याच दिवशी देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. तेव्हापासून न चुकता सेवानिवृत्ती होईपर्यंत जे जे टपाल माझ्याकडे येई ते मी लगेच उत्तर तयार करुन देत असे.

त्यानंतर श्री.अजय अंबेकर साहेब यांच्या कालावधीत काम करण्याची संधी मिळाली. त्यांची बदली झाल्यानंतर श्री.देवेंद्र भुजबळ साहेब याच्या कालावधीत आस्थापना व लेखा विषयक काम करत असतानाच, वृत्त कसे करायचे त्याबाबतचे ज्ञान मिळाले. त्यानंतर श्री.विजय पवार साहेब मग अतिरिक्त कार्यभार मनोहर मोरे, श्री.नांदेडकर साहेब असे अधिका-यांसोबत काम करण्याची संधी मिळाली.

अलिबाग येथे 13 वर्ष काम करीत असताना कोषागार कार्यालयातील श्री.आर.एस.पाटील, श्री.शरद हेंद्रे असे अनेक जण माझे मित्र झाले. त्यांनी कोषागार कार्यालयात बिले कशी तपासली जातात ? त्याची माहिती व प्रत्यक्षिक दाखविले. त्यामुळे माझी सर्व लेखा विषयक कामे वेळेत व व्यवस्थित पूर्ण होवू लागली. कोणताही आक्षेप न लागता बिले कोषागारात पास होत होत. तेथे मार्च महिन्यात मला प्रवास भत्ता व इतर बिले तपासायला बोलवायचे. मी माझी सर्व कामे पार पाडून त्यांना मदत करे. असा मला अनुभव प्राप्त झाला. त्यानंतर श्री.शरद हेंद्रे आणि मी कोषागार कार्यालयातील सहकाऱ्यांना त्यांच्या सततच्या ८ तासाच्या कामातून एक दिवस रिल्याक्स मिळावा या हेतूने सुट्टीच्या दिवशी पर्यटन ट्रिप सुरू केली.

वरील अधिकाऱ्यांपैकी श्री.देवेंद्र भुजबळ साहेब यांचा आमच्या कोकण विभागाचे माहिती उपसंचालक म्हणून नऊ दहा वर्षाचा सहवास लाभला. माझी बदली श्री.भुजबळ साहेब यांनी नियमानुसार केल्याने रत्नागिरी येथे लिपिक टंकलेखक यापदावर मी दि. 4 जून 2000 रोजी रुजू झालो. त्यावेळी प्र.जिल्हा माहिती अधिकारी डॉ.पुरषोत्तम पाटोदकर होते. त्यांच्या कालावधीत बातम्या तयार करणे, लेख लिहिणे, तसेच दूरदर्शन कॅमेरा व छायाचित्र कॅमेरा चालविण्याचे प्रशिक्षण मिळाले. त्यावेळचे माझे सहकारी सिनेयंत्रचालक श्री.विलास जोशी हे नेमके मंत्रीमहोदयांचे दौरे आल्यावार गैरहजर राहायचे. त्यांच्या पश्च्यात मी कॅमेरा चालवायचो व दूरदर्शनला कॅसेट व बातमी पाठवायचो.

डॉ.पाटोदकर साहेब यांनी त्यांच्या कारकिर्दीत एक संकल्पना मला सांगितली की, आपण 101 दिवसात 101 लेख तयार करुन वृत्तपत्रांना द्यायचे. त्या प्रमाणे ते स्वत: लेख लिहायचे व आम्हाला मार्गदर्शन करायचे.
अशा प्रकारे मत्सव्यवसाय, कृषी विभाग आणि अन्य शासकीय कार्यालयात जावून माहिती गोळा करुन त्यावर लेख लिहायला आम्हाला शिकवले. या मोहिमेत मी माहिती गोळा करून 15 लेख लिहीले. विशेष म्हणजे ते सर्व दैनिके व साप्ताहिकांमध्ये प्रसिध्द झाले.

त्यानंतर कोकण भवनचे सहायक संचालक डॉ.संभाजी खराट साहेब यांच्याकडे जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरीचा प्रभारी कार्यभार आला. त्यांच्या कालावधीत त्यांच्या तीन पुस्तकांच्या टंकलेखनाचे काम मी केले. त्यातील दोन पुस्तकांमध्ये माझे नावही आहे.

डॉ.खराट साहेबांच्या काळात शासनाची घडीपत्रिका, दूरध्वनी पुस्तिका, आंबा महोत्सवाची पुस्तिका यांच्या प्रकाशनात माझा प्रत्यक्ष सहभाग होता. तर मँगो पल्प कारखान्यात कसा तयार करतात ते चित्रीकरण मालगुंड येथील आंबा पल्प कारखान्यात केले. त्याची स्टोरी दूरदर्शनवर प्रसिध्द झाली. या स्टोरीचे चित्रीकरण मी स्वत: कार्यालयाच्या दूरदर्शन कॅमेरावर केले होते. हा माझा पहिला अनुभव होता. खुप छान वाटले. डॉ.खराट यांची ती संकल्पना होती.

त्यांच्याच काळात एकदा मा.मुख्यमंत्री महोदयांचा दौरा गुहागर गॅस कंपनीच्या वेळेस आला. डॉ.खराट साहेब हे कोकण विभागाचे सहाय्यक संचालक (माहिती) होते, ते त्यावेळेस कोकण भवनला होते. अचानक आलेल्या या कार्यक्रमासाठी गुहागरला यायला त्यांना उशीर झाला. पत्यावेळेस मी स्वत: दोन्ही कॅमेरे घेवून मा.मुख्यमंत्री महोदयांचा कार्यक्रम कव्हर केला. त्याची बातमीही तयार करुन खराट साहेबांना दिली. त्यांनी माझे मनापासून आभार मानले. मी एक साधा लिपिक-टंकलेखक असतानाचा हा एक अविस्मणीय अनुभव मला त्यावेळी मिळाला.

सन 2002 मध्ये माझा “रत्नागरी जिल्हा: फलोत्पादनात अग्रेसर” हा लेख मुंबईच्या लोकप्रिय दै.नवाकाळ मध्ये प्रसिध्द झाला. अख्या महाराष्ट्रात माझे नाव झाले. मला खुप शुभेच्छा आल्या. पण माझ्या माहिती व जनसंपर्क खात्याने मला एकही शुभेच्छा दिली नाही, ही एक खंत वाटली. असो.

मा.श्री.भुजबळ साहेबांनी दूरदर्शनसाठी दापोली येथील कृषी विद्यापिठामधील एक स्टोरी केली होती. त्यावेळेस तेथे दूरदर्शनचे टी.व्ही युनिट आले होते. त्यांचे भले मोठे कॅमेरे होते. दापोली कृषी विद्यापिठाची स्टोरी करताना दूरदर्शनच्या कॅमेरामनने आम्हाला प्रशिक्षण पण दिले. तो वेगळाच अनुभव मला श्री.भुजबळ साहेबांमुळे मिळाला. त्यांचा मी आभारी आहे.

या कालावधीत माझे बरेच पत्रकार मित्र झाले. बऱ्याच पत्रकारांना अधिकास्वीकृती पत्रिका म्हणजे काय असते ? याची माहितीच नव्हती. त्यांना मी गाईड करुन अर्ज सादर करण्यास सांगितले.

या कालावधीत पत्रकारांसमवेत मी जिल्ह्याबाहेर पत्रकार दौरेही केलेत. खुप फिरलो. पालकमंत्री व इतर मंत्री महोदयांच्या दौऱ्यांमुळे पूर्ण रत्नागिरी जिल्हा पाहिला. त्याचे फायदेही खूप झाले. खूप काही शिकायला मिळाले.

श्री.अविनाश सोनावणे साहेब हे कोकण विभागाचे माहिती उपसंचालक झाल्यावर त्यांनी माझी सेवा कोकण भवन येथे घेतली. तेथेही त्यांच्या समवेत काम करताना खुप अनुभव आलेत.

एकदा अधिस्वीकृती बैठकीसाठी नागपुर येथे गेलो असता सोनावणे साहेबांना एक उच्च अधिकारी म्हणाले, बैठकीसाठी यांना कसे घेवून आलात ? त्यावेळी सोनावणे साहेब म्हणाले,हा माझा कर्मचारी आहे. त्याला अधिस्वीकृती कार्यपद्धतीचे खूप चांगले ज्ञान आहे, म्हणून घेवून आलो आहे. म्हणजे मी जे काम केले त्याचे हे फळ होते !

त्यानंतर माझी बदली दि.1 मार्च 2008 रोजी जिल्हा माहिती कार्यालय, अलिबाग येथे दूरमुद्रणचालक-नि-
टंकलेखक म्हणून झाली. श्रीमती वर्षा शेडगे मॅडम ह्या जिल्हा माहिती अधिकारी होत्या. त्यांच्याकडे माहिती उपसंचालक, कोकण भवनचा अतिरिक्त कार्यभार होता.त्यावेळेस त्यांना रायगडचे पालकमंत्री ना.सुनिल तटकरे साहेब यांच्या कार्यकमास जाता येत नसे .मी अलिबागला हजर झाल्यापासून पालकमंत्री महोदयांचे सतत तीन वर्षे दौरे करीत होतो. ना.तटकरे साहेबांनीही मला नेहमीच एका अधिकाऱ्यासारखी वागणूक दिली. त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो.

सन 2008 ते सन 2014 या कालावधीत मी अलिबाग येथे असताना रायगड जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी भांगे साहेब यांनीही विधानसभा निवडणूकीमध्ये मला अधिकाऱ्यासारखाच दर्जा दिला. त्यांनी माझे प्रसिध्दीचे काम पाहून पत्रकार परिषेदेत सर्व पत्रकारांसमोर माझी स्तुती केली. जिल्हा माहिती अधिकारी पद रिक्त असताना एखाद्या अधिकाऱ्याला लाजवेल असे काम केले, असे त्यांनी सांगितले. अजूनही मी त्यांच्या संपर्कात आहे.

सन 2012 साली डॉ.गणेश मुळे साहेब यांची बदली माहिती उपसंचालक, कोकण विभाग म्हणून झाली. त्यांनी पण माझ्या कामाचे नेहमीच कौतुक केले.

माझ्या 36 वर्षाच्या कारर्किदीत कै.र.दे.वसावे, श्री.अनिरुध्द अष्टपुत्रे, श्री.संजय देशमुख अशा चांगल्या अधिकाऱ्यांची मला साथ मिळाली. या कारर्किदीत मला कर्मचाऱ्यांचीही चांगली साथ मिळाली.

आमची कुलस्वामिनी तुळजाभवानी, आमचे दैवत कानिफनाथ महाराज यांच्या आशिर्वादाने गुरुवार, ३१ मार्च २०२२ रोजी मी शासकीय सेवेतून यशस्वीरित्या, कोणत्याही चौकशीविना सेवानिवृत्त झालो.

या संपूर्ण शासकीय नोकरीमध्ये माझ्या पत्नीने मला मोलाची साथ दिली.ऐनवेळी, सुट्ट्यांच्या दिवशीही मला दौऱ्यावर जावे लागत असे. तिला मी वेळ कमी दिला आणि नोकरीला वेळ जास्त दिला.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामुळे मला चांगले संपादक, पत्रकार, वार्ताहर यांच्या सारखे मित्र भेटले. या खात्याचा मी ऋणी आहे.

राजेंद्र मोहिते

– लेखन : राजेंद्र मोहिते. पेण, जि:रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. श्री मोहिते म्हणजे कोकण विभागातील माहिती कार्यालयातील सर्व बाबतीतील जाणकार कोष. मी त्यांच्याशी आस्थापना शाखेतील कामांकरिता नेहमी संपर्कात असायचो. अगदी ते रजेवर असले तरी ते मोबाईलवर कार्यालयीन कामांसाठी तत्पर असायचे. काही वेळा रजेवर असतानांच आॅफीसमध्ये कोणता संदर्भ कोठे ठेवला आहे हे सांगून वेळेत पूर्तता करायचे. कोणत्याही कारणाने काम खोळंबता कामा नये यासाठी त्यांची तत्परता अगदी वाखाणण्याजोगी होती. खूपच छान लेख

  2. छान 👌👌👌. एकमेकि साह्य करू ,अवघे धरु सुपंथे 👍👍

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments