बीज अंकुरे अंकुरे
ओल्या मातीच्या कुशीत
जसे रुजावे बियाणे
माळरानी खडकात…..
सध्या पावसाळा सुरु आहे. माळरानावर, शेतांच्या बांधावर तसेच डोंगर पायथ्याला रानभाज्या उगू लागल्या आहेत. या रानभाज्यांची माहिती किंवा ओळख आदिवासी मंडळीना असते. मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये उदा. विरार, मुरबाड, पनवेल, कल्याण, कर्जत याठिकाणी अशा प्रकारच्या रानभाज्या मिळतात. अशा भाज्या पिकवल्या जात नाही तर त्या माळरानावर मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. हल्ली काही आदिवासी बांधव या भाज्या विक्रीसाठी घेवून येतात परंतु आपल्यातीलच काही लोकांना या रानभाज्यांची ओळख नसल्याने आपण त्या घेणे टाळतो आणि पाल्यांनाही माहिती देणे लांबच राहते.

अशा भाज्या ठराविक ऋतूमध्ये उपलब्ध असल्याने याविषयी अधिक माहिती नसते. पालकांना याविषयी माहिती नसल्याने त्यांच्या पाल्यांनाही वळ, कुर्डू, घोळ, तेरा, तेभ्रे, मोह्फुले व फळे तेलपट, कोळू, लोत, भोकर, मोखा, भारंगी, काटे, माठ, कुसरा, कुळू या भाज्यांची माहिती कशी मिळणार ? म्हणूनच “रोटरी क्लब ऑफ- डोंबिवली, फिनिक्स व पर्यावरण दक्षता मंडळ आणि नूतन ज्ञानमंदिर कल्याण (पू) यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट, जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने नूतन मंदिर, कल्याण(पू) येथे रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

या प्रदर्शनाचे उद्घाटनवेळी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली -फिनिक्स चे अध्यक्ष रो. सचिन खुटाळ. सेक्रेटरी रो. प्रफुल्ल राऊत, प्रकल्प प्रमुख रो. सौ मंगल तिवारी, रो. महेश खरोटे, रो. सोमनाथ रसाळ उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मीनाक्षी गागरे. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पत्की मॅडम, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ जोशी मॅडम, शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ वैद्य मॅडम उपस्थित होत्या. पर्यावरण दक्षता मंडळाच्या सौ रुपाली शाईवाले तसेच श्री आदित्य कदम यांनी प्रदर्शनाची मांडणी केली. या या प्रदर्शनाला विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
पालकांनी पावसाळी रानभाज्या प्रदर्शनात रानभाज्यांच्या पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात पालकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्यांपासून तरुणांना भुरळ पाडणाऱ्या फास्ट फूड सोबत जणू स्पर्धा केली असे वाटत होते. यामध्ये पालकांनी विविध रानभाज्यांपासून पदार्थ बनविले. यामध्ये कर्टुलेचे मोमोज, कर्टुलेचे मोदक, चूक्याची चटणी, करडूची वडी, त्याचप्रमाणे केळ फुलाचे व वाफळीचे थालीपीठ, कवळ्याच्या भाजीच्या वड्या, परवलाची बर्फी भारंगची भाजी टाकळ्याचे पराठे असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून पालकांनी या स्पर्धेला उस्फुर्त असा प्रतिसाद दिला. तसेच रानभाज्यांच्या पदार्थांचे महत्त्व विद्यार्थी, पालक यांना पटवून दिले.

या स्पर्धेतील विजेत्या पालकांना रोटरी क्लब ऑफ डोंबिवली फिनिक्स यांनी बक्षिसे देऊन कौतुक केले. रानभाज्या खाल्याने शरीराला होणारे फायदे, या भाज्यांचे महत्व, औषधी गुणधर्म याबाबत परिपूर्ण अशी माहिती देवून त्यांच्या शंकांचे निरसन केले.
पाककला स्पर्धेत लाभलेल्या परीक्षक सौ शर्वरी कळंत्रे व सौ मिलन मांजरेकर यांनी केले. जंक फूड खाल्यावर शरीराला कशा इजा होते सध्याची आपली जीवन शैली ही धावपळीची आहे आपले जर स्वास्थ्य चांगले ठेवायचे असेल तर शरीरात रोग प्रतिकारक शक्ति वाढली पाहीजे यासाठी अशा भाज्या चे सेवन करणे आवश्यक आहे.
पर्यावरण दक्षता मंडळाने त्या भाजीचे शास्त्रीय नाव कुल, संस्कृत नाव, वनस्पती कशी ओळखावी, त्यांचे औषधी गुणधर्म व ती भाजी बनविण्याची पाककृती इत्यादी माहितीही दिली. त्यामुळे पालकांना ती माहिती बाजारातून आणल्यावर कशी करावी हा प्रश्न पडणार नाही. या प्रदर्शनातील रानभाज्या या मामनोली परिसरातून आणल्या गेल्या. पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या जास्त रुचकर तर असतातचं शिवाय यामध्ये खनिजे, जीवनसत्त्वे असल्याने शरीरास पौष्टिक देखील असतात. या रानभाज्या निसर्गाची देणगी आहे. मानवाचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य निरोगी राहण्यासाठी आपणास अशा भाज्यांविषयी लोकजागृतीची फार आवश्यकता आहे. या रानभाज्यांचा आहारात जास्तीत जास्त वापर करावा यासाठी केलेला हा प्रयत्न आहे.
कार्यक्रमांस शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन सौ ज्योती चौधरी व श्रीमती सुलभा परदेसी यांनी केले. तर आभार उपमुख्याध्यापिका सौ निलिमा वैद्य यांनी मानले.
यांमध्ये महत्वाचे म्हणजे जैवविधतेचा एक भाग असलेल्या या रानभाज्या ज्या जंगल परिसरातून आपल्याकडे येतात ते जगलं जपण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांनी कटिबद्ध असायला हवे तरच या रणभाज्यांची चव पुढील पिढीस चाखता येईल.

— लेखन : आस. कल्याण
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
रानभाज्या हे आपले संचित आहे.त्यांच्याबद्दल सुरेख प्रबोधन.
रानभाज्या सुंदर उपक्रम