ही आपलीच माणसं !….
अमेरिकेतील मराठी समाजाच्या जीवनावर लिहिलेली कांही पुस्तके मी वाचली आहेत.
तथापि, अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी समाजाच्या पहिल्या पिढी ते २००० सालानंतर अमेरिकेत आलेल्या तरूण पिढीचे भावजीवन डोळसपणे मांडण्याचा यशस्वी प्रयत्न मंगला खाडिलकर व गजानन सबनीस यांनी लिहिलेल्या ‘ही आपलीच माणसं’ या पुस्तकातून केला आहे .
मंगला खाडिलकर या दूरदर्शन, आकाशवाणी तसेच अनेक सामाजिक, सांस्कृतिक व्यासपीठावरील यशस्वी सूत्रसंचालन, निवेदन, निरूपण करणार्या म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या उत्तम लेखिका आहेत. महाराष्ट्राला त्या परिचित आहेतच.
तर गजानन सबनीस हे अमेरिकेत गेल्या चाळीस वर्षापासून वास्तव्यास आहेत. भारतात स्थापत्यशास्त्त्रातील बी.ई आणि एम.टेक या पदव्या प्रथम वर्गात मिळवून त्यांनी अमेरिकेत जाऊन काँर्नेल विद्यापीठाची पी.एचडी प्राप्त केली आहे. गेल्या तीस वर्षापासून ते स्थापत्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. काँक्रीट या विषयाचा त्यांचा सखोल अभ्यास असून या विषयावर दोनशेवर शोधनिबंध व दोन पुस्तकांचे ते लेखक आहेत.
मंगला खाडिलकर यांनी महिनाभर सबनीस यांच्या निवासस्थानी वास्तव्य करून त्यांच्यासह हे पुस्तक लिहिलेले आहे. एवढा दोनही लेखकांचा परिचय पुरेसा आहे.
या पुस्तकाचे वेगळेपण असे आहे की, अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी समाजाच्या पहिल्या पिढीचे डोळस प्रतिनिधी आणि या समाजाचे अस्तित्व, विकास, स्वभावधर्म आणि जीवनशैलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करून गेल्या चाळीस पन्नास वर्षाच्या स्थलांतर प्रक्रियेचा साधार ‘पट’ उभा केला आहे.
त्याबरोबरच मराठी समाजाच्या निवडक प्रतिनिधींचे त्यांच्या जीवन शैलीसंदर्भात मुलाखतीवजा लेखन केले आहे.
या शोधयात्रेतून दोनही लेखकांनी काही मोलाच्या प्रतिक्रिया स्पष्ट शब्दात सडेतोडपणे सांगितल्या आहेत.
मराठी माणसांच्या प्रातिनिधीक प्रतिक्रिया खालील प्रमाणे शब्दबद्ध झाल्या आहेत. त्या अशा : “अमेरिकेनं आपल्या आणि दुसऱ्याच्या वेळेची कदर करायला शिकवलं. माणसं आणि संस्कृती यांचं वैविध्य दिलं. आमच्यातला रसिकतेला अधिक वाव मिळाला. निसर्ग सौंदर्य, चवी, वाचन या सार्याच्या अनुभव कक्षा वाढवल्या. श्रमशक्तीचा आदर करायला शिकवलं. प्रवासाची संधी मिळाली. क्रयशक्ती वाढली. योजनापूर्वक काम करायची सवय लागली. जगाचा नकाशा आमच्या साठी उघडला गेला. अर्थातच आपल्या मायदेशानं हे आम्हाला दिलं नसतं, असं नाही. पण भारतात राहून कदाचित ह्याला इतका वेग आला नसता.”
महाराष्ट्रात राहणारा तो मराठी अशी व्याख्या पुरेशी नाही. जगाच्या पाठीवर कुठेही राहून महाराष्ट्राबद्दल जिव्हाळा असणारा तो मराठी माणूस ! या द्रुष्टींनं बर्याच वर्षापूर्वी अमेरिकेत जाऊन स्थिरावलेली, तेथील नागरिकत्व स्वीकारलेली माणसं आणि त्यांची तेथेच जन्मलेली मुलंबाळं ही आपलीच असतात. या पुस्तकात त्यांचे भावविश्व जाणून घेण्याचा प्रयत्न अतिशय विस्तापूर्वक केला गेला आहे.
अमेरिकेतल्या व्यक्ती स्वातंत्र्य, वैभव, आधुनिक जीवनशैली, शैक्षणिक संधी, आणि आव्हानं या सार्यांचा अर्क ज्यांच्या जीवनात उतरलेला आहे त्या अमेरिकेन भारतीयांबद्दलची निरिक्षण, अनुभव विस्ताराने कथन केले आहेत. इतकेच नव्हे तर विशेष म्हणजे म्हातारपणी मुलाबाळांनी आपली सेवा करायला हवी अशी अपेक्षा अनेक पालक मनात बाळगतात. अमेरिकेत गेलेल्या आपला मुलगा, मुलगी आपल्याजवळ नाही, त्यांच्या संसारात आपल्याला स्थान नाही अशा जाणिवा खंतावलेल्या असतात. ते बोलून दाखवत नाही. आकांडतांडव करत नाही. पालक त्यांच्या कडे न जाता भारतातच रहातात अशा दहा व्रुध्दांच्या प्रतिक्रियांचा समावेश या पुस्तकात केला आहे.
तसेच समारोप करतांना महाराष्ट्राबद्दल जिव्हाळा असणारा तो मराठी माणूस! ही मराठी माणसाची आजची अपेक्षा आहे. पण उद्या हीच व्याख्या राहणार नाही. कारण अमेरिकेत राहणाऱ्या, तिथेच जन्मलेल्या भारतीय मुलांना या भाषेबद्दल, वातावरणाबद्दल प्रेम वाटण्याची शक्यता नाही आणि तशी अपेक्षाही नाही. काही पिढ्यानंतर या पिढीच्या आडनावावरून त्यांच मराठीपण लक्षात येईल. तसं घडू नये ही जबाबदारी अर्थातच “आपल्या माणसांची” आहे, असे प्रतिपादन केले आहे.
एकूणच विविध पैलूंचे हे पुस्तक सर्वानींच आवर्जून वाचण्यासारखे आहे…

– परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
ही आपली माणस या पुस्तकाचा थोडक्यात पण सर्वंकष परिचय करून दिला यासाठी श्री सुधाकर तोरणे यांना धन्यवाद आणि प्रशंसा