Sunday, March 16, 2025
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : 23

मी वाचलेलं पुस्तक : 23

‘स्मरण जीएंचे

मराठी कथा साहित्यातील मानदंड असलेले ‘जीए’ 26 वर्षापूर्वी अचानक दूरच्या प्रवासाला त्यांच्या एकलेपणाच्या मुळ स्वभावानुसार कुणालाही न सांगता अचानक निघून गेले. त्यांच्या कथा साहित्यावर अनेक स्तरावर नामवंत लेखकांनी, वृत्तपत्र, मासिकांनी भरभरून लिहिले गेले. या सर्वांच्या लेखांचे एक समग्र पुस्तक ‘स्मरण जीएंचे’ या नावाने त्यांचे जिवलग मित्र श्री अप्पा परचुरे यांनी कुशलतेने संपादित करून गेल्या 2022 च्या डिसेंबर मध्ये प्रकाशित केले आणि ते अलीकडे, नुकतेच माझ्या हाती आले ! जीएंच्या कथांचा एक सामान्य वाचक आणि चाहता म्हणून मला जीएंच्या कथा साहित्याबरोबरच जीएंच्या एकलेपणाच्या स्वभावाची, जीवनाची मला बरीच उत्सुकता आणि काहीसे कुतहूल होतेच ! अप्पा परचुरेजींचे हे पुस्तक वाचकांची मनिषा निश्चितच परिपूर्ण करते.

‘जी. ए.’यांनी मानवी मनाचा आणि त्यांच्या प्राक्तनाचा व नियतीशी असलेल्या त्यांच्या नात्याचा शोध आपल्या कथेतून घेतला असल्याने मराठी साहित्यात ज्यांचे नाव चिरकाल टिकेल अशा लेखकांत जीएंचा समावेश निश्चितच राहील यात कसलीही शंका नाही, मराठी कथा साहित्याचे ते मानदंडच आहेत.

कोणालाही, थांगपत्ता न लागू देता जीए गेले हे सर्वात जास्त जाणवलं ते पुलंच्या सुनीताबाई देशपांडे यांना ! ज्याला आपला मित्र मानलं तो अचानक गेला हे त्यांच्या हळवे मनाला फार लागलं. उभयतांचा पत्रव्यवहार फार मोठा होता, त्यामुळे त्या फारच अस्वस्थ झाल्या आणि त्यांचा ‘सप्रेम नमस्कार’ हा प्रदीर्घ लेख महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिद्ध झाला. या सविस्तर लेखाचा या पुस्तकात प्रामुख्याने समाविष्ट केला गेला आहे.

यातील आणखी एक गोष्ट म्हणजे जीएंना बरं वाटतं नव्हतं म्हणून कांही टेस्ट करण्यासाठी ते डॉ. फडके यांच्या हाँस्पिटल मध्ये आले, अप्पांना ते दुस-यादिवशी कळले. ते लागचलीच पुण्यात आले तेंव्हा आपण अँडमिट झालो आहे याची वाच्यता कोणालाही काही सांगू नको असं जीएंनी अप्पांना बजावलं होतं. त्यामुळे सुनीताबाईंना देखील सांगितले नाही. पण घडले अघटित. जीएंचे मेडिकल रिपोर्ट यायच्या आतच जीए त्यांच्या स्वभावानुसार कुणालाही न भेटता दूरच्या प्रवासाला निघून गेले. मग मात्र अप्पांनी धावत जाऊन ही अतिशय दुःखद बातमी सुनीताबाईंना सांगितली. त्या इतक्याजवळ असतांना जीएंना अँडमिट केल्याचे त्यांना न सांगितल्याबद्दल पुढे काय झाले असेल ते अप्पा जाणो ! हे सांगण्याचा हेतू हा की डाँ. फडके यांच्या हाँस्पिटलमधील जीएंंच्या रूमची भिंत आणि सुनीताबाईंच्या ‘रूपाली’ अपार्टमेंटची भिंत एकच होती!अप्पा तर पश्चातापदग्ध झाले पण अतिशय अस्वस्थ झालेल्या सुनीताबाईंची स्थिती कशी झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी ! पुढे त्यांनी ‘सप्रेम नमस्कार’ हा लेख ‘मटा’साठी लिहिला तो या पुस्तकात समाविष्ट आहे. हे मी सुरुवातीसच म्हटले आहे !

निरनिराळ्या वृत्तपत्रांमध्ये जीएंवर आलेले नामवंत लेखकांचे वैशिष्ट्यपूर्ण विशेष लेख, अप्रतिम संपादकीय ‘ललित’ मासिकाचा 1988 चा विशेष अंकातील सर्व लेख, जीएंच्या पत्रातून व्यक्त झालेले लेख यांचा या पुस्तकात समावेश आहे.

जीएंच वैशिष्ट्य हे की ते कोणत्याही साहित्य सभा, संमेलन, चर्चा, परिसंवादात आणि कुठल्याही प्रकारच्या छोट्यामोठ्या समारंभात दिसले नाहीत. त्यांच्या स्वभाव व जीवनदृष्टीने ते अलिप्तच राहिले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही ते भाग घेत नसत! साहित्यिक हेवेदावे यापासून तर ते फारच दूर होते. मानवी जीवनाची गुंतागुंत शब्दातून अभिव्यक्त करणारा हा कथाकार साहित्याच्या कळपात कधीच नव्हता. मात्र आयुष्यभर आपल्या कथेतून मानवी दुःखाचा, यातनांचा शोध घेत राहिले ! त्यांची कथा वास्तव, अद्भूत, आशयघन आणि स्तिमित करणारे अनुभव देत गेली त्यामुळे ‘जीए’ या नावाखाली औत्सुक्याबरोबरच गुढतेचे एक वलय निर्माण झाले ! मराठी कथाविश्वात साक्षेपी वाचकांना प्रिय असलेले जीए म्हणजे धारवाडच्या महाविद्यालयातील इंग्रजीचे प्राध्यापक गुरुनाथ आबाजी कुलकर्णी यांचे निधन म्हणजे मराठी कथेच्या एका वैभवी युगाचा अंतच होय !

या पुस्तकात काही वैशिष्ट्यपूर्ण असेही काही लेख घेतले आहेत. विशेष म्हणजे, जी ए नी चेकाँव्ह आणि मोपासाँ यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचे भाषांतर, पत्रातील जीए हा ‘हंस’चे आनंद अंतरकर यांचा, वसंत आबाजी डहाके, वा.ल. कुलकर्णी, माधव आचवल यांचे ‘जीएंचे कथालेखन’ याविषयावर फार चांगले लेख लिहिले आहेत. तर शांता शेळके यांचा ‘नियतीच्या सर्प फणाखालचे जी एं चे कथाविश्व, जी एं चे बालमित्र पां. ना. कुमठा यांचा ‘विस्मरणातील स्मरण’, विजय पाडळकर यांचा अश्रध्दाची तीर्थयात्रा आणि त्यांचीच “जीए यांनी न लिहलेली एक वेगळी कथा, “जी एं च्या चित्रांविषयीचा नंदा पैठणकरांचा ‘जी एंची चित्रकिमया’ लेख आणि अप्पा परचुरे यांचा’ न सांगता गूढयात्रेला गेलेले जीए’ इत्यादी लेख जीएंच्या कर्तृत्वाचा अप्रतिम आलेख साकारतात. याखेरीज निरनिराळ्या वृत्रपत्रांमधील संपादकीय सह विशेष लेख अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

पुल, ग्रेस, महेश एलकुंचवार, गंगाधर गाडगीळ,विंदा,रामदास भटकळ, तु. शं. कुलकर्णी आदी अनेक मान्यवरांनी हळूवारपणे व्यक्त केलेल्या भावनांची वामन देशपांडे यांनी एकत्रित संकलन केलेली श्रध्दांजली, मुग्धाने मामाला लिहिलेले पत्र, मलपृष्ठावरील शंकर रामाणींची कविता, डॉ विकास आमटेंना जीएंनी लिहिलेले पत्र, इत्यादी साहित्याचा पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय जीएंचे 12 कथासंग्रह, 9 अनुवादित कादंब-या व पांच कथासंग्रह, बालवाड्.मय, ललित लेखन, जीएंचे 4 खंडातील निवडक पत्र संग्रह आणि एक अप्रकाशित नाटक यांसह एकूण 33 पुस्तकांचा व सर्व कथांच्या नावांचा परिशिष्टात समावेश केला आहे. हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे

मानवी जीवनाच्या अंतिम एकाकीपणाचा आणि त्याच्या असीम वेदना, दुःख मर्यादांचा वेध हे जीएंच्या कथालेखनाचे मुख्य ईप्सित होते. त्यांचा हा प्रयत्न केवळ मराठी साहित्यातच अपूर्व आहे असे नव्हे तर साऱ्या भारतीय ललित साहित्यातही दुर्मीळ आहे. या पुस्तकाचे निमित्ताने जीएंना माझ्या आणि “न्युज स्टोरी टुडे “च्या संपादक व निर्मात्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आणि पुस्तकाचे संपादक अप्पा परचुरे यांना मराठी भावी पिढीला, वाचकांना जीएंच साहित्य समजण्यासाठी व अध्ययनासाठी अतिशय उपयुक्त माहितीपूर्ण पुस्तकाची निर्मिती केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. जीए हे मराठीतील आधारवड.मानवी भावभावनांचे चित्रण त्यांच्या साहित्यातून आढळते.त्यांच्या आठवणींचे सुरेख लेखन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments