Thursday, July 3, 2025
Homeसाहित्यमी निसर्ग बोलतोय ... !

मी निसर्ग बोलतोय … !

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त…
मनोगत निसर्गाचे……
शुक.. शुक.. ए वेंधळट हो तूच तू ! तुलाच आवाज देतोय रे मी… बघा आता एवढी निरव शांतता असूनही हा वेडा माणूस कित्ती भांबावलाय ! बरोबर, याला आता सवय कुठे राहिली आहे माझ्यात खळखळून वाहणाऱ्या त्या स्वच्छ नद्यांचा खळखळाट ऐकण्याची ?, ऐकतही असेल कधी काळी असा अनैसर्गिक स्वर तर फक्त त्याच्या हातातल्या त्या छोटेखानी डब्यातून… काय बरे म्हणतात त्याला ही शहाणी माणसं ? बरोबर ‘स्मार्ट फोन’ ! अगदी स्वतःची चड्डी न सांभाळता येणाऱ्या त्या निरागस भाबड्या बालमनाला देखील आईवडील तो स्मार्ट फोन देऊन गुंतवून ठेवतात…

माझ्या दगडात कोरल्या गेलेल्या त्या सुंदर लेण्यांना प्रत्यक्ष नजरभेट द्यायला एक तर यांना वेळ नसतो आणि आलेच कधी तर या लेण्यांसमोर स्वतःची वाकडी तिकडी तोंड करत ‘सेल्फी’ नामक तस्विरी काढणं हे काय ते यांचं माझ्या कोरीव नक्षीदार लेण्यांवरच प्रेम.. यांची बहुधा नजरच मेलेली असावी…

संगणक आणि आंतरजालावरील नको ते बिभत्स चित्र, चित्रपट अन चित्रफिती पाहून…! माझ्या लाडक्या मनुष्य प्राण्यांनो एकदा नजर, मन, मेंदू अगदी स्वच्छ करा बघू… काय म्हणतात तुमच्या त्या संगणकीय भाषेत ते डिलीट करून ट्रॅश काढून टाका मग तुम्हाला लेणीच काय, या दगडातून कधीमधी पाझरलेलं पाणी देखील दिसेल… फार मोठी दूरदृष्टी नको पण तुमची नजर तेवढी जिवंत होईल !

एक काळ असाही होता की, कवी माझ्या सानिध्यात येऊन एकरूप होऊन जायचा माझ्यासह त्याच्या काव्यात… खोटंच वाटणार तुम्हाला !

भलतेच स्मार्ट झालात राव ! मेघदूत वाचलय का आपण? नाही न.. अहो मग निदान ऐकलं तर असेल न ? प्रेमातली ताकद एवढी काही जबरदस्त असावी की तुमच्या प्रेयसीला मेघांची भाषा उमगावी पण त्यासाठी तुम्हाला देखील ती यक्षासारखी उमगायला हवी.. आपली प्रेयसी.. पत्नी.. यक्षीला यक्ष रामगिरी वरून जाणाऱ्या मेघांद्वारे प्रेमाचा संदेश धाडतो ! अर्थातच त्या मेघांना रामगिरी पासून अलका प्रांतापर्यंतच्या संपूर्ण मार्गाची अगदी मार्गात लागणारे सर्व पर्वत.. पहाड… अशी इत्यंभूत माहिती तो देतो !

तुमच्या त्या मोबाईल नावाच्या डब्याला बिघाड झाला, ‘रेंज’ नावाची संलग्नता नसली तर येतो का तो ‘गूगलमॅप’ नावाचा नकाशा तुमच्या कामी ? प्रेम करा रे स्वतःवर.. तिच्या त्याच्यावर. हो अगदी माझ्या साक्षीनं ! मी पण साद देईल हिरव्या गर्द वनराईतून… माझ्या गूढ घनराणीतून ! पाखरांच्या किलबिलाटातून आणि अनोख्या त्या घाटातून !

काय म्हणतोस ? भिती वाटते माझी.. हो तसा मी अद्भुत आणि काहीसा गूढ असलो तरी उगाच नाही रे कोपत ! अति तेथे माती होते… तुमच्या चुकीमुळे तुमच्यासोबत माझीही ! तुम्ही घळघळाता तेव्हा मी देखील आतून भळभळत असतोच ना…? नाही दिसत का रे माझ्या अंतःकरणातली जखम तुम्हाला…? तुमच्या अंतःकरणास जी दृष्टी आहे न तिलाच कळते रे ही हळवी सृष्टी !

तुमच्या कारखान्यातली घाण माझ्या गंगेला अपवित्र करून गेली कैकदा.. त्या चिमण्यांमधून निघणाऱ्या धुराने माझी फुफ्फुस विकारग्रस्त झाली आहेत. लाखो वाहनं.. त्यांचे ते कर्णकर्कश भोंगे.. ध्वनी अन वायुप्रदूषण छिन्नविच्छिन्न होत होती माझी अवस्था..! जणू माझी नित्य ओरबाड अन पोखरण ! माझी ओघळती आसवं, कधी नाहीच दिसली का रे तुम्हाला ? तुमची आसवं पुसायला मायेचा पदर असेलही रे पण आमचा तर तो जीवनरक्षक ओझोन नावाचा पदर देखील चिंधी सारखा विरळ होतं चाललाय रे !

तुम्ही पाणी शुद्ध करायला ‘वॉटरफिल्टर’ नावाचं गाळणयंत्र वापरता माझ्या तर नैसर्गिक झरझरत्या तंत्रात देखील तुम्ही तुमचे गलिच्छ हात घालून बसले आहात ! मानवा तू माझे साधेसरळ नियम मोडकळीत काढलेस आणि आता श्वसनयंत्रांची वणवा म्हणून यंत्रणेला दोष देतो आहेस ! ‘प्रेम ही परस्पर देवाणघेवाणीची सुंदर प्रक्रिया असते’ ही परिभाषा तूच तर केलीस ना रे मनुजा?

तू काही काळ घरीच राहिलास आणि स्वच्छता पाळलीस म्हणून आज मी निदान माझी ही अधरं खोलून दिलखुलास बोलू तरी शकलो आहे रे ! श्वास घेतो आहे.. मिळतंय माझ्या अवकाशाला ‘स्पेस’ नावाचं आकाश…! अरे असा घळाघळा आसवं काय गाळतो आहेस ? मला कल्पना आहे माझं तुझ्यावर जसं प्रेम आहे तसच तुझही माझ्यावर अपार आहे… प्रेम…!

याच प्रेमात एक वचन देतोस मला ? नको बाबा करार कसला करतो आहेस ? मोडला तर माझी भाषा..बोली.. ऐकणारं ‘कोर्ट’ नावाचं न्यायालय तुझ्या दुनियेत अजूनतरी आलेलं नाही रे बाबा.. असोत ! आता वचन दे की अधूनमधून असाच निवांत मनानच लॉकडाऊन नावाची बंदी पाळशील ? करशील कधीमधीच व्यक्तीगत वाहनाचा वापर ? ‘प्लॅस्टीक’ नावाचं रसायन तर वापरुच नकोस !  माझे झरे… नद्या… प्राणी… सागर… पर्वत अगदी सगळ्यांनाच पछाडून सोडलंय बाबा या अजब प्लॅस्टिकनं !

बाकी अन्न मोजकच शिजवशील आणि अपरिग्रह तत्त्व पाळशील ! माझं प्रेम खर आहेच रे पण त्या शकुंतलेसारखी अंगठी घेऊन मी काय करू..? अन मला विश्वास आहे तू दिलेले हे शब्द तू अवश्य पाळशील. राजा दूष्यंतासारखं विसरायचा नाहीस !
मला पुन्हा अनुभवायचा आहे रे तुझ्यातलाच तो संत तुकोबा, माझा सच्च्या प्रेमी रॉबर्ट फ्रॉर्स्ट, माझ्याच नावानं ओळखला जाणारा कवी बालकवी, धुक्यातून प्रकाशाकडे नेणारा कवी ग्रेस नाहीतर जिप्सी, चांदोमामा टिपत पाऊसपाणी झेलणारा महान कवी पाडगावकर पुन्हा माझ्या कुशीत जन्माला येवो हीच सदिच्छा !

पाखरांचा किलबिलाट…
नितळ पाण्याचा खळखळाट..
फुलपाखरांचे रंगी बेरंगी तराणे…
माझ्या रेडीओ स्टेशनवर पुन्हा एकदा
ट्यून होतील तू रचलेली बहारदार गोड गाणी!
टीव्ही सेटवर दिसेल तुझी माझी अजरामर नितळ प्रेमकहाणी!
मग तर तू देखील तणावमुक्त होऊन गायला बागडायला शिकशील..
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
तुझ्याच लडीवाळ भाषेत तुला लब्यु
तुझाच वेडा प्रियकर
सखा निसर्ग

तृप्ती काळे.

– लेखिका : तृप्ती काळे.
– संपादक : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. *शुक.. शुक.. ए वेंधळट हो तूच तू ! तुलाच आवाज देतोय रे मी…* बघा *आजकाल आपण एकमेक
    ज्या भाषेत संवाद करतो त्याच
    भाषेत निसर्गही बोलतोय बघा हा
    *वेडा* *माणूस कित्ती भांबावलाय ! बरोबर, याला आता सवय कुठे राहिली आहे माझ्यात खळखळून वाहणाऱ्या त्या स्वच्छ नद्यांचा खळखळाट ऐकण्याची ?,*

    कसा ऐकणार ?
    * नद्यांचा कोरडया पडू
    लागल्यात आवर्षणाने आणि एकतर
    शिक्षणासाठी किवां पैसे कमावण्यासाठी शहराकडे वळला
    जेथे नद्यांचा नाहीत

    अगदी स्वतःची चड्डी न सांभाळता येणाऱ्या त्या निरागस भाबड्या बालमनाला देखील आईवडील तो स्मार्ट फोन देऊन गुंतवून ठेवतात…( **पालकांना हळूच*
    *चिमटा काढलाय )**

    लेण्यांसमोर स्वतःची वाकडी तिकडी तोंड करत ‘सेल्फी’ नामक तस्विरी काढणं हे काय ते यांचं माझ्या कोरीव नक्षीदार लेण्यांवरच प्रेम.. **यांची बहुधा* *नजरच मेलेली असावी…*
    (सेल्फी काढत वेळ घालवण्या
    ऐवजी लेणी कधी कोरली गेली
    असतील ?कोणती हत्यारे वापरली गेली असतील ? किती
    दिवस लागले असतील ? असे
    प्रश्न विचारून उत्तरे शोधा बघू
    जणू काही अगदी तुम्ही तेथेच
    आहात असे समजून जो
    आनन्द मिळवाल तो निसर्गच
    देऊ शकेल

    *माझ्या लाडक्या मनुष्य प्राण्यांनो *एकदा नजर, मन, मेंदू अगदी* स्वच्छ करा बघू… मग तुम्ही अनुभवाल

    **निसर्गाचा आनन्द*
    **याची देही याची डोळा*
    *
    तुम्हाला लेणीच काय, या दगडातून कधीमधी पाझरलेलं पाणी देखील दिसेल… *फार मोठी दूरदृष्टी नको पण तुमची नजर तेवढी जिवंत होईल !*

    (लेखिका सांगतेय एक छोटासा
    बदल तुम्हाला किती मोठा आनन्द
    देऊ शकेल )

    **प्रेम करा रे स्वतःवर.. तिच्या* *त्याच्यावर. हो अगदी* *माझ्या साक्षीनं ! मी पण साद देईल हिरव्या गर्द*

    *वनराईतून… माझ्या गूढ घनराणीतून ! पाखरांच्या* *किलबिलाटातून आणि अनोख्या त्या घाटातून !*

    मित्रानो
    लेखिखा पुन्हा पुन्हा
    विनवणी करते आपल्याला

    निसर्ग माणसांवर त्याच्यापाशी
    जे काही आहे ते मुक्तपणे
    उधळायला आतुर आहे तो
    रोजच वाटेकडे डोळे लावून
    बसलाय तुम्ही कधी याल
    याची

    माझी नित्य ओरबाड अन पोखरण ! माझी ओघळती आसवं, कधी नाहीच दिसली का रे तुम्हाला ? तुमची आसवं पुसायला मायेचा पदर असेलही रे पण आमचा तर तो जीवनरक्षक ओझोन नावाचा पदर देखील चिंधी सारखा विरळ होतं चाललाय रे !

    ( निसर्गाचा राजा अगदी काकुळतीने माणसासापुढे हात
    पसरतोय अशी पाळी माणसाने
    का बरे आणली याचे उत्तर
    लेखिका शोधतेय अरे माणसा
    तू असाच बेफिकिरीने वागलास
    तर एक दिवस तुलाही कोणाकडे
    हात पसरायची वेळ येईल
    पण तुझ्या हातावर ठेवायला
    माझ्याकडे काही उरले नाहीस
    तर तुझे काय होईल बघ बाबा तूच )

    (निसर्गवेडया लेखिकेला निसर्गाच्या अंत:करणात
    झालेली भळभळती जखम
    दिसू लागते तिचा आक्रोश
    कानी आदळू लागतो )

    **ध्वनी अन वायुप्रदूषण* *छिन्नविच्छिन्न होत होती माझी* *अवस्था..! जणू माझी* *नित्य* *ओरबाड अन पोखरण !* *माझी ओघळती* *आसवं, कधी नाहीच दिसली का* रे *तुम्हाला ? तुमची आसवं* *पुसायला मायेचा पदर* *आमचा तर तो असेलही रे पण जीवनरक्षक ओझोन नावाचा* *पदर देखील चिंधी सारखा विरळ होतं* **चाललाय रे !_*
    *
    *मानवा तू माझे साधेसरळ नियम* *मोडकळीत काढलेस* *आणि आता* *श्वसनयंत्रांची वानवा म्हणून यंत्रणेला दोष देतो आहेस ! ‘प्रेम* *ही* *परस्पर *देवाणघेवाणीची** *सुंदर* *प्रक्रिया असते’ ही परिभाषा तूच* **तर केलीस ना रे मनुजा?*

    ( किती म्हणून शब्दात लेखिका
    मिसर्गाचे महत्व आपल्या मनावर
    बिंबवण्यासाठी जीवापाड धडपड
    करतेय। )
    *
    *काही काळ घरीच राहिलास आणि स्वच्छता पाळलीस म्हणून* **आज मी निदान माझी* *ही अधरं खोलून दिलखुलास बोलू तरी शकलो आहे रे ! श्वास घेतो आहे.. मिळतंय माझ्या अवकाशाला* ‘ *स्पेस’ नावाचं आकाश…!*

    कोरोनाच्या काळात सरकारने
    याशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या
    अनुभवातून त्यांनी सुचवलेले
    उपाय म्हणा किंवा काय दक्षता
    घ्यावी सामाजिक संघटनांनी
    विविध आरोग्य अधिकारी व
    त्यांच्या सोबत दिवसरात्र रुग्णांची
    सेवा करणाऱ्या सर्वांच्या अथक
    पर्सयत्नांनी हळूहळू आपले जीवन पूर्ववत होण्यास सुरुवात
    तर झालीच आहे अन लवकरच
    हे ग्रहण सुध्धा सुटेल

    जाता जाता निसर्ग
    साद घालतोय

    *प्रेमात एक वचन देतोस मला ?*

    आता *वचन दे की अधूनमधून असाच निवांत मनानच लॉकडाऊन नावाची बंदी पाळशील ?*

    आणि निसर्गवेडी लेखिका
    निसर्गाच्या मनातील एक
    *भाबडी इच्छा*
    राजाच्याच शब्दात मांडतोय

    *पुन्हा अनुभवायचा आहे रे* *तुझ्यातलाच तो संत तुकोबा,* *माझा सच्या प्रेमाझा सच्मी रॉबर्ट* *फ्रॉर्स्ट, माझ्याच नावानं* *ओळखला जाणारा कवी* *बालकवी, धुक्यातून* *प्रकाशाकडे नेणारा कवी ग्रेस* *नाहीतर जिप्सी, चांदोमामा* *टिपत पाऊसपाणी* *झेलणारा महान* *कवी पाडगावकर पुन्हा* *माझ्या कुशीत जन्माला* **येवो हीच सदिच्छा !*

    काकुळतीने केलेली ही निसर्गाची इच्छा

    एक जागरूक आणि जबाबदार
    नागरीक या नात्याने सहज
    पुरी करू शकतो फक्त हजारो
    हातानी हातात हात घालून सर्व्
    मत आणि मन भेद गाडून पुढे
    सरसावले पाहिजे

    *मीच*का आधी*

    *मग नाही होणार कधी*
    *
    लेखाचा शेवट
    भावनाविवश होऊन
    करते

    तर तू देखील तणावमुक्त होऊन गायला बागडायला शिकशील..
    या **जन्मावर या जगण्यावर* *शतदा प्रेम करावे*
    *तुझ्याच लडीवाळ भाषेत तुला* *लब्यु*

    *तुझाच वेडा प्रियकर*

    *सखा निसर्ग*

    वाचकहो मला या कथेतकाय भावलं
    कथा वाचताना निसर्गाच्या कुशीत अल्प काळ का होईना लेखिकेने
    मन रमवण्यात यशस्वी झाली

    सर्वच रसिक वाचक कदाचित
    पूर्णपणे माझ्या भावनांशी सहमत
    होतील असे नाही पण
    मी मात्र अनेक तास

    खायलोनकी दुनियेत होतो
    पाय पुन्हा जमिनीवर आलेत
    पुन्हा एखादा लेखक / लेखिका
    कवियत्री / काव्यपरी आपले
    लिखाण घेऊन येईलना याच
    दरबारात
    फार वाट पहायला नका लावू

    पुन्हा भेटूया का ?
    एक वाचक

    WhatsApp वर प्राप्त अभिप्राय मी इथे एक आठवण म्हणून अधोरेखित करते आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments