अर्ध्या रात्रीही करमत नाही.
धो धो पावसाच्या खुणा रात्री बाळगत सकाळ उमलत जाते।
मग धुक़्याची चादर गच्च पसरते सकाळच्या देहभर, आंधारउजेडाची आंदोलन सुरु होतात।
दूर नदीवर लाटांचे धुमारे फूटत जातात।त्याची आवरतनं मनावर चढ़त जातात.
केव्हा तरी मग स्वच्छ उन पसरतं, मांजराने अंग झटकून आळस देवून बागड़ावे तसे मन फुलारते.
झाडांच्या देही ओठी पावसाची तृप्ती भरून उरते।
वा-यासोबत फुलांचा गंध ही हलकेच रुंजी घालतो।
आणि मग सकाळ अधिकच प्रसन्न होते।
कोवळी उन्हाची पालवी, सोबत उमललेला एकांत, आणि दाट दुधाचा आलं घातलेला चहा।
दूर नदीच्या काठी असलेल्या शंकराच्या मंदीरातील आरतीचे मंद स्वर मनावर एक सुखाचा तवंग चढ़वत जातो।
अनवट रागाची किनार देहभर पसरत जाते।
उन जाणते होत जाते। कामालाही मग वेग येतो।
पुन्हा चहा, नास्ता, जेवण।
कामाचे ढिग रचत जातात।
उन मलूल होत जातं। आता हिवाळयात जरा गारठा जरा लवकर जांणवतो।
संध्येच्या कातर खुणा देवाजवळ सांजवात लावताच लुप्त होतात।
मग दिव्याच्या तेवत्या प्रकाशात धूप उदबत्ती मंद सुगंध, मनावर फेर धरतो।
रामरक्षेचे कवच मनावर चढ़ते।
रात्र आपला पड़दा धरते।
शरीर आणि मन थकुन गेले असते।
निद्रा देविला आवाहन सुरु असते आणि अचानक पाऊस सुरु होतो. वीज आणि पावसाचे नृत्य सुरु होते।
झोप येता येता मन पावसात अडकते। दूरदेशी असलेल्या सख्याची याद मनभर पसरते।
नकळत किशोरीच्या आर्त स्वरांत “बाबुल मोरा, सुरु होते।
धुन देहभर चढ़त जाते।रात्र आणि पाऊस वाढत जातो।
याद पियाकी आये किंवा अर्ध्या रातीही करमत नाही।अशी अवस्था होते। डोळ्याना धार लागते। आर्त बाबुल मोरा किशोरीचे स्वर मनात खोल खोल रुतत जातात।
रजईच्या खोल ऊबेत मग कधीतरी डोळा लागतो।स्वप्नाची सुंदर माळ उलगड़ते।दूर गेलेला सखा परततो। मळभ सरत।
पुन्हा सुंदर सकाळ उमलते।
मी रांगोळीची नक्षी रेखाटत असताना दारी सख्याची पावलं वाजतात। आणि मंद सुखाची धुन मनी आलाप घेते…..।

– लेखन : अनुपमा मुंजे. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800