‘असे घडवा तुमचे भविष्य‘
विचारांना नवी दिशा देणा-या पुस्तकांची मी जवळपास निवड करीत असतो. नुकतेच मला भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे “असे घडवा तुमचे भविष्य” हे डिसेंबर २०२२ मधील आठव्या आवृत्तीचे पुस्तक उपलब्ध झाले. इंग्रजीत २०१५ रोजी प्रकाशित झालेल्या “Forge Your Future” या पुस्तकाचा मराठीत अनुवाद मनोज अंबिके यांनी छानपैकी केला आहे. तसे आदरणीय कलाम सरांचे ‘अग्नीपंख’, ‘टर्निंग पाॅइंट्स’, भारत की आवाज’, पुस्तके मी यापूर्वी वाचलेली आहेत.
माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जी अब्दुल कलाम हे भारतातील एक लोकप्रिय विशेष नेते आहेत. युवकांत ते आज देखील खास करून प्रचंड लोकप्रिय आहेत. फेसबुकवर १८ लाख लोक त्यांना फाॅलो करतात. कलाम सरांना जवळजवळ ३०० इमेल्स येत. सोशल मिडिया वरील त्यांच्या सक्रीय सहभागामुळे वाचकांना त्यांच्याशी संवाद साधण्याची एक अनोखी संधी प्राप्त झाली होती. त्यात आपल्यापैकी काही युवक देखील असतील. वरील पुस्तक देशातील युवकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारीत आहे. त्यांच्या ईमेलच्या माध्यमातून आलेल्या तरूण वर्गाच्या जीवनात येणाऱ्या ३२ समस्यांची सविस्तर उत्तरे त्यात दिली आहेत.
या पुस्तकात पांच मुख्य प्रकरणांचा समावेश आहे.
१. सफलतेकडे,
२. अधिक चांगल्या समाजाच्या दिशेने,
३. नारी सशक्तीकरणाच्या दिशेने,
४. मजबूत भारताच्या दिशेने आणि
५. जागतिक स्पर्धेच्या दिशेने अशी आहेत. त्यातील पहिल्या दोन प्रकरणातील उपविषय याप्रमाणे आहेत.
‘स्वत:वर विश्वास ठेवा’, ‘स्वप्नांची शक्ती’, ‘वेळेचा सदुपयोग’, ‘अपयशावर मात’, ‘धैर्याची ओळख’, ‘अतुल्य साहस’, ‘न थांबणा-या व्यक्तींचे गुण’, ‘इंशाल्लाह’, ‘इन्चार्ज कोण’, ‘तुम्ही अद्वितीय आहात’, ‘अग्नीपंथ’ ‘अशी असून दुसऱ्या ‘अधिक चांगल्या समाजाच्या दिशेने’ प्रकरणात ‘सोशल मीडियाचा वाढता प्रभाव’, ‘प्रामाणिकपणाचा मार्ग’ ‘भ्रष्टाचाराचं साम्राज्य’, ‘एकत्र कुटुंबाचे महत्व’, ‘सद्गुणांची राणी’, ‘देण्याचं महत्व’, ‘कलेशिवाय जग म्हणजे हवेशिवाय फुगा’ आणि ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या विषयांचा समावेश आहे याखेरीज नारी शक्ती करण, मजबूत भारत,जागतिक स्पर्धेच्या तीन प्रकरणातून तेरा उपविषय आहेत.
या सर्व विषयांच्या शीर्षकावरूनच आपणास पुस्तकात नेमके काय संबोधन केले आहे हे सहजपणे लक्षात येईल. थोडक्यात युवकांच्या प्रत्येक चिंता आणि समस्यांचे कलाम साहेबांनी दिलेलं उत्तरे किंवा सल्ला वरील उपविषयांच्यात समावेश केलेला आहे.
प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शन, यासाठी किंवा त्यांच्याशी असलेलं एक आपुलकीचं नातं म्हणून युवालोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. कलाम साहेबांचे विचार, त्यांची जीवनमूल्ये, समस्यांना दिलेली उत्तरे ही जीवनाच्या खडतर वाटेवरून चालतांना खरेपणाच्या कसोटीवर उतरलेली त्यांची शिकवण प्रत्येक पानातून लक्षात येते, ज्यापासून आपण खूप काही शिकू शकतो. ज्याला आपण आपल्या जीवनात रोज सामोरे जातो त्या वैयक्तिक विकासाच्या आव्हानापासून ते सामाजिक आणि राष्ट्रीय बहुआयामी कठीण प्रश्नांचा सामना करण्यापर्यंत हे पुस्तक संपूर्ण आणि सार्थक जीवन जगण्याची प्रेरणा देते हे या पुस्तकाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे.
हे पुस्तक देशातील युवकांसाठी अत्यंत महत्वाच्या मुद्यांवर आधारित आहे. असे मुद्दे, ज्यामुळे देशातील युवक चिंतीत आहेत. पुस्तकाच्या भुमिकेविषयी कलाम साहेबांनी लिहिले आहे की इथे जे मुद्दे घेतले गेले आहेत, ते तरुण भारतीयांच्या मनातील चिंता आणि समस्या, तुमच्या मनाशी जोडतील.ज्यामध्ये विविध मुद्यांविषयी इंद्रधनुष्यासारखे रंग प्रतिबिंबित होतात. प्रत्येक रंग इतरांपेक्षा वेगळा असला तरी त्यातून निघणारा प्रकाश मात्र एकसारखाच असतो. तो प्रकाश युवकांच्या आत्म्याचे प्रतिक आहे, जो प्रामाणिकपणा, आशा, आणि कुतहूल तरुण मनांच्या माध्यमातून उत्सर्जित करतो. म्हणूनच कलाम साहेबांनी या पुस्तकाच्या माध्यमातून तरुणांच्या मनातील आणि आत्म्यातील प्रकाश जीवंत आणि ज्वलंत ठेवायचा आहे आणि त्यांना महान उंचीवर प्रेरणा द्यायची आहे. हे पुस्तक संपूर्ण वाचल्यावर लक्षात येते.
या पुस्तकात ३२ युवकांनी बरेच दीर्घ स्वरुपात समस्या सांगितल्या आहेत. कलामसाहेबांचा बराचसा वेळ युवकांशी बोलतांना किंवा पुस्तकाच्या माध्यमातून जातो.त्यांना मोटिव्हेट करतांना ते नेहेमीच समस्येवर नाही तर समस्येच्या समाधानाने लक्ष केंद्रित करायला सांगतात.म्हणून या पुस्तकातील समस्यांना त्यांनी अनेक उदाहरणांसह प्रदीर्घ उत्तरे दिली आहेत. त्यातील निवडक उत्तरांचा मुख्य सार- संदेश मी विस्तारभयापोटी थोडक्यात देत आहे. त्यावरून आपणास समस्या काय आहेत ते सहज लक्षात येईल.
+ कार्यकुशलता आणि स्वाभिमान हे आत्मविश्वास वाढवतात.
+ आपले धेय्य निर्धारित करा. ध्येयाच्या दिशेने पावले उचला,वेगाने ध्येयाकडे वाटचाल करत रहा.काम,काम काम आणि कामच करा
+ निर्धार ही अशी शक्ती आहे जी अडथळ्यातून आणि विमनस्क मनस्थितीतून बाहेर काढते. यशासाठी अत्यंत आवश्यक असलेली इच्छाशक्ती निर्माण करण्यास ती मदत करते.
+ वेळ हीच यशाची किल्ली आहे, ज्यावर आपले नियंत्रण नाही. मात्र आपण आपले ध्येय गाठण्यासाठी त्याचा योग्य उपयोग कसा करायचा हे शिकू शकतो.जो माणूस वेळ वाया घालवतो तो इतरांच नाही, तर स्वतः चचं नुकसान करून घेत असतो. वेळ वाया घालवतो हा घात नसून आत्मघात आहे.
+ आयुष्यात अपयशाशिवाय कधीही यश मिळत नाही. यश हे ध्येय आहे तर अपयश हा मधेमधे अडथळा आहे.
+ संकटांसमोर न झुकता निडरतेने त्यातून मार्ग काढण्याचा निश्चय केला तर सर्व अडथळे आपोआपच नाहीसे होतात.
+ असंतोष आणि निराशा ही कुठल्याही गोष्टीच्या कमतरतेमुळे नाही तर दूरदृष्टी नसल्यामुळे येते.
+ आनंद हा स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याने मिळत नाही तर योग्य उद्देशासाठी कटिबद्ध असल्याने मिळतो.
+ तुमचं नशीब तुम्हीच निर्माण करतात.प्रत्येक विचार, भावना, इच्छा, आणि क्रिया एक शक्ती तयार करतात. चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो. आपण त्यांच्यामध्ये संतुलन आणत नाही तोपर्यंत त्या रहातात.
+ शिस्त ही तुमच्या जीवनात ध्येयनिश्चिती आणि ध्येयप्राप्ती यांना जोडणारा पूल आहे.
शेवटी कलाम सरांनी सांगितले आहे की त्यांनी दिलेली उत्तरे ही त्यांच्या जीवनातील अनुभवातून ते जे शिकले त्यांचे सार आहे. त्यांचे विचार, त्यांची जीवनमूल्ये, समस्यांना दिलेली उत्तरे, ही जीवनाच्या खडतर वाटेवरून चालतांना खरेपणाच्या कसोटीवर उतरलेली त्यांची शिकवण आहे. ज्यापासून आपण खूप काही शिकू शकतो. वैयक्तीक विकासाच्या आव्हानापासून ते सामाजिक आणि राष्ट्रीय बहुआयामी कठीण प्रश्नांचा सामना करण्यापर्यंत हे पुस्तक संपूर्ण व सार्थक जीवन जगण्याची प्रेरणा देते असे मी जे सुरवातीस म्हटले आहे. ते सत्य आहे..नव्या पिढीतील तरुणांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे, आत्मसात केले पाहिजे.
— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नाशिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800