Wednesday, February 11, 2026
Homeसाहित्यमुंबई : अनोखे बाल संमेलन !

मुंबई : अनोखे बाल संमेलन !

गेल्या पन्नास वर्षांत मी अनेक लहानमोठ्या मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहिलो आहे. मात्र नुकतेच एका आगळ्यावेगळ्या साहित्य संमेलनाला खास पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले.

मुंबईतील खार भागातील अनुयोग शिक्षण मंडळाच्या शाळा- ज्युनिअर कॉलेजतर्फे आयोजित केलेले हे त्यांचे २६ वे बाल-कुमार साहित्य संमेलन. विद्यार्थी वर्गाची उत्साहपूर्ण लक्षणीय उपस्थिती, मोठे पटांगण, त्यांनीच केलेली साधीसुधी पण आकर्षक लक्षवेधी सजावट. विद्यार्थ्यांचीच सर्व कामगिरी, फक्त शिक्षकांचे मार्गदर्शन.

शोभायात्रा, ग्रंथदिंडी, ढोलताशा वादक, स्वयंसेवक, निवेदक, मुलाखत घेणारे, कथाकथन करणारे, कवी संमेलनात सहभागी कवी. सबकुछ शालेय विद्यार्थीच.

अधिक विशेष म्हणजे बाल साहित्य संमेलनाचा अध्यक्ष सुध्दा नववीतला चि. आयुष परब तर संमेलन स्वागताध्यक्ष दहावीच्या वर्गातील कु नेहा सावंत. व्यासपीठावर फक्त हे दोघे व मान्यवर उदघाटक प्रसाद कुलकर्णी बसss. ही आयोजकांची पुर्वापार रीत.

शाळेचे संस्थापक-संचालक प्रा. सतिशचंद्र चिंदरकर (वय ८४) मुख्याध्यापक, शिक्षक, मान्यवर मंडळी सर्व एकजात श्रोत्यांमध्ये. थोडक्यात विद्यार्थ्यांचे, विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठीचे आयोजित केलेल असे हे अनोखे साहित्य संमेलन झाले. लहान वयापासून वाचनाची आवड निर्माण व्हावी व लेखन प्रेरणा मिळावी, लहान वयात वक्तृत्वासह स्टेज काॅन्फिडन्स यावा, हा मुळ हेतू. विद्यार्थी वर्गाचा व्यासपीठावरील वावर, धीटपणा, वक्तृत्वगुण सर्वच भारी होते. गडबड नाही, गोंधळ नाही.

विद्यार्थ्यांनीच मोठ्या फळ्यांंवर रंगीत खडूने इतक्या नीटनेटक्या सुंदर अक्षरात लिहीले होते व सजावट केली होती की ते वर्णन करायला मला “अप्रतिम” पेक्षा जास्त चांगला शब्द शोधावा लागेल. या साठी या सर्व मुलांचे कौतुक केलेच पाहिजे.

स्नेहीवर्य उद्घाटक प्रसाद कुलकर्णी यांचे रंजक भाषण, मार्गदर्शन व विद्यार्थ्यांशी गप्पागोष्टी करत साध्या सोप्या भाषेतील प्रबोधनात्मक भाषण यामुळे संमेलनाची उंची वाढली. त्याचे भाषण म्हणजे एक काव्यच होते. मुले खूष. सर्वच खूष.

या आधी गेल्या सव्वीस वर्षात या संमेलनाला जेष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी, साहित्यिक सुभाष भेंडे, संपादक माधव गडकरी, लेखिका डॉ विजया वाड, पानिपतकार विश्‍वास पाटील, साहित्यिक डॉ सदानंद मोरे, कुलगुरू डॉ भालचंद्र मुणगेकर आदी अनेक मान्यवर आले होते. या वरून या साहित्य संमेलनाचे महत्त्व कळते.

आयोजकांनी माझा पण यथोचित गौरव केला. या बालगोपाळांत माझा दिवस सार्थकी लागला.

— लेखन : रवींद्र माहिमकर. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments