हिरोशिमा: “ते” आणि “हे”
ओसाका हून आम्ही सकाळी ९ वाजता हिरोशिमा येथे पोहोचलो. स्टेशन बाहेर येताच अत्याधुनिक असे हिरोशिमा बघून आम्ही आश्चर्यचकित झालो. कारण आज पर्यंत हिरोशिमा म्हटले की, आकाशात उसळलेला आगडोंब, धुराचे लोट, भाजलेले देह अशीच चित्रे मनावर ठसली होती. असो.
तर हिरोशिमा त ट्राम सेवा आहे. कोणे एकेकाळी मुंबईत ट्राम सेवा होती, हे ऐकून, वाचून माहिती होते. पण हिरोशिमा त प्रत्यक्षात ट्राम मध्ये बसता आले. हिरोशिमा स्टेशन हून आम्ही हिरोशिमा मेमोरियल सेंटर ला जाणारी ट्राम पकडली. शहराचे दर्शन घेत घेत आम्ही थोड्याच वेळात मेमोरियल सेंटर ला पोहोचलो.
अमेरिकेने ६ ऑगस्ट १९४५ रोजी जपान मधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकल्याने जगभर हाहा:कार माजला. अणूबॉम्बचे किती भयानक दुष्परिणाम होतात हे जगाने पाहिले तर या शहरांनी आणि येथील नागरिकांनी ते पिढ्यानपिढ्या भोगले.
हिरोशिमात उभारण्यात आलेल्या भव्य प्रदर्शनात त्या वेळची व त्या नंतरच्या काळातील भव्य, भेदक छायाचित्रं पाहिली की आपल्या अंगावर काटा येतो. डोळे भरून येतात.माणसाच्या मूळ क्रूर प्रवृत्तीला आधुनिक विज्ञानाची जोड मिळाली की कसा विनाश होऊ शकतो याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. पाहणारे सर्व जण सुन्न होऊन हे प्रदर्शन पहात राहतात. एक तर पूर्ण प्रदर्शन गृहात काळोख, भव्य, भीषण कृष्ण धवल छायाचित्रांवर सोडलेला प्रकाश झोत आणि हे सर्व अत्यंत गंभीरपणे पाहणारे पर्यटक, आपल्या मनावर वेगळाच परिणाम करते.
आवंढा गिळायचीही आपल्याला आठवण रहात नाही. प्रदर्शन पाहून बाहेर आलो त्यावेळेस बाहेर सगळे सुन्न होऊन बसले होते, काहीजण डोळे पुसत होते, एकदम वातावरण गंभीर आणि शांत झाले होते. विज्ञानाच्या गैर वापरामुळे असा विध्वंस होऊ शकतो हे खरेच वाटत नाही. पण या सर्वांपासून धडा शिकण्याएवजी एकेक राष्ट्र अण्वस्त्र सज्ज होण्याच्या मागे लागले आहे. याला काय म्हणावे ? असो.
हिरोशिमात त्या काळातील त्यातल्या त्यात बचावलेल्या कल्चरल हॉल ची वास्तू जतन करून ठेवण्यात आली आहे. तिथे देशोदेशीचे पर्यटक भेट देतात. तर चित्रकलेचे विद्यार्थी, चित्रकार मंडळी हातात कुंचले घेऊन मन लावून चित्रे काढत बसलेली दिसतात.
एक स्मारक तर शाळकरी विद्यार्थ्यांनी त्यांची वर्ग मैत्रीण दहा वर्षांच्या आजारपणा नंतर मरण पावल्याने तिच्या स्मृती प्रित्यर्थ उभारले आहे. पर्यटक तिथे रांग लावून, तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मोठा दोरखंड लावलेली घंटा वाजवितात.
१९४५ साली उद्ध्वस्त झालेले हिरोशिमा आणि आजचे अत्यंत आधुनिक, नियोजनबध्द शहर, गगनचुंबी इमारती बघितल्या की खरोखरच फिनिक्स पक्ष्याप्रमाणे हिरोशिमा ने आपले पुनर्निर्माण केल्याचे दिसतेच पण यासाठी जपानी लोकांनी किती कष्ट, परिश्रम, जिद्द, चिकाटी, सातत्य ठेवले असेल, याची कल्पना करवत नाही.
जपानी लोकांच्या या भरारीला मनापासून सलाम.
क्रमशः
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️+91 9869484800
भुजबळ सर तुमचे लेख अतिशय वाचनीय असतात.तुमची “मेरा जूता हैं जपानी” ही लेखमाला फारच छान आहे.तुमच्या लेखाद्वारे पुन्हा एकदा जपान टूर घडत आहे. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
उत्तम चालू आहे लेखमाला….