Friday, January 2, 2026
Homeसाहित्यमी, पोलीस अधिकारी…

मी, पोलीस अधिकारी…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात स्त्रियांसाठी शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्याचे फळ म्हणुन आज विविध क्षेत्रात, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया आपली कर्तबगारी सिद्ध करीत आहेत. आजच्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या आणि काल झालेल्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने निवृत्त पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर मॅडमनी लिहिलेल्या “मी, पोलीस अधिकारी” ही लेखमाला आणि या लेखमालेतून निर्माण झालेल्या “मी, पोलीस अधिकारी” या पुस्तकाचा हा मागोवा …..

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या, पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मी शिकवायला जात असे. तेव्हा 2019/20 च्या तुकडीत, मुंबई पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्त म्हणुन कार्यरत असलेल्या सुनीता नाशिककर मॅडम यांनीही प्रवेश घेतला होता. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला शोभेलसे असेच त्यांचे रूबाबदार व्यक्तिमत्त्व होते. पोलीस अधिकारी असूनही त्यांनी ज्या अर्थी पत्रकारिता अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला, त्याअर्थी त्यांना वाचनाची आणि लिखाणाची नक्कीच आवड असेल, असा कयास मी बांधला. हा अभ्यासक्रम त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला.

पुढे कोरोनाचे भयंकर दिवस आले आणि “न भूतो, न भविष्यती” अशी परिस्थिती उद्भवली. अशा परिस्थितीत लोकांना धीर देण्याचे काम करावे, म्हणुन आम्ही www.newsstorytoday.com हे पोर्टल सुरू केले. यथावकाश नाशिककर मॅडमशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला. मी त्यांना, त्यांचे पोलीस खात्यातील अनुभव लिहिण्यासाठी सुचविले. पहिले तर त्या नाहीच म्हणाल्या. पण मला खात्री होती की, त्या लिहू शकतील म्हणुन. त्यांच्या मनाची तयारी करून घेण्यासाठी मी त्यांना म्हणालो, तुम्हाला पंचनामा लिहिता येतो की नाही ? यावर त्या म्हणाल्या, सर पंचनामे लिहिण्यात आणि तपासण्यात तर सर्व आयुष्य गेले आहे. यावर मी म्हणालो, आपण आपल्या एकेका आठवणीचा, अनुभवाचा, घडलेल्या घटनेचा पंचनामा लिहून माझ्याकडे पाठवित चला. त्याच्यावर संपादकीय संस्कार करून आपण ते पोर्टल वर प्रसिद्ध करीत जाऊ. दोन तीन भाग, असा प्रयोग करून बघू आणि नाहीच जमत असे वाटले, तर बंद करू या. ही कल्पना त्यांना आवडली. त्यात त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या, मुंबई समाजकल्याण कार्यालयाच्या जात पडताळणी समितीच्या सदस्य म्हणुन प्रतिनियुक्तीवर होत्या.

कोरोनामुळे ते कार्यालय बंदच होते. त्यामुळे त्यांच्याकडे वेळही होता. बघता बघता, प्रयोग म्हणुन दोन तीन भाग लिहायला घेतलेली लेखमाला 35 भाग पूर्ण होऊन संपली. दरम्यान मॅडम च्या विनंती प्रमाणे त्यांच्या नोकरीच्या शेवटच्या वर्षी, त्यांच्या विनंतीनुसार त्यांची बदली कोल्हापूर या त्यांच्या स्वजिल्ह्यात झाली. यथावकाश त्या तिथून पोलीस उपअधीक्षक म्हणुन नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाल्या. त्यामुळे मग आम्हाला त्या लेखमालेचे पुस्तक करायला वेळ मिळाला आणि नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या आमच्या ‘न्यूज स्टोरी टुडे’ पब्लिकेशन्सच्या वतीने अतिशय दर्जेदारपणे त्यांचे पुस्तक तयार करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईतील राजभवनात या पुस्तकाचे 16 मे 2023 रोजी शानदारपणे प्रकाशन झाले. हे पुस्तक महिलांना पोलीस दलात भरती होण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या पुस्तकाला वाचकांचा छान प्रतिसाद मिळाला आणि मिळत आहे. वाचू या काही बोलक्या प्रतिक्रिया…

1.
ज्या काळात ग्रामीण भागातील महिला नोकरीच करायच्या नाहीत तर शहरी भागातील महिला नर्स, शिक्षिका, कारकून अशा प्रकारच्या सुरक्षित नोकऱ्या करायच्या.त्या काळात घरात उच्च शिक्षणाची, नोकरी करण्याची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या, नाशिककर मॅडम यांनी पोलीस दलात दाखल होण्याचे धाडस कसे केले, पुढे कठोर प्रशिक्षण आणि अत्यंत धडाडीने, प्रसंगी जीवावर उदार होऊन, प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असताना आलेले अनुभव या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. हे पुस्तक खरोखरच खूप प्रेरणादायी आहे.
— लेखिका सौ रश्मी हेडे. सातारा
2.
“मी एका बैठकीत पुस्तक वाचून संपवले. पुस्तकाची भाषा अतिशय सहज सुंदर आहे. असेच लिहित रहा..”
— कल्पना होरे. सेवानिवृत्त न्यायाधीश

3
“मी वपु काळे यांची कन्या. आपल्या पुस्तकात आपण वांद्रे पोलीस स्टेशन ला आलेले असतानाचे अनुभव लिहिले आहेत. त्यात मी बाबांचा उल्लेख पाहिला आणि मस्त वाटलं.”
_ स्वाती चांदोरकर. लोकप्रिय लेखक व.पु. काळे यांच्या कन्या, मुंबई.
4
“पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि वाचत वाचत कधी संध्याकाळ झाली ते समजलेच नाही. पोलीस दलामध्ये रुजू झाल्यापासून आपण सेवानिवृत्तीपर्यंत जे कर्तव्य पार पाडले आणि यामधून काही संदेश जे दिले ते खरंच वाखणण्याजोगे आहे.

विशेष करून आपण सर्व अधिकारी व अंमलदार यांचा अगत्याने उल्लेख करून एक प्रकारे त्यांचा सन्मानच केलेला आहे. वाचन करत असताना आपण केलेल्या घटनांचा उल्लेख व तो वाचताना आपण स्वतः प्रत्यक्षात त्या ठिकाणी आहोत अशीच अनुभूती येत होती. खूप दिवसांनी एक छान पुस्तक वाचायला मिळाले याचे समाधान वाटले. पोलीस खात्यामध्ये असतानाही आपण पत्रकारिता व इतर गोष्टींमध्ये जे लक्ष घातले त्याचे आकलन करण्याजोगे आहे.
सेवानिवृत्ती नंतरचे आपले आयुष्य सुखा समाधानाचे व समृद्धीचे जावो याच आपणास माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून व संपूर्ण पोलीस दलाकडून आपणास शुभेच्छा.
— कैलास अमर सुर्यवंशी. निवृत्त पोलीस हवालदार, कोल्हापूर

स्वतः माझ्या दृष्टीने या पुस्तकाचे महत्व अशासाठी आहे की, हे पुस्तक जशी पोलीस दलाची, त्यातील कामकाजाची, कसोटीच्या प्रसंगांची, प्रसंगी जिवाची बाजी लावून कसे धाडसाने काम करावे लागते, याचे स्वानुभव कथन करणारे असले तरीही, त्याची महत्वाची बाजू अशी आहे की, केवळ बाह्य आकर्षणामुळे पोलीस खात्यात भरती न होता, सर्व साधक बाधक विचार करून, आपण भरती झाल्यास, आपला पुढे होणारा भ्रमनिरास टळू शकेल. विविध मानसिक, शारीरिक आजार, नैराश्य यापासून तुम्ही वाचू शकाल. थोडक्यात म्हणजे, हे पुस्तक आपल्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास नक्की सहाय्यभूत ठरू शकेल.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments