लाकडी कॅसल
टोकियोतून दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता आम्ही मात्सूमिटो शहराकडे निघालो.
दोन तासांच्या प्रवासानंतर आम्ही चहापानासाठी शिबुटा या हायवे मॉल मध्ये थांबलो. आपल्याकडच्या बहुतेक फूडमॉल मध्ये बसून निवांतपणे चहा नाश्ता घेणे तर दूरच राहिले पण नीट उभे राहून ही काही खातापिता येत नाही. गाड्या उभ्या करायला पुरेशी जागाही नसते. पण या मॉलपुढे गाड्या पार्किंग साठी भरपूर व्यवस्थित जागा होती. तर आत ही विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, वस्तू मिळण्याची आणि सर्वाँना नीट बसून खाता येईल, अशी छान व्यवस्था होती.
पुढे आम्ही एका तासाच्या प्रवासानंतर मात्सूमिटो शहरात पोहोचलो. तिथे मोती या भारतीय हॉटेलमध्ये जेवण करून आम्ही
मात्सूमिटो कॅसल पाहायला गेलो.
चारही बाजूंनी पाणी असलेला, एखाद्या तलावात वाटणारा आणि सात मजली असलेला हा कॅसल पूर्णतः लाकडी आहे. कुठेही लोखंड किंवा साधा खिळा सुध्धा मारलेला नाही. एक वेगळीच स्थापत्य कला इथे पहायला मिळते.
आत जाताना आपल्याला तेथील कर्मचारी एक प्लास्टिकची पिशवी देतात. त्यात आपल्या चपला/बुट काढून ते हातात घेऊन आत प्रवेश केल्यावर एकेक मजला चढून आपण वर जातो.
आतले जिने अतिशय अरुंद असल्याने एका वेळी एकच व्यक्ती वर जाऊ शकते किंवा खाली येऊ शकते. त्यामुळे खुप सावकाश आणि सांभाळून जा ये सुरू असते. या कॅसलमध्ये बाहेरून हल्ला झालाच तर तो परतवून लावण्यासाठी मोक्याच्या जागी खिडक्या आहेत. तसेच आत त्या काळात वापरली जाणारी शस्त्रे मांडून ठेवण्यात आली आहेत.
इथे एका स्विस परिवाराशी माझा छान परिचय झाला. मला त्यांनी त्यांच्या देशात येण्याचे आमंत्रण दिले तर मी त्यांना भारत पहायला येण्याचे आमंत्रण दिले.
जवळपास तीन तास कसे गेले, हे कळलेच नाही !
क्रमशः
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अद्भुत लाकडी कॅसल
गोविंद पाटील सर जळगाव.
खूपच सुंदर लिहिता एक एक आठवण जागी होते आहे.जपान खूप सुंदर आणि स्वच्छ देश आहे.
स्वतः अनुभव घेतला आहे.तरीही लेख वाचताना मस्त वाटते. जपान चे पुन्हा एकदा पर्यटन होणार आहे.
धन्यवाद भुजबळ साहेब आणि अलका ताई भुजबळ.