महाराष्ट्र शासनाच्या, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात, ज्याचं लोकप्रिय नाव माहिती खातं आहे, त्यात काम केलेल्या/करीत असलेल्यांच्या आठवणी आपण आज पासून दर शनिवारी प्रसिद्ध करीत आहोत. अवघे 88 वय असलेल्या श्री शेषराव चव्हाण यांच्या आठवणी त्यांच्याच शब्दात….
मी १९६४ ते १९६६ च्या दरम्यान औरंगाबादला जिल्हा प्रसिद्धी अधिकारी होतो. माझ्या कार्यकाळात २ अविस्मरणीय प्रसंग घडले. ते भारत पाकिस्तान युद्धाचे दिवस होतें. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते. पाकिस्तान विरुद्ध वातावरण तापवण्या साठी ते महाराष्ट्राचा काणाकोपरा पालथा घालत होते. त्यांच्या सर्व सभा उशिरा पर्यंत चालत.

एकदा अशीच एक रात्री उशिरापर्यंत चाललेली सभा आटोपुन नाईकसाहेब सुभेदारी गेस्ट हाऊसला परतले आणि त्यांच्या कक्षात झोपी गेले. पहाटे २ च्या सुमारास मी सुभेदारी गेस्ट हाऊसला गेलो आणि मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव काशीकर यांना मुख्यमंत्र्याना उठविण्याची विनंती केली. अशा अवेळी त्यांना उठविणे योग्य होणार नाही, असे सांगून त्यांनी मुळात उठविण्याचे कारण विचारले.
मी त्यांना सांगितले की, आपण मुख्यमंत्र्यांना उठवा तर खरे, ते अजिबात रागविणार नाही. त्यांनतर काशीकरांनी मुख्यमंत्र्यांना उठवून जिल्हा प्रसिद्धी अधिकारी आपल्याला काही अती महत्वाचं सांगू इच्छितात, असं त्यांना सांगितलं. नाईकसाहेब बाहेर आले आणि त्यांनी मला काय आहे ? असें विचारले. मी त्यांना सांगितले की, गुजरातचे मुख्यमंत्री बलवंतराय मेहता यांचे विमान अपघातात निधन झाले असून त्यांच्या निधनाविषयीचा शोक संदेश लगेच हवा आहे, जेणेकरून तो आकाशवाणीच्या सकाळच्या पहिल्याच बातमींपत्रात प्रसारित होऊ शकेल. हे ऐकून त्यांनी लगेच त्यांचा शोक संदेश डिकटेट केला. तो सकाळच्या बातम्यात प्रसारित होण्याची पुढील योग्य ती कार्यवाही मीं केली. आकाशवाणीवर प्रसारित झालेला संदेश ऐकून नाईकसाहेब माझ्या समयसूचकते वर खुश झाले. पुढे ते जेव्हा जेव्हा औरंगाबादला येत असत, तेव्हा तेव्हा मला बोलावून माझ्या खांद्यावर हात ठेवून माझी विचारपूस करत. असें होते नाईकसाहेब !
माझी दुसरी अविस्मरणीय आठवण आहे, ती म्हणजे भारत पाकिस्तान च्या युद्धादरम्यान पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची औरंगाबाद ला झालेली भेट.

त्यावेळी माझे वरिष्ठ अधिकारी, विभागीय प्रसिद्धी अधिकारी (ज्यांचे पदनाम आता विभागीय उपसंचालक असें झाले आहे) हे कुप्रसिद्ध होते. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा संरक्षण समिती नेमण्यात आली होती. जिल्हा प्रसिद्धी अधिकारी हे त्या समितीचे सचिव होते. पंतप्रधान या समितीला संबोधित करणार होते. त्यावेळचे जिल्हाधिकारी रझवी हे विभागीय प्रसिद्धी अधिकारी यांच्या भूमिकेबाबत साशंक होते. त्यामुळे
जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना समितीच्या बैठकीपासून दूर ठेवा, अशा सूचना मला दिल्या.
माझ्यापुढे तर धर्म संकट उभे राहिले. म्हणुन मीं जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की, विभागीय प्रसिद्धी अधिकार्यांचा अहंकार दुखावला जाऊ नये म्हणुन त्याना हॉल बाहेर असलेल्या पत्रकारांना युद्ध विषयक प्रसिद्धी साहित्य वाटण्याची जबाबदारी देऊ या. ही कल्पना चांगलीच फळास आली आणि जिल्हाधिकाऱ्यांना हायसे वाटले. जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे विमान तळावर स्वागत करण्याची जबाबदारींही माझ्यावर सोपविली. पुढे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बंद दाराआड बैठक झाली.
त्या बैठकीतील शास्त्रीजींचे शब्द अजुन माझ्या कानात गुंजतात. ते म्हणाले, “पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले होते की, हा धोतरवाला आमच्याशी काय लढणार ? पण या धोतरवाल्यानेच पाकिस्तानला भारतापुढे गुडघे टेकण्यास भाग पाडले” पुढे शास्त्रीजींचे ताशकंद येथे दुर्दैवी निधन झाले आणि देश शोकसागरात बुडाला.

– लेखन : शेषराव चव्हाण, औरंगाबाद.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800