प्रशासन : भाग २
गेली ५० वर्षे जे एक प्रशासक म्हणून काम करीत होते ते ‘प्रशासन’ या नाविन्यपूर्ण पुस्तकाचे लेखक डॉ.मनोहर जोशी यांनी हे जीवनोपयोगी पुस्तक लिहिले असून ते अतिशय वाचनीय आहे. पुस्तक लिहितांना त्यांचे वय ८२ होते. आता हे वाचतांना त्यांनी ८७ वर्षे गाठली आहेत. ते दारिद्र्यातून आले पण दरिद्री राहिले नाहीत. त्यांनी फक्त एकच नोकरी केली आणि बाकी सर्व जीवन उद्योगधंद्यात काढले.हे पुस्तक म्हणजे त्यांच्या ‘अनुभवांचे बोल’च आहेत. स्वप्न बघणे, त्याचा ध्यास घेणे, आणि तळमळ व जिद्दीने प्रयत्न करणे याच उद्देशाने त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे हे प्रथम भागात संक्षिप्ताने पाहिले.
सुरूवातीसच मी प्रशासकांपैकी निवृत्त मुख्य सचिव श्री दिनेश अफझलपूरकर आणि माजी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या सरांनी घेतलेल्या मुलाखती कडे वळतो. संपूर्ण भारतात आय ए.एस परिक्षेत पहिला क्रमांक मिळवणारे श्री दिनेश अफझलपूरकर सर यांनी सुरूवातीलाच असि.कलेक्टर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कलेक्टर, सचिवालयात उपसचिव ते मुख्य सचिव या विविध पदांवर यशस्वीपणे काम केले आहे. प्रशासनासंबंधीची व्यापक व्याख्या सांगताना त्यांनी सांगितले की, मुख्यत्वे शासन- मंत्रालय धोरण ठरवतं.धोरण ठरविल्यानंतर नियमावली शासनच बनवते. धोरण व्यापक असतं. नियम काटेकोरपणे असतात. धोरण व नियमांमध्ये योग्य ती सांगड घालून त्या धोरणाबाबत काही तफावत होणार नाही आणि त्यात लवचिकता असली पाहिजे अशी त्यांची प्रशासनाची व्याख्या आहे. ही नियमावली धोरणाशी विसंगत होणार नाही याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. प्रशासन राबविताना मानसिकता आणि राजकीय हेतू या घटकांचा सर्वात जास्त परिणाम प्रशासनावर होतो. प्रशासकीय अधिका-याची मानसिकता महत्वाची आहे. जर काम करायची इच्छा असेल तर काम लवकर, जलद होतात. त्या खालोखाल आपल्या खालचे अधिकारी म्हणजे नोकरदारांचा दर्जा आणि त्याची इच्छाशक्ती यांचा परिणाम प्रशासनावर होत असतो. लोकशाहीत लोकांची कामं होतील अशी आजही समजूत आहे. परंतु प्रत्यक्षात अनुभव असा येतो की खालचे अधिकारी होण्यासारखी कामे सुध्दा करत नाहीत. बरेच आपल्या कडे आलेले कागद वर पाठवतात. त्यामुळे इतका वेळ जातो की शेवटी सामान्य जनता कंटाळून जाते.
सर्वात जास्त प्रभाव भ्रष्टाचाराचा ! जेथे भ्रष्टाचार असेल तिथला कागद लवकरच हलणार नाही. त्यासाठी भ्रष्टाचाराचं निर्मुलन होणं गरजेच आहे.जे धोरण ठरवलेलं आहे त्या चौकटीत काम असतील तर ती जलद झाली पाहिजेत आणि ज्या अधिकाऱ्याकडून ही कामं होणार नाहीत त्यांना योग्य ते शासन आणि योग्य ती जरब असली तर काम जलद होत असते.
मनोहर जोशी सरांनी त्यांना एक प्रश्न विचारला की सरकारी दरबारी लोकांची कामं होतात कां ? सवलती ख-या लाभार्थ्यांना मिळतात का ? त्यावर अफझलपूरकर साहेबांनी प्रामाणिकपणे सांगितले की सवलती सगळ्या लाभार्थ्यांना मिळत नाहीत. त्याचे वाटप हे अतिशय निकोप आणि योग्य प्रकारे होत नाही. त्याचे जे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे त्यांचे योग्य वाटप होण्याकरिता प्रामाणिकपणा आणि इच्छाशक्ती यांची अत्यंत आवश्यकता आहे. सगळ्याच स्तरावर आपणास ती आढळून येत नाही. याला नोकरशाही जबाबदार आहेच शिवाय जे सरकार चालवतात ते देखील तितकेच जबाबदार आहेत. या दोघांनीही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.
नीला सत्यनारायण या आय ए एस असून त्यांनी शासनामध्ये ३७ वर्षे आणि निवडणूक आयोगात ५ वर्षे अशी ४२ वर्षे सेवा केली होती. महसुल, गृह, वन, वैद्यक, समाजकल्याण, ग्रामविकास, माहिती व जनसंपर्क यांसारख्या अनेक खात्यांच्या प्रमुख पदावर काम केले होते.
डॉ.मनोहर जोशी सरांनी त्यांना प्रशासनाची व्याख्या काय कराल ? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी प्रशासन हा सरकार आणि सामान्य माणूस यांच्यातला दुवा आहे. शासनाची बांधिलकी ही नेहमीच सामान्य माणसापर्यंत असली पाहिजे.याचा अभाव शासनात असेल तर कुठलेच शासन यशस्वी होणार नाही. मग हा दुवा कायम ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे ? असे सरांनी विचारता, नीला सत्यनारायण म्हणाल्या की, लोकांचे हित जपतांना स्वतःचा स्वार्थ आड येऊ न देता प्रसंगी राज्यकर्त्यांशी वैर पत्करण्याची धमक तुमच्यात असली पाहिजे. आपण ज्या हेतूने प्रशासकीय सेवेत आलात तो सफल झाला कां ? असे सरांनी विचारलं असता त्या म्हणाल्या “काम करतांना ब-याच मर्यादा होत्या. त्या मर्यादेत राहून मला जे करता येत होते ते केले. कधी विरोध पत्करून तर कधी धाडसाने काम केले. काही प्रमाणात मला सफलता मिळाली. परंतु जोपर्यंत लोककल्याणासाठी योजना शेवटच्या माणसापर्यंत पोचत नाहीत तोपर्यंत असे कसे म्हणता येईल की आपण सफल झालोय ? खरं दुर्दैव आणि वस्तुस्थिती हीच आहे की शासनाच्या उदात्त योजना शेवटच्या माणसापर्यंत पोचतच नाहीत.
शेवटी डॉ मनोहर जोशी सरांनी एक प्रश्न विचारला की तुम्ही साहित्यिक, लेखिका आहात. चांगल्या कवयत्री आहात याचा प्रशासन व्यवस्था बदलण्यासाठी काही उपयोग होतो कां ? त्यावर नीलाजी म्हणाल्या की माझ्या लिखाणाचा किंवा बोलण्याचा लोकांकडून मला छान प्रतिसाद मिळाला की मला बरे वाटते. ते म्हणतात ‘तुमच्यामुळे आमच्या जीवनात खुपच फरक पडला. आमचा दृष्टिकोन बदलला. “सामान्य माणसांचा प्रतिसाद हुरूप देणारा आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर माझ्या साहित्याचा काय परिणाम झाला ते मला माहित नाही आणि होत असेल असं मला वाटतं नाही, कारण प्रत्येक जण स्वतःची अशी स्वतंत्र भुमिका घेऊन प्रशासनात उतरला आहे. पूर्वी जसे आपल्या वरिष्ठांचे आदर्श आपल्यासमोर होते तसे आता राहिलेले नाहीत. जो तो स्वतः पुरते पहातो. समाधानाची गोष्ट एवढीच की सामान्य माणसांची खुप पत्रे, फोन येतात. विशेषत: माझ्या मतीमंद मुलावर लिहिलेलं माझे ‘एक पूर्ण -अपूर्ण’ हे पुस्तक खुप लोकप्रिय झाले. पुस्तक प्रकाशित होऊन पंधरा वर्षे झाली तरी लोक मला फोन करतात, भेटायला येतात” … सरांनी एक प्रश्न विचारला की तुमची कोणती ओळख प्रभावीपणे समोर येते -प्रशासकीय अधिकारी की साहित्यिक ? त्यावर नीला सत्यनारायण म्हणाल्या की, “एक संवेदनशील, प्रामाणिक, एकनिष्ठ अधिकारी, A Strong Woman ! मला कोणी साहित्यिक किंवा कवयत्री संबोधिले की मला खुप आनंद होतो” शेवटी सरांनी पदांवर असणे आणि पदांवर नसणे हा फरक तुम्हाला जाणवतो कां ? त्यावर नाही सर, मला फारसा फरक जाणवत नाही. माझा मुलगा मतीमंद असल्यामुळे मला अगोदरही सोशल लाईफ नव्हतंच. घर आणि ऑफिस यातच माझा दिवस संपायचा. ऑफिसच्या पलिकडे माझ्या सहकाऱ्यांशी माझा फारसा संबंध आला नाही, तरीही आता कोणाला फोन केला तर ते आदराने बोलतात. मला सांगतात, “आम्ही तुमचाच वारसा चालवीत आहोत तुम्ही आमच्या आयकाॅन आहात” हे एकून मानसिक समाधान मिळते. अधिकाराची खुर्ची गेल्याची फारशी खंत वाटत नाही. केंव्हातरी आपल्याला निवृत्त व्हावेच लागते.’.
नीला सत्यनारायण यांनी आपल्या कार्य काळातील वरिष्ठ अधिकारी, मंत्री, सरकार जनता आणि प्रसारमाध्यमे याबाबतीत काही मजेशीर, चांगले, बरेवाईट अनुभव देखील सांगितले ते पुस्तकातच वाचले पाहिजे.
क्रमशः
— परीक्षण : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️v9869484800