“इच्छा तेथे मार्ग”
“ज्याच्या मनात तीव्र इच्छा असते त्याला आपले ध्येय गाठण्याचा मार्ग सापडतो” या अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. मी एका पुस्तक दुकानात उत्तम पुस्तकाचा शोध घेतांना मला नेमके “इच्छा तेथे मार्ग” हे 2005 साली प्रकाशित झालेले पुस्तक हाती आले. आणि मी ते कुतहुलपूर्वक समग्र वाचून काढले. अर्थात ही या पुस्तकाची दुसरी आवृत्ती होती.
आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर थोर लोकांनी उत्तुंग यश मिळविण्याच्या कथा आपणा सर्वांनाच माहिती आहे. परंतु त्यांच्या यशाचे रहस्य म्हणजे त्या इच्छांसाठी धडाडीचे परिश्रम हेच आहे. इच्छापूर्ती आणि यश तसे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. इच्छापूर्तीची ताकद अंगी येण्यासाठी दीर्घकाळ परिश्रम करावे लागतात हेच या पुस्तकातून सांगितले आहे.

ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या इंग्रजीतील प्रसिद्ध पुस्तकाचा भावानुवाद श्री ह.अ.भावे व श्री प्र.रा.अहिरराव यांनी मराठीत केला आहे.
प्रथम आपण ओरिसन स्वेट मार्डेन यांचा परिचय जाणून घेऊ. ते
व्यवसायाने एम्. डी. डॉक्टर होते त्यांनी (1850 ते 1924) अमेरिकेतील आणि जगभरातील लाखो तरुणात ‘यत्न तो देव जाणावा’ ही पुरुषार्थ-प्रेरणा निर्माण केली.
अमेरिकेबरोबरच जपानमध्ये त्यांच्या याच इंग्रजी विषयावरील 70 हून अधिक पुस्तकांचे अनुवाद जपानी भाषेत केले गेले आहेत. आज जपानमधील तरुण सर्वच बाबतीत किती पुढे गेला आहे, हे निराळे सांगावे लागणे नकोच ! जपानने त्यांना राष्ट्रगुरूच मानले होते.
आपण भारतीय लोक ”उद्योगिनम् पुरुषसिंहम् उपैति लक्ष्मी:’ हे सुभाषित फक्त पाठ करतो. मार्डेनने त्याचा वस्तुपाठ देऊन तरुणांना निराशा झटकून जीवनात उत्साह निर्माण कसा करायचा हे शिकविले.
या पुस्तकात एकूण 11 प्रकरण आहेत. कठीण कांहीच नाही, तुमचे सामर्थ्य, संधी ओळखा, सर्व सामर्थ्य वापरा, उदार स्वभाव, प्रभावी व्यक्तिमत्व, ध्येय ठरवा, इच्छापूर्ती, यशाची योजना,
निराशा-एक शाप, तुमचे चिंतामणी रत्न अशी असून त्या प्रत्येक प्रकरणात अनेक उदाहरणासह उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले आहे.
एकदा का तुम्हाला आवडणारे तुमचे सामर्थ्य समजले की या जगात कठीण असे कांहीच नसते. प्रत्येक माणसांच्या मनात अनेक इच्छा उत्पन्न होत असतात तथापि या इच्छापूर्ती साठी योजना बनवावी लागते जे केवळ नशिबावर हवाला ठेवतात. ती स्वत:ची केलेली शुद्ध फसवणूक आहे हे त्यांना उमजत नाही. प्रत्येक माणसाच्या ठिकाणी फार मोठे सामर्थ्य दडलेले असते जे एकपट काम आजच्यापेक्षा दुप्पट तिप्पटपणे सहज करू शकतात. त्यासाठी झटून मेहनत केली तरच इच्छापूर्ती होत असते. ही गोष्ट लेखकाने आवर्जून सांगितली आहे.
ओरिसन स्वेट मार्डेन यांनी ‘Pushing to the Front’ (पुढे व्हा) हे जगप्रसिद्ध पुस्तक प्रथम प्रसिद्ध केले. निराश झालेल्या, अपयशाने मरगळलेल्या तरुणांना या पुस्तकाने जणू संजीवनी लाभली. त्यांच्या या उदास व निराश जीवनात आशेचे दीप उजळले. या पुस्तकाच्या 250 आवृत्या निघाल्या. जगातील शेकडो भाषात याचे भाषांतर झाले. विशेष म्हणजे मराठीतील पहिले भाषांतर लेखक व स्वातंत्र्य सैनिक यदुनाथ थत्ते यांनी 42 च्या लढ्यात तुरुंगात असतांना केले. पण मार्डेनचे एका पुस्तकावर समाधान झाले नाही, त्यांनी तरुणांना स्फुर्ती देणारी अशी सत्तर पुस्तके प्रकाशित केली. त्यातील पहिले ‘इच्छा तेथे मार्ग’ प्रसिद्ध झाले.

तरुणांच्या इच्छांची परिपूर्ती नक्की होणारे सहा पैलू असलेले हे या पुस्तक रूपाचे ‘चिंतामणी रत्न’ केवळ पूजा करून उपयोगी नाही. त्याबरोबर जागरूक राहून उघड्या डोळ्यांनी या जगात यशस्वीपणे ध्येय परिपूर्ण करण्यासाठी योग्य आयोजन, इच्छांचे एकत्रित बांधणी, कठोर परिश्रम, अढळ विश्वास आणि परमेश्वरावर नितांत श्रद्धा या गोष्टींच्या मदतीने तरुणांच्या प्रत्येक इच्छापूर्तीचा मार्ग निश्चिपणे दाखवणारे आहे. तथापि तुमच्या समोर भव्य दिव्य ध्येय असेल तरच असे आवाहन शेवटी स्वेट मार्डेन यांनी केले आहे. “Where there is will there is way.” ज्यांच्या मनात तीव्र इच्छा असते त्याला आपले ध्येय गाठण्याचा मार्ग सापडतोच ! पण त्यासाठी मात्र दीर्घकाळ परिश्रम अत्यावश्यक आहेत. नव्या पिढीने अशी पुस्तके वाचलीच पाहिजेत !

— परीक्षण : सुधाकर तोरणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
प्रबळ इच्छाशक्ती आणि निस्चित दिशेने केलेले कार्य हे यश मिळवून देते.जगात अनेक बाबी अवघड असतील पण अशक्य काहीच नाही हे सुलभपणे सांगणारी साहित्यसंपदा.
खरंच पुस्तक हे चांगले मित्र असतात.