नमस्कार मंडळी.
आपणास २ जुन रोजी कळविल्याप्रमाणे आम्ही काल रात्री आमचा जपान पर्यटन दौरा छान पैकी पार पाडून मुंबईत परतलो.
या दौऱ्यावर आधारित वृत्तांत मी फेसबुक वर शक्यतो दररोज पोस्ट करीत होतो. पण अनेक वाचकांनी कळविले की, आम्हाला हा वृत्तान्त व्हॉट्स ॲपवर पाठविल्यास वाचायला नक्कीच आवडेल. त्याप्रमाणे आज पासून आपल्या पोर्टलवर “मेरा जूता हैं जपानी” ही प्रवास वर्णन पर लेख माला सुरू करीत आहे. आशा आहे की, ही लेखमाला आपल्याला नक्कीच आवडेल. धन्यवाद.
– संपादक
“मेरा जूता हैं जपानी…”
हे हिंदी गीत लहानपणापासून कानावर पडत राहिल्याने आणि पुढे इतिहास विषय शिकताना अमेरिकेने जपान मधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकल्याने आणि नंतर जपान ने झपाट्याने केलेल्या प्रगतीमुळे, जपानी लोकांच्या कष्टाळू वृत्तीमुळे जपान विषयी मला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. म्हणून जपान पहायचे माझ्या मनात खूप वर्षांपासून होते. त्याप्रमाणे आमचे मित्र श्री आनंद शेंडे यांच्याशी बोलणे केले. मागच्याच वर्षी आम्ही, म्हणजे भुजबळ, शेंडे, शिरधनकर परिवाराने एकत्र व्हिएतनाम – कंबोडिया दौरा केला होता. हा दौरा आम्ही नवी मुंबईतील खन्ना ट्रॅव्हल यांच्या मार्फत केला होता. त्यावेळी स्वतः श्री मनोज खन्ना, त्यांची पत्नी सौ मीनाक्षी, मुलगा मोहित हे सहभागी झाले होते. स्वतः मालकच सोबत असल्याने तो दौरा छान झाला होता. त्यावेळेप्रमाणे या ही दौऱ्यात खन्ना पती पत्नी व त्यांचा दुसरा मुलगा शिवम जपान दौऱ्यात सहभागी होणार म्हटल्यावर आम्ही त्यांच्याच बरोबर जायचे नक्की केले. श्री आनंद शेंडे यांनी या दौऱ्यासाठी खुप छान संशोधन केले. ते आणि पीएम उर्फ प्रभाकर शिरधनकर (वय वर्षे अवघे ७८!) यांनी खन्ना यांच्या सोबत अनेक बैठका घेऊन दौऱ्याचे सर्व नियोजन केले.
त्या प्रमाणे आम्हा २२ जणांचा ग्रुप २ जुन रोजी संध्याकाळी ७.३० वाजता मुंबई – टोकियो विमानाने जपान साठी निघाला. नऊ तासाच्या विमान प्रवासानंतर आम्ही टोकियोला पोहोचलो तेव्हा रिमझिम पाऊस पडत होता. हवेत गारवा होता. पुढेही असा पाऊस पडू नये, अन्यथा सर्व दौऱ्यावरच पाणी पडते की काय ? अशी शंका मनाला चाटून गेली. असो…
विमान तळावरून पुढे हॉटेल कडे जाताना सर्वीकडची स्वच्छता, वाहतूक शिस्त लक्ष वेधून घेत होती. तुळतुळीत, खड्डे विरहित रस्ते अनुभवून आपली मुंबई अशी कधी होणार ? हा विचार सारखा मनात येत होता. या मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्यामुळे कमरेला jark बसल्याने, मा.राज्यपाल महोदयांकडे नुकत्याच झालेल्या माझ्या “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकाच्या लोकार्पण कार्यक्रमाला या पुस्तकातील एक कथा नायक, विद्यमान सचिव येऊ शकले नाहीत, त्याचीही नेमकी या वेळी आठवण झाली.
आम्ही उतरलो, ते टोकियो तील हॉटेल रिघा रॉयल म्हणजे जणू एखादा राजवाडा च वाटत होते. फ्रेश होऊन आम्ही, नटराज या भारतीय हॉटेल मध्ये जेवण घेऊन टोकियो दर्शन करायला निघालो.
टोकियो तील “शिबुया चौक” आता एक पर्यटन स्थळ बनले आहे. चार रस्ते मिळणाऱ्या या चौकात चार ही रस्त्यांचे सिग्नल एकदमच पडतात आणि हजारो लोक शिस्तीत रस्ते ओलांडतात हे दृश्य खरोखरच पाहण्यासारखे आहे. पुन्हा अवती भवती असलेल्या गगनचुंबी इमारतींवर केलेल्या नियोन साईन च्या आकर्षक जाहिराती लक्ष वेधून घेत राहतात.
याच चौकात एका एका निष्ठावान कुत्र्याचा ९० वर्षांपूर्वी उभारलेला पुतळा आहे. हा कुत्रा, प्रोफेसर असलेल्या त्याच्या मालकाला रोज रेल्वे स्टेशन वर सोडण्यासाठी येत असे. पुढे तो मालक वारल्यावर हा कुत्रा मरेस्तोवर, १० वर्षे स्टेशन वर येत राहिला. त्याच्या स्मृती प्रित्यर्थ या कुत्र्याचा पुतळा उभारण्यात आला आहे. ८ मार्च, या त्याच्या स्मृती दिनी तर इथे एक प्रकारची यात्रा भरते म्हणून सांगण्यात आले.
याच चौकात असलेल्या शिबूया स्क्रंबल स्केअर या गगनचुंबी इमारतीवर जाऊन (अर्थात तिकीट काढून) हा चौक वरून पाहता येतो. तसा आम्ही तो पाहिला.
इथून पुढे आम्ही निघालो ते टोकियो टॉवर बघायला. जगप्रसिद्ध आयफेल टॉवरच्या धर्तीवर हा टॉवर उभारण्यात आला आहे.
तिथून वेगवेगळ्या तीन मजल्यांवरून आपल्याला सर्व बाजूंनी टोकियो शहर पाहता येते. आम्ही गेलो तेव्हा पाऊस पडत असल्याने सर्व चित्र काही स्पष्ट दिसत नव्हते. पण तरीही इतक्या उंचीवरून टोकियो शहर बघण्याची मजा काही औरच.
तर असा हा आमचा पहिला दिवस छान पार पडला.
क्रमशः
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान चित्रदर्शी वर्णन..
धन्यवाद.
महायुद्धात बेचिराख झालेल्या जपानने खडतर कष्टाने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली.
म्हणून त्या देशाची वाटचाल ही सर्वांनाच प्रेरणाताई आहे.
या जपानमधील अनुभवांना भुजबळ सरांनी माहितीपूर्ण आणि साहित्यिक स्वरूपात उत्तम चित्रित केले आहे.
खूप छान लेखन, जपान बद्दल खूप ऐकले होते.
आता पाहायला मिळाले.तुमचे लेखन आणि व्यवस्थित इतंभुत माहिती ने आता पुन्हा जपान चे
पर्यटन होणार. खूप खूप धन्यवाद साहेब.खरंच खूप मस्त वाटतं आहे लेख वाचताना.
नमस्कार,जपान सहलीचे वर्णनाचा हा पहिला भाग
आवडला आता पुढील भाग वाचण्याची उत्कंठावाढली
मस्त…जपानची पहिल्या दिवसाची सैर पुन्हा अनुभवली. स्वच्छता, शिस्त, जपानी नागरिकांची लगबग,आपापल्या कामात व्यस्त,पण इतरांबद्दल आदर पाहत राहावे असेच होते.गगनचुंबी इमारती, जमिनीला लागूनच ground level लाच इमारती बांधण्यात येतात
म्हणजे सुरवातीला पायर्यां नसतात.
मनात सारखे वाटायचे जरा जास्त
पाऊस पडला आणि पाणी साचले तर
सहजच पाणी इमारतीत घुसेल पण तसे
काही दिसले नाही फुटपाथ पण मोठे
ऐसपैस होते. खुपच छान अनुभव येत
होता.