” ‘मा’ ती “ हा कवयित्री लतिका चौधरी यांचा अस्सल मराठी मातीतील काव्यसंग्रह ! या काव्यसंग्रहाला जसा इथल्या मातीचा सुगंध आहे तसाच स्त्रीत्वाचा, माणुसकीचा स्पर्शही आहे.
पहिल्याच “हे आई” या कवितेत ‘आईचा’ घेतलेला परामर्श अखिल स्त्री जातीचा आढावा घेणारा तर वाटतोच पण प्रत्येक स्त्रीला त्यातून आपली आई गवसावी एवढे सामर्थ्य या कवितेचे आहे.
“काया तुझी रापली रणरणत्या उन्हात,
भाजला जीव तुझा धगधगत्या चुल्हांगणात”
कवितेत ‘चुल्हांगण‘ सारखे शब्द निश्चितच काहीतरी वेगळेपण देऊन जातात आणि नाविन्याचा साक्षात्कार घडवतात, तर “भेट तुझी-माझी” कवितेत मनातील धग कवितेच्या शब्दाशब्दांतून जाणवते आणि शेवटी कवयित्री या अबोल आसवांना वाट करून देते. “ओंजळ” कवितेत उत्तुंग आशावाद कवयित्री व्यक्त करताना दिसतात. वसंतामुळे, श्रावण बहरण्यामुळे ओंजळ भरून येण्याचा आणि पानगळीला आव्हान देण्याचा सकारात्मक विचार या कवितेतून उमाळून येतो.
‘तृण’ या कवितेत उपेक्षितांचे दुःख दिसतेच पण कवयित्री ‘तृणपाती’च्या माध्यमातून अवघ्या स्त्री जातीचे दुर्मुखलेपण, दुर्लक्षलेले जिणे साकार करते.
‘रोप‘ कवितेचा छोटेखानी रुबाब ही न्यारा आहे कारण मनाच्या प्रांगणात लावलेल्या या रोपाला प्रेमाचे खत-पाणी अलवारपणे कवयित्री घालत आहेत आणि मग ही मनःबाग फुलून न येईल तर काय ?
‘वडाचा महिमा‘ या कवितेत “नको वरपांगी आचरण” असा नकळत कविमन सल्ला देऊन जातं. वडाच्या झाडाचा सर्व प्रकारचा महिमा या कवितेतून व्यक्त होतो.
‘वसंतचे रिमिक्स‘ कवितेत दिखाऊपणा च्या वृत्तीवर अनाहूत ताशेरे कवयित्री ओढते पण ते वाचकमनास स्वीकारार्ह ठरतील अशा विचारांनी ओतप्रोत असल्याने कवितेचा बाज वेगळ्या प्रकारे राखला गेला आहे .
‘डहाळी‘ कवितेत नदीकाठच्या बहरलेल्या झाडावरील सुंदर डवरलेल्या हिरव्या फांदीचे वर्णन बीजकणाचे रोपणही नवजन्माच्या रोपणासाठी कसे होते हा आशय घेऊन येणारा हा सोहळा मन मोहून टाकतो.
“निसर्ग… सख्या” कवितेतच आर्त साद घालून निसर्गाच्या कलाकारीचं सर्वदूर उमटणारं चित्र या कवितेत अलगद मोजक्या शब्दातून रेखाटलं आहे, तर “श्रावण सडा” कवितेत क्षणात श्रावणातील ती रिमझिम, तो शालू हिरवा आणि सोबत कवयित्री “सुकल्या हिरदाचा झाकतो तडा” या कवितेत हिरदा सारख्या नवीन वेगळ्या शब्दांचा वापर सहजतेने करून अवघी श्रावण कळा साकारताना दिसतात.
‘झाड आणि माणूस’ कवितेत सृजनाचा कवयित्रीने घडवलेला अविष्कार केवळ अफलातूनच !
“तो जाणतो सृजनकळा… प्रसवयातना, ‘बी’ अन् ‘बाई’च्या” शब्द न शब्द जणू जिवंत होतो आणि शब्दालाच अंकुर फुटताना जाणवतो.
तसेच ‘दीन बळीराजा‘ या कवितेत कृषिप्रधान भारतातील शेतकऱ्यांच्या जीवनातील अथक मेहनतीनंतरचा विस्तव आणि शब्दांतील वास्तव अप्रतिमपणे कवयित्री लतिका चौधरी यांनी मांडले आहे आणि अस्मानी-सुलतानी संकटा सोबतच केल्या जाणाऱ्या जुल्मांवर ताशेरे ओढून झणझणीत अंजन घातले आहे.
पण मुळात कवयित्रीची लेखणी बंडखोर नाही तर संयत, संयमी असल्याने शब्दा- शब्दातून आशावाद जाणवतो.
“मामाचे पत्र हरवले” ही कविता रसिकजनांस थेट बालपणीच्या अधिराज्यात घेऊन जाऊन सर्व प्रकारच्या खेळातून शिकवलेल्या विविधांगी गुणांचा परामर्श घेणारी हलकी-फुलकी कविता ठरते. ‘पुस्तकं‘ या कवितेत पुस्तकाचे दीपस्तंभत्व आणि कवयित्रीची पुस्तकांची जवळीक यातून पुस्तकांसोबत वावरताना तीचेच पुस्तक होऊन जाणे, वाचनाप्रति कवयित्रीच्या मनातील आपलेपण आणि अद्वैतभाव दिसून येतो.
‘डिजिटल‘ कवितेत गावच्या मातीतील भाषेतून आजच्या ‘डिजिटल इंडिया’ साकारताना फायद्या सोबत आपोआपच आलेले तोटेही सहजतेने शब्दांकित झाले आहेत.
‘अंधश्रद्धा‘ ही कविता थोडी वेगळ्या धाटणीची, संत काव्याची आठवण व्हावी अशी! कष्टाचे सामर्थ्य सांगून ज्ञान- विज्ञानाची कास धरण्यास कवयित्री या कवितेत सांगते.
‘हत्या- आत्म्याची‘ या कवितेत विश्वपसाऱ्यात माणूस प्रार्थना, प्रतिज्ञा आणि सुख शांती पेरण्याची प्रेरणा पेरत राहतो ही सुंदर संकल्पना व्यक्त केली आहे .
‘अफवा‘ या कवितेत नसलेल्या गोष्टीही कर्णोपकर्णी कितीदा दाहक रूप धारण करतात आणि माणुसकी जणु नाहिशी झाल्याचा आभास होतो ही रोजच्या जीवनात घडणारी घटना कवितेत सुंदर रित्या व्यक्त झाली आहे.
“विठ्ठला” ह्या कवितेत ‘पाव रे विठ्ठला’ ते ‘वेदना संपली’ पर्यंत पूर्ण कवितेचा सुंदर प्रवास कवयित्रीने थोडक्या शब्दातून साकारला आहे.
‘दिवाळी‘ कवितेत अंतरीचा दीप कवयित्री जग उजळवण्यासाठी, चेतवण्याचा संदेश देतात. ‘सृजन‘ ही कविता जीवनाच्या प्रलयात मनाचा बंध सृजनाचा छंद बनताना दिसतो.
“दोंडाईचा” या आपल्या कवितेत कवयित्री आपल्या मातीतील झालेली स्थित्यंतरे रेखाटताना दिसतात. साहित्य, कला, उद्योग, प्रवास, लोकसंख्या, इतिहास, नगरपालिका, रेल्वे, व्यापार, बाजार, यात्रा, शेती- वाडी यांचा आढावा घेतच सर्वधर्मसमभाव व एकात्मतेचे सुंदर वर्णन म्हणजे कवयिञीचे गाव हे सारे या कवितेतून व्यक्त झाले आहे.
“बाई गं” या कवितेत स्त्रीला जगण्याच्या झाकोळापासून दूर जाऊन जगण्याच्या आशेचा किरण कवयित्री दाखवतात. “श्रावण” कवितेत कवयित्रीने उत्सवाची रांगोळी रेखली आहे.
“नदी आणि बाई” या कवितेत अमरावती आणि भोगावती नदीच्या मध्ये वसलेल्या माहेराचे सहजसुंदर वर्णन करताना प्रत्येक स्त्रीच्या मनातील माहेर आणि कवयित्रीचे माहेराबद्दलचे स्थान व्यक्त झाले आहे.
‘बाराखडी’, ‘नसते नदी फक्त’, ‘गुंता’, ‘ऋतुमती’ ‘हे सख्या- साजणा’, ‘लॉकडाउन’, ‘रेशीमगाठी’, ‘अमुची आक्का’, ‘अभंग’ विठ्ठलाचा’ ‘अभंग’ ‘झिजणाऱ्या हातांना वंदन’, ‘हायकू दगडाचे’ ‘आषाढ’, ‘हायकू’,’कस’, ‘तिमिराचा फडशा’ अशा सर्व कवितांचा स्वतःचा असा एक वेगळा आवाज आहे, बाज आहे, प्रत्येक कवितेत ‘मा’ती आहे मा मध्ये माॕ आहे आणि ‘ती’ देखील आहे. ‘मा’ती या कवितेत संपूर्ण कवितेचा आशय दडलेला आहे.” ‘ती’ होते माय अन् ‘ति’चे व ‘माय’चे दोघींचे होत राहते शोषण माती होईपर्यंत…” या लहानशा कवितेत आशयगर्भता तर जाणवतेच पण संपूर्ण कवितासंग्रहाचे ते जणू सार आहे.
या ‘मा’ती या कवितासंग्रहातील प्रत्येक कविता म्हणजे एक- एक स्त्री चा जणू इतिहास आहे, शब्दांआड दडलेला! स्त्रीचे गहिरेपण, ओलावा, वात्सल्य आणि तिने भोगलेली अवहेलना, दुःख, दारिद्र्य आणि कष्ट या सर्वांतून साकारलेली ‘ती’ आणि ‘मा’ म्हणजे आईपण, बाईपण या वरकरणी वेगळ्या दिसणाऱ्या पण आशयघन असणाऱ्या कवितेतून आईचे ‘ती’ पण आणि ‘ती’चे आई पण साकारताना कवितेचे रूप अनेक प्रवाहाने जाते आणि जे सांगायचे आहे ते नेमकेपणाने उमगते हेच या काव्यसंग्रहाचे यश आहे.
‘माती’ कविता संग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदररित्या साकारले आहे. त्यातूनही स्त्री आणि माती यांचे भावबंध दिसतात.
या मातीचे आणि ‘ती’ चेही अंतरंग सर्वार्थाने साकारणा-या काव्यसंग्रहास ज्येष्ठ साहित्यिक प्रल्हाद लुल्हेकर यांची प्रस्तावना लाभली आहे.
एकंदरीत ह्या कविता वाचताना अनेकविध पुस्तकांचे लेखन करणाऱ्या लतिका चौधरी यांच्या सिद्दहस्तेचा स्पर्श सतत जाणवत राहतो !!

– लेखन : डॉ. सुचिता पाटील
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.