Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : ७

मी वाचलेलं पुस्तक : ७

प्रतिशोध
स्वातंत्र्य मिळून भारत अम्रुतवर्षाच्या कालावधीतही समाज आणि पोलीस यांच्या मधील दरी तशी कमी झालेली नाही. लोकांच्या मनात पोलीसांविषयी भीतीचे वातावरण असले तरी समाजाला पोलीसांविषयी फारसे प्रेम, आपुलकीची भावना दिसून येत नाही.

आपल्या कर्तव्याशी चोवीस तास बांधलेला, कुटुंबाकडेही लक्ष देण्यासाठी वेळ नसलेला सोशल मिडीया, नाटक, सिनेमा, दुरदर्शन इत्यादी प्रसार माध्यमातून खिल्ली उडविलेला, सातत्याने टीका, अपप्रचार झालेला पोलीस समाजातील जडणघडणीचा साक्षीदार असूनही दुर्दैवाने वंचित राहतो.
अर्थातच सर्व सामान्यांच्या व्यथेला कांही अंशी पोलीसही तितकाच जबाबदार असतो.

या वस्तुस्थिती च्या पार्श्वभूमीवर आय.पी.एस अधिकारी असलेले, उच्च शिक्षित डॉ. बी.जी.शेखर यांनी लिहिलेलं ‘प्रतिशोध’ हे पुस्तक नुकतेच माझ्या हाती आले.

इंजिनिअर असलेले डॉ. शेखर गुन्हेगारांचा शोध घेऊन क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे म्हणून लौकिक प्राप्त केलेले अधिकारी आहेत. सर्वात कमी अवधीत पोलीस महासंचालकांचे ‘सुवर्णपदक’ आणि गुन्हे अन्वेषणाच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे पोलीस दलातील सर्वोच्च ‘राष्ट्रपती पदक’ मिळविण्याचे भाग्य लाभलेले अधिकारी आहेत.

‘प्रतिशोध’ पुस्तकास पद्मश्री कवी ना.धों महानोर यांची प्रस्तावना आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, समाज आणि पोलीस यांच्यात सुसंवाद निर्माण करण्यासाठी सतत कार्यरत असलेले
डॉ. बी.जी.शेखर एक संवेदनशील लेखक असून गुन्हे अन्वेषणामधले ते खरेखुरे डाँक्टर आहेत. लेखकाची प्रतिभा व पोलीसदल आणि समाजाबद्दलची त्यांची निष्ठा अलौकिक आहे. तर हेमलकसाहून डॉ. प्रकाश आमटे यांनी शुभेच्छा देतांना त्यांच्या पुस्तकावरून बोध घेऊन हेमलकसा येथे वारंवार चोऱ्या करणाऱ्या दोन चोरांना रंगेहात पकडल्याचे सांगून डॉ.शेखर यांचे कार्य अतुलनीय असून हे पुस्तक खुपच रंजक, रहस्यमय, व आनंददायी आहे असे म्हटले आहे.

अंधाऱ्या वाटांनी सावजाचा शोध घेणाऱ्या खतरनाक अट्टल गुन्हेगारांचा प्रतिशोध घेणारा हा सत्य कथासंग्रह प्रसंग, तारखा व विविध व्यक्तींच्या स्वभावाच्या उल्लेखांमुळे दर्जेदार झाला आहे.

या पुस्तकात एकूण पांच सत्यकथा आहेत. प्रत्येक कथा वेगवेगळी असून अतिशय सहज, सुलभ भाषाशैली आणि शेवटपर्यंत श्वास रोखून ठेवणारा ‘सस्पेन्स’ यामुळे वाचकप्रिय झाली आहे. एखाद्या सिध्दहस्त साहित्यिकाप्रमाणे त्यांचे लेखन झाले आहे. शोध घेतांना निसर्गाचे, कौटुंबिक वातावरणाचे उत्तम चित्र त्यांनी रेखाटले असल्याने इतर पोलीस चातुर्य कथा, डिटेक्टिव स्टोरीजच्या पुस्तकापेक्षा हे पुस्तक खुप आगळे वेगळे आहे.

पहिल्या ‘प्रतिशोध चंबळचा’ या कथेतील खलनायकाने अनेक वर्षे पोलिसांना गुंगारा देऊन, अगणित व्यक्तींचे खून करून प्रचंड लुटालूट केलेली होती.डॉ. शेखर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या निर्ढावलेल्या अट्टल गुन्हेगाराचे निर्दालन करण्याकरिता आपल्या प्राणांची बाजी लावावी लागली याची कथा आहे.

तर ‘लग्नाची भेट’ या कथेत मीरा या उपवर मुलीच्या लग्न घरी दरोडेखोरांनी अचानक टाकलेल्या दरोड्यामुळे लग्नाचा बस्ता, दागदागिने, रोख पैसे लुटून नेल्यामुळे मीराचे नियोजित लग्न मोडते की काय अशी शंका वडिलांना वाटत असतांना पोलीसांनी रात्रंदिवस मेहनत करून दरोडेखोरांना जेरबंद केले. आणि लग्नाच्या तिथी अगोदर लुटलेला सर्व दस्ताऐवज, लग्नाचा बस्ता परत मिळवून दिला आणि मीराचे मोडू पहाणारे लग्न वेळेत लावून दिले याची ओघवती कथा आहे.

‘निमंत्रण पत्रिका’ या कथेत एका डॉक्टरांनी आपल्या डॉक्टर भावाचा खून केल्याची अकल्पित घटना एका कोपऱ्यात पडलेल्या छोट्या निमंत्रण पत्रिके वरून उघडकीस आणली आहे.अतिशय चित्तथरारक असलेल्या या कथेत गावकऱ्यांच्या गर्दीत तपास करतांना गावकऱ्यांनी केलेल्या शेरेबाजीची दखल
डॉ. शेखर यांनी घेतली आहे.

तर माजघराच्या दरवाजाच्यावर असलेल्या हत्याराच्या खुणांवरून जिल्ह्याच्या क्राईम इंचार्ज असलेल्या पोलीस इन्स्पेक्टर च्या चोरलेल्या रिव्हाँल्वरने दोन मर्डर करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास किती कौशल्याने अटक केली याचे समग्र चित्र चौथ्या कथेत रेखाटलेलं आहे.

‘राधा’ ही काहीशी आगळीवेगळी कथा डॉ. शेखर यांच्या साहित्यिक द्रुष्टीची साक्षच आहे.

सर्व पाच कथांतील ओघवत्या रसाळशैलीतील भाषेमुळे रंजक आणि शेवटपर्यंत वाचनीय झाल्या आहेत.

डॉ. शेखर यांनी या अगोदर ‘शोध’ हे अशाच कथांचे पुस्तक लिहिले आहे. त्याच्या चार आवृत्त्या निघाल्या आहेत. ‘प्रतिशोध’ची मी वाचत असलेली दुसरी आवृत्ती आहे.या सर्व कथात कसलाही पुरावा नसतांना गुन्हेगारांनी वापरलेली वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैली व गुन्हे करण्याची पध्दत यावरून तसेच अतिसुक्ष्म पुरावे, छोटेछोटे धागेदोरे यांच्या आधारे कठीण व क्लिष्ट असे गुन्हे तपासाचे महाकाय कार्य डॉ. शेखर यांनी केले आहे.

क्राईममध्ये पी.एच.डी मिळवलेल्या आणि दोनशे पेक्षा जास्त बक्षिसे व प्रशस्तीपत्र मिळविणारे डॉ शेखर आंतरराष्ट्रीय स्तरावरील युनोचे पदक प्राप्त करणारे मेहनती आणि जिद्दी अधिकारी म्हणून त्या़ंचा लौकिक आहे. लेखकाची प्रतिभा व पोलीसदल आणि समाजाबद्दलची त्यांची अलौकिक निष्ठा यांचे ‘प्रतिशोध’ पुस्तक साक्ष आहे. किंबहूना पोलीस दलातील अधिकारी, पोलीस व कर्मचारी यांच्या साठी आणि प्रत्येक नागरिकाच्या ज्ञानात व सतर्कतेत भर टाकणारे मार्गदर्शक ‘गाईड’च झाले आहे.

सुधाकर तोरणे

– परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !