Thursday, November 21, 2024
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : ६६

मी वाचलेलं पुस्तक : ६६

‘जीत की हार व्हा तयार’

व्यक्तिमत्त्व विकासासंबंधीची पुस्तके शोध घेतांना मला डॉ.उज्वल पाटणी यांचे “जीत की हार व्हा तयार” हे पुस्तक हाती आले. परंतू मुखपृष्ठावर “हे पुस्तक विचार करून वाचायला घ्या कारण यात स्तुती किंवा रंजन करणाऱ्या गोड गोड पुस्तकी गोष्टी नाहीत. हे पुस्तक तुम्हाला घायाळ करू शकते, इजा पोहोचू शकते, लज्जित करू शकते, वैतागही आणू शकते, हे तुम्हाला प्रेरितही करू शकते किंवा तुमच्यासमोर एखादे कटू सत्य उघड करू शकते. एक गोष्ट मात्र नक्की आहे तुमच्या डोक्यात विचारांचा स्फोट घडविण्याची यात क्षमता आहे” इतके वाचल्यानंतर हारजीतची परवा न करता एक आव्हान म्हणून मी हे पुस्तक हाती घेतले आणि संपूर्ण वाचून काढले. या पुस्तकामुळे मी खूपच प्रभावित झालो. हे पुस्तक व्यक्तीमध्ये एक नवा जोश भरणारे आहे. यातील प्रत्येक शब्दाशी माझी सहमती आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

सन्मानाने हरण्याची आणि गर्वाने जिंकण्याची सूत्रे सांगणारे क्रांतिकारी विचारवंत आणि स्पीच गुरु डॉक्टर उज्वल पाटणी यांचे  हे इंग्रजीतील पुस्तक असून त्याचा अनुवाद श्री. यशवंत एकनाथ कुलकर्णी यांनी केला आहे. डाॅ.उज्वल पाटणी हे BDS, MBA, M.A, CCP, CHR असून ग्रीनिज विश्वविक्रमाचे मानकरी असून कमलपत्र पुरस्काराचे विजेते आहेत.त्यांचे ‘यशस्वी वक्ता’, ‘यशस्वी व्यक्ती’ आणि ‘जुडो, जोडो, जीतो’ या इंग्रजी पुस्तकांचे प्रसिद्ध लेखक आहेत.

जय आणि पराजय हे ध्येयप्राप्तीतील प्रवासाचा एक भाग आहे. हरल्यामुळे कुणी लहान होत नाही आणि जिंकल्यामुळे कोणी मोठा होत नाही. तुम्ही तुमच्या क्षमतांचा पुरेपूर वापर केला किंवा नाही, तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी घाम गाळला किंवा नाही, याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. ध्येय गाठल्यानंतर जो आनंद मिळेल त्याची कल्पना करत ठाम रहा, मग मार्गात कसल्याही अडचणी येवोत, इतके ‘जीत की हार, व्हा तयार’ या पुस्तकाचे थोडक्यात सार असल्याचे मला तरी सांगावसे वाटते.

डॉ.पाटणी यांनी या पुस्तकात ”अपयशी होणे म्हणजे आयुष्य संपले असे नाही, वरदान म्हणावे की शाप, साथ सोडा, साथ निवडा, तणाव असेल तर आयुष्य असेल, स्वतःचे मार्केटिंग करा” ‘वेळच मिळत नाही’ हे तुमचे पालूपद आहे कां ? शक्ती सोबतच दिशा असणेही महत्त्वाचे, जीवनातील प्राधान्यक्रम ठरवा, भूतकाळापासून मुक्त व्हावे लागेल, तुमच्या अवतीभोवती कसे लोक आहेत सकारात्मक किंवा नकारात्मक, अभिमान पाहिजे- अहंकार आणि देखावा नको, यश म्हणजे काय चीज आहे, लक्षा शिवाय सर्वदूर अंधार, उत्साह नसेल तर मृत आहात, नाकारले जाण्याची भीती, तुमचा स्वतःवर विश्वास आहे काय, तुम्ही पण संधीचे रडगाणे गाता काय, जे पाहिजे, ते वाटू लागा, सिद्धी पाहिजे तर एकाग्रता साधा अशा शिर्षकांची सुमारे ३९ प्रकरणे या पुस्तकात नमूद केले असून यशस्वी वागणुकीचे शक्तिशाली नियम तसेच ‘गुडविल’ वाढविण्याचे पंचवीस कानमंत्र दिले आहेत.

या पुस्तकात लेखकाने खालील ५ महत्वाच्या बाबींची सुत्ररूपाने रोखठोक विवेचन केले आहे ते असे-   
१. आपण सन्मानाने जगू इच्छित असाल तर आपल्या भूतकाळापासून स्वतःला मुक्त करा. स्वतःविषयी उच्च मत बाळगा. आणि पूर्ण ताकदीने नवीन आयुष्य सुरू करा. कोणत्याही तऱ्हेचे बहाने सोडून द्या. जय किंवा पर्याया सारखे बेईमान शब्द डोक्यातून काढून टाका. आणि फक्त एवढा संकल्प करा की “मी जे काही करू शकतो ते पूर्ण ताकद आणि इर्षेने करीन” आणि मग तुम्हाला चिंता करण्याचे काही कारण नाही. कारण परिणाम नेहमीच आपल्या अपेक्षेपेक्षा सर्वोत्तम असेल, मग परिस्थिती स्वतः वाकून तुम्हाला नमस्कार करू लागेल. कारण उगवत्या सूर्याची आराधना सारे जग करीत असते. आपल्याकडे काय नाही त्याचा आपण नेहमीच विचार करीत असतो. आपल्याकडे किती आहे याच्या विचार आपण फारच थोडा करतो.
२. जीवनात ज्या गोष्टींना आपण ‘दुर्भाग्य’ मानतो त्या भविष्यात ‘सौभाग्य’ ठरू शकतात. त्यामुळे परमेश्वराच्या इच्छेचा विश्वास बाळगा. तुमची १००% शक्ती लावा. हाती असलेले कोणतेही काम पूर्ण शक्तीनिशी करा.           
३. गंभीरपणे तुमचे संपर्क आणि मित्रांची यादी तयार करा. साथ सोडण्यायोग्य असणाऱ्या व्यक्तींना सोडण्याचा आणि साथ सोडण्यायोग्य असणाऱ्या; परंतु ही तसे करण्यास नाईलाज असणाऱ्या व्यक्तींची कामाशी काम ठेवा. यशस्वी आणि सकारात्मक लोकांकडे मैत्रीचा हात पुढे करा. त्यांची संगत निवडा, मग भलेही यासाठी थोडे वाकावे लागो.                  
तणाव पूर्ण परिस्थितीमध्ये थंड डोक्याने हा विचार करा की आपण कोणती परिस्थिती बदलू शकता ? व कोणती परिस्थिती आपण बदलू शकत नाही ? न बदलणाऱ्या गोष्टीची चिंता आपण करीत राहाल तर तणाव वाढत राहील. कारण पूर्ण शक्ती लावली, तरी न बदलणाऱ्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही. या परिस्थितीत आपल्या नियंत्रणात असणारी कामे कोणती ? त्या कामांची तत्काळ जबाबदारी घेऊन ती हाती घ्या. तसेच जी कामे आपल्या हाताबाहेरची आहेत ती गौण मानून त्यात आपली शक्ती व्यर्थ गमावू नका. तणाव वाटून टाकाल तर कमी होईल. लपवाल तर वाढेल ही गोष्ट लक्षात घ्या. आपले शब्द आणि कामामधून तणावाचे प्रतिबिंब दिसते. आपण लवकर उत्तेजित होतो, चिडतो, मग चुका वाढतात, आणि तणाव आणखीन वाढतो. या चुकांची भरपाई नंतर आपल्याला करावी लागते. कोणत्याही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला थोडे धैर्य बाळगून वागावे लागेल. थांबा, विसावा घ्या आणि नंतर विचार करा. प्रयत्नात कमी पडू नका पूर्वीपासूनच डोक्यात ग्रह तयार करू नका. सर्व शक्य मार्गांचा विचार करा आणि एकाग्र होऊन उपाय शोधा.       
४. स्वतः चे मार्केटिंग करा, सुरुवातीला स्वतःच्या प्रतिभेचा भोंगा स्वतःच वाजवावा लागतो. स्वतःची प्रशंसा स्वतः करावी लागते आणि स्वतःच मार्केटिंग करणे लाज वाटण्याची गोष्ट नाही. यश मिळवण्यासाठी ‘जीनियस’ असण्यापेक्षाही ‘कॉमनसेन्स’ असणे खूप महत्त्वाचे आहे. आपण स्वतःची मार्केटिंग करू लागताच लोक तुम्हाला ‘संधीसाधू’ ‘अति महत्त्वाकांक्षी’ ‘अति शहाणा’ ‘चमचा’ अशी अनेक नावे ठेवतील. त्यांची पर्वा करू नका. कारण थोड्याच दिवसात त्यांच्या तोंडी एकच शब्द असेल ‘यशस्वी’  ! स्वतःला धैर्याने सादर करा, चांगले कपडे परिधान करा. श्रेष्ठ दिसू लागा. आपल्या बाहेरील रूपावर लक्ष द्या. व्यक्तिमत्व सकारात्मक पहिला प्रभाव तयार करते स्वतःच्या गुणांना मूर्त रूप द्या. स्वतःची प्रतिभा समोर ठेवा. कोण काय म्हणेल त्याचा विचार करू नका.
५. ‘वेळच मिळत नाही ‘हे आपले पालूपद नसावे. जी कामे करणे आवश्यक आहेत, ती लगेच करून टाका. आणि जी करायची नसतील त्यासाठी ‘नाही’ म्हणणे शिका. आपण एखाद्या महत्त्वाच्या कामात गुंतलेले नसाल आणि एखादे काम आठवले तर लगेच करून टाका. नंतर करू म्हणून ते टाळू नका. तुमच्याकडे एकच जीवन आहे ते तुम्ही असेच बहाणेबाजी करून घालवून टाका किंवा संघर्ष करून तुमचे यश मिळवा आणि स्वतःच्या जीवनाचे सार्थक करा. अर्थात निवड तुमचीच आहे.
तुम्हाला भूतकाळापासून मुक्त व्हावेच लागेल. भूतकाळातील एखादा महत्त्वाचा अनुभव भविष्यातील भरारीचे इंधन बनू शकत असेल तरच तो लक्षात ठेवावा आणि इतर सर्व काही विसरून जा.                              

जीवनात अडचणी येतीलच, त्यावेळी ईश्वराला आठवा; पण त्यासोबत पूर्ण शक्तीनिशी कर्म ही करा; कारण देव कर्मवीरांचा चाहता आहे. जे लोक आपले अपयश आणि नालायकी, भाग्य किंवा देवाच्या इच्छेच्या नावाखाली लपवतात, ते जीवनभर असेच राहतील. कारण देव देखील कर्मवीरांच्याच हाकेला ‘ओ’ देतो.

नकारात्मक लोक नेहमीच बदलता न येणाऱ्या गोष्टींची निंदा करून आणि त्यावर रडून वेळ व्यर्थ घालवितात. सकारात्मक विचार करणारे लोक जी कामे करू शकतात त्यात पूर्णवेळ लावून टाकतात आणि ज्यांचे नियंत्रण शक्य नाही अशा गोष्टींवर डोके लावत नाही. ‘पण’, ‘परंतु’, ‘टाळाटाळ’, ‘अडचण’ यासारखे शब्द स्वीकारू नका. कारण हे शब्द माणसाने तयार केलेल्या आपल्या सीमा आणि काम टाळण्याचे पर्याय आहेत. नकारात्मक लोकांपासून शंभर टक्के दूर राहण्याचा प्रयत्न करा. गप्पाटप्पा, निंदा आणि टीकेत उर्जा नष्ट करू नका. एका विजेत्याप्रमाणे स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि ‘मी करू शकतो ‘अशी भावना ठेवा.

चांगल्या कामासाठी कोणतीही वेळ अयोग्य असत नाही. एका सकारात्मक बदलासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही. त्यामुळे आपण एक लवकरच उच्च निर्णय घ्यावा हे उत्तम ! आपण एक छोटेसे उद्दिष्ट साध्य केले असेल तर मोठ्या उद्दिष्टाशी लढा. कारण जोपर्यंत लढत राहाल, तोपर्यंत जिवंत असाल. प्रत्येक आव्हान सोबत उत्तर घेऊन येत असते. तुमच्यात गुण असतील तर अहंकाराने त्याचा देखावा उभा करण्याची काहीही गरज नाही. धोरण आखून तुमची कामे करीत रहा, योजनाबद्ध मार्केटिंग करा, गुण आपोआप सर्वांना दिसून येतील. जीवनात लोकप्रिय व्हायचे असेल तर सर्वात जास्त ‘तुम्ही’ काही वेळा ‘आपण’ आणि सर्वात कमी वेळा ‘मी’ या शब्दांचा वापर करा. यशातील वाटा ३५%टक्के कठोर मेहनत, ३५ टक्के बुध्दिमत्ता, १५टक्के भाग्य व १५ टक्के मार्केटिंग, व्यक्तिमत्त्व व इतर गुणांसाठी आहे. यावरुन कठोर मेहनत, दृष्टिकोन आणि योग्य दिशा यांना पर्याय नाही. प्रत्येक माणूस प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. तेंव्हा स्वतःचे क्षेत्र, स्वतःची आवड आणि क्षमतेप्रमाणे निवडा. आपली जिंकण्याची जिद्द असेल तर विजय निश्चितच मिळेल.

यशस्वी वागणुकीचे शक्तिशाली नियम लेखकाने सांगितले आहेत. ते असे….
१) बोलण्यापूर्वी विचार करा
२) चूक झाली असेल तर लगेच स्वीकार करा
३) तुम्ही काय म्हणता, त्यापेक्षा महत्त्वाचे तुम्ही कसे म्हणता?
४) वादाचा शेवट मोठेपणा घेऊन करा
५) जुन्या गोष्टी उकरून काढू नका
६) इतरांना असहमत होण्याचा अधिकार आहे. त्यामुळे उत्तेजित होऊ नका.

साधारणपणे मी पुस्तकातील लेखकाचे प्रदीर्घ प्रकरणांचा सारांश वरील ११ मसुद्यात अगदी थोडक्यात दिला आहे. अजूनही खुप वाचण्यासारखे आहे.

पूर्ण करायच्या पंधरा वचनात मला “दर महिन्याला एक पुस्तक वाचा” हे कलम जास्त आवडले. एका यशस्वी व्यक्तीची लेखणी तुमच्या जीवनात देखील जबरदस्त सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकते असे लेखकाचे म्हणणे आहे.

आपल्या कुटुंबियांना प्रथम प्राधान्य देण्यासाठी प्रयत्नशील रहाण्याचे आवाहन करुन यशस्वी आणि आनंदी जीवन बनविण्यासाठी पंधरा वचने आणि ‘गुडविल’ तयार करण्याचे आणि त्या बळावर यश मिळविण्याचे २५ खरे मंत्र आणि स्वतःची उर्जा वाचविण्यासाठी “लोड मत लो” हा गुरुमंत्र देखील दिला आहे. ते सर्व विस्तार भयापोटी पुस्तकातच वाचलेले चांगलं!

या पुस्तकाचे बाबतीत मॅंगसेसे विजेत्या डॉ.किरण बेदी यांनी हे पुस्तक व्यक्तीमध्ये एक नवा जोश भरणारे आहे. या पुस्तकामुळे मी खूपच प्रभावित झाले आहे असे जे म्हटले आहे त्यावर  मी शंभर टक्के सहमत आहे. सर्वांना सन्मानाने हरण्याची आणि गर्वाने जिंकण्याची सूत्रे सांगणारे डॉ उज्ज्वल पाटणी हे खरे क्रांतिकारी विचारवंत आणि ‘स्पीच गुरु’ आहेत’ आणि त्यांचे हे “जीत की हार, व्हा तयार” दुसऱ्या आवृतीचे पुस्तक नव्या पिढीला दिशा व प्रेरणा देणारे आहे यात तीळमात्र शंका नाही.

देवेंद्र भुजबळ

एक मात्र खरं, हे पुस्तक वाचताना मला आपल्या न्यूज स्टोरी टुडे चे संपादक श्री देवेंद्रजी भुजबळ यांच्या कर्तृत्वाची प्रत्येक प्रकरणातून झलक दिसत होती. त्यांचे चार वर्षांपासून समर्थपणे उभे  राहिलेले ‘न्यूज स्टोरी टुडे’ पोर्टल. तेथून पुढे प्रकाशन व्यवसायाची उभारणी ! हे सर्व व्याप करत असतांनाच अनेक यशस्वी पुस्तकांचे लेखन ! अनेक सभा सभारंभात, दुरदर्शनवर अनेकदा सामाजिक, शैक्षणिक विषयांवर सडेतोड विचार व्यक्त करण्यात यशस्वीरीत्या वाटचाल ! अनेक नियतकालिकात विकास तसेच वैचारिक विषयांवर सातत्याने लेखन ! माध्यमक्षेत्रातील एक सव्यासाची, प्रथितयश विचारवंत म्हणून उज्वल प्रतिमा ! महाराष्ट्र राज्याचे यशस्वी कतर्बगार माहिती संचालक म्हणून लौकिक ! अनेक अनुबोधपटांची निर्मिती ! मला वाटते हे पुस्तक देवेंद्रजींनी अगोदर वाचले तर नाही ?

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक. नासिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. जीत की,हार… या डाॅ. पटणी यांच्या पुस्तकाच्या मराठी भाषांतरावर तोरणे सरांचे भाष्य पुस्तकाइतकेच सकारात्मक. सन्मानाने हरणे याविषयावर बोलताना,जीवनात हरण्याची चिंता न करता,हरल्याने तुम्ही कमी होत नाही,हा विचार मौलिक वाटला.जय पराजयापेक्षा तुम्ही तुमच्या निर्धारित स्वप्नाकडे कसे प्रवास करता हे महत्वपूर्ण हा विचार भावला.

  2. श्री सुधाकर तोरणे सरांनी ‘ जीत की हार व्हा तयार’ ह्या सकारात्मक विचार पेरणाऱ्या पुस्तकाचे सुंदर विवेचन करून पुर्ण पुस्तकाचा सार सादर केला आहे. तोरणे सरांची ही हातोटी वाखाणण्याजोगी आहे.

    तोरणे सरांचे व देवेंद्र सर दोघांचेही अभिनंदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments