धर्मक्षेत्रे-कुरूक्षेत्रे
गणेशोत्सवाचा धुमधडाका चालू होता. अशा वातावरणात एखादं आध्यात्मिक पुस्तक वाचावं असं ठरवलं आणि पुस्तकाच्या शोध यात्रेत “धर्मक्षेत्रे कुरूक्षेत्र” हे अगदी अलीकडचे म्हणजे अठरा वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले श्री विश्वास दांडेकर यांचे पुस्तक हाती आले.
महाभारताबद्दल आणि त्यातील अनेक व्यक्तीरेखा या विषयी विद्वान चरित्रकर्त्यांची तसेच अनेक साहित्यिकांची पुस्तके यापूर्वी वाचली होती. अगदी बाळशास्त्री हरदास यांचे ‘भगवान श्रीकृष्ण’, अ.ज. करंदीकर यांचे ‘महाभारताची पार्श्वभूमी’, डॉ. इरावती कर्वे यांचे ‘युगांत’, आनंद साधले यांचे ‘हा जय नावाचा इतिहास आहे’, नरहर कुरुंदकर यांचे ‘व्यासांचे शिल्प’, दुर्गा भागवतांचे ‘व्यासपर्व’, दाजी पणशीकर यांचे ‘महाभारत: एक सुडाचा प्रवास’, रणजित देसाई यांची ‘राधेय’ आणि शिवाजी सावंताची ‘मृत्युंजय’ ह्या महारथी कर्णाच्या विफल जीवनाचा वेध घेणा-या कादंबरी तसेच सावंतांचीच श्री कृष्णावरील ‘युगंधर’ कादंबरी, तात्यासाहेब शिरवाडकर यांचे नाटक ‘कौंतेय’… अशी अनेक पुस्तके या विषयावर उत्सुकतेने वाचली होती.
अलीकडे कमला सुब्रह्मण्यम यांच्या इंग्रजीतील ‘महाभारत’ या दोन खंडाचे मंगेश पाडगावकर यांनी अनुवादित केलेलं अत्यंत सोपे, रसाळ कथारुप पुस्तक सेवानिवृत्तीनंतर केवळ आनंद घेण्यासाठी बालसुलभ वृत्तीने वाचून काढलं.!.
विश्वास दांडेकर यांचे हे पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर मला असे वाटले की महाभारताची कथा यात असावी. परंतु संपूर्ण पुस्तक वाचल्यानंतर हे काहीतरी आगळे वेगळे आहे असेच दिसले. महाभारताचे मुख्य कथानक लहान थोरांना सर्वांनाच परिचित आहे. विस्तारभयापोटी ते सांगण्याची जरुरी नाही. मात्र पुस्तक नव्हे तर ग्रंथ वाचल्यानंतर लक्षात आले की हा महापट एका पूर्णावताराची ईश्वरलीला म्हणून न पाहता एका लोकोत्तर नेत्याचे कार्य व त्याने खेळवलेले राजकारण म्हणून पाहिले पाहिजे असे लेखकाचे मत आहे असे दिसले..त्यातून कृष्ण जास्त चांगलाच कळतो. अवतार म्हणून चित्र पाहण्यापेक्षा मानवी कर्तृत्व म्हणून न्याहाळले म्हणजे त्याची भव्यता कितीतरी मोठी आहे हे या वाचनातून लक्षात आले.
श्रीकृष्ण हे संपूर्ण भारतव्यापी दैवत आहे. या दैवत प्रतिमेने भारतीय मनाला सर्वांगाने आकर्षित केले आहे. भारताचे फार मोठे सांस्कृतिक विश्व व्यापणारी, जीवनाच्या ताण्याबाण्यांना सतत स्पर्श करणारे, प्रतिमान आहे असे लेखकाने सांगितले आहे.
तसे पाहिले तर भारतीय जनतेचा दैवतपट विशाल आहे. या सर्वच दैवतांचा उगम विकास हा भारताच्या सामाजिक उत्क्रांतीच्या एक महत्त्वाचा घटक आहे. श्रीराम, शिव, गणपती यांचे स्थान तरविशेषच आहे. शिवाय त्याच आवारात स्थानिक दैवते आहेत. आंबा, तुळजा, रेणुका, काली, कामाख्या विद्यावासिनी अशा मोठ्या पटापासून स्थानिक ग्रामदैवता पर्यंत पसरलेल्या या पटात सर्वांनाच कमी अधिक महत्त्व आहे. या देवी देवतांची रूपे त्यांची पुजाअर्चा भारतभर पसरलेली आहे. ही सर्व महत्त्वाचीच आहेत. पण यांचे महत्त्व कमी न करता कृष्ण हे दैवत आपले निराळे स्थान राखून आहे.
श्रीकृष्ण चरित्राची ही वाढ भारताचे भावविश्व श्रीमंत करणारे सांस्कृतिक इतिहासातले एक आकर्षक पर्व आहे. कृष्ण एक लोक विलक्षण नेता, सावध राजकारणी, धाडसी योद्धा, असामान्य युद्ध विशारद, अफाट बुद्धिवैभवाचा धनी, प्रज्ञावंत महामानव असा आहे.असा हा माणूस महाभारत पटाच्या केंद्रस्थानी आहे. सांस्कृतिक मान्यतेप्रमाणे गीतेचा उद्गाता प्रवक्ता कृष्णच आहे. सांस्कृतिक भारताची कुठलीही रंगछटा कृष्ण चरित्राशिवाय पूर्ण होतच नाही.
पुन्हा कृष्ण हा धनुर्धर आहे, योद्धा आहे, युध्दविन्मुखही आहे.y कंसाचा वध करून एकतंत्री राजवट संपवणारा आहे. जरासंध वध घडवून साम्राज्य उलथविणारा आहे. पांडवांना मदत करून नवे साम्राज्य उभारणारा आहे. पण त्याचवेळी स्वतःसाठी राज्य नाकारणारा, पण त्याचवेळी मोहात न पडणाराही आहे.
मानवी जीवनाची सर्व गुंतागुंत, सर्व वैविध्य या व्यक्तिरेखेत एकवटत जे काही विलोभनीय सर्वोत्तम असेल ते कृष्णचरित्राशी जोडले गेल्यामुळे भारताच्या संस्कृतीचा परंपराचा, धर्माचा, तत्त्वज्ञानाचा किंबहुना कुठल्याही रंगाचा आधार कृष्णचरित्रात सापडतो. कृष्ण एकटाच पूर्ण अवतार अशी लोकश्रद्धाही आहे असे या ग्रंथातील अनेक प्रकरणावरून लेखकाची भूमिका स्पष्ट होते.
या भव्यदिव्य पटात दिसणाऱ्या सर्व घटना-छटा तशाच प्रत्यक्ष घडल्या असे गृहीत धरण्याचे काहीच कारण नाही असे सांगून लेखकाने एखाद्या घटनेची व व्यक्तीची पकड समाज मनावर बसली म्हणजे काल प्रवाहात अनेक रंगांची भर त्यात पडत जाते, असे म्हटले आहे. नाट्य, काव्य, दंतकथा, लोकमानस हे रंग आणखीन विविध क्षेत्रात विकसित करते असेही म्हटले आहे.
एका प्रकरणात लेखकाने बाळशास्त्री हरदास, चिंतामणराव वैद्य, शंकर केशव पेंडसे, आनंद साधले, दुर्गा भागवत, डॉ. इरावती कर्वे, दाजी शास्त्री पणशीकर, डॉ.मेहेंदळे, प्रा नरहर कुरुंदकर, या विद्वजनांच्या या विषयावरील लेखनाचा विस्तृत परामर्ष सडेतोडपणे घेतला आहे. तो विस्तारभयापोटी पुस्तकातच वाचलेला अधिक चांगला! मात्र त्यांनी कथा, कादंबऱ्या, ललित व पौराणिक लेखनाचा या आढाव्यात विचार केलेला नाही.
मराठी सोडता इतर भारतीय व युरोपीय भाषांमध्येही महाभारतावर विपुल लिखाण आहे. यातल्या बऱ्याच लिखाणाचा आपला परिचय नाही अशी उणीव लेखकाने मान्य केलेली असली तरीही वेद, ऋग्वेद, सिंधू संस्कृती यावर विस्तृतपणे प्रदीर्घ विवेचन केले आहे. ऋग्वेदातील काही सुक्तातील ऋचा, देखील आपल्या विवेचनाच्या समर्थनाच्यादृष्टीने उधृतकेल्या आहेत. तथापि मराठीतील या ‘धर्मक्षेत्रे-कुरुक्षेत्र’ पुस्तकांमधील आढावा परिपूर्ण आहे असा आपला दावा नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
लेखक विश्वास दांडेकर यांचे वास्तव्य अनेक वर्षे महाराष्ट्राबाहेर राजकोट, आग्रा, भोपाळ, इंदूर येथे गेले. सध्या ते सातारा येथे असून नोव्हेंबर २००६ मध्ये त्यांनी हे चिंतनात्मक पुस्तक लिहिले आहे. महाभारतातील महासंघर्षाची महती अनेकांनी कादंबरी, नाटक, काव्य यातून थोरमोठ्या साहित्यिक मंडळींनी केली असली तरी हे पुस्तक नव्हे तर एक चिंतनात्मक ग्रंथ वाचल्यानंतर महाभारतातील विविध प्रसंग आणि व्यक्ती यांच्यावर नवा प्रकाशझोत पडतोच पण आपला समजही रूंदावतो आणि सखोल होतो.
काळ आजचा असो वा महाभारतातला प्रत्येक व्यक्तीला तिची मूल्ये आणि तिची नाती, तिच्या श्रद्धा आणि संशय, तिची समष्टी, आणि आजूबाजूच्या व्यक्तींचे स्वभाव, हे सगळे समजून घ्यायचे असते. विश्वास दांडेकर यांनी घेतलेला वेध केवळ आजच्या काळाला अनुरूप आहे असे नव्हे तर ज्याला हल्ली ‘स्ट्र्याटेजिक थिंकींग’ म्हणून संबोधले जाते, त्या व्युहात्मक विचारसरणीनुसार केलेले व काव्यफुलोरा-चमत्कार टाळून मांडलेले हे रोखठोक प्रतिपादन आहे असा अभिप्राय नामवंत संपादक-पत्रकार खासदार कुमार केतकर यांनी मलपृष्ठावर व्यक्त केला आहे, तो अतिशय रास्त असा आहे. जिज्ञासूंनी हा सुमारे २०० पृष्ठांचा ‘धर्मक्षेत्रे कुरूश्रेत्रे’ ग्रंथ समग्रच वाचला पाहिजे.
— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नासिक
— संपादन:देवेंद्र भुजबळ.
— निर्माती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या पुस्तकाचा थोडक्यात परिचय करून दिल्याबद्दल श्री सुधाकर तोरणे यांचे धन्यवाद.
पुस्तकातील वर्णन श्रीकृष्ण चरित्र आहे की महाभारतकारांनी वर्णन केलेल्या राजकीय पटलावरील घटनांचा व्युहात्मक विचार व्यक्त केलेला आहे ते समजून घ्यायला आवडेल.
श्रीकृष्ण, श्रीराम अशा व्यक्तिमत्त्वांना धार्मिक, दैवी देणगी असलेल्या असे पहायचे टाळून, राज्य पद न घेता, जनसामान्यात राहून त्यांच्या गरजा, समस्या, अडचणी समजून घेतल्या. असंघटित शक्ती एकत्र करून मोठ्या, ऐश्वर्यवान राजसत्ता आपापल्यात भांडून विनाश घडवतात. यावर विश्वास दांडेकर यांनी प्रकाश टाकला आहे. तो नक्कीच विचार करायला लावणारा असेल. पुस्तक मागवायचे असेल तर कुठे संपर्क साधावा यावर प्रकाश टाकला जावा.