अनोख्या दुकानाच्या गोष्टी
नेहमी प्रमाणे पुस्तकांचा शोध घेत असता मला एका अनोख्या पुस्तकाचा शोध केवळ या पुस्तकाचे नाव वाचून… “अनोख्या दुकानाच्या गोष्टी” लागला. सुमारे २४० पानांच्या, गेल्याच वर्षी प्रकाशित झालेल्या ह्या पुस्तकाचे खुपचं औत्सुक्य वाटले. अन ते घेऊन वाचून काढले.
अनघा ठोंबरे यांनी अतिशय साध्या, सरळ, सोप्या आणि प्रवाही शैलीत लिहिलेले, हे एक प्रकारचे, त्यांच्या दुकानानिमित्ताने केलेले, अप्रतिम आत्मकथन आहे. अनघा ठोंबरे यांच्या माहेरचे समाजकार्याचे संस्कार, सासरची श्रम संस्कृती, लेखन वाचनमय जीवनशैली, परिवारातून मिळालेली साथ, सहकार्य आणि स्वातंत्र्य यातून या ‘अनोख्या दुकानाची गोष्ट’ निर्माण झाली आहे. पदवी परीक्षा सन्मानाने उत्तीर्ण झालेल्या अनघांनी समाजकार्याची आवड म्हणून वेगळ्या वाटेचा शोध घेतला. रस्त्यावरच्या विखुरलेल्या कष्टकरी लोकांसाठी काही करावे, त्यांना मदत तर व्हावी पण त्यांच्या कष्टांचा सन्मान व्हावा आणि हे दोन समाजातले जे अंतर आहे ते दूर व्हावे, हे सगळे लोक सहभागातून व्हावे, सर्व लोकांना द्यायचे आहे, मदत करायची आहे, आपण केलेली मदत योग्य ठिकाणी पोहोचते की नाही याचा भरोसा वाटत नाही, आपण एक सेतू व्हावे देणारे आणि घेणारे यांच्या मधला एक निरपेक्षपणे स्वतःला वाहून घेण्याचा समाजकार्याचा मार्ग त्यांना सापडला आणि अनोख्या दुकानाची कल्पना प्रत्यक्षात अमलात आली.
कसे आहे हे दुकान ? याचे उत्तर म्हटले तर ते आहे कॅशलेस दुकान ! त्यांच्या या अनोख्या दुकानाला कॅश काउंटरच नाही. या दुकानात सर्व मोफत मिळते. दुकानाला वेळही निश्चित नाही. दुकान कधी बंदही नसते. दुकानात नोकरचाकर नाहीत. हे मोबाईल दुकान आहे. अनेकदा दुकानच ग्राहकांकडे जाते, ऑनलाइन नोंदणी न करताच घरपोच ग्राहकांकडे मोफत माल जातो. आणखी एक म्हणजे दुकानात स्टॉक नसतो, काहीही साठवलेले नसते, २४ तासात दुकान रिकामे होते. दुकानात ऑर्डर प्रमाणे माल मिळतो, मागणीप्रमाणे पुरवठा केला जातो. दुकानाची कुठलीही जाहिरात केली जात नाही. ग्राहक आपोआप येतात, सीजन प्रमाणे दुकानात वेगवेगळ्या प्रकारचा माल मागवला जातो आणि ग्राहकांना निवडीलाही वाव असतो. हा पूर्णपणे मोफत मिळणारा माल ग्राहक आपल्या कुटुंबासाठी तर नेऊच शकतात. पण वस्तीसाठी, नातलगासाठी, गावाकडच्या लोकांसाठीही नेऊ शकतात. सर्व व्यवहार विश्वासावर चालतो. दुकानात व्हरायटी भरपूर असते. सुई दोरा, कपबशी पासून लॅपटॉप टीव्ही सर्व काही मिळते. रुमालापासून नऊवारी साड्यांपर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळतात. धान्य किराणामाल मिळतो. हे कॅशलेस दुकान आहे. दुकान कायम तेजीत असते. त्याला परवाना जीएसटी नोकरचाकर काहीच नाही. नोटाबंदीच्या या धंद्यावर काहीच परिणाम झाला नाही. कारण तिथे नोटा लागतच नाहीत.
‘आमची अन्यत्र कुठे शाखा नाही’ हे मात्र या दुकानाचे वैशिष्ट्य आहे. असे दुकान खरंच कुठेही नाही. आमच्याकडे शाखा काढा असे सगळीकडेच लोक म्हणतात. त्यांनी अशी दुकाने काढली तरी कुणाची काही हरकत नाही. कुणीही दुकानदार होऊ शकतो पण लेखिका म्हणते की प्रत्यक्षात मात्र कुणीही असे केलेले नाही. अनेक जण दुकान बघायला मोठ्या उत्सुकतेने आले. दुकान चालू करायचे ठरवले, मार्गदर्शनही घेतले, पण प्रत्यक्ष कोणी असे काही करू शकलेले नाहीत. हे दुकान एकमेव अद्वितीय आहे. दुकान सुरू होऊन पंधरा वर्षे झाली. या दुकानाची जाहिरात लोकच करतात. दुकानदाराला काहीच करावे लागत नाही. हे दुकान २४ तासात जसे रिकामे होते, तसे ते २४ तासात पुन्हा भरते. एका दिवसात या दुकानातील मालाची कथा संपते आणि दुसऱ्या दिवशी दुकानात वेगळाच माल असतो. मालाची नोंद ठेवणे, स्टॉक करणे, लेबल लावणे, जीएसटी, पावत्या यापैकी काहीही इथे नसते. सणवार, सुट्ट्या, परिस्थिती, वेळ पाहून माल मागवला जातो गरजेच्या चैनीच्या सर्व गोष्टी इथे मिळतात. जगण्यासाठी आनंदासाठी जे जे लागते ते ते इथे मिळते. इथे काही गोष्टी लायब्ररी बेसीसवर मिळतात. म्हणजे ग्राहक त्या नेतात आणि त्यांचे काम झाले की पुन्हा आणून देतात. साड्यांची लायब्ररी आहे. भारी जरीच्या कांजीवरम प्युअर सिल्क साड्या, शालू, लायब्ररी बेसिसवर मिळतात .सणवार, लग्नकार्य, घरातले समारंभ, देवदेव, यात्रा, जत्रा, पूजा वाढदिवस या दिवशी पसंतीची साडी न्यायची व वापरल्यावर परत आणून द्यायची आणि फारच आवडली तर बक्षीस द्यायला ही हरकत नसते. हे दुकान वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी रूपे धारण करते.
या दुकानात महिला मंडळ, अभ्यासिका, स्वच्छतागृह, दवाखाना, रोजगार विनिमय केंद्र, ऑर्डर सेंटर, वधूवर सूचक केंद्र, रेशन, खेळण्यांचे, बेंटेक्स दागिन्यांचे दुकानही आहे. दुकानात बहुतेक सगळे सामान, जुने, वापरलेले पण वापरण्यायोग्य असते. अनेक वेळेला नवे कोरे पॅकिंग लेबल असलेल्या गोष्टीही मिळतात. दुकानात सन्मानाने प्रेम, आदर, प्रतिष्ठा, आणि कृतज्ञता मिळते.
विशेष म्हणजे या दुकानात माल लोकच सेवाभावनेने भरतात. दोघा तिघांची मध्यमवर्गीय घरातील जुनी कालबाह्य झालेली मोठमोठी भांडी, घागर बादल्या, पाण्याची पिंपे, तांबे, वाट्या, पेले मोठी ताटे दुकानात आणून दिल्या जातात. तीच बाब कपडे, ड्रेस, पादत्राणे, सजावटीच्या वस्तू दुकानात दिल्या जातात. घेणारे हात तर खुप आहेत तर देणा-याचे हात ही भरपूर आहेत. धान्य, शैक्षणिक साहित्य, कपडे रोजच येत असतात. अनेक दानशूर व्यक्ती, संस्था, कंपनी गरीबांसाठी नव्या विविध वस्तूंचे, दान दुकानाला सेवाभावाने नेहमीच करतात. त्यामुळे हे अनोखे कॅशलेस दुकान उत्तम प्रकारे चालते.
अनघा ठोंबरे यांनी प्रारंभी सावित्रीबाईंच्या लेकींनी बुद्धिमत्ता, कर्तृत्व, चिकाटी, एकाग्रता, साहस, जिद्द, महत्त्वाकांक्षा अनेक गुणांनी नेत्रदीपक प्रगती केली आहे. संगणकापासून अंतरिक्षा पर्यंत प्रत्येक क्षेत्रात झेप घेत आहेत. परिवर्तनाच्या लाटेवर स्वार होऊन समस्यांचा समुद्र पार करून साहित्य, संगीत, कला, क्रीडा, सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. समाजकार्य, सेवा, स्वयंपाक आणि शिक्षण या परंपरागत क्षेत्रातही नवी दालनं त्यांनी शोधली आहेत. संशोधन, प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे असे सांगून समाजातील निरक्षर बहिणाबाईंच्या लेकींचीही जाणीव करून दिली आहे. या लेकी म्हणजे कष्टकरी, मोल मजुरी करणाऱ्या, शेतात राबणाऱ्या, किरकोळ भाजी विकणाऱ्या, पडेल ते काम करणाऱ्या, स्वयंपाक, वृद्ध सेवा, रुग्णसेवा, बालसेवा, साफसफाई, वरकाम, बाग काम, फाॅल-पिको करणा-या, गोधड्या शिवणाऱ्या, आयाचे काम करणाऱ्या, डबे पोहोचणाऱ्या, चहाची टपरी चालवणाऱ्या, मोलकरीण, बोहारणी आहेत. शाळेचा तोंडही न पाहिलेल्या या एकलव्य विद्यापीठाच्या पदवीधर आहेत. जीवनाच्या शाळेत त्या शिकतात. त्यांचं जीवन साधं सरळ सुरक्षित नसतं अनेक उलथापालथी घडामोडी असतात. प्रत्येक दिवस वेगळा असतो. दारिद्रय, कष्ट, उपेक्षा, अनिश्चितता असते. वर्तमान, भूत, भविष्य, कुठेही आशेचा किरण नसतो अशा लेकींसाठी आपण हया अनोख्या दुकानाची वाट शोधली आहे असे सांगितले आहे आणि अशाच काही छाया, मंदा, लक्ष्मी, इंदिरा, जनाबाई, पार्वताबाई, शांताबाई, इत्यादी कष्टकरी महिलांच्या सत्यकथाही सांगितल्या आहेत. विस्तार भयापोटी त्या काल्पनिक नसलेल्या सत्यकथा व दुकानासंबंधीची समग्र तपशीलवार माहिती व त्यांद्वारे विविध उपक्रम हे सर्व आपण पुस्तकातच वाचलेलं चांगलं !..
शेवटी लेखिका अनघा ठोंबरे यांच्या पुण्यातील या अनोख्या दुकानाचे स्वागत करून ‘श्रमिक स्त्री संस्कृतीचे जगणं’ आजपर्यंत लेखनात फारसे आलेले नाही. प्रतिकूल परिस्थितीतले त्यांचे श्रम, विचार, प्रेम, वास्तव्य, संसार, जाणून घेऊन दोन समाजातील अंतर दूर होण्याची मानवतेची आनंद यात्रा आरंभ होण्याच्या दृष्टीने त्यांच्या या अनोख्या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल असे म्हणावेसे वाटते.
— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक. नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800