“रामजन्मभूमी-संघर्ष कथा मालिका”
जानेवारी २०२४ महिन्यात २१ ते २५ च्या दरम्यान रामजन्मभूमी अयोध्या येथे पवित्र शरयू नदीच्या काठी श्री रामाच्या च अतिभव्य मंदिराचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते लोकार्पण होत आहे. या राम मंदिरासाठी मोठा संघर्ष झाला. त्याचा आत्तापर्यंतचा तसेच न्यायालयीन वस्तुस्थितीचा इतिहास पूर्णतः नव्या पिढीला ज्ञात होण्याच्या दृष्टीने मी काही पुस्तकांचा शोध घेत होतो. २०२२ च्या गेल्या जुलैमध्ये प्रकाशित झालेलं अद्यावत पुस्तक ‘रामजन्मभूमी संघर्ष कथामालिका’ हे शरयू नदीच्या मुखातून सांगितलेलं लेखक श्री अशोक जुनागडे यांचे नवे पुस्तक अवचितपणे हातात आले आणि कथा स्वरुपात असल्याने मी ते पुर्णपणे एका दिवसात वाचून काढले.
शरयू नदी सांगते अशा १५ भागात अशोक जुनागडे यांनी अतिशय रसाळपणे उत्तम भाषाशैलीत, कथामालिकेच्या रुपात अभिनवपणे हा संपूर्ण इतिहास निवेदिला असल्याने मला व्यक्तिशः उद्बोधक प्रेरणादायी वाटला. नव्या पिढीतील साहित्यप्रेमी जिज्ञासूंना कथेच्या रुपात शब्द बध्द झालेल्या या पुस्तकाचे वाचन निश्चितच आवडेल असा विश्वास मी प्रारंभीच प्रकट केल्यास वावगे होणार नाही.
प्रभू रामचंद्र हे संपूर्ण देशाचे प्रेरणादायी असे महान व्यक्तिमत्व आहे. आपण परस्परांना भेटल्यावर नेहमीच राम राम म्हणतो. अगदी अंत्य समयापर्यंत श्री रामाचे नाव घेतले जाते. संसार सागरात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक क्षेत्रात अशी अनेक उदाहरणे देता येतील.एखाद्या व्यक्तींचे माणूसपण हरपले तर त्यांच्यात काही ‘राम’ राहिला नाही असे म्हणण्याची देखील पूर्वापार पध्दत असल्याने श्रीरामाचे मनुष्य मात्राला व्यापलेलं अद्वितीय व्यक्तिमत्व आहे.ते तर भगवान विष्णूचा सातवा अवतार म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आहेत.अशा या श्रीरामाची देश विदेशात असंख्य मंदिरे आहेत. असेच एक मंदिर शरयू नदीच्या काठी श्री रामाच्या निर्वाणानंतर त्यांचे पुत्र लव आणि कुश यांनी रामजन्मभूमीत अयोध्या येथे भव्य मंदिर निर्माण केले. हा इतिहास सर्वच भारतीयांना माहित आहे.
या पुस्तकात प्रभू रामचंद्रांचे जीवन कार्य, राज्य कारभार, बंधू प्रेम, इत्यादी माहिती रामायणामुळे सर्वांना मुखोद्गत असल्याने मी पुन्हा न देता अशोक जुनागडे यांनी शरूयाच्या मुखाने ज्या कथा सांगितल्या आहेत त्यातील मुख्य निरूपणाकडे वळतो.
राजा कुश आणि लव यांनी श्री रामाच्या जन्मभूमीत ८४ दगडी खांबाचे भव्यदिव्य मंदिर पवित्र अशा शरयू नदीच्या काठी अयोध्या नगरीत निर्माण केले. त्यानंतर अनेक वर्षांच्या काळा नंतर ग्रीक राजा मीनांडर याने आक्रमण करून ते पाडून टाकले. त्या जन्म भूमीवर काही वर्षांनी राजा विक्रमादित्य महाराजांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार करुन पुन्हा राम मंदिर उभे केले. त्यानंतर परकीय आक्रमक सालार मसूद विरूध्द राजा सुहलदेव आणि त्यांच्या सहकारी १७-१८राजांनी या आक्रमणाला युद्ध करून मंदिराचे रक्षण केले. ते सुमारे दीड दोनशे वर्षे पूर्ण वैभवाने दिमाखात उभे राहून भाविकांना प्रेरणा देत राहिले. पुढे मोगल साम्राज्यांनी बाबर बादशहाच्या काळात मंदिराला १५२७-२८मध्ये जमीन दोस्त केले. या लढाईत १ लाख ७१ हजार ध्येयवादी वीरांनी बलिदान केले. त्यात हंसवर संस्थानाचे राजे रणविजयसिंह लढतांना वीरगतीला गेले. त्यानंतर त्यांच्या महाराणी जयराजकुमारी यांनी केलेल्या संघर्षाची आणि त्यांच्या तलवारीच्या धारेवर जाज्वल्य वीरगाथा कथन केली आहे.
पुढे या जागी बाबरी मशिदीच्या भिंती उभारण्याचे काम सुरू झाले.१५३० मध्ये बाबराच्या मृत्यू नंतर औरंगजेबा पर्यंत रामभक्तांची घमासान लढत चालूच होती. औरंगजेबच्या सैन्यांनी मंदिराचा चबुतरा आणि मंदिर पाडले.त्या जागी मोठा खड्डा पडला तरीही नबाबी आणि इंग्रजी राजवटीत लढा चालू होता. त्यावर भाविकांनी पुन्हा चबुतरा व मंदिर बांधले पण बाहेरूनच पुजा अर्चा करण्याची परवानगी सरकारने दिली. २३ डिसेंबर १९४९ला रामलल्ला जन्मभूमीवर प्रकट झाले. तथापि २९ डिसेंबरला जन्मभूमी वर जप्ती आणून प्रवेशद्वारावर कुलपे लावली गेली. १९८४ पर्यंत रामलल्ला कुलूप बंदीतून मुक्त करण्याचा संकल्प दोन लाख रामभक्त समुदायाने धर्माचार्यांच्या उपस्थितीत केला. १ फेब्रुवारी १९८६ ला कायदेशीर मार्गाचा अवलंब करून ३७ वर्षांनंतर रामाला कारागृहातून मुक्त केले. त्यानंतर १९८७ वर्षात देशभर दंगे झालेत आणि शिलान्यासात अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु देशभर शीलापूजन उत्साहात संपन्न झाले. त्यानंतर अनेक अडथळ्यांवर मात करून श्री रामजन्मभूमी मुक्ती यज्ञ समिती आपल्या निश्चित ध्येयाकडे वाटचाल करत एकेक पाऊल पुढे जात होती. असंख्य कार्यकर्त्याच्या परिश्रमाने श्रीराम ज्योत यात्रांचे दैवदूर्लभ स्वागत गावागावमध्ये झाले व जनमतांची प्रभावी ताकद सर्व कारसेवकामागे उभी राहिली.
पुढे २५ सप्टेंबर १९९० पासून भा ज प नेते लालकृष्ण अडवाणी यांची सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा निघाली. ती गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश राजस्थान बिहार पर्यंत आली. तेथे अडवाणी यांना अटक झाली. त्यानंतर भाजपने भारत बंदचे आवाहन केले. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. दरम्यान काळात उत्तर प्रदेश मुख्यमंत्री मुलायमसिंग यांनी १२ ऑक्टोबर पासून रामभक्तांची अटक करण्यास सुरुवात केली.कित्येक कारसेवक हुतात्मे झाले. त्यानंतर मात्र ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी बाबरी मशीद जमीनदोस्त केली. ७ डिसेंबर नंतर देशभरात दंगलींचा भस्मासुर उसळला शेकडो लोक गोळीबारात ठार झाले. काही जीवंत जाळले गेले. रेल्वे गाड्यांमध्ये बाॅम्बस्फोट झाले. यापुढचा संपूर्ण इतिहास राज्य व केंद्र सरकारांच्या विविध निर्णयांसह प्रिंट व टीव्ही माध्यमातून मोठ्याप्रमाणात प्रसारित झालेला असल्याने आणि तो सर्वांना ज्ञात असल्याने मी येथे पुन्हा देण्याचा विस्तार भयापोटी संकोच करीत आहे. न्यायालयात कशी लढत झाली त्याचा व हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टाचा सुनावणीचा आणि निकालांचा वृतांत सर्वांना ज्ञात असल्याने मी तो देत नाही. या पुस्तकात मात्र हे सर्व विस्ताराने आलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक एक ऐतिहासिक ठेवा झाला आहे.
आता श्री रामाच्या मंदिराच्या वास्तूचे प्रारूप ठरविल्याप्रमाणे बांधकाम जवळपास पूर्ण होत आहे. १६१ फूट उंच ५ शिखरें यासह ५७ हजार ४०० चौरस फूट जागेवर झाले आहे. त्याची लांबी ३६० फूट, रूंदी २३५ फूट आणि उंची १६१ फूट असून मुख्य शिखर हे तीन मजली आणि बाकीची ४ शिखरे दोन मजली आहेत.सर्वात खालच्या मजल्यावर १६० स्तंभ, गर्भगृहात १५ फूट उंचीचे खांब, २ फूट उंचीचा सुवर्ण जडित ज्ञानज्योतीरुप कलश, त्यावर ८१ फूट उंचीचे शिखर ज्यावर विविध देवदेवतांच्या प्रतिमा आहेत. गर्भगृहात साडेअकरा फूटाची श्रीरामाची मूर्ती व लक्ष्मण आणि सीता यांची सव्वानऊ फूट उंचीच्या मूर्ती आहेत. रामजन्मभूमी ही २.७७ एकर जागेवर आहे.व त्याच जागेवर मंदिर उभारलेले आहे. त्याच्या बाजूला असलेली सुमारे ६८ एकर जागा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने न्यासाला हस्तांतरित केली आहे. त्या जागेवर अतिथी भवन, संशोधन केंद्र, प्रशासकीय भवन, भक्त आणि कर्मचारी निवासस्थाने, प्रदर्शनी म्युझियम, भाविकांसाठी सोयीसुविधा, वाहनतळ, संगीतमय फवारे, कारंजे, संग्रहालय, यज्ञ शाळा, अभिलेखागार, संमेलन केंद्र, सत्संग सभागृह, ग्रंथालय, ३६० डिग्री रंगभूमी, संशोधन केंद्र इमारतसारख्या वास्तूंची उभारणी होत आहे या मंदिराचे निर्माणाचे भूमिपूजन दिनांक ५ ऑगष्ट २०२० मध्ये भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत झाले. आता येत्या २४ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याच हस्ते उद्घाटन होत आहे. भारतातील भाविकांचा हा अभूतपूर्व संघर्ष इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. या सर्व घडामोडींची पाच शतकांची हकिकत लेखक अशोक जुनागडे यांनी कथात्मक स्वरुपात शरयू नदीच्या मुखातून शब्दांकित या पुस्तकात केली आहे ती नव्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास आहे.
अशोक जुनागडे हे कारसेवक असून बाबरीचे पतन व रथयात्रांचे स्वतः कार्य अनुभव घेऊन ओघवत्या शब्दबध्दात रसाळपणे कथन करून पुस्तकरूपाने समग्र इतिहासासह शब्दांकित केले आहे.ते नव्या पिढीला प्रेरणा देणारे, मार्गदर्शक ठरेल याचा निश्चितच विश्वास वाटतो.
अशोकजी ख्यातनाम सी. ए.असून मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व अनन्यसाधारण आहे. राम मंदिर भारताच्या आधुनिक संस्कृतीचे, राष्ट्र भावनेचे प्रतीक असेल तसेच कोट्यावधी लोकांच्या सामुहिक संकल्पशक्तीचे प्रतीक म्हणून भावी पिढ्यांना आस्था, श्रध्दा, आणि संकल्पाची प्रेरणा देत राहील असा विश्वास पंतप्रधानांनी भूमिपूजन करतांना व्यक्त केला तो अतिशय उद्बोधक आहे.
— परीक्षण : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नासिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800