“दिसतो दूर दिवा“
पुस्तकांचा शोध घेतांना आमचे नाशिकचे एक सिध्दहस्त लेखक, विधानपरिषदेचे राज्यपाल नियुक्त आणि पूर्ण तपपूर्ती झालेले आमदार, एका राष्ट्रीय पक्षाचे कोषाध्यक्ष श्री हेमंतराव टकले यांची दोन पुस्तकं हाती लागली. त्यापैकी एक होतं
“रंगांना रेषांचा आधार”हा कथासंग्रह आणि दुसरे होते ललित गद्य असलेलं ‘दिसतो दूर दिवा’!
आज मी त्यांच्या या गद्य लेखन पुस्तकासंबंधीच बोलणारं आहे !
कोरोना महामारीचा काळ सुरु झाला, लाँकडाऊन जाहीर झाले आणि बरीच वर्षे प्रवास, बैठका, मार्गदर्शन अशा शब्दामध्ये अडकून पडलेल्या हेमंतरावांना कोरोनाच्या सक्तीच्या विश्रांती ने घरातच थांबावे लागले ! आणि मग काय चिंतन, मनन, दैनंदिन जीवनातल्या असंख्य आठवणी यांचा वेध घेत हेमंतजींनी आपली लेखनयात्रा सुरु केली !
तसे हेमंतराव हे शब्द ब्रम्हाचे उपासक म्हणून सा-या रसिक नाशिकरांना दीर्घकाळ सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमातून तसेच शास्त्रीय, सुगम गाण्याच्या मैफलीतून परिचित आहेतच ! ! गो-यापान चेह-यावर सुहास्यपूर्ण काव्यात्मक रसाळ शब्दांच्या अनोख्यारितीने केलेलं वैशिष्ट्यपूर्ण सूत्रसंचालन तमाम नाशिककरांना मुख्य कार्यक्रमाइतकेच हवेहवेसे वाटणारे !
आमच्या काँलेज जीवनातील माझ्या सा-या मित्रांचं या एकाच गोष्टीवर एकमत ! यामुळेच ओघाने त्यांच्या पुस्तकांचा दिलखुलास आनंद पुन्हा एकदा जुन्या जमान्यातील आठवणींनी सम्रुध्दपणे उजाळला गेला !
या १५० वर पानी अत्यंत सुबक पुस्तकाचं प्रकाशन मात्र ब-याच कालावधी नंतर २०२२ मधील ऑगस्ट महिन्यात, म्हणजे बरोबर वर्षापूर्वीच झालं आणि लेखकाचं शब्द वैभव पुनश्च साकारल्यासाखं वाटलं !

या पुस्तकातले गद्य लेखनाचे हेमंतजींनी तीन भाग केले आहेत. पहिल्या भागात “जीवन त्यांना कळले हो”
दुसऱ्या भागात “फुले, फळे चिंतनाची” आणि अखेरच्या भागात “आठवणीचे अम्रुत सिंचन”!
पहिल्या भागात लोकोत्तर हास्यसम्राट चार्ली चँप्लीन, साहित्य लक्ष्मी लक्ष्मीबाई टिळकांची स्मृती चित्रे, अंधांच्या जीवनातील प्रकाशदूत हेलन केलर, लेखकाला लाभलेला मदर तेरेसांचा तेजोमय सहवास, चाणक्य मालिकेत सम्राट चंद्रगुप्ताची भूमिका केलेला महान कलाकार इरफान यांची एक्झिट, अलौकिक महात्मा गाडगेबाबा यांच्या जीवनातील अप्रकाशित भागांचे, गोष्टींचे रसाळपणे केलेलं दर्शन अतिशय वेधकपणाने हेमंतजींनी चितारलेलं आहे.. काहींच्या तर प्रत्यक्ष भेटी घेऊन सुसंवादही साधला आहे. नावाजलेल्या, आतंरराष्ट्रीय डॉक्युमेंट्री फिल्म मेकर अम्रुता सिन्हा यांना एका शास्त्रज्ञाच्या डॉक्यूमेंटरीचं काम आलं आणि ते आतंरराष्ट्रीय ख्याती मिळवलेले पुण्याला स्थायिक झालेले इन्स्टिट्यूट आँफ बायोटेक्नॉलॉजीचे संस्थापक संचालक पद्मविभुषण डॉ. जीवन तुळापूरकर यांच्या संशोधनावर ! या अनुबोधपटाच्या निर्मितीचा मागोवा लेखकाने छान पैकी घेतला आहे शेवटचा वार्धक्याने व्हीलचेअर वर बसलेले तुळापूरकर जीवनाचे तत्वज्ञान सांगतात ते चल्-चित्रण फार चांगल्या प्रकारे चित्रित आणि शब्दबध्द केलं याचं लेखात मनोज्ञ दर्शन घडविलं आहे !
दुसऱ्या ह्रदयस्पर्ष करणा-या छोट्या गोष्टी पासून तर आनंदाचे डोही आनंद लेखात तुकोबाच्या चिंतनाशी आपण एकरूप होऊ या हा संदेश दिला आहे. ‘कोकरू, तो आणि आपण’ हा लेख पूर्णतः वाचण्यातच मजा आहे.
“जिवंत माणसांचा खेळ” या लेखातला बोअर झालेल्या एका नटाच्या रंगीत तालीमीतले ‘सोलो’ मनोगतात सद्यस्थितीचे वर्णन सुरेखपणे रेखाटले आहे. आईची माया पासून सर्वधर्ममभाव, का्वळा, सावली, भाषा, मन, माझा कँलिडोस्कोप, आणि ख-या-खोट्याची मीमांसा या अनेक लेखनात रेखाटलेलं लेखकाचं मनन, चिंतन वाचलेच पाहिजे.
आणि तिसऱ्या शेवटच्या भागात लेखकाला भेटीगाठी तून आलेल्या विविध अनुभवाचं भावनोत्कट दर्शन फार चांगल्या शब्दांनी रंगविलं आहे. त्यात राजकमल ब्रास बँंड, बाबू माकडवाला, तो, ती, आपण हो-नाही चा पेच, जगावेगळी चोरी, युरोप भेटीतील घड्याळावरील आगळावेगळा लेखांचं रसग्रहण करण्यापेक्षा वाचलेलंच समाधान देणारं आहे असं मला प्रामाणिक पणे वाटतं.
या पुस्तकाचं माझ्या पेक्षा हेमंतजींनी स्वतःकेलंलं आयुष्याचं शब्दरूप फारच रसिले, रोचक असे केले आहे ते म्हणतात “अचानक एखादी विस्मृतीत गेलेली गाण्याची ओळ भेटायला येते, तसच काहीसं” ! “चंदा को ढुंढने तारे निकल पडे” या ओळीचे झाले. चंद्र हरवला आहे, सगळे तारे दुखावले आहेत. निघालेत मग हरवलेला तो चंद्र शोधायला! या एका ओळीत आयुष्याचं सार साठवलंय. आपला प्रवास असाच अखंड सुरू असतो हरवलेल्या चंद्राच्या शोधात. ऋतू बदलतात, दिवसही अंधारतात आणि पौर्णिमेचा पूर्ण चंद्र सापडतो, पण निसर्गचक्रामुळे अमावस्येला हरवून जातो. तारे अखेरीला अस्ताचलाला जाणाऱ्या सूर्यदेवाची करूणा भाकतात. आमचा चंद्र परत दे, तर तोही त्यांची हाक ऐकतो आणि अस्ताला जातांना आश्वास देतो, बघा आकाशाकडे तिथे आहे तुमचा चंद्र.
अशा हरवण्या-सापडण्या
साठीच तर असतंना आयुष्य ?
त्या आयुष्याचंच हे
शब्दरूप…”
महामारीचं संकट आलं सगळं जगणच विस्कटून गेलं, उजेड, अंधार, सूर्य-चंद्र अस्ताला गेले मग सावरायला हेमंतजींनी लेखणी हाती घेतली. आपण एकटे असलो तरी सगळेच होते भवताली ! आज आपल्या कोषात मग मौनाची भाषा संवादी झाली. हेमंतजींसारख्या पथिकाला दिसला दूर दिवा म्हणजे हे पुस्तक !
विशेष म्हणजे त्या दिव्याकडे नेणारी ही शब्दयात्रा या काळात कायमच्या अंतरलेल्या सर्व सुह्रुदांना लेखकानी समर्पित केली आहे हे “”दिसतो दूर दिवा'” या पुस्तकाचं ह्रदयस्पर्षी वैशिष्ट्य !…
त्यांच ‘रंगांना रेषांचा आधार’ कथासंग्रहावर पुढे कधीतरी !

— परीक्षण : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नाशिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800