‘बोर्डरूम‘
आजकाल पुस्तकाच्या दुनियेत गेलो तर तिथे कविता, कादंबरी, चरित्र यापेक्षा मॅनेजमेंट वरची पुस्तकच खूप मोठ्या संख्येने दिसतात. तसा मी शासन सेवेत असताना मॅनेजमेंटची काही पुस्तकं वाचलेली होती. त्यात शिव खेरा, स्टीफन कॉन्व्ही, रॉबिन शर्मा इत्यादी मंडळींच्या पुस्तकांचं सखोल वाचन केलेलं आहे.
नुकताच पुस्तकालयात गेलो असताना एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर “अद्यावत माहितीने समृद्ध” “नव्या स्वरूपात सादर नवी आवृत्ती” असं या पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहिल्यावर ते ‘बोर्डरूम‘ या नावाचे पुस्तक घेऊन पूर्ण वाचून काढलं. व्यवस्थापन दुनियेची रोमहर्षक सफर या पुस्तकात लेखक श्री अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते यांनी केली आहे आणि ती अतिशय वास्तव आहे. तथापि हे पुस्तक जानेवारी २००२ मध्ये प्रकाशित झाले आणि त्याची अकरावी आवृत्ती डिसेंबर २०१० मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर १७ वी सुधारित आवृत्ती मे २०१५ मध्ये प्रकाशित झाली. ती माझ्या हाती आली.
‘बोर्डरूम‘ हे पुस्तक अद्यावत माहितीनं समृद्ध असे असून ते नव्या आणि चांगल्या स्वरूपात सादर करण्यात आलेलं आहे. हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. मराठी साहित्यात या पुस्तकाचे लेखक श्री अच्युत गोडबोले यांना मी मॅनेजमेंट गुरुच समजतो. त्यांनी मॅनेजमेंटचे तीन भाग केलेले आहे. एक म्हणजे ‘सेल्फ इम्प्रुव्हमेंट’ किंवा ‘पर्सनल मॅनेजमेंट’. या पहिल्या भागात वेळेचे व्यवस्थापन किंवा नेतृत्व कसं करावं, ‘टीम वर्क’ कसं घडून आणावं, डेलिगेशन कसं करावं, कामं वेळच्या वेळी कशी करावीत, व्यवस्थापकाने कसं वागावं, बोलावं, लिहावं अशा बऱ्याच गोष्टी येतात.
मॅनेजमेंटचा हा भाग तसा पाहिला तर जवळपास आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टींना लागू आहे. स्वयंपाक घरातल्या स्वयंपाकापासून ते एखाद्या सामाजिक चळवळीतल्या नेत्यापर्यंत किंवा युद्धातल्या जनरल पासून तर ते एखाद्या मोठ्या कंपनीच्या अध्यक्षा पर्यंत यातल्या बऱ्याच गोष्टी बरेच जण थोड्याफार प्रमाणात रोज करत असतात आणि हा भाग इतिहासातही फार पूर्वीपासून चालत आला आहे.
लेखकाच्यादृष्टीने दुसरा भाग म्हणजे ‘ऑपरेशनल मॅनेजमेंट. यासाठी तुम्ही जे काम करत आहे त्याची तुम्हाला सखोल आणि तांत्रिक माहिती हवी. या दुसऱ्या भागाचे महत्त्व औद्योगिक क्रांतीनंतर सुरू झालं ते विसाव्या शतकाच्या पहिल्या ६०-७० वर्षापर्यंत टिकून होतं असे श्री गोडबोले यांनी म्हटले आहे.
मॅनेजमेंट चा तिसरा भाग म्हणजे ‘स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट’. हा प्रकार मात्र तसा अलीकडे म्हणजे १९८० पासून त्याविषयी चर्चा जास्तच मोठ्या प्रमाणात सुरू झाली. या भागाचे महत्व अलीकडेच खूप वाढण्याचं कारण म्हणजे ‘ग्लोबलायझेशन आणि ‘जीवघेणी स्पर्धा ‘ही आहे. समाज व्यवस्थेत ‘थांबला तो संपला’ हेच खरं असतं. बदलत्या काळाबरोबर बदलायला हवं हे सगळं या मॅनेजमेंट मध्ये येतं. नवीन कुठल्या वस्तूचं उत्पादन करावं का, नवीन कुठली कंपनी विकत घ्यावी का, वगैरे प्रश्न त्यात येतात. एकूणच जागतिक उद्योगाविषयी माहिती आणि ‘स्ट्रॅटेजिक थिंकिंग’ ची गरज असते असेही विधान त्यांनी केलेलं आहे.
अतिशय धाडसाने, जिद्दीने लहान्याच्या मोठ्या केलेल्या कंपन्यांच्या ब-याच कहाण्या या पुस्तकात लेखकाने सांगितल्या आहेत आणि त्या सांगता सांगता व्यवस्थापनाची मूलतत्त्व मराठी वाचकाला अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा हेतू असल्याचे लेखकाने विशद केले आहे आणि ते संपूर्णपणे यशस्वी कसे झाले आहे ते विस्तारभयापोटी या ‘बोर्डरूम’ मध्येच जिज्ञासूंनी वाचले पाहिजे.
लेखक अच्युत गोडबोले यांना भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या मुलांमध्ये खूपच कमी उद्योजकता आढळते. आपण आपल्या मुलांना खूपच सुरक्षित आयुष्य जगायला शिकवतो. जोखीम घ्यायला शिकवत नाही. अपयशाची भीती त्यांच्या मनात पेरून ठेवतो. या सगळ्यांचा अर्थातच भारताच्या उद्योगांवर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोच. आपण अनेक लहान लहान गोष्टींपासून मोठ्या मोटर गाड्या आणि विमानापर्यंत प्रचंड गोष्टी अजून परदेशातूनच आयात करतो .विम्याच्या पॉलिसीसाठी ही आपल्याला परदेशी कंपन्या लागतात. शर्ट किंवा बुट, परफ्युम किंवा चड्ड्यांही आपल्याला परदेशी लागतात. आपलं अकाउंटिंग करण्यासाठी आयटी सुपर पॉवर असणारे आपण परदेशीच सॉफ्टवेअर पॅकेजेस वापरतो. प्रश्न कुठल्या फालतू वस्तू किंवा सेवा आपण आयात करतो याचा आहे, आणि यातल्या कित्येक गोष्टी आपण बनवू शकत नाही याचा आहे. आपल्यातील उद्योजकता वाढली तर यातल्या बऱ्याच गोष्टी कमी होतील अशी ही हे पुस्तक लिहिण्यामागील एक प्रेरणा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
‘बोर्डरुम‘ मध्ये औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या कहाण्या जितक्या सुरस तितक्यात शिकविणाऱ्या, जितक्या चटकदार तितक्याच प्रेरणादायी असल्याचे पुस्तकात पानोपानी दिसत आहे.फिनिक्स पक्षासारख्या राखेतून भरारी घेणाऱ्या अविश्वसनीय तितक्या थरारक यशोगाथाही या पुस्तकात आहेत पण स्वतःच लेखकाने प्रश्न उपस्थित केला आहे की हे सगळं कशाकरता करायचं ? कंपन्या मोठ्या बनवायच्या, अहोरात्र स्पर्धा करायची, लहान कंपन्यांना गिळून टाकायचं, आणखीन नफा मिळवायचा हे सगळं ठीक आहे पण या सगळ्यांमुळे सगळ्या मानव जातीची प्रगती जर होणार असेल, सगळ्यांना खायला, प्यायला, राहायला, शिकायला आणि आनंदाने काम करायला मिळणार असेल तर सगळं ठीक आहे. पण तसं होतंय का ? आतापर्यंत असं दिसून येईल की तसं मुळीच होत नाही. प्रत्यक्ष अमेरिकेसह आणि इतर जगातही गरिबांचे जीवनमान आणखीनच खालावलाय. गरीब जास्त गरीब आणि श्रीमंत मात्र अति श्रीमंत बनत चालले आहेत.
‘बोर्डरूम‘ चे दुसरे मॅनेजमेंट तज्ञ लेखक श्री अतुल कहाते यांनी म्हटलं आहे की, कित्येक तथाकथित ‘मॅनेजमेंट थिंकर’नी लोकांना नुसतं गाडीला जुंपलेल्या बैलासारखा करून टाकलं आहे याची प्रचिती येते. माणूस आपल्या आयुष्याच्या चहुबाजूनी आणि सर्वार्थाने मनमुराद आनंद लुटायच्या ऐवजी आपल्या नोकरीला किंवा उद्योगाला बांधलेला गुलाम झाला आहे हे नव्याने जाणवायला लागतं. माणूस हे सगळं नक्की करतो तरी कशासाठी ? असा मूलभूत प्रश्न निर्माण व्हायला लागतो. तसंच आपण आपलं आयुष्य कसं जगायचं हे तो माणूस स्वतः ठरवू शकत नाही. त्याचा साहेब, त्याची कंपनी या सगळ्या गोष्टींवर त्या माणसाचं आयुष्य अवलंबून झालेलं असतं. तो माणूस त्यांनी ठरवून दिलेल्या चक्रात नुसता फिरत असतो आणि एके दिवशी आपण यातून बाहेर पडू अशी भाबडी आशा घेऊन बसलेला असतो.अर्थातअशी ही व्यावसायिक आणि सामाजिक व्यवस्था सहजासहजी बदलणं शक्य नाही पण निदान आपल्या पुरता स्वार्थी वाटेल असा विचार करून तरी माणसानं काही केलं तरी खूप झालं.आपल्या आयुष्याला सर्वार्थाने आकार देणं तसंच नुसतंच एकसुरीपणानं त्याच त्याच गोष्टी वारंवार करत राहणं आणि त्यामुळे निराश होत राहणं याला आपण स्वतःही तितकेच जबाबदार असतो हे खरे असल्याचे म्हटले आहे. एका दिवसात हे चित्र बदलत नाही हे जितकं खरं आहे तितकं त्याविषयी कधीच प्रयत्न सुरु न करणे हेही चुकीचं आहे असं म्हटलं आहे. आणि ही भावना आणि विश्वास बोर्ड रुम पुस्तक निश्चित देतं.
या पुस्तकातून अच्युत गोडबोले यांच्या लिखाणाची खोली, त्यांची शैली, त्यातला आशय अप्रतिम, सुरेख असा आहे. लेखकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनी काही वाचक तरी बैचेन होऊन अनेक सामाजिक गोष्टी मुळापासून तपासून बघतील अशी इच्छाही व्यक्त केली आहे. म्हणून नव्या पिढीतील जिज्ञासूंनी हे ‘बोर्डरूम‘ पुस्तक वाचण्याची नितांत आवश्यकता आहे असे मला तरी वाटते.
— परीक्षण : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800