“अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड”
काँर्पोरेट गव्हर्नन्स आणि सार्वजनिक व्यवस्थापन या विषयावर एखादे पुस्तक मिळते कां ? याचा शोध घेत असतांनाच न कळत एन.आर.नारायण मूर्तींचे “अ बेटर इंडिया-अ बेटर वर्ल्ड” पुस्तकच हाती आले आणि मला अपेक्षित असलेल्या विषयाबरोबरच त्यांनी अनेक ठिकाणी दिलेल्या व्याख्यानांचा संपूर्ण संच या असाधारण पुस्तकामुळे मला प्राप्त झाला. मूळ इंग्रजीतील पुस्तकाचा मराठी अनुवाद चित्रा वाळिंबे यांनी केला आहे.
श्री.नारायण मूर्तींची ओळख वाचकांना करून देण्याची तशी आवश्यकता नाही. ‘इन्फोसिस टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ या बेंगळुरुस्थित- जागतिक सॉफ्टवेअर सल्लागार कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष आहेत.याखेरीज देश विदेशातील मँनेजमेंट, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी , स्कूल आँफ बिझनेस या काही महत्वाच्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत .’द इकाँनाँमिस्ट’ने २००५ मध्ये जगातील सर्वाधिक आदरणीय व्यावसायिकांत पहिल्या दहा मधील एक म्हणून श्री मूर्तींची नोंद केलेली आहे. इतकेच नव्हे तर पुढील तीन वर्षे भारतातील सर्वाधिक प्रभावशाली CEO म्हणून गौरविले आहे. भारत सरकारचा ‘पद्मविभूषण’ तसेच फ्रान्स व ब्रिटिश सरकारने त्यांच्या देशाचा सन्मान पुरस्कार त्यांना दिला आहे. देश परदेशातील अनेक आर्थिक विषयावरील प्रसिद्ध नियतकालिकांनी विविध पुरस्काराने श्री मूर्तींचा गौरव केला आहे.

मराठी इंग्रजी तील अनेक प्रसिध्द पुस्तकाच्या लेखिका सौ.सुधा मूर्तींचे यजमान आणि अलीकडेच ब्रिटनच्या पंतप्रधानांचे सासरे म्हणून देखील त्यांची ओळख नव्या पिढीला सांगायला हरकत नाही !
या पुस्तकात श्री मूर्तींनी जगभरातील नामवंत संस्था, विद्यापीठे, काँलेजेस, कंपन्यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानांचा समावेश केला असल्याने त्यांना आलेल्या विविध अनुभवांचे रसाळपणे विवेचन केल्यामुळे प्रत्येक विषय चांगलाच समजण्यास मदत झाली आहे. फेस टू फेस व्याख्यान असल्याने ते अगदी मोकळेपणाने बोलतात हा अनुभव फारच उद्बोधक वाटतो.
या पुस्तकात एकूण दहा भाग आहेत. त्यांत पहिल्याच विभागात विद्यार्थ्यांना संदेश देणारे आठ व्याख्यान – लेखांचा समावेश आहे. ज्यात जगात यशस्वी होण्यासाठीचे अप्रतिम मार्गदर्शन विद्यार्थ्यांना श्री मूर्तींनी केले आहे.

दुसऱ्या ‘मूल्ये’ विभागात देशाच्या विकासाची गती वाढविण्यात अनुशासनाची भूमिकापासून पश्चिमेकडून आपण काय शिकू शकतो यांचे विवेचन केले आहे. तसं हे पुस्तक २०१० मध्ये प्रसिद्ध झाले असल्याने भारतातील भ्रष्टाचार कसा थांबवता येईल या विषयावर प्रासंगिक विचार व्यक्त केले आहेत.
तिसऱ्या भागात महत्त्वाचे ‘राष्ट्रीय मुद्दे ‘या विषयावर भारताचा आर्थिक विकास, आधुनिक भारतातील शहर नियोजनाची चौकट, तसेच आर्थिक सुधारणांचे धडे दिले आहेत तर एका व्याख्यानात भारताचं नशीब बदलणारी अष्टसूत्री सांगितली आहे.
चौथ्या ‘शिक्षण’ विभागात भारतातील उच्च शिक्षणातील सुधारणांचा आराखडा विशद केला आहे. इतकेच नव्हे तर ‘मी माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक असतो तर” या विषयावर त्यांनी अतिशय रोचक, खुमासदार विवेचन केलं आहे.
पुढील पाच ते दहा भागात नेतृत्व गुण, काँर्पोरेट आणि सार्वजनिक व्यवस्थापन, औद्योगिक, सामाजिक जबाबदारी आणि समाजसेवा, उद्योजकता, जागतिकीकरण या विषयावर उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले आहे.
भारताला जागतिकीकरणाचा कसा फायदा होऊ शकतो आणि विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवर्तन व ठसा यावर अभ्यासपूर्ण संभाषण केले आहे ते या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य मानले पाहिजे. याबरोबर एवढे उत्तम बोधप्रद मार्गदर्शन करणाऱ्या ‘इन्फोसिस’च्या आजवरच्या प्रवासाचे प्रामाणिकपणे श्री मूर्ती यांनी शेवटी यथार्थ दर्शन घडविले आहे. १९८१ मध्ये मुंबईतील छोट्या घरात १० बाय १० च्या रूममध्ये सात साँफ्टवेअर व्यावसायिकांनी एकत्र येऊन इन्फोसिसची स्थापना केली. त्यावेळी त्यांच्याकडे होती एकमेकांना पूरक कौशल्ये, समान मूल्य व्यवस्था, आणि भांडवलं अवघे २५० डॉलर्स !एवढ्या तुटपुंज्या भांडवलावर काही करता येणे शक्य नव्हतं तथापि त्यांच्याकडे झोकून देऊन काम करण्याची जिद्द होती. उर्जा, उत्साह, आत्मविश्वास आणि अविरत कष्ट या बळावर ‘इन्फोसिस’च बाजारपेठेतील भांडवली मूल्य सुमारे २७ अब्ज
डॉलर असल्याचे श्री मूर्ती यांनी २००७ मध्ये न्युयाँर्कमध्ये केलेल्या भाषणात सांगितले. या प्रक्रियेत तब्बल ७० हजार उत्तम पगार देणा-या नोक-या निर्माण केल्या आहेत आणि १ लाख ३० हजार तरुण इन्फोसिअन्स बरोबर काम करण्याचा आनंद मिळवतात त्याचा ओघवता तपशील पुस्तकात दिला आहे.

मायक्रोसॉफ्ट काँर्पोरेशनचे अध्यक्ष बिल गेटस् यांनी, “नारायण मूर्ती यांनी अनेक अडथळे पार करून हे दाखवून दिले आहे की, भारतात जागतिक दर्जाच्या, मूल्याधिष्ठित कंपनीची उभारणी करणं शक्य आहे. मूर्तींच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे नाविन्य आणि उद्योजकतेच्या जगात चमक आली आहे. आपली स्वतःकडे पाहण्याची आणि जगाची भारताकडे पाहण्याची द्रुष्टी बदलली आहे. व्याख्यानांच्या या पुस्तकाद्वारे व्यवसायामधील मूल्यं आणि नेतृत्व गुणांचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलें आहे” असा अभिप्राय दिला आहे.
तर लाखो भारतीयांसाठी नारायण मूर्ती एक आदर्श व्यक्तिमत्व त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि नेतृत्वामुळे नाही तर मूल्याधिष्ठित वागणूक आणि व्यक्तिगत आचरणामुळे असल्याने नारायण मूर्ती अवघ्या देशासाठी आदर्श ठरले आहेत ते जगासमोर भारताच्या नव्या, प्रगतीशील चेहऱ्याचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचा हा संच येणाऱ्या पिढ्यांना माहितीपर, प्रेरणादायक आणि मार्गदर्शक ठरेल अशा शब्दात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटलेले असल्यावर मी पामराने या पुस्तकावर अधिक बोलणं फारसे गरजेचं आणि औचित्याचं नाही ! मात्र मूर्तीजींनी एका व्याख्यानाचा समारोप करतांना मूर्तीजींनीच सांगितलेल्या संस्कृत सुभाषिताचा अर्थ देण्याचा मोह मला होत आहे ते शब्द असे- “अहिंसा, इंद्रियनिग्रह,परोपकार, क्षमा, शांति, मनःशांति, दया आणि सत्य ही देवाला वश करणारी आठ पुष्पे आहेत आणि एकविसाव्या शतकातल्या भारतीयांचे हे सारे गुण आहेत”

— परीक्षण : सुधाकर तोरणे,
निवृत्त माहिती संचालक. नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800