Wednesday, September 10, 2025
Homeकलामी ढोल वाजवलाच !

मी ढोल वाजवलाच !

खूप दिवसांपासून डोक्यात हा विषय भनभनत होता, हो हाच शब्द योग्य वाटतोय भनभनतच होता !!! टीव्हीवर मुलींना ढोल वाजवताना पाहिलं किंवा ढोल ताश्याची मिरवणूक पाहिली किंवा महिलांचं ढोल पथक बघितलं की त्यांच्याकडून ढोल काढून घ्यावा आणि आपण वाजवावा अशी इच्छा जागृत झाल्याशिवाय मी तिथून पुढे सरकत नसे. खूप वाटायचं, मला पण अस वाजवता यावं !!!, मी पण वाजवायला शिकणार !!!! पण त्याचा योग मात्र कधी येतच नव्हता. प्रत्येक वेळी काहीतरी कारणाने तो विषय मागे पडून जायचा …..

गणेशोत्सव जवळ आला की ढोल ताशा च्या प्रॅक्टिस चे आवाज कानात घुमायचे. मी कितीतरी वेळा चौकशी पण केली पण कधी तुला खूप लांब पडेल, रात्री घरी जायला वेळ होतो, एकटी कशी जाशील? पथक सांगेल तिकडे मिरवणुकीला जावंच लागत, कारणं सांगून चालत नाही. गेलं नाही तर घरी येऊन गाडीत घालून घेऊन जातात अश्या अनेक गोष्टी कानावर पडायच्या आणि मनाची पूर्ण तयारी केलेली मी पुन्हा काहीशी लडबडायचे. असे करत करत ही माझी इच्छा अतृप्त च रहाते की काय ? असं वाटायला लागलं.

कितीतरी वेळा मी माझ्या जावांना पण विचारले आपण सगळ्या मिळून जाऊया का ढोल पथकात, पण तिथून ही निराशाच पदरी पडली. पण म्हणतात ना ते ओम शांती ओम चा डायलॉग !! अगदी तसच काहीसं घडलं !!!.
“अगर तुम किसीं चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तूम्हे मिलाने मे लग जाती है”……आणि अगदी असच काहीसं झालं. माझ्या जबरदस्त इच्छेपुढे या सगळ्या कारणांचा बळी पडला, वातावरणात माझ्या या इच्छेचे असे काही वायूमंडल पसरले की संधी आपोआपच चालून आली आणि या वर्षी इजिनयरिंग पूर्ण झालेला माझा मुलगा फोन करून मला म्हणाला की मम्मी आपलं दोघांचं नाव नोंदव पथकात आपण दोघ मिळून ढोल शिकायला जाऊया !!!! आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मनापासून जर एखादी इच्छा असेल तर सारा चराचर तुम्हाल त्याची पूर्तता करण्यात हातभार लावतो याची प्रकर्षाने प्रचिती आली. चला माझी इच्छापुर्ती होण्याकडे वाटचाल सुरू तर झाली. मनात म्हणलं चला आत्मा तर भटकणार नाही इच्छा अपुरी राहिली म्हणून 😂 आणि पुण्याहून अथर्व इचलकरंजी ला आल्यावर आम्ही पथक जॉईन केले…..

पहिल्या दिवशी फॉर्म भरला आणि ढोल घ्यायला शाळेत गेलो. प्रॅक्टिस सुरू होऊन चार पाच दिवस झाले होते. शाळेतून ढोल खांद्यावर उचलून प्रॅक्टिस च्या ठिकाणी आणायचा होता. आजपर्यंत पाच किलो दळणाचा डबा पण न उचलेली मी आता हा ढोल कशी उचलणार ? असा विचार मनाला स्पर्शून गेला. 😂 पण इरादा पक्का तर दे धक्का अस म्हणत ढोल उचलला. ढोल खांद्यावर घेऊन गेले प्रॅक्टिस च्या ठिकाणी आणि पहिल्या च दिवशी हे वाटत तेवढं सोपं नाही याची खात्री पटली.

तिथे गेल्यावर बघितलं तर सगळ्या तरुण तरुण मुली आणि मी एकटीच पन्नाशीची स्त्री. क्षणभर वाटलं या सगळ्या मुली आणि मी यांच्याबरोबरीने वाजवू शकेल का ? पण पुन्हा तेच इरादा पक्का …. येईल ती परिस्थिती पार करायची आणि पुढे चालत रहायचं हे माझं ठरलं होत. ढोल बांधला मग आम्हाला तो बांधून चालायला लावलं पण दोन फेऱ्यात मी गारच झाले, श्वास फुलायला लागला घसा कोरडा झाला. त्यात माझं हिमोग्लोबिन 8. पुढे चालायला येईना कष्टाची सवय नसलेल्या शरीराला तो ढोल काही पुढे चालूच देईना. झाली का पंचाईत !!! आता काय करायचं ? माझं हे स्वप्न अर्धवट राहते की काय ? अशी शंका मनाला स्पर्शून गेली आणि माझी ती अवस्था पाहून मुलींनी मला ढोल सोडायला लावला. काकू सुरवातीला होतो थोडा त्रास !!! नंतर होते सवय. अशी त्यांनी माझी सांत्वना केली. थोडीशी नाराजच झाले मी. म्हणलं अस झालं तर मी कशी शिकणार ढोल ? नाही, अस करून चालणारच नाही. काही झालं तरी सहन करायचं पण ढोल वाजवायला शिकायचंच.

विचार केला तेवढा सहज नव्हतं ढोल शिकणं ती पण एक साधनाच म्हणा की !!! खडतर तपश्चर्या करायलाच हवी, तल्लीन व्हायलाच हव, एकरस होऊन साधना करायलाच हवी, त्याशिवाय तुमची समाधी कशी लागेल !!! आणि फलप्राप्ती कशी होईल हे मनोमन पटलं !! आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्या उमेदीने मी प्रॅक्टिस ला आले, ढोल बांधला थोडा त्रास होत होता कमरेला दोर कचत होता, श्वास पण फुलत होता पण सगळं सहन करत हळूहळू प्रॅक्टिस करत मी शिकायला सुरवात केली…. हळूहळू हे सगळं मला आवडत होतं खूप छान वाटत होतं. पुन्हा एकदा शाळेत गेल्यासारख वाटलं.

कितीतरी मुली कॉलेज करून शिकायला येत होत्या, बरेचजण जॉबहुन डायरेक्ट पथकात येत होते खूप कौतुक वाटलं हे सगळं पाहून. वेड माणसाला सगळं सोसण्याची शक्ती देत हे मनोमन जाणवलं. शालेय जीवनाची आठवण करून दिली या नवीन शाळेन मला. रांगेत बसा, आपली ओळ बघा, शांत बसा, रोजच्या सूचना, पाठांतर, किती छान !!! पुन्हा शालेय जीवन जगण अगदी मनापासून आवडलं !!…..

रोज प्रॅक्टिस ला जायचं, घरी आल्यावर मिठाच्या पाण्यानं शेकायच, हळदीचे दूध प्यायचे, पावसात भिजायचं सगळं चालू होतं. हळूहळू त्रास कमी झाला, सवय होऊन गेली. नवनवीन ठेके, तोड, सगळं शिकवलं. अभि सर खूप छान पद्धतीने शिकवतात. खूप कौतुक त्यांचं. परमेश्वरी देणगीच प्रदान आहे यांना. केवढा स्टॅमिना आहे सरांकडे. पाहूनच अचंबित व्हायला होतं. ताशा मास्टरच आहेत ते, सॅल्युट त्यांना. सरांनी शिकवलेलं सगळं समजत देखील होत, पण माझ्या वयाचा प्रोब्लेम म्हणा किंवा आणखी काही असेल पण ठेके लक्षात येऊनही माझं वाजवताना चुकायचं आणि सगळेजण काकुंच चुकतंय म्हणून माझ्यावर अगदी नजर ठेवून असायचे (अस मला वाटायचं) आणि मला येत असलेलं पण या भीतीने आणखीनच चुकायच. शाळेत असताना मेरिट मध्ये येणारी मी या शाळेत “ढ” विध्यार्थी ठरत होते. “ढ” मुलांना जस शेवटी बसवतात तसं मला सर्वांच्या शेवटी उभं केलं जायचं. कोणतंही काम परफेक्ट झालं पाहिजे असं मानणारी मी माझा ढोल कधी परफेक्ट वाजणार, या विचाराने व्याकुळ व्हायचे. ज्यावेळी फास्ट गतीने ढोल वाजवायला लागायचा त्यावेळी माझं नेमकं चुकायच. खूप ठरवायचे मी पण कधी काऊंटिंग चुकायच, कधी लक्ष नसलं की चुकायच तर कधी मनात काहीतरी वेगळे विचार आले की चुकायच. मग कळलं की पन्नाशीत ढोल शिकण हे एक दिव्यच आहे. एकतर शरीर साथ देत नाही, शरीराने साथ दिली तर मन साथ देत नाही. अरे संसार संसार !!!!…..

अस वाटलं आपण ज्या त्या वयातच छंद जोपासायला हवे होते का ?आपली वेळ चुकली का ? आपल्याला जमेल ना ? घर सांभाळून, सणवार करून शिकायला. कारण गौरी गणपती पण जवळ आलेत. सगळं सांभाळून आपल्या डोक्यात हे ताल, ठेके सगळे हात राहतील का ? नको नको ते विचार मनात येऊन गेले पण या सगळ्यावर एकाच गोष्टीने मात केली “इरादा पक्का”…. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वयात शिकताना तुम्हाला तुमच्या घरच्यांची साथ हवी ती खूप महत्त्वाची असते ती एक वेगळंच बळ देऊन जाते, आणि साथ नसेल तर खूप स्ट्रगल करावा लागतो पण या बाबतीत मी खूप भाग्यवानच म्हणावी लागेल ……

झालं असं करत करत ढोल क्लास पूर्ण झाला आणि मिरवणूकीचे दिवस जवळ आले. घरात गौरी गणपती, डेकोरेशन, फराळ, सगळं अगदी आनंदात केलं. मिरवणुकीत पण सहभागी झाले. पहिल्या मिरवणुकीला गाडीतून निघालो आणि मुलींनी जोरजोरात गणपतीबाप्पा मोरया !! हर हर महादेव !! च्या गर्जना दिल्या. किती एनर्जी मिळते यामुळे हे आता समजलं. मला तर वाटतंय नसानसात उत्साह संचारतो या मुळे, ब्लॉकेजेस पण निघून जात असतील या घोषणांमुळे. आपली संस्कृती केलीय कशाला, सार्थ अभिमान हवा प्रत्येक नागरिकाला या परंपरांचा आणि आपल्या संस्कृतिचा. अभिमानाने जतन करून ठेवावी अशीच आहे आपली भारतीय संस्कृती !!!.

ढोल नसेल बांधलेला तर ध्वज घ्यायचा किंवा झांज वाजवाजवायची अस सांगितलं होतं पथकात. पण मला जरा संकोच वाटायचा ते करायला, पण अजित दादा अगदी मस्त मौला माणूस !! अगदी मनमौजी !! त्यांनी माझा हा संकोच दूर केला आणि ‘चला मी शिकवतो तुम्हाला’ म्हणून ध्वज घ्यायला लावला आणि माझी मनातली भीती किंवा संकोच कुठच्या कुठं पळाला… एखादा पदार्थ खायच्या आधीच तो मला आवडत नाही म्हणायचं आणि खाल्यावर त्याचा स्वाद मन भरून टाकणारा असावा. तसच काहीसं वाटलं. एखादी गोष्ट करायच्या आधी संकोच वाटणं आणि ती केल्यावर मन आनंदान भरून जाणं असच काहीसं झालं. काही काही अनुभव मन आनंदाने भरून टाकतात, म्हणून माणसानं सगळं करून बघावं आणि मग काय ते ठरवावं. आधीच मला आवडत नाही, मला जमणार नाही हे करणं किती चुकीचं असत ते मला कळलं. कोण जाणे त्यातून तुम्हाला भरपूर आनंद, समाधान, एनर्जी मिळेल, जी मला मिळाली. मी अगदी आनंदाने ध्वज पण नाचवला आणि झान्ज पण वाजवले. दादा खरचं खूप धन्यवाद !! तुमच्यासारखे शिक्षक सर्वांना मिळावेत. किती आनंद घेऊन वाजवता तुम्ही. खूप छान !!!एखाद्याच्या चेहऱ्यावर हासू नसेल तर ते आणायचं, एखादा बोलत नसेल तर त्याला बोलत करायचं, किती छान जमतं तुम्हाला. सगळ्यांच्यात उत्साह भरायचं काम अजितदादांनीच करावं !!!! असं सगळं वातावरण बदलवून टाकता तुम्ही !!.

शेवटी एकच सांगावं वाटत तुम्हाला जर मनापासून एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही त्यावर मात करून ती पूर्ण करताच. छंद जोपासायला वयाच बंधन नको. किंवा जग काय म्हणेल यासारखे विचार नको. काही कारणाने छंद जोपासायचे राहिले असतील तर तशी संधी मिळेल तेंव्हा तिचं सोन नक्की करा. कारण आपल्या आवडीच्या गोष्टी शिकल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा मिळते. मन प्रसन्न होतं आणि जगण्याचं बळ येत. त्यामुळे आपल्याला (स्वानुभव) म्हणून आपले छंद सर्वांनी जोपासायलाच हवे, अगदी कोणत्याही वयात अस वाटतं……

या ढोल शिकण्यामुळे केसरी सारखा एक खूप सुन्दर परिवार मिळाला. खूप आपुलकी जपणारा आणि सर्वांची काळजी घेणारा परिवार. अगदी वेळ झाला तर मुलींना त्यांच्या घराच्या दारात सोडणे, आदरपूर्वक वागणूक आणि अत्यंत महत्त्वाच म्हणजे शिस्तबद्धता. खूप छान परिवार आहे “केसरी परिवार” अश्या परिवाराचा मी भाग आहे हे माझ्याकरता अभिमानास्पदच !!!🚩……..

सविता कोकीळ.

— लेखन : सौ सविता कोकीळ. इचलकरंजी
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सविता कोकीळ यांचा लेख आवडला. सकारात्मकतेचा संदेश यातून मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

जयश्री चौधरी मुंबई on व्यंग कथा
सचिन जगन्नाथ कांबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
नामदेव लक्ष्मण वनगुले तळा - सोनसडे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
श्री. समीर मारुती शिर्के on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
अजित महादेव गावडे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
जयश्री चौधरी मुंबई on माझी जडणघडण : ६५