21 ग्रेट लीडर्स : भाग 1
जगावर ठसा उमटविणाऱ्या नेतृत्वांची कार्य शैली सांगणारे ’21 ग्रेट लीडर्स’, हे माझे आवडते लेखक पॅट विल्यम्स यांचे अप्रतिम नवीन पुस्तक नुकतेच माझ्या हाती आले. एखाद्याला कोणतीही गोष्ट शिकवायची असेल तर कथांचा किंवा गोष्टींचा वापर करणं हा एक उत्तम मार्ग आहे आणि या गोष्टी सांगण्याच्या बाबतीत पॅट विल्यम्स यांचा इंग्रजी साहित्यात तरी हात धरणारा कुणीच नाही. गेल्या सप्टेंबर २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या या इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद लेखिका नीलिमा करमरकर यांनी सुरेखपणे केला आहे. जाॅर्ज वाॅशिंग्टन, वाॅल्ट डिस्ने, बिल गेट्स, अब्राहम लिंकन, स्टीव्ह जाॅब्ज, मदर तेरेसा, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, विन्स्टन चर्चिल, फ्रॅंकलीन रुझवेल्ट, मार्टिन ल्युथर किंग, मार्गारेट थॅचर असे ’21 ग्रेट लीडर्स’ यामध्ये नेतृत्व आणि नेतृत्वाचे धडे यांचे अतिशय सुंदर एकत्रीकरण केले आहे ते आपल्याला दैनंदिन जीवनात, व्यवहारात निश्चितच वापरता येण्यासारखे आहे.
हे पुस्तक म्हणजे नेतृत्वशैलीची सुरेख गाथाच झाली आहे. कठीण काळामध्ये आपल्याला पुढे होऊन कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करण्याची गरज असते ते कसं करायचं ? याचं अतिशय, मार्मिक समाधानकारक विवेचन कथारुपाने लेखकाने केले आहे. हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
लेखकाने नेतृत्वाचे सात पैलूत जे भाष्य केले आहेत ते म्हणजे…
१. दृष्टिकोन-Vision
२. संभाषण कौशल्य,
३. लोक कौशल्य
४. चारित्र्य
५. क्षमता
६. धैर्य आणि
७. सेवाभाव
असे केले असून त्यात प्रत्येकी तीन ग्रेट लीडर्स यांचा समावेश केला आहे. या सर्व महान लीडर्स यांचे स्वभाव वैशिष्ट्ये, त्यांचे गुणविशेष, त्यांच्या जीवनातील प्रेरणादायक प्रसंग, तसेच जीवनशैलीतून मिळणारे मार्गदर्शन या बरोबरच प्रत्येक लीडर कडून मिळणारे धडे आणि संदेश यांचा उत्तम मेळ साधला आहे. तसेच या महान नेत्यांच्या जीवनावर आणि त्यांनी दिलेल्या संदेशावर लेखकाने अत्यंत विचारपूर्वक भाष्य केले आहे.
वाॅल्ट डिस्ने लॅंड, डिस्ने पार्क, स्टुडिओचा जनक वाॅल्ट डिस्नेने नेतृत्वाबद्दल जे धडे दिले ते म्हणजे भविष्य काळात काहीतरी घडून दाखविण्याची क्षमता स्वप्नांमध्ये असते. तो म्हणतो “तुम्ही स्वप्न बघत असाल, तर नक्कीच ती कृतीत उतरवाल ती मात्र विश्वासाच्या कसोटीवर अजमावणे, धोका पत्करण्याचे साहस करणे, आत्मविश्वासावर भर असणे स्वप्न तडीला नेण्यासाठी, विविध अडचणी, विरोधावर मात करून नियोजनबध्द अंमलबजावणी करणे, सर्व क्षमता ध्येयपूर्तीसाठी एकवटणे हे गुण आवश्यक आहेत. नुसते स्वप्नरंजन करून भागणार नाही.”
प्रत्येक जण आपले स्वप्न प्रत्यक्षात आणू शकतो, हा वाॅल्ट डिस्ने यांचा दृष्टिकोन आपण पाहिला. आता याच दृष्टिकोनातून सप्तरंगी स्वप्न पाहणारे दक्षिण आफ्रिकेचे द्रष्टे नेते नेल्सन मंडेला यांनी नेतृत्वाला द्रष्टेपणा ची साथ, क्षमाशील वृत्ती, ध्येय गाठणारा मार्ग, दृष्टी व दृष्टिकोन यांची गल्लत नको असे सांगून प्रभावीपणे आणि मनापासून आपल्या स्वप्नाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे असे सांगितले आहे. एखादी गोष्ट पूर्णत्वास येईल पर्यंत ती अशक्य वाटत असते. अनेकदा अशी वेळ येते की नेत्याला जनसमुदायापासून दूर नव्या दिशेला मार्गक्रमण करावं लागतं आणि तो लोकांना योग्य मार्गाने नेत आहे याचा त्याला आत्मविश्वास असावा लागतो असेही प्रतिपादन मंडाले यांनी दृष्टिकोन संदर्भात केले आहे.
‘जगाला वाकवायचे ‘असे ध्येय असलेला स्टीव्ह जॉब्ज हा एक थोर द्रष्टा नेता होता. त्याने एका कंपनीची स्थापना करुन अनेक अडचणींवर मात करून यशस्वी केली आणि इतिहास घडविला. त्याचे शोध आणि त्याची स्वप्ने यामुळे आज आपण विविध प्रकारे कम्प्युटरचा उपयोग तर करत आहोतच, याशिवाय फोन वरील संभाषण, फोटो काढणे, संगीत ऐकणे, पुस्तकं वाचणे, सिनेमा बघणे आणि कित्येक गोष्टी सहजसाध्य होण्यामागे स्टीव्ह जॉब्जचे योगदान आहे. त्याने इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले नाही. इंडस्ट्रीअल डिझाईन, मॅनेजमेंट, बिझनेस एडमिनीस्ट्रेशन यासंबंधीचे कोर्सेस घेतले नाही तरी तो विसाव्या- एकविसाव्या शतकातल्या अशक्यप्राय कल्पना उराशी बाळगणारा नेता ठरला. त्याच्या दृष्टिकोनातून तुमचे स्वप्न साकार होण्यासाठी, अपयश पचवायला शिका, अशक्यप्राय कल्पना साकार करण्यासाठी लक्ष केंद्रित करून इतरांकडे न बघता तुमच्या अंतर्मनात बघा. तुमची कृती सर्वोत्तम ठरते तेंव्हा तुम्ही काहीतरी अत्युत्तम गोष्ट करण्याच्या मागे लागा. एकातच जास्त वेळ गुंतून न पडता नेहमी पुढचा विचार करा” असे आवर्जून सांगितले आहे.
नेत्तृत्वाच्या दुसरा पैलूत ‘संभाषण कौशल्य’ हा महत्त्वाचा घटक आहे. २०१३ मध्ये ‘The Independent’ या ब्रिटिश दैनिकाने ‘गेल्या ५० वर्षातील सर्वात प्रभावी व्यक्ती कोण’ ? या विषयावर मतदान घेतले होते. त्यावर पहिल्या क्रमांकाचे नेते होते सर विन्स्टन चर्चिल, दुसरे होते डॉ मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) व तिसऱ्या क्रमांकावर होते जाॅन केनेडी! दुस-या महायुद्धाचे वेळी चर्चिलने दिलेली झंझावती भाषणे ब्रिटीशांना प्रेरणादायी ठरली. त्यांच्या संभाषण कौशल्याचे वैशिष्ट्य ‘सुसंवाद’ हे आहे. चर्चिलने कोणतीही वाईट गोष्ट सुध्दा आशावादी पध्दतीने लोकांपुढे मांडली. वाईट बातमी ही आपल्याला प्रेरणेची संधी देणारी असते असे सांगून ‘अंतिम विजय’ आपलाच आहे हे सांगत राहिले. आपल्या विधानाचा पुन:रुच्चार करा, नेहमी आशा निर्माण करा, संवाद साधा, थट्टेखोर, विनोदी बोला. अल्पाक्षरी व्हा. कारण भरमसाठ शब्द अर्थशून्य असतात. आपलं बोलणं प्रभावी करण्यासाठी दृश्यात्मकता आणली म्हणजे साहाय्य होते. त्यासाठी चिन्ह, चित्र, पाॅवरपाॅईंट आणि इतर माध्यमांचा वापर केल्याने तुम्ही श्रोत्यांच्या केवळ कानापर्यंत नव्हे तर डोळ्यांपर्यंत पोचू शकता. चर्चिलने दोन बोटांनी “V For Victory” हे चिन्ह वापरल्यावर जगप्रसिद्ध ते प्रसिद्ध झाले. चर्चिल यांचा एक संदेश त्यांच्याच शब्दात- “पुरुषांच्या अनेक गुणांपैकी ‘वक्तृत्वशैली’ महत्वाची आहे. एखाद्या राजाप्रमाणे सत्ता टिकवून ठेवायची असेल तर त्याला वक्तृत्वाचे शस्त्र परजून ठेवायला हवे. मग तो एक स्वतंत्र बलशाली व्यक्ती होईल”.
नेतृत्वाच्या ‘संभाषण कौशल्य’ या पैलूत डॉ.मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांचे विचार महत्वपूर्ण आहेत. डॉ किंग हे उच्च विद्याविभुषित आणि बुध्दिमान असे नेते होते. साहित्यप्रेमी, उत्तम कल्पनांचे जनक होते. आपले विचार मात्र ते नेहमीच सरळ, साध्या भाषेत आणि नम्रपणे मांडत. अलंकारिक भाषा वापरत नसतं उत्तम नेता हा नेहमी प्रभावी आणि मनापासून बोलणारा असतो. संवाद साधणे हे नेत्यांचे वैशिष्ट्य असते. त्यासाठी त्यांनी पुढील मार्ग सांगितले आहेत. नम्रपणे बोलून आपले विचार मांडणे, भाषण लिहिलेला कागद दूर करून बोलावे, कल्पना, माहिती याबरोबरच श्रोत्यांची आवडसुध्दा महत्वपूर्ण असते, अधिकारवाणीने बोला, वाईट गोष्टींचे आशावादी विचारात परिवर्तन करा, संवाद साधा, श्रोत्यांची नस ओळखा, भाषणाचा शेवट प्रभावी हवा. पण तुमच्या मनात प्रेमभावना असू द्या असे उपयुक्त मार्ग सांगितले आहेत.
अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष रोनाल्ड रेगन हे उत्तम जनसंपर्क साधणारे महान संवादक नेते होते. त्यांच्यापासून या बाबी शिकण्यासारख्या आहेत. प्रेरणा देणे, मन वळविणे, नवीन ज्ञान देणे या गोष्टी साधण्यासाठी लोकांबरोबर जनसंपर्क आणि संवाद साधणे महत्वाचे असते. आशावादी व्यक्ती आत्मविश्वासू असतात त्यामुळे त्या नवनवीन आव्हाने स्वीकारतात असे सांगून रेगन यांनी अफलातून कल्पना दृश्य स्वरूपात मांडा, नेहेमी सत्य बोला, कथाकार व्हा, अंत:प्रेरणा आणि श्रध्देने विश्वास ठेवा असे मार्ग सुचविले आहेत. विस्तारभयापोटी मी येथेच विराम घेतो. पुढच्या भागात आपण लोककौशल्य, चारित्र्य, क्षमता, धैर्य आणि सेवाभावाबद्ल ग्रेट लीडर्स यांनी नेत्तृत्वाचे जे मौल्यवान धडे दिले आहेत त्यांचा परामर्ष घेऊ या. आपणास जर उत्तम लीडर बनायचं असेल तर या पुस्तकाचा एक प्रॅक्टिकल मार्गदर्शक म्हणून निश्चितच उपयोग होईल याची मला खात्री आहे.
क्रमशः
— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक. नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800