“गोष्ट नर्मदालयाची“
नर्मदा परिक्रमा या विषयी पूर्वी वृत्तपत्रांच्या रविवार पुरवणीतून बरेच लेखन वाचले होते. नंतर भारती ठाकूर यांचे
“नर्मदा परिक्रमा-एक अंतर्यात्रा” पुस्तक वाचले. परिक्रमेतील त्यांची अनुभवगाथा उद्बोधक वाटली. आपणही अशी पदयात्रा करावी अशी इच्छा झाली. पण ती काही कारणाने मूर्तस्वरुपात आली नाही आणि अलिकडेच त्यांचेच “गोष्ट नर्मदालयाची” हे डिसेंबर २०२२ मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक हाती आले आणि मी ते उत्सुकतेने वाचून काढले !
नर्मदा परिक्रमेनं भारती ठाकूर यांना अधिकाधिक अंतर्मुख केले. तशा त्या नाशिकच्या ! केंद्र सरकारच्या नोकरीत ३० वर्षे पूर्ण करून त्या स्वेच्छेने सेवा निवृत्त झाल्या. काही वर्षे नासिकलाच सेवावस्तीतल्या मुलांना शिकवित राहिल्या. त्या आधी विवेकानंद केंद्राच्या वतीने आसाममध्ये शाळा चालविण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. नर्मदा परिक्रमेनंतर जवळपास पन्नासीत असतांना त्यांनी नाशिक सोडून नर्मदा किनारी एकट्याने राहण्याचा निर्णय घेतला. घरातील आई, भाऊ, बहिणी, आप्त यांनी प्रखर विरोध केला, एकटी राहून नर्मदा किनारी तिथल्या वंचित गरीब मुलांना शिकविण्यासाठी स्थायिक होणं हा शुद्ध वेडेपणा आहे असे आवर्जून सांगितले पण त्यांचा निर्णय आणि निश्चय पक्का होता. यापूर्वी देखील त्या कन्याकुमारी विवेक केंद्रात आणि आसामला पाच वर्षे घर सोडून राहिल्या होत्या !
२६ जुलै २००९ रोजी कपड्याची एक छोटी सुटकेस, दोनचार छोटी भांडी असं सामान घेऊन त्या मंडलेश्वरला पोहचल्या! यापूर्वी केलेल्या परिक्रमेत मंडलेश्वरातील काही ५-६ मंडळीशी चांगला परिचय झाला होता ! परंतू इथं येऊन नेमकं काय करायचं ? असा मनाशी विचार करत असतांना त्या महेश्वर येथे गेल्या. तेथे स्वामी अनंतराम यांचा आश्रम होता, २००४ च्या परिक्रमेत त्यांच्याशी सुसंवाद झालाच होता आणि त्यांना मनातील हाच प्रश्न विचारला, त्यावेळी स्वामी अनंतराम म्हणाले की “स्वतःची वाट स्वतःच चालायची असते तसेच आपले प्रश्न देखील आपणच सोडवावयाचे असतात, खरा साधक कुठलेही कार्य करतांना यशअपयशाचा विचार करीत नाही. कुठलेही प्रलोभन त्याला त्याच्या मार्गावरुन परावृत्त करु शकत नाहीत. निःस्वार्थ सेवाभाव मनात असेल तर कुठल्याही अडचणी शांतपणे विचार करून सोडवण्याची क्षमता आपल्यात आपोआपच येते, ईश्वर आपल्या पाठीशी आहे याची खात्री करून विश्वास व श्रध्दा बाळग”
पुढे भारतीजींना नर्मदा नदीच्या एक किलोमीटर अंतरावरील तीन रूमचे श्रीनगर काँलनीत खोचे काकांच्या निवासस्थानाजवळ घर मिळाले ! खोचेकाकांची ओळख नर्मदा परिक्रमेप्रसंगी झाली होतीच.
मंडलेश्वर तसं मोठं गाव, त्यापासून चार कि. मी अंतरावर एका वस्तीत पाचवी पर्यंतची सरकारी शाळेत मुले शिकत होती पण पाचवी पर्यंत शिकूनही मुलांना लिहिता वाचता येत नव्हतं. शाळा 11वाजता सुरु व्हायची, शिक्षकाची तर आठवडाभर भेट झाली नाही. मग सकाळी 7-8 वाजता भारतीजी त्यांना खेळ, गाणी, गोष्टी आणि अभ्यास शिकवू लागल्या. तशा त्या शिक्षणाची डीएड, बीएड पदवी वा पदविका धारण कर्त्या नव्हत्या परंतु शिकवायची हौस होती. एक दोन दिवसात सुरुवातीस शाळेजवळ रहात असलेली काही मुलं यायची, पुढे ही संख्या ७०-८० पर्यंत गेली ! शाळेत शिक्षकाची पहिल्या आठवड्यात भेट झाली नाही ! नंतर भेटल्यावर व त्यांच्या अडचणी सांगितल्यावर शाळेची एक रुम वापरायला दिली. काही दिवसानंतर त्या नर्मदाकिनारी असलेल्या ‘लेपा’ या गावी गेल्या. ते मंडलेश्वर पासून ९-१० किलोमीटर अंतरावर होतं. तेथे दररोज पायी जाऊन त्या मुलांना शिकवित! तेथे एका धरणाचे काम चालू होते. भारतीजींनी सरपंचांना भेटून तेथील धर्मशाळेत असलेले सभागृह पाहिले आणि पंचक्रोशीतील मुलांना तेथे शिकवायला सुरूवात केली. हे गाव महेश्वर जल विद्युत प्रकल्प धरणाच्या डूब क्षेत्रातील असल्याने अनेक वर्षांपासून कुठलीही विकासकामे सरकारने या गावात केली नाहीत.

या पुस्तकात भारतीजींना आलेले विविध अनुभव, अडचणी, त्यावर काढलेले मार्ग, अगदी विस्ताराने लिहिले आहेत. शिक्षण म्हणजे कागदावरच आकडेमोड आणि इतिहासातील सनावळी पाठ करण्यापुरते काय ? जीवन शिक्षणाचे काय ? ते देणारी व्यवस्था कोणती व इतर शैक्षणिक, सामाजिक प्रश्नांना उत्तरे देणारे रसरशीत अनुभव कथन त्यांनी या पुस्तकात प्रारंभीच केले आहेत.
पुढे काय झाले असेल तर भारती ठाकूर यांनी शिक्षण आणि जगणे एकमेकांना सामावून घेत उभा केला हा नर्मदालयाचा अनोखा प्रकल्प ! कुठल्याही सरकारी मदतीविना ! सामाजिक क्षेत्रातील अनेकांकडून समर्पण केलेल्या उदार दानांच्या रुपाने अस्तित्वात आला !
वंचित मुलांना जीवन प्रवाहात सामील करुन घेण्यासाठी आयुष्य झोकून देणा-या एका विलक्षण स्त्रीच्या अथक प्रयत्नांची थक्क करणारी कहाणी या पुस्तकातील प्रत्येक पानातून सोप्या भाषेत चित्रीत अथवा शब्दबध्द केली गेली आहे !
या “नर्मदालया”ची वाटचाल कशी झाली ते पाहणे रंजक आणि तितकेच उद्बोधक आहे.
२०१० मध्ये “निमाड अभ्युदय रुरल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट असोशिएशन (NARMADA)” या संस्थेची स्थापना ‘लेपा’ या मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यामधल्या नर्मदा किना-यावरील छोट्याशा गावात झाली. या संस्थेचे ‘नर्मदालय’ या समग्र शिक्षण केंद्राची लागलीच सुरुवात करण्याचे धोरण अंगिकारून सभोवतालच्या पाच खेड्यांचा समावेश केला गेला. शाळा अर्ध्यातच सोडून दिलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य धारेत आणण्याच्या तयारीने या केंद्राची रीतसर सुरुवात २०११ मध्ये केली गेली. २०१२ मध्ये संत राजगिरी महाराज यांच्यातर्फे ५४०० चौ. फुटाचा प्लाँट आणि त्यावर २५०० चौ. फूटाचे बांधकाम असलेला आश्रम संस्थेला दान दिला. तसेच सहा गाई असलेली गोशाळा दानरूपाने देण्यात आली. पुढे २०१३ मध्ये भट्टयाण येथील स्थानिक प्रशासनाकडून जमीन मिळाली व २०१४ मध्ये भट्टयाण येथे समग्र शिक्षण केंद्राची अर्थात नर्मदालयाची इमारत बांधण्यात आली. या केंद्राचा १५ गावात विस्तार करण्यात आला.नाशिकचे डॉ. विश्वास सावकार यांच्या तर्फे बैरागगढ येथे पावणेतीन बिघा जमीन दानात मिळाली.
जनरल इन्शुरन्स काँर्पोरेशन तर्फे भट्याण येथील मुलांसाठी शाळा – माध्यान्ह भोजन, शाळेसाठी वाहन आणि शिक्षकांच्या पगारासाठी २०१५ या एका वर्षासाठी निधी मिळाला भारतीय आयुर्विमा महामंडळाने २०१७ मध्ये असाच निधी दिला़.
श्री सुरेश कश्यप यांनी नर्मदेच्या किनारी उत्तर तळावरील छोटी खरगोन येथील दोन मजली भव्य इमारत संस्थेला दान केली. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विभागाने समर्थित असा Fablab हा अत्याधुनिक यंत्रसामग्री असलेला प्रकल्प संस्थेस मिळाला.
गेल्या १२ वर्षात नर्मदालय विविध अंगांनी विकसीत होत गेलं. तीन शाळा, वनवासी विद्यार्थींसाठी वसतीगृह, रोज सुमारे ५०० मुलांचं मध्यान्ह भोजन, जैविक शेती, प्लंबिंग, सुतारकाम, वेल्डिंग यांचे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू असून २०१७ पर्यंत १७०० हून अधिक मुलांपर्यंत पोचलेली १५ समग्र शिक्षण केंद्राची वाटचाल झाली आहे.
समाजाने दिलेला भरघोस प्रतिसाद आणि प्रोत्साहनामुळे हे शक्य झालं आहे. विशेष म्हणजे या शाळेचे बेंच, डेस्क, टेबल, खुर्ची, कपाटं,वसतीगृहाला लागणारे पलंग, असं संपूर्ण फर्निचर शाळेतले विद्यार्थीच बनवतात. ४५ गाई असलेल्या गोठ्यांचे अगदी दूध काढण्यापासून ते गाईचं बाळंतपण करण्यापर्यंत सर्व व्यवस्थापन शाळेतील मोठी मुलं करतात. वसतीगृहात भोजनासाठी लागणारी अधिकांश भाजी या संस्थेच्या शेतातच उगवते. वसतीगृहातील सव्वाशे मुले व पंचवीस कार्यकर्त्यांना नाष्टा रोज सकाळी ११वी,१२वीची मुलंच करतात .त्यात पोहे, उपम्यापासून इडली डोसा, शिरा, बटाटेवडा, बुंदी, जिलेबी, गुलाब जामूनपर्यंत सर्व काही बनतं. मेतकूट, चिवडा, गरममसाला, सांबार मसाला, वेगवेगळ्या प्रकारची लोणची बनवणं हे देखील त्यांच्या या जीवनशिक्षणात समाविष्ट केलं आहे.आणि ते चांगल्याप्रकारे केले जात आहे.
शाळेत, वसतीगृहात सफाई कर्मचारी नाहीत. मुलांचे केस कापायला न्हावी येत नाही. मुलंच एकमेकांचे आणि कार्यकर्त्यांचे केस कापतात. अर्थात ज्याला जे शिकायला आवडतं तेच फक्त शिकवलं जातं.
संगीत या मुलांना मनापासून आवडतं. शास्त्रीय संगीत आवड असलेल्या मुलांना शिकवलं जातं. हार्मोनियम, तबला,
पखवाज, आँक्टोपँड, कांगो, सिंथेसायजर या सारखी वाद्यं मुलं शिकताहेत. शास्त्रीय रागांवर आणि लोकसंगीतावर आधारित फक्त पाठ्यपुस्तकातील कवितांचा असा हा भारतातील एकमेव वाद्यवृंद या शाळेचा आहे. भगवतगीता,
गंगालहरी, असंख्य स्तोत्र या मुलांना कंठस्थ आहेत, विशेष म्हणजे क्रीडा क्षेत्रातही ती मागे नाहीत.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता ‘व्यवसाय कौशल्य’ हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट झालाय. पण खेडोपाडी त्यासाठी लागणारी यंत्रणा व प्रशिक्षित मंडळी उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती ओळखून संपूर्ण भारतातील पहिली Mobile Vocational Training Van -जिला संस्थेने Skills on Wheels’ आणि ‘कौशल्य रथ’ असं नाव देऊन तयार केली आहे.

अशा या नर्मदालयाच्या भारती ठाकूर यांनी एका तपात हे वैभव उभे केले आहे आणि आता अलीकडेच एका क्षणी त्यांनी दुस-या टप्यात संन्यस्त होण्याची सर्व काही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी पावले टाकली आहेत. आता या ‘भारती ठाकूर’चे नाव संन्यासिनी ‘प्रव्राजिका विशुध्दानंदा’ झाले आहे. अशी सर्वांगसुंदर ‘कथा नर्मदालयाची’ या पुस्तकाची काहीशी अद्भुत कहानी आहे.
एक, एकटी स्त्री जीवनशिक्षणाच्या क्षेत्रात, नवनिर्माणासाठी, विविध अडचणीना समर्थपणे तोंड देऊन काय करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण भारती ठाकूर यांनी घालून दिले आहे, आणि म्हणूनच या पुस्तकाचे महत्व अनन्यसाधारण आहे ही ‘नर्मदालयाची गोष्ट’ त्यांच्याच कुशल लेखणीतून अतिशय सुरेख, रसाळ, उद्बोधक आणि वाचनीय झाली आहे.

— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक. नाशिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
नर्मदा परिक्रमेतून सामाजिक वास्तव लक्षात आल्यावर भारती ठाकूर यांनी जो संकल्प केला,खडतर प्रवास करून ‘ नर्मदालय’ हे अभिनव शिक्षणकेंद्र सुरू केले त्याविषयीचा अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायक लेखाजोखा.