Tuesday, March 11, 2025
Homeलेखमी "कॉमन मॅन" बोलतोय !

मी “कॉमन मॅन” बोलतोय !

आर के लक्ष्मण चा कॉमन मॅन. तुम्ही विसरला असाल कदाचित. म्हणजे आजच्या पिढीला माहिती देखील नसेल कोण आर के लक्ष्मण, कोण कॉमन मॅन ! अनेक वर्षापूर्वी सकाळी उठून त्याचेच दर्शन व्हायचे टाइम्सच्या पहिल्या पानावर. चेकचा कोट घातलेला, काहीसा गबाळा दिसणारा, भांबावलेला, गरीब, तुमच्या आमच्यातला, वरपांगी बावळट वाटणारा, पण अवती भवतीच्या घटनावर, राजकारणावर कमीत कमी शब्दात तिखट भाष्य करणारा कॉमन मॅन. आज तो असता तर तुटून पडला असता या राजकारणी पुढाऱ्यांवर, स्वतःला समाजसेवक म्हणविणाऱ्या ढोंगी, भ्रष्टाचारी नेत्यावर !

आता आर के लक्ष्मण नाही, त्यांचा कॉमन मॅन नाही पण कुणीतरी ते काम करण्याची गरज आहे. सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्याची, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची खरेच गरज आहे. स्वातंत्र्यानंतर कधी नव्हे ते राजकारण चिखलाने अक्षरशा बरबटले आहे. अतिशय खालच्या स्तराला गेले आहे. निष्ठा, नैतिकता, या शब्दांची लक्तरे करून टाकली आहेत या मंडळींनी. चारित्र्यवान पुढारी दिवा घेऊन शोधावे लागतील अशी परिस्थिती आहे. “बहुमताने आलेली सत्ता, म्हणजे हवे तसे वागण्याचे, बोलण्याचे, वाटेल ते करण्याचे स्वातंत्र्य” असा अर्थ घेतला आहे या ढोंगी राजकारणी मंडळींनी ! पक्ष कुठलाही असो, सगळेच एका माळेचे मणी. कोण कुणाशी, का युती करतो, कोण कुणाचा हात धरतो, कुणाचा सोडतो, कुठल्या पक्षातून निवडून येतो, मग कुठल्या पक्षात जातो याचा काहीच भरवसा राहिला नाही.आपण यांना कुठल्या अपेक्षेने, विश्वासाने निवडून दिले, का निवडून दिले त्याच्याशी म्हणजे मतदारांशी यांचे आता काही देणे घेणे उरले नाही. एकदा का हे निवडून आले की मग ते अनभिषिक्त राजे झालेत. मग ज्यांनी निवडून दिले ती जनता गेली चुलीत! आमच्या सारखे कॉमन मॅन गेले खड्ड्यात ! आपण म्हणजे त्यांच्यासाठी किस झाडकी पतती!सत्तेवर आलेत की यांच्यासाठी भ्रष्टाचाराचे, अत्याचाराचे, रान मोकळे !

आम्हा पामरांना यांच्या राजकारणाचा नेमका अर्थच कळेनासा झाला आहे. यांची युती, यांची आघाडी, यांचे एकत्र येणे, हातात हात घालून ते वर करीत एकतेची ग्वाही देणे, मग एकमेकावर चिखलफेक करणे, हे राजकारणाचे सोयीचे गणित आमच्या समजुती पलीकडचे आहे. यांच्यापैकी काही तर उच्च शिक्षित आहेत. मोठमोठ्या संस्थेतले हुशार म्हणविणारे उच्च शिक्षित, सुसंस्कृत पदवीधर. त्यांना भ्रष्टाचार घालवायचा होता. साफ सफाई करायचा वसा घेऊन ते राजकारणात आले. स्वतःला निष्कलंक, स्वच्छ, निस्वार्थी म्हणविणारे हेच महालाची स्वप्ने बघायला लागले. सत्ता भोगायला लागले. चक्क जेलमधून सत्ता चालवायला लागले. आपले नियम, कायदा, संविधानाच्या सवलती कशाही वाकवून, त्याचे सोयीचे अर्थ लावून ही मंडळी न्यायालयाच्या देखील डोळ्यात धूळ फेक करीत आपला मुद्दा रेटून धरतात. त्यामुळे खरे काय, खोटे काय, न्याय अन्याय काय, चांगले वाईट काय याचे अर्थही बदलत चालले आहेत. हे काय गौडबंगाल आहे ते आमच्या सारख्या कॉमन मॅन ला कळेनासे झाले आहे.

किती मोठा विरोधाभास आहे हा ? आमच्यासाठी कायदे करणारी मंडळी स्वतःच कायदे पायदळी तुडवत आहेत. गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत. त्यात भागीदार आहेत. अन् वर स्वच्छ पारदर्शी प्रशासन, लोकांच्या भल्यासाठी निर्णय घेणारे शासन, अशा घोषणा देत आहेत ! ही संविधानाचीच प्रतारणा आहे. ज्यांनी यांना निवडून दिले, सत्तेत पाठवले त्या जनतेशी विश्वासघात आहे. ही एक प्रकारे लोकशाहीची विटंबना आहे.

हे असे एकाएकी कसे बिघडले, रसातळाला गेले हे देखील न उलगडणारे कोडेच आहे कॉमन मॅन साठी. कुणालाही कायद्याची भीती राहिलेली नाही. अगदी जेल मध्ये महिनोन महिने राहून आलेले देखील उजळ माथ्याने समाजात वाववरताना दिसतात. सत्ता भोगताना दिसतात. अन् कॉमन मॅन साठी मात्र नियम वेगळे. साध्या गुन्ह्याखाली देखील त्याला जेलमध्ये खितपत पडावे लागते. कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. साधा अपराध असला तरी त्याच्या नोकरीवर टाच येते. निलंबन होते म्हणजे या पुढाऱ्यासाठी नियम वेगळे. कॉमन मॅन साठी नियम वेगळे. न्याय वेगळा.
आता राजकारणाचे प्रचंड गुन्हेगारीकरण झाले आहे. ही मंडळी तरुण पिढीला नादी लावतात. त्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी गुन्हेगारीसाठी प्रवृत्त करतात. न शिकता, कष्ट न करता पैसा हाती खेळत असेल, मौज मजा करायला मिळत असेल तर ते कुणाला नको आहे ? अन् त्यातही मोठ्या वडाच्या सावलीत आरामात ऐश करायला मिळत असेल, थोडीफार प्रसिद्धी मिळत असेल तर कुणाला नको आहे ? आजची तरुण पिढी म्हणूनच या मृगजळामागे मोर्चात, आंदोलनात फरफटत वाहवत जाताना दिसते. कोवळ्या वयात गुन्हेगारी जगात आपले आयुष्य, भविष्य बरबाद करताना दिसते. कसलाही कामधंदा, उद्योग, व्यवसाय न करणाऱ्या या मंडळीकडे आलिशान गाड्या, हातात गळ्यात सोन्याचे दागिने येतात कुठून ? हे प्रश्न आहेत आमच्या सारख्या कॉमन मॅन चे. कशासाठी निवडून देतो आम्ही यांना ? कशासाठी होतात करोडो रुपये खर्च करून होणाऱ्या निवडणुका ? कशासाठी सर्व सामान्य जनता खर्च करते, कर भरते ? या सत्ताधाऱ्यासाठी ? आहे कुणाकडे उत्तर, स्पष्टीकरण ? कुठे चालला आहे हा सुजलाम सुफलाम म्हणवणारा देश, प्रदेश ? कोण करेल कॉमन मॅन चे शंका समाधान ?

केवळ तांत्रिक प्रगतीचा देखावा, वरवर दिसणाऱ्या सुखसोयी याला समृद्धीचा महामार्ग म्हणत नाही. जोपर्यंत देशाचा प्रत्येक नागरिक, कॉमन मॅन, स्वच्छ, प्रामाणिक, चारित्र्य संपन्न होणार नाही तो पर्यंत भारत भाग्य विधाता, विश्वगुरू होऊ शकणार नाही.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. कुलगुरु सरांनी पहिल्या परिच्छेदात ‘अवतीभवतीच्या घटनांवर, राजकारणावर कमीत कमी शब्दात तिखट भाष्य करणारा कॉमन मँन’ असा उल्लेख केलाय. यात मी थोडी दुरुस्ती करु इच्छितो. या कॉमन मँनचे वैशिष्ट्य म्हणजे तो अख्ख्या हयातीत चकार शब्द किंवा अवाक्षरही बोलला नाही. बोलायची ती त्याची सहधर्मचारिणी किंवा व्यंगचित्रातील इतर पात्रं. तो फक्त एक मूक साक्षीदार होता. मी १९९०-९१मध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये उपसंपादक होतो. तेव्हा बरेचदा आरके यांचं दर्शन व्हायचं. मोठा माणूस…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम