‘फक्त ‘ती’ च्यासाठी‘
ही एक असाधारण कादंबरी ‘ग्रंथाली’ने २४ डिसेंबर २०२२ रोजी प्रकाशित केली.
ही कादंबरी गर्भपाताच्या हक्कासाठीच्या संघर्षाची, एका नाजूक विषयावरची आहे. त्यामुळे काही पुस्तके शोधत असताना या कादंबरीने माझे लक्ष वेधून घेतले ! ती मुळात एका सत्य लढ्याच्या घटनेवर आधारित आहे.
या कादंबरीवर लिहिण्यापूर्वी त्या गर्भपाताच्या संघर्षाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे ? याचा मी प्रथम शोध घेतला. कादंबरीचे नायक आहेत डॉ. निखिल दातार आणि कादंबरी लिहिली आहे लेखिका डॉ. स्मिता या त्यांच्या सुविद्य पत्नीने ! त्यांचा एक कथासंग्रह व दोन कादंबऱ्या यासह पाच पुस्तके प्रकाशित असून त्यांना काही पुरस्कारही मिळाले आहेत.
या कादंबरीचे नायक मुंबईतील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ, वकील आणि आरोग्य हक्क चळवळीतील एक अग्रगण्य कार्यकर्ते आणि मुंबई, मालाड, गोरेगाव येथील तीन नामवंत हाँस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर आणि स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. स्त्रियांच्या गर्भपाताच्या हक्कासाठी सतत चौदा वर्षे दिलेल्या लढ्यामुळे देशाचा गर्भपात कायदा बदलला गेला आहे. त्यांचा न्यायालय, व केंद सरकारमधील संघर्ष या कादंबरीत ललित शैलीत शब्दबध्द झाला आहे.
डॉ स्मिता दातार यांनी आपल्या प्रारंभीच मनोगतात एका बातमीचा उल्लेख केला आहे. तो असा, इंग्लंडमध्ये राहणा-या वीस वर्षाच्या इव्हाने, ती आईच्या पोटात असतांना आईवर उपचार सुरू करणा-या डॉक्टर फिलिप मिशेल यांना कोर्टात खेचलं. इव्ही विकलांग जन्माला आली होती, तिच्या पाठीच्या मनक्यावर जन्मतःच गळू होतं (SpinaBifida).
इव्ही आयुष्यभर व्हीलचेअरवरच राहणार होती. तिच्या हातापायांच्या हालचाली, विसर्जनक्रिया यावर तिचा ताबा नव्हता. असं आयुष्य तिला नको होतं, तिचा प्रश्न होता; डाँक्टर, तुम्ही मला या जगात कां येऊ दिलं ? जगभरातल्या समाजमाध्यमांनी या बातमीची दखल घेतली.
मुळात गर्भाला आपलं आयुष्य नाकारण्याचा अधिकार आहे कां ? स्त्रीला आपला अवांछित गर्भ नाकारण्याचा अधिकार आहे कां ? अतिशय गंभीर व्यंग असलेल्या बाळाला जन्म देणं हे त्या जिवासाठी तरी भल्याच आहे कां ? याच विषयाचा आक्रोश गेली काही वर्षे नायकाच्या मनात दाटला होता. आपल्या देशात गेली ५० वर्षे स्त्रीला वीस आठवड्यापर्यंतच गर्भपाताची परवानगी होती. २०२१ मध्ये डाँ. निखिल दातार यांच्या संघर्षानंतर २४ आठवडयाची सुधारणा करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने केली.
सतत एक तपाहून अधिक काळाची संघर्षाची कहाणी डॉ. स्मिता यांनी कादंबरीत ललित शैलीत, साहित्यिक परिभाषेत साकार केली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ स्नेहलता देशमुख यांनी प्रस्तावनेत डॉ निखिल यांच्या साहस, धैर्य, बुध्दी, शक्ती, पराक्रम या गुणांमुळे ते ह्या लढ्यात जिंकले आणि त्यांची पत्नी तथा लेखिका डॉ स्मिता यांनी तितक्याच ताकदीने हा लढा शब्दात मांडला आहे तो अतिशय उत्कंठावर्धक आहे असे गौरवोद्गार काढले आहेत.
या कादंबरीत लेखिकेने हा माणूस असा कां लढला ? या प्रवासात आलेले चढ उतार, खाचखळगे, अवघड वळण, अपघात, कौटुंबिक जीवन, स्वतःचं स्वास्थ्य, हे सर्व पणाला लावून थोडीथोडकी नाहीत तर चौदा वर्षे हा लढा चालू ठेवला याचा लेखनप्रपंच कादंबरीत मांडला आहे. स्वतः लेखिका जनरल फिजिशियन, सौंदर्यतज्ञ, साहित्यिक आहेत. परंतू या लढ्याविषयी लिहितांना त्या एखाद्या त्रयस्थाच्या भुमिकेत दिसतात.
डॉ दातारांची मुलाखत घेणा-या पत्रकार महिलेला हा लढा कसा दिसला याचा प्रत्यय कादंबरीत दिसतो. त्यादृष्टीने लढ्याचा नायक वस्तुनिष्ठपणे रंगवलेला दिसून येतो.
तसा हा लढा शब्दबद्ध करणे अवघडच!विषय नाजूक, कोणाच्या भावना न दुखवता मांडायचा, ही गोष्ट लक्षात घेतली तर यामुळेच या कादंबरीची मांडणी त्रयस्थपणे, अधिक प्रांजळपणे डॉ स्मिताजींनी साकार केलेली आहे अन् हे त्यांचे अपूर्व यश आहे असे म्हटल्यास वावगं होणार नाही !
— परीक्षण : सुधाकर तोरणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर पुस्तक परिचय.