“सय-माझा प्रवास“
सई परांजपे या माझ्या आवडत्या लेखिका, नाट्य व चित्रपट दिग्दर्शिका. ‘सख्खे शेजारी’, ‘नांदा सौख्यभरे’ ही त्यांनी निर्मिती व दिग्दर्शित केलेली नाटके आणि ‘स्पर्श’, ‘चष्मेबद्दूर’, ‘कथा’, ‘दिशा’ ‘साज’ हे अनवट चित्रपट मी आवर्जून पाहिले आहेत. अचानक मला त्यांचे ‘सय -माझा कला प्रवास’ हे ऑक्टोबर २०१६ मधील प्रकाशित झालेले सुमारे ३५० हून अधिक पृष्ठांचे पुस्तक हाती आलं आणि ते अतिशय आनंदाने ३-४ दिवसात समग्र वाचून काढलं. तसं हे आत्मचरित्र नव्हे तर कला प्रवासातील एक उत्कृष्ट आत्मकथनच आहे.
जगातल्या अनेक गोष्टींचा एखाद्या उत्साही मुलीच्या अवखळ कुतूहलाने अतिशय प्रामाणिकपणे सांगण्याचं या प्रतिभावान मनस्विनीचे हे हृदगत मला फारच अपूर्व वाटलं. सईचा प्रवास आकाशवाणी, दूरदर्शन पर्यंत आणि तेथे न थांबता बालनाट्य अन् प्रायोगिक रंगभूमी पासून तर काही गाजलेल्या नाटकातल्या, अनोख्या अनुबोधपटापासून तर वर उल्लेखिलेल्या अनवट चित्रपटापर्यंत कसा झाला याचा अतिशय मार्मिकपणे रसास्वाद या पुस्तकातून घेता आला. अनेक क्षेत्रात स्वतःची अमीट छाप उमटवणारी ही सई स्वतः एक बहुआयामी कलाकार आहे हे पुस्तकाच्या पानांपानातून दिसून येते.
मनस्वी प्रेमळ आणि फटकळ, तितकीच मिश्किल आणि नर्मविनोदी, आग्रही आणि स्पष्ट वक्ती आणि तेवढीच पारदर्शी असे सईच्या व्यक्तीमत्वा चे विविध पैलू उलगडणारे हे आत्मकथन रूपी कला प्रवास वर्णन फारच उद्बोधक आहे. भावी पिढीतील तरुण तरुणींना नाट्य चित्रपटात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना ते एक मार्गदर्शक गाईडचं ठरेल असे म्हणावयास हरकत नाही.
या कला प्रवासातील लेखिका सई परांजपे यांच्या मातोश्री कोण ?असं अलिकडच्या तरूणांना वाटणं सहाजिकच आहे. केंब्रिजला गणिताची उच्च परीक्षा प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण होऊन विक्रम नोंदविणारे भारताचे पहिले सीनिअर रॅंगलर, सुप्रसिद्ध गणित तज्ञ, पुणे भुषण डॉ. रघुनाथराव परांजपे यांची ‘सई’ ही नात. त्यांची एकलुती एक कन्या शकुंतला परांजपे यांची एकुलती एक मुलगी! केंब्रिजची पदवी संपादन करून जिनिव्हा आय. एल. ओ. मध्ये नोकरी केलेली, फ्रेंच भाषा शिकलेली आणि तिथं भेटलेल्या एका उमद्या रशियन चित्रकारा बरोबर लग्न करून खळबळ उडवून देणारी सईची आई !
दीड वर्षं युरोपमध्ये संसार करून, पुढे घटस्फोट घेऊन आपल्या तान्ह्या सईला घेऊन मायदेशी, पितृ गृही परतली. पुणेकरांना हे पचायला अवघड होतं. कारण ती तेवढीच फटकळ. रशियन लाल गोरा रंग, गरगरीत गोल अंग, निळे डोळे आणि कापलेलं केस असा सईचा अवतार. एकमेकाद्वितीय असं आईचं व्यक्तिमत्त्व अतिशय मनस्वी व अतिरेकी, शिस्त वाजवीपेक्षा कठोर पण तिच्या ममतेला, लाडालाही सीमा नव्हती असं सईने तिचं देणं ‘छप्पर फाडके’ असं वर्णन केलं आहे आईनं कोणत्याही नियमबद्ध चाकोरी मध्ये स्वतःला अडकवून घेतलं नाही. व्ही शांताराम यांच्या ‘कुंकू’ चित्रपटात चित्राची भूमिका मात्र केली. त्याकाळी घरंदाज कुटुंबातील स्त्रिया सहसा पडद्यावर दिसत नसत. फ्रेंच नाटकावरून आईनं ‘सोयरीक’, ‘चढाओढ’, व ‘पांघरलेली कातडी’ ही नाटकेही लिहिली. पुढे मात्र तिने त्याकाळात भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासमवेत संतती नियमनांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. १९९१ मध्ये शकुंतला परांजपे यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार मिळाला. या संबंधीचं संपूर्ण एक प्रकरण या पुस्तकात प्रारंभीच आहे.
बालपणातील गंमती जंमती सईनं विस्ताराने दुसऱ्या प्रकरणात सांगितल्या आहेत. सईचं नाव जरी चित्रपट, नाटक किंवा दूरदर्शन या माध्यमांशी निगडित असलं तरी तिच्या बहुआयामी कारकिर्दीची सुरुवात झाली रेडिओ पासून! आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या वास्तूमध्ये तिच्या व्यावसायिक कार्यप्रणालीची मुहूर्तमेढ रोवली गेली. आकाशवाणीच्या बाल विभागाचे प्रमुख होते गोपीनाथ तळवळकर. एक समर्थ लेखक म्हणून आणि आनंद मासिकाचे संपादक म्हणून त्यांचा लौकिक होता. ‘बालोद्यान’ हा मुलांचा कार्यक्रम ते दर रविवारी सकाळी दहा वाजता बालगोपाळांच्या गच्च उपस्थितीत सादर करीत असत. त्यांची सहाय्यिका म्हणून सई काम पाहू लागली. लहान मोठी नाटक बसवणं मुलांच्या तालमी घेणं, नित्य नव्या कार्यक्रमांचा वेध घेणं हे काम होतं. या काळातही सईची सात आठ नाटक लिहून झाली होती आणि चार एक नाटकं आकाशवाणी सप्ताहात निमंत्रितांच्या उपस्थितीत मंचावरून सादर करण्यात आली होती. प्रचंड मेहनत घेऊन बसवलेल्या नाटकाचा एकच प्रयोग होतो त्यामुळे भूमिका करणारी मुलं आणि पालक विचारीत हे काय महिनाभर तालीम करून एकच प्रयोग! मग त्यांनी बाल रंगभूमी द्वारे ‘पत्तेनगरीत’ पहिलंच नाटक सादर केलं आणि ते खूपच गाजलं. बाल रंगभूमीच्या रंगमंचावर किती तरी गुणी मुलं चमकले.त्यांची गणतीच नाही .त्यातल्या कित्येक मुलांशी त्यांचा आजही संपर्क आहे. सुहास जोशी, मोहन आगाशे यशवंत दत्त, ज्ञानदा माडगूळकर, ज्योत्स्ना किरपेकर अशी अनेक मुलेमुली बाल रंगभूमीने दिली.
पुढे सईनं दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश घेतला. तेथे शिक्षण घेत असलेल्या अरूण जोगळेकर बरोबर विवाह केला. दरम्यान राष्ट्रीय नाट्य विद्यालयाला वर्षभरानंतर रामराम ठोकून सई पुण्याला परतली. दिल्लीला अरुणचं नाट्य शिक्षण चालूच राहिलं. आता तरी अगदी एका वेगळ्या निर्मितीमध्ये गुंतली होती तिने ‘विनी’ला म्हणजे अश्विनीला जन्म दिला. विनीच्या संगोपनात दंग असताना एक छानशी संधी चालून आली. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या पुणे स्थित प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांना अभिनय तंत्र आणि प्रात्यक्षिक आणि आवाज व शब्दोच्चारण- नियंत्रण शिकवण्याची नोकरी मिळाली. विषय तिच्या आवडीचे आणि चित्रपट विद्यापीठ त्यामुळे दिवसाचे दोन तास काय ते वर्ग घ्यायचे होते. विनिवर फारसा अन्याय होणार नव्हता कारण त्या नसताना तिचा ताबा घ्यायला आई आणि काकू या तिच्या दोन खंबीर आणि अनुभवी आज्या सज्ज होत्या. तेव्हा ही नोकरी आनंदाने पत्करली.
पुढे सईने दूरदर्शन दिल्लीसाठी प्रोड्यूसरच्या जागेसाठी अर्ज केला आणि सुदैवाने तिची निवड झाली. मग पुणे सोडलं आणि छोट्या विणीला घेऊन दिल्लीला त्या आल्या. अरुणचं राष्ट्रीय नाट्य विद्यालयात तिसरं म्हणजे शेवटचं वर्ष चालू होतं. तेव्हा त्यांचा गृहस्थाश्रम दिल्लीत पुन्हा सुरू झाला. दूरदर्शन मध्ये सईने एकूण आठ वर्ष नोकरी केली. बातम्या आणि कृषिदर्शन सोडल्यास बाकी सर्व विभाग तिने सांभाळले. बायकांचे आणि मुलांचे कार्यक्रम, नाटक, लघुपट, चर्चासत्र, विशेष दिन प्रसारण, मुलाखती कलापरामर्श, सांस्कृतिक झलक, नाट्य समीक्षण आणि सई नेच सुरू केलेला विविध रंजनाचा ‘पिठारा’ कार्यक्रम अशी मोठी जंत्रीच या पुस्तकात लिहिली आहे.
राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची पदवी घेऊन बाहेर पडल्यावर सहाजिकच स्वतःची नाटक कंपनी काढण्याची अरुणची आणि सईची तमन्ना होती .नाटक हाच व्यवसाय करायचा असं त्या दोघांनी ठरवलं. संस्थेला ‘नाट्यद्वयी’ हे काहीसे बाळबोध नाव बहाल करून ते रणांगणात उतरले आणि मग हॅम्लेट, नांदा सौख्यभरे, तुझी माझी जोडी जमली रे, सखाराम बाईंडर (हिंदी आवृत्ती) एक तमाशा अच्छा खासा, सख्खे शेजारी,जास्वंदी, बिकट वाट वहिवाट, सोयरिक, माझा खेळ मांडू दे इत्यादी नाटके त्यांनी सादर केली. यातील बहुतेक नाटके स्वतः सईने लिहिली, दिग्दर्शित केली होती.
नाट्य प्रवासातील अनेक प्रासंगिक घटना, अडीअडचणी, काही नाटकांचे संवाद या पुस्तकात भरपूर विस्ताराने कथित केलेले आहेत. त्यामुळे दोघांची सर्वांगिण धडपड चांगलीच लक्षात येते.ती संपूर्णपणे पुस्तकातच वाचली पाहिजे.
नाट्य क्षेत्रामधल्या इथपर्यंतच्या कामगिरीवर पडदा टाकून सईने चित्रपट सृष्टीत पाऊल टाकण्याचा निर्धार केला आणि पहिल्याच ‘स्पर्श’ या चित्रपटास सर्वोत्तम हिंदी चित्रपट, सर्वोत्तम कथा पटकथा आणि सर्वश्रेष्ठ अभिनय असे पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार नसरुद्दीन शाह यांना मिळाला. अंधविश्वाच्या पार्श्वभूमीवरील प्रेम कथेला दर्शकांचा कल्पनेबाहेर प्रतिसाद मिळाला. नसरुद्दीन शहा बरोबर शबाना आझमी, वीरेंद्र सैनी, सुधांशु श्रीवास्तव यांनी या चित्रपटात उत्कृष्ट भूमिका केल्या. ताश्कंद येथे झालेल्या महोत्सवात या चित्रपटाचा शानदार गौरव करण्यात आला.
नंतर ‘चष्मेबद्दूर’ हा तीन तरुणावरीवरील चित्रपट तीने कथा, पटकथा, दिग्दर्शन सहित निर्मित केला. हा चित्रपट सतत हाऊसफुल्ल राहिला. कॉलेजात शिकणारे म्हणण्यापेक्षा, कॉलेजात उनाडक्या करणारे, गच्चीवरच्या एका लहानशा खोलीत तिघे मिळून राहतात. सिगरेटी फुंकण्यात आणि दिवास्वप्न रंगवण्यात तिघांचा वेळ जातो. आपल्या आयुष्यात काही ‘नाजूक’ गुंतागुंत व्हावी अशी तिघांची ही मनोमन इच्छा असते पण कुणाच्यातही तशी धमक नसल्यामुळे तोंडची वाफ दवडण्यापलीकडे कुणाची मजल पुढे जात नाही. एकदा तिघे गच्चीवरून खाली रस्त्यावरून जाणारी एक छानशी मुलगी पाहतात. तिघांच्यात पैज लागते कोण आधी तिच्याशी ओळख करून घेतो आणि पुढे दोस्ती करणार ? पुढे तिघांचे केविलवालणे प्रयत्न चित्रित केले जातात. एक एक करून तिघेही प्रेमवीर सपशेल तोंडघशी पडतात. पण खोलीवर येऊन इतर दोघांना आपली फजिती सांगायची कशी? मग तिघेही एक एक कपोलकल्पित कथा रचून सांगतात अशी या चित्रपटाची कथा आहे. ती संवाद आणि गाण्यासह पुस्तकातच वाचलेली चांगली! सई चा हा दुसराच चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटात फारुख शेख, दीप्ती नवल, नसरुद्दीन शाह, राकेश बेदी, वालचंद इंडस्ट्रीजचे चेअरमन विनोद दोशी, लीला मिश्रा, सईद जाफरी इत्यादी कलावंतांनी फार सुरेख भूमिका केल्या आहेत. चित्रपट निर्मितीला येणाऱ्या असंख्य अडचणी, विविध कलाकार, वितरण, डबिंग इत्यादी तांत्रिक बाबी सईने फारच परखड परंतु खुमासदापणे लिहिले आहे ते पुस्तकातच वाचलेलं अधिक चांगले !
मुंबईतील चाळीच्या पार्श्वभूमीवर एका मराठमोळ्या वातावरणातील ‘कथा’ या अनोख्या चित्रपटाची निर्मिती करण्याची सईने तयार केली. तो देखील फारच गाजला.कलाकार चष्मेबद्दूरचेच होते. मुंबईतील सईने अनेक चाळी पाहिल्या परंतु यांना त्या कारणाने त्यांचा वापर न करता पुण्यात नारायण पेठेत, केसरी वाड्याच्या शेजारी असलेली चौपदरी साळुंखे चाळ कॅमेराला अगदी हवी तशी होती. चारी बाजूने निवासी खोल्या मध्ये पटांगण प्रत्येक खोलीच्या बाहेरून धावणारी आणि अवघ्या चाळीला सांधणारी गॅलरी असल्यामुळे कुठूनही कोणालाही साद घालावी अशी ती चाळ होती. राजाराम आणि बासू अशा दोन प्रमुख पात्रांची निवड करताना मात्र सईला फारच मजा आली. तिचे दोन आवडते नट म्हणजे नसिरुद्दीन आणि फारुक शेख हाताशी होते. दोघांना तिने कथा संहिता वाचायला दिली. नेहेमीच्या भूमिकेसाठी आपली निवड झाली आहे असा दोघांचाही प्रांजल समज झाला. म्हणजे फारूक राजाराम आणि बासू नसरुद्दीन असे त्यांना वाटले पण सईची योजना नेमकी उरफाटी होती. मी बासू फारूक आश्चर्याने म्हणाला चष्मेबद्दूर मधला माझा सीधा साधा सिद्धार्थ विसरलीस कां ? नसरुद्दीन म्हणाला माझा तडफदार व्यक्तिमत्त्व तू लक्षात घेतलं नाही. श्यामळू राजाराम म्हणून मी कसा पटेल? पण दिग्दर्शकी थाटात दोघांनाही म्हटलं अरे तुम्ही नट आहात की पोस्टर बॉईज ! तुम्हाला काही आव्हान नको का? बंद चुक्या टेलरमेड भूमिका करण्यात काय हशील आहे ? या दोघा अभिनेत्यांनी सईच म्हणणं शंभर टक्के खरे करून दाखवलं हे या चित्रपटातल्या त्यांच्या सुरेख अभिनयातून निश्चितच लक्षात येईल. या चित्रपटात फारुख आणि नसरुद्दीन बरोबर दीप्ती नवल, अरुण जोगळेकर, मिरा खरे, लीला मिश्रा, रमेश जांजानी, वासुदेव पाळंदे, जलाल आगा, नितीन सेठी, रेखा देशपांडे इत्यादी कलावंतांनी अतिशय उत्तम भूमिका केल्या. या ‘कथा’ चित्रपटाला देखील त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला.
यानंतर सई ने गिरणी व गिरणी कामगारांच्या जीवनावर ‘दिशा’ नावाचा चित्रपट तसेच चिपको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘पपिहा’ हा चित्रपट तर दोन बहिणींच्या पार्श्वगायिकांच्या जीवनावर’ साज’ चित्रपटाची निर्मिती केली.या सर्व चित्रपटाच्या कथा, पटकथा, गीत लेखन आणि दिग्दर्शन सईनेच केले. या तिन्ही चित्रपटाची कथा, पटकथा, गीतांसह पुस्तकात प्रदीर्घ स्वरूपात परामर्श घेतला आहे. दिशा चित्रपटातही शबाना आझमी, नाना पाटेकर,ओमपुरी, रघुवीर यादव यांच्या भूमिका उत्कृष्ट ठरल्या. पण चित्रपटास राष्ट्रीय पारितोषिक काही मिळाले नाही. ते कां व कसं यांचा एक मजेदार किस्सा सईने सांगितला आहे. मात्र ‘दिशा’ चित्रपट घेऊन अमेरिका, सिडनी, न्युयॉर्क, फिलाडेल्फिया ऑस्ट्रेलिया इत्यादी नामवंत विद्यापीठाने व्याख्यानासाठी सईला निमंत्रित केले होते, हा या चित्रपटाचा गौरवच मानला पाहिजे.
वयाचा एक टप्पा गाठल्यानंतर, काढता पाय घेण्याआधी ‘आपण होतो’ याची कुठेतरी सुसूत्र नोंद करून ठेवावी असं वाटल्याने त्यांनी ‘सय’रुपी कला प्रवास’ या पुस्तकाचं लेखन केलं आहे चित्रपट दुनियेतील अनेक चांगल्या वाईट आठवणी देखील सईने अगदी नावानिशी अगदी विस्ताराने सांगितल्या आहेत. तर आपलं नेमकं कुठं चुकलं तेही मनमोकळ्या प्रांजळपणे कथित केले आहे. अर्थात या सर्व बाबी त्या पुस्तकातच वाचलेल्या बऱ्या ! एकूण सईची लेखन शैली फारच अप्रतिम, सुरेख अशी असल्याचे पानापानातून प्रत्ययास येते हे या ‘सय’ चे वैशिष्ट्य मानलेच पाहिजे.
— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत माहिती संचालक नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800