Friday, November 22, 2024
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : ५६

मी वाचलेलं पुस्तक : ५६

‘आयुष्य जगताना’

आपल्या न्युज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक, माझे सहकारी राहिलेले, पुढे संचालक म्हणून निवृत्त झालेले श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेले “आम्ही अधिकारी झालो” हे पुस्तक माझ्या नुकतेच वाचनात आले.

या पुस्तकातील पहिलाच लेख, “अमीट नीला सत्यनारायण” वाचून मी खूपच प्रभावित झालो. श्री देवेंद्र भुजबळ यांना बराच काळ सत्यनारायण मॅडमचा आत्मियतेचा सहवास, सहकार्य आणि प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले, याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि हे निःसंकोचपणे नमूद करण्यास मला निश्चितच समाधान व आनंद लाभत आहे.

श्री देवेंद्र भुजबळ यांचे पुस्तक वाचून मला नीला सत्यनारायण यांनी लिहिलेले “आयुष्य जगताना” हे २०१४ साली प्रकाशित झालेले पुस्तक वाचल्याचे आठवले. नीलाजी आता हयात नाहीत. पण त्यांनी या पुस्तकातून केलेले अध्यात्माचे विवेचन आपणा सर्वांना आयुष्य जगताना अतिशय उत्तम प्रेरणा देणारे तसेच उद्बोधक आणि मार्गदर्शक ठरेल यात मुळीच शंका नाही. त्यामुळे माझ्या संग्रही असलेले हे पुस्तक मी आता पुन्हा वाचले. त्याच पुस्तकाचे परीक्षण आपण आज वाचू या.

‘महाराष्ट्र टाइम्स’ दैनिकात संपादकीय पृष्ठावर ‘सगुण-निर्गुण’ या शीर्षकाखाली एक अध्यात्मिक विषयाचे सदर नियमितपणे प्रसिद्ध होत असते. ‘मला समजलेलं अध्यात्म’ असं त्याच स्वरुप आहे आणि समाजातील या क्षेत्रातील नामवंत व्यासंगी अनुभवी व्यक्तींकडून ते लिहिलं जातं. गेल्या कित्येक वर्षांपासून हे सदर आजही अखंडपणे चालू आहे. मटाने नीला सत्यनारायण यांना “सगुण- निर्गुण” या सदरात लेखन करावयास सांगितले. या सदरातील सुमारे तीस लेखानंतर नीलाजींनी आणखी तीस लेखांची भर घालून “आयुष्य जगताना” हे पुस्तक लिहिले आहे.

स्वतः नीला सत्यनारायण यांनी पुस्तकाच्या प्रारंभीच स्वच्छपणे सांगितले आहे की, आई-वडिलांनी केलेले संस्कार, समोर ठेवलेले आदर्श आणि त्यांनी दिलेली मुल्ये हीच आपली अध्यात्मिक शिदोरी आहे. मानवता हाच सर्वात मोठा धर्म आहे. सहिष्णुता, करुणा मनात बाळगून आपण समाजाला उपयोगी पडेल असे काहीतरी करीत रहावे ही शिकवण लहानपणापासून मनात ठसलेली होती. त्याचा आध्यात्माशी संबंध आला तो एवढाच ! या पलीकडे अध्यात्म या विषयावर आपला काहीच अधिकार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. आपण भगवत गीतेवर प्रवचन करू शकत नाही, ज्ञानेश्वरीवर भाष्य करू शकत नाही. वेद आणि उपनिषद यांच्याबाबत आपल्याला जुजबी माहिती होती. आपली नोकरी धकाधकीची असल्यामुळे व त्यात पुन्हा चैतन्य सारख्या मतिमंद मुलाचा सांभाळ करण्याची जबाबदारी ईश्वराने त्यांना दिलेली असल्यामुळे त्या यथासांग पूजा किंवा पारंपारिक पद्धतीने मनातील श्रद्धा, पूजेच्या किंवा कर्मकांडाच्या स्वरूपात कधीच प्रगट करू शकल्या नाहीत. अर्थात तशा पद्धतीने आध्यात्मिक बनायचे त्यांच्या मनातही नव्हते. मुलांचे वाढदिवस पाश्चात्य पद्धतीने, उत्सवाचे स्वरूप देऊन, साजरे करण्याऐवजी गरीब मुलांना त्यादिवशी जेवण दिले तर अधिक चांगले अशा प्रकारचे विचार त्या करीत आल्या. त्यांना मिळालेल्या बक्षिसांची रक्कम जमवून त्यांनी अडलेल्या नडलेल्यांना यथाशक्ती मदत केली. या पलीकडे अध्यात्म म्हणजे काय याचा वेगळा विचार आपण कधीच केला नाही. “माणसाचे मन समजून घ्यायला माणूस व्हायला हवे, आपल्या सारखाच असतो दुसरा हे जाणून घ्यायला हवे” हे त्यांच्याच कवितेतील शब्द त्यांना साथ करीत राहिले. म्हणून त्यांनी आपण जे अध्यात्म जगतो त्याविषयी लिहायचे ठरविले. त्यांनी या सर्व लेखांमधून छोट्या छोट्या गोष्टी कथन केल्या आहेत आणि त्या गोष्टीतून त्यांना उमजलेले जीवन अथवा जीवनातील अध्यात्म यावर त्यांनी छोटीशी टिपणी केली आहे. हे पुस्तक म्हणजे आपल्या आयुष्यातील मोलाच्या क्षणांची ठेव आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

‘वेगळे अध्यात्म’ या लेखात सत्यनारायण मॅडमनी एक गोष्ट सांगितली ती अशी :
नारद मुनींना आपण सातत्याने ‘नारायण’ ‘नारायण’ म्हणतो म्हणून असे वाटायचे की श्री विष्णूंचे सर्व श्रेष्ठ भक्त आपणच आहोत. खातरजमा करून घेण्यासाठी त्यांनी मुद्दाम जाऊन श्री विष्णूंना विचारले, “नारायणा, आपला सर्वात आवडता भक्त कोण ?” नारदांना खात्रीच होती श्री विष्णू त्यांचेच नाव घेणार. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्री विष्णूंनी एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याचे नाव घेतले. नारदांना ते झोंबले.
श्री विष्णूंच्या ते लक्षात आल्यावर ते नारदास म्हणाले, “चला, आपण या या शेतकऱ्याची दिनचर्या बघू या!” दोघांनीही सबंध दिवस शेतकऱ्याची दिनचर्या पाहिली. दिवसभर तो शेतातच राबराब राबत होता. रात्री झोपण्यापूर्वी त्याने श्री विष्णूची प्रार्थना केली, ‘मला आजचा दिवस चांगला दिलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे’ असे म्हणून तो झोपला. दुसऱ्या दिवशी उठल्यावरही त्याने हात जोडले व विष्णू जवळ प्रार्थना केली “देवा माझे आयुष्य फार खडतर आहे, छोटेसे शेत आहे, पण मेहनत खूप घ्यावी लागते, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी खूप हालअपेष्टा झेलाव्या लागतात, त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. फक्त तू माझ्या संगती राहा, मी सर्व काही यथास्थित निभावून नेईन.”
शेतकऱ्याच्या हृदयातील श्रद्धा, त्याची ईश्वरावरील आस्था आणि जीवनाविषयी कुठलीच तक्रार त्याने देवाजवळ केली नाही, हे पाहून नारद मुनी वरमले. मिळालेले आयुष्य सोसण्याचे सामर्थ्य फक्त त्याने मागितले, याहून मोठे अध्यात्म काय असू शकते ? आपणही असेच काहीसे जीवन सार्थकी करणारे जगण्याचे कारण शोधले पाहिजे, असे या लेखात लेखिकेने शेवटी म्हटले आहे. हा विचार फार महत्त्वाचा आहे.

मॅडम नीला सत्यनारायण

‘तुझी गरज मोठी आहे’ या लेखात नीलाजींनी त्यांच्या वडिलांची परंपरा शिकवण सांगितली आहे. “तुझ्याजवळ दोन वस्तू असल्या आणि तुला एक वस्तू दुसऱ्याला द्यायला सांगितली, तर त्या दोन वस्तूं मधील चांगली वस्तू तू दुसऱ्याला दे” दुसऱ्याचा विचार करणे हा सुद्धा एक अध्यात्माचा भाग आहे. Thy need is greater than mine. ‘माझ्यापेक्षा तुझी गरज मोठी आहे’ ही युद्धकथा सर्वांना परिचित असेल. एका युद्धात एक सेनापती आणि शिपाई जखमी होऊन शेजारी शेजारी पडलेले असतात. दोघांनाही तहान लागलेली असते ते “पाणी पाणी” असे कण्हत असतात. अशावेळी कोणीतरी पाण्याची बुधली घेऊन त्यांच्याजवळ येतो, पण इतरांना पाणी पाजता पाजता त्याच्या बुधलीतील पाणी संपते. थोडेच पाणी शिल्लक असते. पाणी हे देणारा साहजिकपणे प्रथम सेनापती कडे जातो, पण सेनापतीच्या लक्षात येते की आपल्याला पाणी मिळाले तर या शिपायाला मिळणार नाही. तो तरुण आहे, त्याच्या घरी त्याची तरुण बायको व छोटे बाळ असेल, माझे तर बरेचसे आयुष्य उपभोगून झाले आहे. जखमी अवस्थेतही तो शिपायाला सांगतो की, “हे पाणी तू पी, कारण माझ्यापेक्षा तुझी गरज मोठी आहे.” केवढा हा उदात्त विचार आणि रोजच्या जीवनात जगलेले ‘अध्यात्म’ असाच विचार आपण करू लागलो तर हे जगच बदलून जाईल. “माणसाचे मन जाणून घ्यायला माणूस व्हायला हवे, आपल्यासारखाच असतो दुसरा हे जाणून घ्यायला हवे” असेही लेखिकेने या लेखात शेवटी म्हटले आहे‌.

‘मुझसे बुरखा न कोय’ या शिर्षकाखाली सुरवातीला त्यांनी एक कथा सांगितली आहे. एकदा एका गावामध्ये वादळ येते. घरांचे पत्रे उडू लागतात. नदीला पूर येतो. घराघरात पाणी शिरायला लागते. गावातील माणसे घाबरून एका मोठ्या जुन्या वडाच्या झाडाखाली आश्रय घेतात. तेवढ्यात विजांचा कडकडात सुरू होतो. विजेचा लोळ सारखा त्या वडाच्या झाडाजवळ येत असे आणि पुन्हा परतून जात असे, ते पाहून सगळेजण आणखीनच घाबरतात. गावातील एका माणसाला सर्वजण दोषी ठरवितात. ते त्या माणसाला उद्देशून म्हणतात, “तुझ्यामुळे ही वीज सारखी आपल्या अंगावर येऊन पाहते आहे. तू अपशकुनी आहेस. तू आम्हाला सोडून जा म्हणजे ती वीज ही इकडे येणार नाही.” तो माणूस गयावया करतो. पण त्याचे कोणीच ऐकत नाही. सगळे मिळून त्याला झाडाखालून हाकलून देतात. तो बिचारा रडत रडत समोरच्या देवळात जाऊन उभा राहतो. जसा तो वडाचे झाड सोडतो तसा विजेचा लोड झपकन खाली येतो आणि झाडाखालच्या सर्वांना भस्म करून जातो. वडा खालच्या गोष्टीने हेच सिद्ध करून दाखविले, की अन्यथा अपशकुने वाटलेल्या माणसाने झाडाखालचा आश्रय सोडल्यावर बाकी सर्वांवर वीज का पडावी ? यावर नीलाजींनी म्हटले आहे की, दुसऱ्यांच्या प्रती जी सहनशीलता आपल्यामध्ये आणावी लागते, तो ही अध्यात्माचा एक भाग आहे. वास्तविक एकमेकांशी तडजोड करूनही आयुष्य सुखाने जगता येते. आपण मात्र तसे कधीच करीत नाही. उलट दुसऱ्याच्या वर्मावर बोट ठेवून सतत आपल्याला दुसऱ्यांच्या उणीवांचा कसा त्रास होतो याचा विचार आपण करत राहतो. ही प्रवृत्ती आपण बदलली पाहिजे. आपल्या अंतर्मनात डोकावून बघितल्यावर कळते की आपल्यापेक्षा वाईट या जगात कोणीच नाही. या संदर्भात संत कबीराचा एक सुंदर दोहा त्यांनी विशद केला आहे…
“बुरा जो देखने मै चला, बुरा दिखा न कोय,
आंतर झाॅंका आपना, मुझसे बुरा न कोय”

‘आयुष्य सरताना’ या पुस्तकात अशा सुमारे साठ विषयांवर नीला सत्यनारायण यांनी सुमारे सहा महिने छोट्या छोट्या गोष्टीं सांगून अध्यात्मावर दिलखुलासपणे भाष्य केले आहे. विस्तार भयापोटी मला ते इथे देता येत नाही. म्हणून या पुस्तकातून समग्र वाचून कुटुंबातील सर्वांनीच बोध घेण्यासारखा आहे, हे नक्कीच.

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments