Friday, November 22, 2024
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक :12

मी वाचलेलं पुस्तक :12

अचूक निदान
प्रख्यात डॉ रवी बापट यांच्या २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाची सहावी आवृत्ती अलीकडेच माझ्या हाती आली. यापूर्वी त्यांची पोस्टमार्टेम्, वार्ड नंबर पाच के ई एम, स्वास्थ-वेध ही पुस्तके मी वाचून काढली़ होती.

पोस्टमार्टेम पुस्तकाने तर त्याकाळात वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवली होती .आजच्या आरोग्य व्यवस्थेत जे काही चाललं आहे, समाज कसा उद्विग्न झाला आहे, डॉक्टर्स व रूग्ण यांच्यातील दरी वाढत चालली आहे,लोकांचा विश्वास कसा उडत चालला याचे परखडपणे विवेचन केले आहे.

आताच्या “अचूक निदान” या पुस्तकात वैद्यकीय उपचारांतील अचूक निदानाचे महत्व जवळपास २५ प्रकरणातीत ४०-५० केसेसमध्ये विस्ताराने केलं आहे. त्या सर्वच केसेस वाचल्या पाहिजेत.

काही केसेस महत्वाच्या आहेत. एक प्रसिद्ध नगररचना तज्ञ एका वृद्ध गृहस्थांना घेऊन रवी बापट सरांकडे आले होते. एका मोठ्या हाॅस्पिटल ने त्यांना पाच की सहावेळा केमोथेरपी करण्यासाठी काही लाख रुपयांचे पॅकेज देण्याची तयारी दाखविली होती. डाॅ.बापटांनी त्या गृहस्थांच्या तपासण्यांचे सगळे रिपोर्ट बारकाईने वाचले आणि सांगितले की तुम्हाला कॅन्सर असल्याचा एकही पुरावा येथे नाही. ते गृहस्थ चक्क लुबाडले गेले होते.

या पुस्तकाला पत्रकार पंढरीनाथ सावंत यांची छोटी प्रस्तावना आहे. एकदा ते पोटात दुखते म्हणून बापट सरांकडे गेले होते. तेवढ्यात उत्तर भारतातल्या एक खेडवळ माणूस पत्नीसह तिथे आला. दोघेही डॉक्टरांच्या पाया पडले. तो बिहार मधील सोनार होता. त्याच्या नातलगाने त्याला फसवून तेजाब पाजले होते. त्याची अन्ननलिका जळून गेली. डाॅ बापट आणि त्यांच्या टीमने त्यांच्या आतड्याचा भाग वापरून त्याची अन्ननलिका बनवली. तो व्यवस्थित झाला.

डॉ रवी बापट त्यांच्या केबिनला चावडी म्हणत. त्या चावडीवर हजेरी लावणाऱ्यांमध्ये साहित्यिक, कवी, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, गायक, राजकारणी, संगीतकार, प्राध्यापक, चित्रकार, पत्रकार, टीकाकार आहेत तसेच अगदी गल्लीतल्या सामान्य माणसापासून दिल्लीतल्या जेष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती येऊन जातात याची मोजदाद ठेवणे अवघड असल्याचे शब्दांकन करणारे केदार नायगावकरांचे मत आहे.

दुखणेकरी हा दुखणेकरी असतो. मग बाहेरच्या आयुष्यात तो कामगार असेल, मास्तर असेल, गॅंगस्टर असेल. त्यांच्याकडे बिहारचा सोनार जसा येतो तसा रत्नागिरीचा कंडक्टर मुलीला घेऊन येतो. प्रख्यात नाटककार येतो. सोन्याच्या चमच्याने खाणारा शिक्षणसम्राट सुध्दा येतो. त्या प्रत्येकाला वाचविण्यासाठी आपण आहोंत असेच डॉक्टरांना वाटते म्हणून हजारों माणसांना डॉ रवी बापट यांचा आधार वाटतो.

अचूक उपचारांसाठी वैद्यकशास्त्रात अचूक निदान महत्वाचं ठरतं. दुखण पाठीच असतं अन् उपचार पोटावर केले जातात किंवा दुखत छातीत असतं आणि आजार पोटात असतो अशावेळी ब-याचदा आजाराचे निदानच दिशाभूल करणारं ठरतं त्यामुळे रूग्ण मानसिक शारीरिक आणि आर्थिक बाबींची त्रस्त होतात.

आजच्या वैद्यकीय व्यवसायामध्ये ज्या काही गोष्टी आपण ऐकतो आणि बघतो त्यामुळे बहुसंख्य रूग्णांना असा प्रश्न पडतो की योग्य तो औषधोपचार मिळणं आज सहज शक्य का नाही ॽ

डॉ रवी बापट यांचा हा लेखनप्रपंच निदानप्रक्रियेवर, जी वैद्यकशास्त्रात आधारस्तंभ आहे, त्या प्रक्रियेचं विश्लेषण करुन लोकशिक्षण देण्याचा आहे॑॑ .’अचूक निदान’ या पुस्तकातून डॉ रवी बापट सरांनी अतिशय आस्थेनं वैद्यकीय उपचारातलं. ‘अचूक निदाना’चे महत्व अनेक उदाहरणांसह अधोरेखित केले आहे. ते संपूर्ण वाचलेच पाहिजे.

सुधाकर तोरणे

– परीक्षण : सुधाकर तोरणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments