आपल्या पिढीने नाटक, चित्रपट, एकपात्री या सर्वांचा आस्वाद घेऊन सुंदर अशा करमणूक जगाचा आनंद घेतलेला आहे. पण पुढची पिढी घेईल का ? त्यासाठी कलाकारही तयार झाले पाहिजेत आणि रसिकही ! नैसर्गिकपणे कलाकार किंवा लेखक हे जगात तयार होत असतातच. पण पुष्कळदा त्या उर्मी अभ्यासाच्या किंवा ठराविक दिशेने करिअर करण्यासाठी दडपल्या जातात. पुष्कळांना आपल्यातील गुण हे अर्धे आयुष्य गेल्यावर कळतात. तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे मुलांमधील सुप्त गुण लहानपणीच ओळखता आले तर बरं होईल.
गेली काही वर्षे मी आणि माझे पती हेमंत साने शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम बसवणे, त्यांच्या गाण्यांच्या, कवितेच्या सीडी काढणे, युट्युबसाठी त्यांचे शूटिंग करणे असे उपक्रम राबवत होतो. त्यावरूनच एक कल्पना सुचली. मुलांचे सुप्त गुण ओळखण्याची कार्यशाळा घेऊया. ‘अखिल भारतीय नाट्य परिषदे’च्या मीटिंगमध्ये मी तसे निवेदन दिले आणि सुप्रसिद्ध निवेदक तसेच नाट्य परिषद ठाणे शाखेचे उपाध्यक्ष नरेंद्र बेडेकर यांनी ते मान्यही केले. दोनच दिवसात आम्हाला ऑफिसला बोलावून कार्यशाळेची संकल्पना नाट्य परिषदेच्या नरेंद्र बेडेकर यांनी समजावून घेतली. त्यावेळी आशाताई जोशी, ज्योती टिपणीस, पाटील मॅडम यांच्यासोबत बसून चर्चा केली. बेडेकरांनी लगेचच एक रंगीत पत्रक तयार केले आणि ते सोशल मीडियावर प्रसारित केले. शनि. पाच, रवि. सहा, शनी. बारा आणि पंधरा या ऑगस्ट २०२३ मधील तारखा ठरल्या. आम्ही चारच दिवसात मुलांचा कार्यक्रम बसवू आणि पालकांसमोर सादर करूअसा विश्वास मी त्यांना दिला. शनिवारी मुलांच्या अर्धा दिवस शाळा असल्याने कार्यशाळा दुपारी ३ ते ५ या वेळेत घ्यावी लागणार होती.
‘अखिल भारतीय नाट्य परिषदे’ने केलेले पत्रक फेसबुक वर टाकल्याबरोबर केवळ तीन दिवसाच्या आत ३०-३५ मुलांचे प्रवेश आले. प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्यातील सुप्त गुण ओळखायचे म्हणजे जास्त मुलांना प्रवेश देता येणार नव्हता. काही पालक नाराज झाले. पण पुढे दिवाळीच्या सुट्टीत प्रवेश देऊ असे सांगितले तेव्हा त्यांनी आनंदाने मान्य केले. प्रत्यक्ष कार्यशाळेत चार दिवस ३५ मुलांपैकी २९ मुले आली. काही तब्येत बरी नाही म्हणून तर काही, पालकांच्या अडचणीमुळे आली नाहीत. मात्र चार दिवसांचे ट्रेनिंग घेऊन १५ ऑगस्ट रोजी सादर झालेल्या कार्यक्रमात २९ मुले सहभागी झाली आणि पालकसुद्धा लॉन्ग विकेंड म्हणून कोठेही फिरायला न जाता कार्यक्रमाला उपस्थित होते. आपल्या मुलाच्या कानावर काहीतरी साहित्य पडले आणि त्याला सादरीकरण करण्याची आवड निर्माण झाली याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
कार्यशाळेच्या आधी आठ दिवस आम्ही व्हाट्सअप ग्रुप सुरू केला. अर्थात मुलांकडे मोबाईल नव्हते. त्यांच्या पालकांकडेच होते. पण ग्रुप वर गाणे टाकणे म्हणजे गाण्याचे शब्द आणि त्याचे स्टुडिओ रेकॉर्डिंग टाकायला सुरुवात केली. ही गाणी आम्ही मुलांसाठी खास तयार केली होती. “आली परीक्षा, आली परीक्षा, अभ्यास करायची सर्वांना शिक्षा” हे गीत अभिनयातून शिकवायचे होते. तर “हिरव्या हिरव्या माडात” हे गीत अर्थासह समजून द्यायचे होते.
कार्यशाळेत तिसरी ते सहावीची मुले असल्याने आम्हाला त्यांच्या मजेशीर आणि विविध प्रश्नांना उत्तरे द्यावी लागली. एका मुलीने ‘माड’ म्हणजे काय ? हे विचारले तर एकाने ‘खेडे’ म्हणजे काय ? हे विचारले. एका कवितेत ‘भुई’ हा शब्द कवीने बसवला होता. तर तो त्यांनी कधीच ऐकला नव्हता. बहुतेक मुले, मुली ही इंग्रजी माध्यमातली होती. पण सर्वांना साहित्याची जाण मात्र उत्तम होती.

हेमंत साने यांनी पाच तारखेला शनिवारी कराओकेवर ‘हासरा नाचरा जरासा लाजरा’ हे कुसुमाग्रजांचे गीत मुलांसाठी वेगळ्या चालीत तयार केले होते. ते शिकवायला सुरुवात केली. कीबोर्डवर प्रथम प्रत्येकाला जवळ बोलावून सूर लावून घेतला. साधारण तासाभरात मुले कराओकेवर बऱ्यापैकी सुरात आणि तालात गाऊ लागली. मुलांचे हे सुप्त गुण बाहेर आलेले पाहून पालक खुष झाले.
दुसऱ्या दिवशी कार्यशाळेत मुलांना पोचवायला आल्यावर बाहेर गाणी ऐकत थांबले. तोवर दोन-तीन गाणी शिकवून झाली होती.
मुलांचे थोडे वाचन घेतले आणि प्रत्येकाच्या आवाजाचा पोत कसा आहे ते पाहिले. काहींना विनोद सांगा तर काही ना कथा सांगा म्हटल्यानंतर उत्साहाने मुले पुढे येऊन जे त्यांना माहीत होते ते सांगू लागली. त्यात हर्षिता बिडवाईचे बोलणे निवेदनासाठी छान वाटले. आदित्य चकोलेचा स्वर कथाकथनासाठी योग्य होता.

काही मुले कविता छान सादर करत होती तर काहींना नाटकासाठी लागणारा स्टेज व्हॉइस होता. प्रयत्न करूनही काहींचा आवाजच निघत नव्हता. ही मुले दडपणाखाली असावीत किंवा त्यांचा आवाज लहान असावा.
शनिवार, रविवार पाच आणि सहा तारखेला तालीम घेऊन आम्ही नाट्यप्रवेश बसवणार होतो. पण पाच तारखेला उपस्थित असलेली आणि कार्यक्रमासाठी निवडलेली काही मुले सहा तारखेला अनुपस्थित होती.
ठाण्यात डोळ्याची साथ आली होती. तशीच तापाचीही साथ आली होती. आई वडिलांचे निरोप आले. आम्ही त्यांना धीर दिला. बरे झाले की पुढच्या सत्रात पाठवा. त्या मुलांऐवजी दुसरी मुले उभी करून तालीम सुरू ठेवली.
कार्यशाळेचे पुढील सत्र आठ दिवसांनी सुरू होणार होते. तोवर मुले बरी होतील असा विश्वास होताच. तसेच झाले. बारा तारखेच्या वर्गाला मुले बरी होऊन आली. आणि कार्यक्रम करण्यासाठी उत्साही असलेली दिसली. ‘अज्जात मज्जात पिंटूच्या राज्यात’ या नाटकात आम्ही सर्वच मुलांना घेतले. ज्योती टिपणीस नावाच्या एक उत्तम शिक्षिका दिग्दर्शन करायला सहाय्यक म्हणून आल्या आणि त्यांनी जबाबदारी घेतली. प्रवेश मस्त बसवला.
अधून मधून मी कथाकथन आणि एकपात्री याची तालीम घेत होते. सनिश परब हा मुख्य भूमिका करत होता. छोटी भूमिका असूनही विधीका देसले उत्तम काम करत होती. तिसरी आणि पाचवीच्या मुलांना दिग्दर्शन उत्तम समजत होते.
तीस मुलांमध्ये कार्तिका देसले ही एकटीच मुलगी मला एकपात्री करण्यासाठी योग्य वाटली. तिचा छानपैकी कार्यक्रम बसवला. तिच्या घरच्यांनीही मेहनत घेतली.
मुलांसाठी काही खास विषय निवडून ‘मुलांसाठी एकपात्री’ हे पुस्तक मी कार्यशाळेसाठी लिहीले होते. कवि अरुण म्हात्रे यांनी या पुस्तकाच्या शंभर प्रति प्रकाशित करून शिबिराच्या वेळेवर माझ्याकडे आणून दिल्या.
कार्यशाळेच्या चारही दिवसात अनेक पाहुणे येऊन गेले. मुलांशी हितगुज करून गेले. ‘गप्पागोष्टी’कार जयंत ओक, कवयित्री प्रतिभा सराफ, लेखिका आणि प्रकाशिका ज्योती कपिले असे काही पाहुणे येऊन मुलांना गोष्टी सांगणे, कविता वाचून दाखवणे असे सादरीकरण करून गेले.
ज्योतीने घातलेली शब्दांची साहित्यिक कोडी मुलांना फारच आवडली. कार्यशाळा संपल्यावर प्रतिभा आणि ज्योती यांच्याकडून बाल साहित्याची पुस्तके विकत घ्यायला मुले आणि पालक आवर्जून थांबले होते. मुलांना साहित्याची आवड निर्माण व्हावी हेच तर आम्हाला हवे होते.
१५ ऑगस्टला आम्हाला संपूर्ण कार्यक्रमाचे सादरीकरण पालकांसमोर करायचे होते. ज्यांचे कथाकथन, एकपात्री सारखे वैयक्तिक परफॉर्मन्स होते त्यांना माझ्या घरी बोलावून एक तालीम दिली. हर्षिका आणि दिव्या यांचा एक सुंदर संवाद मी बसवला होता. दिव्या आजारी असल्याने एक दिवस कार्यशाळेत येऊ शकली नव्हती. म्हणून परत दोघींना घरी बोलावून तालीम घेतली.
१५ ऑगस्टला सकाळच्या सत्रात संपूर्ण कार्यक्रमाची सलग तालीम झाली. यावेळी निवेदिका हर्षिता बिडवईही व्यवस्थित निवेदन करत होती. तिने घरी चांगली तालीम केलेली दिसली. ही बारा वर्षाची मुलगी अत्यंत आत्मविश्वासाने आणि समजून उमजून निवेदन करत होती. नाटकाच्या प्रवेशाचीही सलग तालीम झाली. मुले आता अधिकच रंगात आली होती. दुपारी तीन वाजता सर्वांना रिफ्रेशमेंट मिळाली. त्यानंतर आई-बाबा कार्यक्रमासाठी सभागृहात येऊ लागले. कोणी कोणी मुलांना तयार करायला कपडेही आणले होते. व्यासपीठाच्या बाजूच्या खोलीत मुले तयार होऊ लागली. आता मात्र मुलांना कुठलीही सूचना न देता आम्ही व्यासपीठावर सोडून देणार होतो.
बरोबर साडेचार वाजता कार्यक्रम सुरू झाला. सुप्रसिद्ध बालनाट्य लेखक व दिग्दर्शक राजू तुलालवार हे कार्यक्रम पाहायला अध्यक्ष म्हणून आले होते. त्यांच्याबरोबरच आम्ही पहिल्या रांगेत बसून कार्यक्रम पाहणार होतो.
हर्षिकाने निवेदन सुरू केले आणि एका पाठोपाठ एक मुले येऊन सादरीकरण करू लागली.
हेमंत साने यांच्याबरोबर मुलांनी गाणी सादर केली. कराओके ट्रॅकवर सर्व मुले उत्तम गायली. पालकांना आश्चर्य वाटले की मुलांना एवढा रिदम कसा समजतो आहे ? पण ही सगळी जादूच होती. मुलांनी पहिल्या दिवशीपासून गाणे पिकअप केले होते. एक नाही, दोन नाही, तर चक्क तीन गाणी सादर झाली. हिरव्या हिरव्या माडात या मी लिहीलेल्या गाण्यावर मुली स्वतःहूनच नाचू लागल्या. उस्फुर्त आविष्कारामुळे वेगळीच रंगत आली. कार्तिका देसलेने, ‘आला ज्योतिषी पहा’ या एकपात्रीचे सादरीकरण केले. तर आदित्यने रामायणातली ‘घामाची फुले’ ही कथा कथन केली. ही कथा मी त्याला केवळ आदल्या दिवशी शिकवली होती. पण ती त्याने संपूर्ण नीटपणे त्याने सादर केली. (मी आदित्यच्या आईशी बोलले तेव्हा मला कळले की हा वर्गातही पहिला येतो!) हे तर मोठ्या मोठ्या लोकांनाही जमत नाही.

कथाकथन करणारे महाराष्ट्रात किती लोक सापडतात ? अगदी मूठभर! हर्षिका केळकर आणि दिव्या महाजन यांनीही दोनच दिवसांच्या तालमीत मारिया आणि ब्रोन्न्या यांचा संवाद छान सादर केला. हर्षिता बिडवईच्या निवेदनाचेही कौतुक होत होते. विहान जाधव आणि अथेना मिरसेराजी यांनी प्रतिभा भिडे यांच्या कविता सादर केल्या. प्रतिभा भिडे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. आपल्या कवितांचे इतक्या लहान मुलांनी केलेले उत्तम सादरीकरण पाहून त्यांना खूप आनंद झाला.
‘अज्जात मज्जात पिंटूच्या राज्यात’ या मी लिहिलेल्या नाटकातील प्रवेशात कार्तिकी, सनिश, विधीका सर्वांनी डायलॉगला टाळ्या घेतल्या. पालक हसत खेळत एन्जॉय करत होते. कारण तसाच विनोदी प्रवेश होता.
समारोपाच्या समारंभात मला व हेमंत साने कार्यशाळेचे शिक्षक म्हणून व्यासपीठावर बोलावले गेले. उपाध्यक्ष नरेंद्र बेडेकर यांनी कार्यशाळेची संकल्पना समजावून सांगितली. नाट्य परिषदेचे इतर उपक्रमही सांगितले. राजू तुलालवार यांनी कार्यशाळेतील सर्वच मुलांच्या सादरी करणाबद्दल समाधान व्यक्त केले. नृत्य नाट्य या कलांचा समावेश शासनाने अभ्यासक्रमातही केला आहे अशी माहिती त्यांनी दिली.
रश्मी केळकर या पालकांमधून पुढे आल्या. कार्यशाळेच्या पालकांचा अनुभव सांगू लागल्या. “इतक्या कमी वेळात लहान मुलांमधील सुप्त गुण ओळखून त्याचे सादरीकरण बसवले ही खरोखरच आश्चर्यकारक गोष्ट आहे. कार्यशाळेत सादरीकरणात नवीन विषय घेतले होते. स्वीडनची ग्रेटा काय म्हणते ? ‘मारी क्यूरीने शिक्षण कसे घेतले’ या विषयांना स्पर्श केल्यामुळे मुलांना माहिती खूप मिळाली. अशी शिबिरे, कार्यशाळा नेहमी व्हाव्यात.” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
या समारोपाच्या समारंभात मी मुलांसाठी लिहीलेल्या ‘मुलांसाठी एकपात्री’ या पुस्तकाचे प्रकाशन राजू तुलालवार यांच्या हस्ते झाले आणि मग मुलांच्या पालकांनी हे पुस्तक घ्यायला गर्दी केली.
ही कार्यशाळा विनामूल्य होती. नाट्य परिषद, ठाणे शाखेने शिबिरासाठी दिवसभर हॉल आणि माईक उपलब्ध करून दिले होते. त्यांचे कार्यकर्ते दिवसभर शिबिरात मुलांची काळजी घेण्यासाठी उपस्थित असायचे. कार्यकर्ते आणि पालकांच्या सहकार्यामुळे ही कार्यशाळा यशस्वी झाली असे मी आम्ही मानतो.
नाट्य परिषदेने एक मेमेंटो देऊन माझा आणि हेमंत साने यांचा सत्कार केला. ‘कोणतेही मानधन न घेता ही कार्यशाळा घेऊ’ असे स्वतःहून सांगितल्याबद्दल नरेंद्र बेडेकर यांनी आमचे कौतुक केले. मुलांसोबत कलेच्या निर्मितीत घालवलेल्या या चार दिवसांचा आनंद आम्हाला कित्येक महिने पुरणार होता.

— लेखन : मेघना साने
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
साने दाम्पत्यांनी कमी वेळात खूप चांगली कार्यशाळा घेतली मनापासून धन्यवाद
खुप छान उपक्रम होता. साने सर व मॅडम चे शतशः आभार.
माझा मुलगा सनिष याचा संवाद कौशल्य व सादरीकरणाचा आत्मविश्वास वाढला याअभिनव कार्यशाळेमुळे.
बर्याच ठिकाणी तो पिंगपाॉंग म्हणून प्रसिद्ध झाला आहे.
धन्यवाद.
मी मेघना आणि हेमंत यांना प्रत्यक्ष कार्यशाळा घेताना पाहिले. ते इतके समरसून सगळं करत होते की जणू त्यांच्यासारखेच ते एक लहान मूल आहेत. त्यामुळे मुलांनी खूप एन्जॉय केले. मुलांना अशा कार्यशाळेतून खूप काही शिकायला मिळाले. लहान मुलांसाठी अशा तऱ्हेने वेळ देणारी माणसे कमी यासाठी ते दोघे आणि ज्यांनी ही कार्यशाळा घेतली तर सर्वांचे खूप कौतुक.
प्रतिभा सराफ
खरंच अभिनव कार्यशाळा होती.
करील मनोरंजन जो, मुलांचे जडेल नाते प्रभु शी तयाचे असे साने गुरुजींनी म्हटलेच होते.
ते या साने दाम्पत्याने खरे करून दाखवले असे म्हटले तर ते गैर होणार नाही.
कार्यशाळेत मुलांना छान मार्गदर्शन मिळाले,
गुरू जनांना मनापासून धन्यवाद 💐💐