आमच्या कालिका योगा गृपची एक छान सहल नुकतीच झाली. निमित्त होते आमच्या योगा गृपचे उत्साही जोडपे म्हणजे श्री राजू ओसवाल व सौ शेवंती ओसवाल हे आजी आजोबा झाल्याचे. हा आनंद या दाम्पत्याला नेहमीच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा होता, तो ही सर्वांसोबत आणि निसर्गाच्या सानिध्यात !
मनमिळावू व उत्साही व्यक्तिमत्व लाभलेल्या ओसवाल दाम्पत्याने योगा गृप मधील प्रकाश सर व मित्र परिवाराच्या मदतीने सर्व सहलीचे नियोजन केले. आम्ही एकूण ४० जण होतो. गाडी ठीक नऊ वाजता सातारा येथून निघाली. देवाचे नामस्मरण तसेच सुंदर अशा भजनाने सहलीची सुरवात झाली. विशेष म्हणजे आमच्या योगा परिवारात अनेक गायक आहेत त्यामुळे धमाल नेहमीच असते. गाडीत कपल डान्स देखील झाले. वय विसरून सर्व मंडळी उत्साहाने व आनंदाने नाचत गात होते. मध्येच एका ठिकाणी थांबवून गरमागरम चहा व पोह्याचा आस्वाद देखील घेतला.

आता थोडी पोट पूजा झाल्यावर आमची स्वारी पुढे निघाली ती थांबली कास पठार येथे. काय तो पाऊस…..काय ते पठार….. काय ते धुके… आणि सोबतीला योगा मित्र परिवार; सुवर्ण योग जणू !
कास पठारावर मस्त पावसात भिजलो. छान नाच, गाणी झाली. फोटोसेशन झाले. खरे तर हे फोटो अनेक आठवणींचा उजाळा देतात…..हो ना….ते जगलेले, अनुभवलेले क्षण….
आता ओढ लागली शेमडी मठ येथे जाण्याची. बामणोली गावाजवळ, कोयना धरणाच्या बॅकवॉटरच्या निसर्गरम्य परिसरात बांधलेला हा शेमडी मठ. हा श्री नारायण महाराजांचा पवित्र मठ आहे जे दत्त गुरूंचे शिष्य होते. या मठाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील जमिनीखालील तळघरातील अद्भुत शिव मंदिर जेथे जाण्यासाठी गुहेतून मार्ग आहे. मुख्य मंदिराच्या बरोबर वर श्री गणेश मंदिर आणि श्री गुरुदेव दत्त पादुका आहेत.
येथे मोबाईल नेटवर्क नसल्याने जणू आपण एक वेगळ्या विश्वात आलो आहोत, असे वाटायला लागले होते. थोडा वेळ का होईना आपल्या टेन्शन, अडचणी, धावपळ या सर्व गोष्टींना पूर्णविराम मिळाला. सगळं काही विसरून स्व मध्ये रमण्याचा आनंद काही औरच होता.
शंकराच्या मंदिरात गेल्यावर सर्व मंडळी भजनात तल्लीन झाले. एक अद्भुत आत्मिक समाधान जाणवला. मठाच्या भव्य हॉल मध्ये प्रवेश केल्यावर पुन्हा थोडा वेळ भक्तीगीत झाले. नंतर सूत्र दिले गेले राजू भैया व सीमा भाभी यांच्याकडे. त्यांनी चार गृप करून छान गेम्स घेतले. सर्वांच्या कला गुणांना वाव मिळाला. आपल्या गृपला बक्षीस मिळावे यासाठी सर्वांची खेळीमेळीने चढाओढ होती. खूप दंगा, मजा मस्ती, त्या गंमती जंमती, तो खोडकरपणा, ती पळापळ जणू पुन्हा एकदा लहान मुल झाल्याचा निरागस भाव सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
एक दिवस सर्व कामाला सुट्टी व मैत्रीशी गट्टी. येथे कोणाशी स्पर्धा नव्हती लोकांची गर्दी नव्हती आणि त्या फोनची किरकिर देखील नव्हती. या अनोख्या गेम्स मध्ये देश भक्ती गीत, नात्यांची वीण आपली संस्कृती सण समारंभ सर्व टीमने सुंदर सादर केले.
कस सर्व छान ….अगदी मनासारखं हसून हसून पोट दुखत होते. अगदी मनसोक्त आनंद घेत होतो. बक्षीस समारंभ पार पडल्यावर आयोजकांचे सत्कार करण्यात आले. ही प्रेमाची भेट होती…एक छोटी आठवण आम्हा सर्वांच्या वतीने.
एक दिवस पुन्हा नव्याने जगायला मिळाल्याने सकारात्मक ऊर्जा मिळाली. या अनेक आठवणींचा साठा मनात कायम घर करून राहणार. या कुटुंबाने दिलेली ही एक अद्भुत भेट होती जी अमूल्य होती आम्हां सर्वांसाठी.
आता अनेकांच्या पोटात कावळे ओरडू लागले. प्रदीप सर यांच्या प्रेमाने बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला. गरमागरम पोळी, मटकीची सुकी भाजी, आलू मटारची रस्सा भाजी, चटणी, कोशिंबीर, पावसाळ्यात ती मस्त भजी, मसाले भात, पापड आणि बुंदीचे लाडू अन्न देवता सुखी भव म्हणत सर्वांनी ताव मारला.थंडीचे वातावरण आणि असे गरम सात्विक भोजन जणू स्वर्ग सुखच.
श्री व सौ ओसवाल यांनी उत्तम व्यवस्था केली होती. सर्वांना आग्रहाने वाढत होते. असे दातृत्व आज दुर्मिळ असले तरी आमच्या योगा गृप मध्ये अनेकांकडे आहे हे आमचे भाग्य…..आणि हो पान सुपारीची देखील सोय करण्यात आली म्हणजे कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती.
नंतर काही जण गप्पात, काही भजनात तर काही रील करण्यात रंगले. वेळ कसा गेला कळलेच नाही आपल्या माणसात असताना वेळ किती लवकर जातो नाही का…?
आता ओढ लागली घरी जाण्याची त्यामुळे पुन्हा एकदा पुढचा प्रवास सुरु झाला.पुढे कधी काय होणार हे कोणालाही माहीत नसते. अरुंद रस्त्यावर गाडी अडकली म्हणून आम्ही खाली उतरून चालू लागलो. जेवण तर छानच झाले होते म्हणून असे वाटले बहुदा वजन जास्त झाल्याने गाडी जात नसावी. मग काय छत्री हातात घेऊन नाचत त्या वाटेने जाताना मनस्वी आनंद मिळत होता.तो अनुभव आम्हास सुखावत होता. त्या रंगीबेरंगी छत्रीत वेडेपणा करीत हे रंगबिरंगी फुलपाखरू आपल्याच तंद्रीत उडत होते. मैत्रीचे अनोखे अतूट नाते खुलत होते निसर्गाला साद घालत होते. जणू सप्तरंगी इंद्रधनुष्य पृथ्वीवर अवतरले होते. हे दृश्य विलोभनीय होते सुखावत होते. चालून दमल्यावर गावातील एका घरात थांबून गाडीची वाट पाहत बसलो होतो. पण परमेश्वराच्या मनात काही वेगळेच होत. गाडीचे एक चाक चिखलात रुतून बसले होते. काही पुरुष मंडळींनी खूप प्रयत्न केले मात्र जेसीबी शिवाय हे शक्य नाही हे कळून चुकले. आता पुढे काय करायचे…. ? कितीही कठीण प्रसंग असला तरी त्यात मार्ग असतो. महिला मंडळाच्या मनात भीती नव्हती कारण माहीत होते की पुरुष मंडळी नक्कीच काही तरी सोय करणार. आमच्या कालिका योगा परिवारात नेहमीच महिलांना प्रथम प्राध्यान्य दिले जाते, त्यांची योग्य काळजी घेतली जाते. अगदी आपलेपणाची नाते असल्यासारखे.त्यात परत तिथे आमच्या कोणाच्या मोबाईल ला रेंज नव्हती. ज्यांच्या घरात आम्ही विसावा घेतला त्या साळुंखे कुटुंबाची मोलाची साथ लाभली. त्यांच्या मोबाईल वरून कशीबशी दोन गाड्यांची सोय करण्यात आली. संकटात देव सोबत असतो फक्त अतूट विश्वास असावा लागतो म्हणतात ना जेथे मार्ग तेथे देव. तो पर्यंत घरी बसून भजन झाले, गप्पा गोष्टी झाल्या. घरी खुशाली देखील कळवली.
जे होते ते चांगल्यासाठी कारण गाडी बंद पडल्याने अजून हा तास दीड तास असा निसर्गाच्या सानिध्यात मैत्रीच्या सोबत घालवण्याची संधी मिळाली. हा एक दिवस अविस्मरणीय झाला. अनेक आठवणी उजाळा देऊन गेला व बरेच काही शिकवून ही गेला. गावाकडची माणसे,त्यांच्या साध्यापणातील माणुसकीचा झरा, एकीचे बळ, कठीण प्रसंगात सर्वांच्या सहकार्याने घेतलेला योग्य निर्णय. हा वेळ कसा गेला कळलेच नाही. शेवटी दोन गाड्या आल्या जणू देवासारखे धावून आली ही मंडळी. अखेर रात्री नऊ पर्यंत आम्ही सर्व सुखरूप सातारला पोहचलो.
गाडी, नाष्टा, जेवण याचे खूप छान नियोजन केले होते त्याबद्दल ओसवाल दाम्पत्याचे मनापासून धन्यवाद.
आज कुठलाही थकवा, ताण अथवा त्रास नव्हता होता केवळ मैत्रीचा सहवास एकमेकांनवर असलेला अतूट विश्वास.
असा आजी आजोबा होण्याचा मान ते सौभाग्य सर्वांना लाभू देत आणि अशीच फिरायची संधी आम्हा सर्व योग साधकांना मिळू देत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. ही झाली गंमतीची बाजू….
बरे का… पण…..काय तो डांगर….काय तो वारा…. सोबत मैत्रीच्या नात्याचा ओलावा, अविस्मरणीय प्रत्येक क्षण…….या निसर्गाची किमया… मैत्रीची ती जादू न्यारी…हा एक दिवस स्वतःसाठी जगलो कारण सर्वांसोबत रंगला होता मैत्रीचा मेळावा….तो नात्याचा सोहळा.
— लेखन : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800.