Sunday, September 8, 2024
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : ६०

मी वाचलेलं पुस्तक : ६०

“दिव्यत्वाची जेथे प्रचिती”

गुरू पौर्णिमेनिमित्त अध्यात्मावर एखादे पुस्तक वाचण्याची इच्छा झाली. अनेक पुस्तकातून पाचव्या आवृतीचे आठ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती’ हे श्री प्रमोद केणे यांचे पुस्तक हाती आले. सुमारे १५० पानांचे आणि गिरनारची व श्री दत्तात्रेयांची चरण पादुकांसह अनेक सुंदर चित्रे आर्ट पेपरवर असलेले पुस्तक मी एका दमात वाचून काढले.

ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी एकरूप होऊन, दत्तावतार जगाच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी घेतला आहे. कलियुगात दत्त भक्ती श्रेष्ठ मानली आहे. याचा मला अनुभव मुंबई व पुणे येथील माझ्या प्रदीर्घ सेवा काळात आला होता. मंत्रालयातील प्रत्येक खात्यांच्या काही जागेत तसेच पुण्यातील सेंट्रल बिल्डींगमधल्या प्रत्येक विभागात काही ठराविक जागेत बहुतेक चाकरमाने श्री दत्तात्रयाच्या तसबिरीवर पुष्पहार घालून नतमस्तक होत असल्याचे मी वेळोवेळी पाहिले आहे. श्री दत्तभक्ती प्रत्येक सेवकाच्या अंगी सामावलेली दिसली. हे दृश्य मी अनेक खात्यात पाहिले आहे. याखेरीज एस.टीच्या अनेक स्थानकांवर दत्त मंदिर उभारले पाहिले आहे. म्हणून हे पुस्तक उत्सुकतेने पुर्णपणे वाचून काढलं.

गुजरात मधील जुनागढ जवळ गिरनार पर्वत हे दत्त महाराजांच्या जागृत स्थानांपैकी एक आहे. दहा हजार पायऱ्या व साडेतीन हजार फूट उंची चढून गेल्यावरच स्वयंभू दत्त पादुकांचे दर्शन होते. श्रद्धेची कसोटी पाहणाऱ्या गिरणार यात्रेचे महत्त्व प्राचीन काळापासून आहे.

या पुस्तकाचे लेखक रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चौल येथे राहणारे श्री प्रमोद केणे हे विज्ञानाचे पदवीधर, सांसारिक, व एक छोटे उद्योजकही आहेत. दत्त भक्तीची ज्योत अंतरी निर्माण होऊन त्यांनी एक दोन नव्हे तर चक्क १०८ वेळा गिरनार यात्रा करून हे पुस्तक लिहिले आहे.या १०८ गिरनार यात्रा लेखकाकडून कशा घडल्या त्यांचे इत्यंभूत वर्णन या पुस्तकात केले आहे. सलग, अखंडित, दर पौर्णिमेला रात्रीच पर्वत चढून, कडाक्याची थंडी, तीव्र उन्हाळा, कोसळता पाऊस, धंद्यातील संकटे, तीव्र आर्थिक अडचणी, कशाचीही पर्वा न करता, श्रीदत्त कृपेच्या आड येणारी बंधने तोडणे हीच साधना समजून त्यांनी श्रद्धा व भक्ती यांच्या बळावर या यात्रा पार केल्या आहेत.

श्रद्धा, भक्ती, अनुभुती व विज्ञान यांचा संगम श्री केणे यांच्यामध्ये झाला असल्याचे सांगून ४ जून २०१२ रोजी हा संकल्प संपन्न झाला असल्याचे त्यांनी पुस्तकात म्हटले आहे.

गिरनार दत्त महाराजांचे अक्षय निवासस्थान आहे. यात शिखरावर दत्त महाराजांनी बारा हजार वर्षे तपश्चर्या केली आहे. त्यांच्या पायाचे गुरु शिखरावर उमटलेले ठसे म्हणजे त्यांचे चरण कमल दत्तभक्तांचे प्रेरणा स्तोत्र बनले आहे. ईश्वराचे इतर अवतार हे त्या त्या कार्यापुरते मर्यादित होते, परंतु दत्त महाराजांचा अवतार हा चिरंजीवी असून ते सदैव कार्यरत आहेत. ते परमगुरु असून सर्वांना आजही मार्गदर्शन करीत आहे अशी भूमिका ही श्री केणे यांनी पुस्तकात व्यक्त केली आहे.

गिरनारचे संपूर्ण रुप ही लेखकाने साकार केले आहे.जिज्ञासूं वाचकांच्या सुविधेसाठी ते त्यांच्याच शब्दांत असे-“गिरनार च्या पायथ्याशी ऊन आणि जैन मंदिराच्या वर अंबाजी पासून पाऊस असे चित्र पावसाळ्यात नेहमी दिसते. गिरनारच्या पायथ्याशी भवनाथ मंदिर आहे. तेथे मुंगी कुंड असून शिवरात्रीच्या मेळाव्याला या कुंडाजवळ दहा ते बारा लाख लोक जमा होतात. भवनाथ मंदिराच्या बाजूला असलेले वस्त्रोपरेश महादेव मंदिर हे सर्वात प्राचीन मंदिर आहे. गिरनार चढू लागले की दोनहजार तीनशे पाय-याजवळ राजा गोपीचंद आणि राजा भर्तरीनाथ या चिरंजीवी सिध्दयोग्यांची गुंफा आहे. साधारण तीन हजार आठशे पाय-यांवर बाविसावे तीर्थंकर नेमीनाथ भगवान यांचे प्रसिद्ध जैन मंदिर आहे. चार हजार आठशे पाय-यांवर अंबाजींचे जागृत स्थान आहे. हे समुद्र सपाटी पासून ३३३० फुट उंचीवर असून देवीच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे. पुढील डोंगराच्या सुळक्यावर सर्वात उंच ३६६६ फुट उंचीवर गुरू गोरक्षनाथांचे स्थान आहे. गुरुशिखराला लागूनच असलेला अवघड नाथांचा डोंगर हा नावाप्रमाणेच चढण्यास अवघड आहे. गुरूशिखर हे उभ्या सुळक्यासारखे असून त्याची उंची ३६३० फुट आहे. या शिखरावर निमुळत्या टोकाजवळ दत्त महाराजांचे चरण कमल आहेत. तेथे आता छोटे मंदिर बांधून दत्तमुर्तीची स्थापना केली आहे. बाजुलाच प्राचीन गणेश व हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेते. गुरुशिखरावरून खाली उतरले की कमांडलू कुंड आश्रम येतो. तेथेच दत्त महाराजांनी प्रज्वलित केलेली अखंड धूनी ही एक दैवदुर्लभ देणगी आहे. तेथून महाकाली गुंफेच्या डोंगराकडे जाता येते. गिरनारच्या बाजूला असलेल्या दोन डोंगरांवर रेणुकामाता अन् अनुसया माता विराजमान आहेत. दक्षिण बाजूला नजर टाकली की भव्य दातार पर्वत आहे. त्याचेसमोर जोगिणींचा डोंगर आहे. तेथे जाण्यास आजही कोणी धजावत नाही. गिरनारचा नकाशा पाहिला तर परिक्रमेचा मार्ग लक्षात येतो. हिंदू संस्कृतीत चरण पादुका, देवता, पर्वत, नदी यांना उजवे ठेवून गिरनार प्रदक्षिणा घालता येणे पुण्यप्रद मानले आहे. कार्तिक शुध्द एकादशीपासून गिरनार परिक्रमेला सुरूवात होते. शिवपुराणात गिरनारचा उल्लेख ‘रेवताचल’ पर्वत म्हणून करण्यात आला आहे.

गिरनारची महती सांगावी तेवढी थोडीच आहे. वरील सर्व गोष्टी गिरनार च्या दिव्यत्वाशी निगडीत आहेत असे लेखकाने म्हटले आहे. या १०८ यात्रेतून श्री केणे यांना जे विलक्षण अनुभव येत गेले, ते त्यांनी विज्ञानाच्या कसोटीवर तोलले असून या ईश्वरी लीलातील मर्म शोधून काढून ते या लीलेतच सहभागी झाले आहेत. यातील काही मोजके अनुभव भक्तिमार्गावर असलेल्या साधकांसाठी या पुस्तकातून श्री दत्तांच्या कृपेने लिखित केले आहेत. विस्तारभयापोटी हे सर्व अनुभव पुस्तकातच वाचलेले चांगले !

गिरनार पर्वतावर कसे जावे यासाठी रेल्वे, बस, विमान मार्गांचा संपूर्ण तपशीलही या पुस्तकात दिला आहे. शेवटी श्रध्दा ही महत्त्वाची आहे. ती प्रेरक शक्ती असून आपल्याला कार्य करण्यास उद्युक्त करते. आपला आत्मविश्वास वाढवते. वाईट प्रवृती पासून परावृत करून सन्मार्गाला नेण्याचा श्रध्दा हा राजमार्ग आहे हे या पुस्तकाचे थोडक्यात सार आहे. ते लेखकाच्या विविध अनुभवासह संपूर्ण वाचलेलंच उत्तम!जय श्री गुरुदेव दत्त !

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खुप छान माहिती. पूर्ण पुस्तक वाचत आहोत असं वाटलं 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments