Friday, December 26, 2025
Homeबातम्यामिशन आय ए एस :- विदर्भात नि:शुल्क - प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे

मिशन आय ए एस :- विदर्भात नि:शुल्क – प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे

स्पर्धा परीक्षा ही एक चळवळ व्हावी, त्याच बरोबर गोरगरीब, होतकरू युवक युवतीना योग्य मार्गदर्शन मिळावे या उदात्त हेतूने 22 वर्षांपूर्वी लावलेले ‘मिशन आय ए एस‘ चे छोटेसे रोपटे बहारदार वटवृक्षा समान झाले आहे, ही कल्पना कोणीही केली नव्हती. पण फक्त एक रुपयात स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणारी ही संस्था आज देश भर पसरत आहे.

‘मिशन आय ए एस’ चे उगमस्थान असलेल्या
विदर्भात मिशनच्या उपक्रमांनी अधिक जोर धरावा म्हणून या पुढे हे मिशन विदर्भात निःशुल्क राबविण्यात येईल, अशी घोषणा मिशनचे संस्थापक संचालक
प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे यांनी नुकतीच नागपूर मध्ये एका पत्रकार परिषदेत केली.

या पत्रपरिषदेला डॉ नरेशचंद्र काठोळे यांच्या सह श्री विकास भाऊ ढेंगे, प्रा. सुभाष नलांगे, प्रा. बी एन शिंदे, प्रा. ममता मून जावेद कुरेशी, प्रमोद जवादे, मुकेश कुमार साहू प्रवीण पटेल, तृप्ती सरोदे आदी उपस्थित होते.

मिशन ची माहिती
मिशन आयएएस या उपक्रमाचा शुभारंभ प्रधान सचिव श्री विकास खारगे यांच्या हस्ते १२ मे 2000 रोजी अमरावतीच्या दंत महाविद्यालयात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून श्री अभिनय कुंभार, आय आर एस .अमरावती महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त श्री धनराज खामतकर व प्रा.अमोल पाटील हे होते.

अमरावती शहरात स्पर्धा परीक्षेसाठी सुरू झालेला व विनामूल्य सेवा देणारा हा पहिला उपक्रम. त्यापूर्वी अमरावती शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी एकही ग्रंथालय किंवा अभ्यासिका उपलब्ध नव्हती. परंतु विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे कोषाध्यक्ष प्राचार्य श्री बाबुराव उर्फ अण्णासाहेब हिवसे यांनी पुढाकार घेतला व या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

या 22 वर्षात मिशन आयएएसमध्ये शेकडो आयएएस व राजपत्रित अधिकारी सहभागी झालेले आहेत. मिशन आयएएसने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत संस्कार शिबिरात या अधिकाऱ्यांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्य सचिव असताना, श्री जे पी डांगे यांनी एकूण तेरा कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला आहे.

त्याचबरोबर दुसरे मुख्य सचिव श्री रत्नाकर गायकवाड यांनी देखील या उपक्रमात भाग घेतला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आय ए एस. सनदी अधिकारी सहभागी झालेली मिशन आयएस ही भारतातील एकमेव संस्था आहे.

‘फक्त एक रुपयात
मिशन आयएएसतर्फे फक्त एक रुपयामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांनी दिवसाला एक रुपया याप्रमाणे वर्षाला 365 रुपये भरायचे. त्यामध्ये त्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके विनामूल्य देण्यात येतात. त्यांची परीक्षा घेण्यात येते. त्यांचे पेपर तपासण्यात येतात आणि त्यांना गुणपत्रिका व प्रमाणपत्र देखील देण्यात येते. फक्त एक रुपयामध्ये आयएएसची प्रशिक्षण देणारी ‘मिशन आयएएस’ सारखी दुसरी संस्था आज तरी अस्तित्वात नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे प्रशिक्षण दुसऱ्या वर्गापासून देण्यात येते. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेसाठी मानसिकता तयार करण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे.

कार्यशाळा
संपूर्ण भारतात मिशनच्या आज पर्यंत 15000 कार्यशाळा झाल्या आहेत. विशेष म्हणजे या कार्यशाळेसाठी मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे व त्यांचे सहकारी जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जातात तेव्हा कोणत्याही प्रकारचे मानधन घेत नाहीत.

त्यांच्या या कार्यशाळेमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून त्यामध्ये सुप्रसिद्ध सनदी अधिकारी श्री रमेश घोलप, आयएएस व श्री विशाल नरवाडे यांचा समावेश आहे.

या उपक्रमाला संपूर्ण भारतात उत्तम प्रतिसाद असून अशाप्रकारे पूर्ण भारतात स्पर्धा परीक्षा घेऊन मिशन आयएएसने व्यापक जनजागृती केली आहे.

लाँकडाऊन मधील कार्य गतवर्षी संपूर्ण भारतात लॉक डाऊन सुरू झाले. त्यामुळे विविध राज्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळा होऊ शकल्या नाहीत. त्यासाठी मिशन आयएएसने 5 जून 2020 पासून जय जवान जय किसान ही स्पर्धा परीक्षेला वाहिलेली व्याख्यानमाला सुरू केली. या व्याख्यानमालेमध्ये अनेक आयएएस आयपीएस सनदी व राजपत्रित अधिकारी व्याख्याते म्हणून आलेले आहेत.

याशिवाय विद्यार्थ्यांचा अधिकाऱ्यांचा सुसंवाद व्हावा यासाठी मिशन आयएएसने वेळोवेळी झूम मिटींगचे आयोजन करून विद्यार्थ्यांना वेगवेगळे सनदी व राजपत्रित अधिकारी उपलब्ध करून दिले आहेत. या उपक्रमाला देखील चांगला प्रतिसाद असून लोकांनी लाँकडाऊनच्या काळात या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे.

विद्यार्थ्यांचा सत्कार
मिशन आयएएसने गेल्या 22 वर्षात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आय ए एस या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आय ए एस झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी अमरावतीला आयोजित केला आहे. या सत्कारांमध्ये बरेचसे आयएएस टॉपर अमरावती शहरात येऊन गेले आहेत. त्यामध्ये भारतातून पहिली आलेली शेना अग्रवाल पंजाब, अमृतेश औरंगाबादकर, पुणे. राहुल रेखावार, नांदेड. शिप्रा आग्रे, लातूर, डाँ.विपीन इटणकर चंदिगड, डॉ.अश्विनी जोशी रत्नागिरी, संपदा मेहता पुणे, श्री विशाल नरवाडे बुलढाणा यांचा समावेश आहे. लाँकडाऊनमध्येही झूम मीटिंग द्वारे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड, माजी सनदी अधिकारी श्री किशोर गजभिये, माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे हे उपस्थित होते.

पुस्तकांचे प्रकाशन
मिशन आयएएसने स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यामध्ये मी आयएएस अधिकारी होणारच, शेतकऱ्याची मुले झाली कलेक्टर, स्पर्धा परीक्षेची ए बी सी डी, प्रेरणा स्पर्धा परीक्षेची, आनंदी रहा यशस्वी व्हा, विद्यार्थ्यांनो अधिकारी व्हा यासारख्या पुस्तकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे लाकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना ही पुस्तके ई-बुक स्वरूपात विनामूल्य वितरित करण्यात आली आहेत.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”