“टू द लास्ट बुलेट”
२६/११…टेरर अँटँक : अशोक कामटे यांची जीवनकहाणी….
दिनांक २६/११/२००८ रोजी मुंबईत झालेल्या हल्ल्याच्या वेळी ताज हाँटेल, ट्रायडन्ट हाँटेल, नरिमन हाऊस, छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील टेरर अँटकच्या घटनांचा साद्यंत वृत्तान्त प्रसार माध्यमातून संपूर्ण जनतेला माहित झालेला आहेच.
कामा हाँस्पिटल परिसरात घडलेल्या घटना मात्र फारशा प्रकाशात आल्या नाहीत.
अटक केलेला एकमेव आत्मघातकी अतिरेकी अजमल कसाब हा या परिसरातच जखमी झाला. तर हेमंत करकरे, अशोक आमटे, विजय साळसकर आणि त्यांचे सहकारी याच ठिकाणी शहीद झाले.
अतिरेक्यांशी लढताना वीरमरण पत्करणारे मुंबईच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे यांची जीवनकहाणी म्हणजे “टू द लास्ट बुलेट” हे पुस्तक होय.
भारतीय पोलिस दलातील एका अत्यंत साहसी आणि कार्यक्षम अधिकाऱ्याची ही प्रेरणादायक कहाणी त्यांच्या सुविद्य पत्नी विनीता यांनीच सांगितली आहे.
ही कहाणी ‘टू द लास्ट बुलेट’ या इंग्रजी पुस्तकात नागरी हक्काच्या जाग्रुतीसाठी चालविलेल्या जाणाऱ्या पुण्यातील ‘इंटेलिजन्स’ साप्ताहिकाच्या संपादिका विनीता देशमुख यांनी शब्दबद्ध केली आहे. तर त्याचा मराठीत अनुवाद पत्रकार भगवान दातार यांनी केला आहे.
डिसेंबर २००९ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची २०१७ मधील पांचवी मराठी आवृत्ती अलिकडेच माझ्या वाचण्यात आली. आपल्या पतीच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचा शोध विनीतांनी जीवापाड संघर्ष करून घेतला. त्यांचे ते प्रयत्न काळजाला भिडणारे आहेत. याची साद्यंत कथा म्हणजेच ओघवत्या भाषेत निवेदन केलेली ही जीवनकहाणी आहे, एका निर्भय पोलिस अधिकाऱ्याची !
विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील नक्षलवाद्यांशी दोन हात करतांना अशोक कामटे यांनी दाखविलेले धाडस असो की, सोलापूर मधली गुंडाविरोधाची मोहीम असो. जिथं तिथं त्यांनी काम केलं तिथं लोकांची मन जिंकली. याचाही परामर्ष या पुस्तकात आहे.
लष्कर आणि पोलिस दलातून देशाची तब्बल चार पिढ्या सेवा केलेल्या घराण्यात अशोक यांचा जन्म झाला. त्यांच्या जीवन आलेखाचे आणि व्यावसायिक गुणवत्तेचं योग्य चित्रण विनीतांजींनी केलं आहे. एक निधड्या छातीचा सह्रदयी पोलिस अधिकारी, निष्णात खेळाडू, एक प्रेमळ व प्रामाणिक व्यक्ती आणि एक कर्तव्यदक्ष पती आणि पिता या रुपातले विविध पैलू यांचा सुयोग्य समावेश देखील विनीताजींनी मांडला आहे.
२६ जानेवारी २००९ रोजी त्यांना मरणोत्तर ‘अशोक चक्र’ प्रदान करण्यात आले. कोणत्याही प्रसंगात नेहेमीच आघाडीवर राहून नेतृत्व करणारे अशोकराव यांचे हे जीवनचरित्र पोलिस दलात येऊ इच्छिणाऱ्या असंख्य तरूणांना नेहमीच प्रेरणादायी ठरेल.
स्वतः विनीता कामटे या बीएसएल, एलएलबी आहेत. सिंम्बायोसिस विद्यापीठातून कामगार कायदे आणि कामगार कल्याण या विषयातील पदव्युत्तर शिक्षणही त्यांनी पूर्ण केलं आहे. या पुस्तकाची प्रस्तावना हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांनी लिहिली आहे. केवळ कार्यक्षम अधिकारीच नव्हे तर एक उमदा माणूस असलेल्या अशोकराव कामटे यांची जीवनकहाणी नक्कीच ह्रदयाला भिडणारी आहे.

– परीक्षण : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800