सुमारे चार दशकांपूर्वी भारतावर आलेले मोठे संकट दूर होत आल्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. काँग्रेस गवत किंवा गाजर गवत, अशा नावाने आलेलं हे संकट दूर करण्यासाठी उपयोगी ठरतो आहे, एक सहा मिमी लांबीचा क्षुद्र आणि निरुपद्रवी वाटणारा मूळचा
मेक्सिकोचा भुंगा.
आपल्यावर मोठे उपकार करणाऱ्या या कीटकांची माहिती करून घेण्यापूर्वी हे काँग्रेस गवत आणि त्याच्यामुळे आलेले संकट या विषयी जाणून घेऊ या.
या तणाचे वनस्पती शास्त्रीय लॅटिन नाव पार्थेनियम हिस्टेरिफोरस असे आहे. काँग्रेस गवतामुळे गुरांच्या दुधाला कडवट चव येत असे. माणसाच्या छातीपर्यंत वाढणारे हे गवत चवीने फारच कडवट असते.
लहान बालकांना अशा दुधाच्या सेवनामुळे इतर आजार होण्याची धास्ती होती. या तणाचा देशातल्या शेतीला देखील मोठा धोका निर्माण झाला. सुमारे साडे तीन कोटी हेक्टर क्षेत्रावर या गवताने आक्रमण केल्याने त्यावरची पिके नष्ट होऊ लागली होती.
या गवताला काँग्रेस गवत म्हणण्याचे कारण म्हणजे गावाकडचे कार्यकर्ते घालतात तशी दिसणारी पांढरी टोपी वाटेल अशी फुले या गवताला येतात हे एक कारण.
अमेरिकन काँग्रेसने भारतात मदत म्हणून पाठविलेल्या गव्हाबरोबर या गवताच्या बिया आल्या हे दुसरे कारण. हे गवत दिसायला गाजराच्या गवतासारखे दिसते.
भारतात आणि भारताबाहेर इंग्रजी वर्तमानपत्रानी तर या गवताला भयकारक नावं दिली होती. “भारतावर
आलेलं अरिष्ट” हे त्यातलं एक नाव.
वर्ष १९८४ मध्ये हॉलिवूडचा ‘टर्मिनेटर’ या नावाचा चित्रपट जगभर गाजला होता. मानव वंशाचा संहार करू पाहणाऱ्यांचा निप्पात करणाऱ्या नायकाची
ही कथा होती. विज्ञान कल्पित असं स्वरूप असलेल्या या चित्रपटाचे नंतर आतापर्यंत सहा सिक्वील भाग निघाले. टीव्ही आणि आता वेब सिरीअल सुरु आहेत. गेली छत्तीस वर्षे, या टर्मिनेटर शब्दाने दहशत निर्माण केली.
गाजर गवत खेरीज वेगवेगळ्या भागात या तणाला वेगवेगळी नावं पडली होती. त्यातील एक होत चटकचांदणी ! काँग्रेस गवत किंवा गाजर गवतामुळे देश हताश झाला होता. सत्तरच्या दशकात बेजार करून टाकणारा, चेहरा – मान भेसूर करणारा, त्वचा रोग आणि दमा अशा विकारांनी त्रस्त झालेले रुग्ण देशात मोठ्या संख्येनं आढळण्याला कारणीभूत असलेले हे गवत होते.
हे तण म्हणजे शेतकऱ्यांना फारच तापदायक आहे.
लव्हाळयानंतर गाजर गवताचा त्रासदायक तणांमध्ये क्रमांक लागेल. गाजर गवत भर उन्हाळ्यात धोतऱ्याबरोबर (कणगुली) जिवंत रहाते. याच्या पांंढऱ्या बिया वाऱ्याबरोबर आजूबाजूला पसरतात. मुंग्यासुद्धा या बिया इकडेतिकडे पसरवतात.
या कुप्रसिद्ध तणाचा नायनाट करण्यासाठी मोठमोठ्या मोहीमा हाती घेतल्या जात होत्या. भारतात कृषी तज्ञ, वनस्पती शास्त्रज्ञ, त्वचारोग तज्ञ, अशा अनेकांनी आघाडी उभारली. भारतात आणि देशाबाहेरही स्वतंत्रपणे प्रयत्न सुरु झाले.
या मंथनातून भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि तण संशोधन निदेशालाय यांनी मेक्सिको मधील, झायागींग्राम बायकोलाराटा या भुंग्यावर लक्ष केंद्रित केले. मेक्सिको मधून आयात केलेल्या गव्हाबरोबर गाजर गवताचे पार्थेनियम हिस्टेरोफोरसचे बी भारतात आले. या प्रदेशात हे तण खाऊनच हा भुंगा जगतो आणि हे गवत नष्ट होते हे लक्षात आल्याने या भुंग्यांची तेथून आयात करून हा प्रयोग भारतात सुरु झाला.
केंद्र शासनाच्या ऑल इंडिया को-ऑर्डिनटेड रीसर्च प्रोग्रॅमच्या माध्यमातून हा प्रयोग सुरु झाला. हळूहळू यश मिळत गेले तशी प्रयोगाची व्याप्ती वाढत गेली. कृषी विकास केंद्रांच्या माध्यमातून सुमारे सोळा लक्ष झायगोग्रामा बायकोलेरटा भुंगे देशभरात विनामूल्य सोडले. त्यांनी खाऊन टाकायला सुरवात केली त्यामुळे गाजर गवत हळू हळू अदृश्य होऊ लागले. परंतु केवळ या भुंग्यावर विसंबून न राहता आधी सुरु केलेल्या एकात्मिक कार्यक्रमाचा उपयोगही जनतेने चालू ठेवावा असे धोरण सध्या आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामतीच्या कृषी विकास केंद्राने देखील आपला कार्यक्रम चालू ठेवला आहे. केंद्राचे
प्रमुख डॉ मिलिंद जोशी आणि त्यांचे सहकारी संतोष गोडसे आणि भूषण पगार यांनी सविस्तर लेख लिहुन ऍग्रोवन या मराठी कृषीविषयक दैनिकात मार्गदर्शन केले आहे. मुळापासून उपटून टाकणे, मीठाचं द्रावण फवारणे, या तणाचे सेंद्रिय खत करणे, नैसर्गिक खत करणे, रासायनिक तणनाशके फवारणे, आणि झायागींग्राम बायकोलाराटा भुंगे सोडणे अशा
विविध प्रकाराने गाजर गवताचे निर्मूलन होऊ शकते.
पण सर्वात सुरक्षित आणि स्वस्त प्रकार झायागींग्राम बायकोलाराटा भुंगे यांचा वापर करणे हाच आहे असे आतापर्यंतच्या प्रयोगात सिद्ध झाले आहे. गाजर गवताच्या दुष्परिणामांबाबत आणि या तणाच्या निर्मूलनाविषयी जनजागृती करण्याचा कार्यक्रम या केंद्रामार्फत घेतला जातो. त्यासाठी दरवर्षी १६ ते २२ ऑगस्ट अशी जागृती मोहिम आयोजित केली जाते. त्यामध्ये शासकीय, बिगर शासकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्थाचा सहभाग असतो.
एकंदरीतच मेक्सिको मधील झायागींग्राम बायकोलाराटा या भुंग्यामुळे गाजर किंवा काँग्रेस गवत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, ही मोठीच दिलासा देणारी बाब आहे.

– लेखन : डॉ किरण ठाकूर, विश्वकर्मा विद्यापीठ सेंटर ऑफ कम्युनिकेशन फॉर डेव्हलपमेंट.
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800.
किती सुंदर आणि उपयुक्त माहिती मिळाली. खूप धन्यवाद डॉक्टर.
इतके दिवस फक्त काँग्रेस गवत एवढेच माहिती होते…
खूप धन्यवाद..
प्रकाश फासाटे.
मोरोक्को.
नॉर्थ आफ्रिका.