दोतोंबुरी
हिरोशिमा येथून परतीच्या बुलेट ट्रेन ने आम्ही दुपारी चार वाजता ओसाका येथे परतलो. हाताशी वेळ भरपूर होता. आता काय करायचे ? यावर प्रदीर्घ विचार मंथन झाले. जितक्या व्यक्ती, तितक्या सूचना ! शेवटी हिरीरीने सूचना, कल्पना मांडणाऱ्या पुरुष वर्गाचे आप्पापल्या जोडीदारासमोर काही न चालल्याने तमाम महिला मंडळाने ठरविल्या प्रमाणे त्यांच्या अत्यंत आवडीच्या कार्यक्रमासाठी म्हणजेच शॉपिंग साठी जाण्याचे ठरले !
त्याप्रमाणे ओसाका रेल्वे स्टेशनहून आम्ही आमच्या बसेसने “दोतोंबुरी” या भरपूर दुकाने असलेल्या भागात पोहोचलो. मला तर एकदम नरिमन पॉईंट हून दादर च्या रानडे रोड ला आल्यासारखे वाटले. काय ती दुकाने, काय ती गर्दी, चालायला काय; उभे राहायला जागा नाही, अशी परिस्थिती. विविध दुकानांचे बाह्य चित्र विचित्र स्वरूप हे आतापर्यंत पाहिलेल्या जपान च्या एकदम विपरीत चित्र !
बहुतेक सर्व दुकाने ही कॉस्मेटिक्स, छोट्या छोट्या वस्तू, खाद्य पदार्थ, हॉटेल्स, त्यांच्या समोर लागलेल्या लांबच लांब रांगा हे सर्व पाहून मला तर गुदमरायला लागले. खरे तर अलकाला जपान मध्ये किटकॅट चॉकलेटची खुप चांगली व्हरायटी मिळते असे तिच्या एका मैत्रिणीने सांगितले होते. तिकडच्या काही डिपार्टमेंट स्टोर मध्ये उपलब्ध होती ती चॉकलेट्स घेतली पण “जपानची खरेदी” करावी असे काही त्या गर्दीत वाटत नव्हते.
https://youtu.be/S8w9mpvh7cQ?si=5FvA7KwYzW9BqnR6
त्या गर्दीत आमच्या टूर मधील सर्व इकडे तिकडे पांगले गेले होते. कोण कुठल्या दुकानात आहे हेच कळत नव्हते. मनात आले, आता पर्यंत आपण पॉश पॉश जपान पहात आलो.,पण जपान असेही आहे तर !
खूप शोधल्यावर शेवटी बिना गर्दीचे एक कॉफीचे दुकान दिसले. तिथे कॉफी घेऊन मी आणि अलका ने आम्हाला जिथे जेवायला जायचे होते त्याचे लोकेशन दिले होते तिकडे जायचे ठरवले. खरे तर फोन ची बॅटरी फक्त १२% शिल्लक होती, आम्ही तिकडील युवकांना लोकेशन दाखवून कसे जायचे हे विचारायचा प्रयत्न केला पण त्यांना इंग्रजी सुध्दा समजत नव्हते.
लोकेशन शोधत शोधत आम्ही जेथे भेटायचे होते तिकडेच गोल गोल फिरत होतो. नशिबाने एक इंग्रजी समजणारा मुलगा भेटला आणि त्याने जपानी भाषेत विचारात विचारात त्याने आम्हाला आमच्या नेमक्या ठिकाणी नेऊन पोहोचवले.
जर आम्हीं दोघे गर्दीत हरवलो असतो तर काय हाल झाले असते याची कल्पना सुध्दा करवत नाही कारण तिकडच्या लोकांना जपानी शिवाय इतर कोणतीच भाषा समजत नाही. असो..
आम्ही तासभर आधीच जेवणाच्या ठिकाणी येऊन पोहोचलो. जसजसे सगळे भेटत गेले तसतसे कुणी कुणी काय काय खरेदी केली हे आम्ही विचारत होतो. पण प्रत्येकजण सांगत होता, बापरे ! आम्ही नुसते भटक भटक भटकलो. त्या गर्दीत काहीच घेण्यासारखे नव्हते. मात्र काही हुशार मंडळींनी दिसलेल्या मसाज पार्लर मध्ये जाऊन ‘जपानी मसाज’ चा आनंद घेतला. मात्र, बायका मंडळींची “जपानची खरेदी” काही झाली नाही.
क्रमशः
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
भटक भटक भटकलो आणि पाय दुखायला लागले तेवढ्यात
मसाजची (पायाचे) चित्र दिसले. चौकशी केली
सर्वांना एकाच वेळ हवी होती.
जेमतेम आम्ही तिघींनी शोभा, सुरेखा आणि मी पायाचा मसाज केला. खुपच मस्त केला. बाकी दोघांनी बाजूला एका
दुकानात मसाज घेतले. खरेदी पेक्षा मसाज महत्वाचा वाटला दिवस सार्थकी लागला. हायसे वाटले.
आणि अशा प्रकारे समस्त महिला मंडळाचा खरेदीच्या भ्रमाचा भोपळा फुटला आणि नवरे मंडळीत अगदी आनंदी आनंद पसरला