महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक नागेश शेवाळकर यांचे मराठी साहित्यात विपुल लेखन आहे. बाल साहित्य, कथासंग्रह, कवितासंग्रह, समीक्षा ग्रंथ आणि कादंबरी असे त्यांचे चौफेर लेखन आहे. महाराष्ट्रातील विविध नामवंत संस्थांचे त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त आहेत.
त्यांचा नुकताच मोबाईल माझा गुरु हा बालकथा संग्रह बालचमुंच्या भेटीला आला आहे. या कथासंग्रहात एकूण 11 कथांचा समावेश आहे. आजकाल तंत्रज्ञान खूपच प्रगत आहे. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल! अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत आणि आता यात मोबाईलची ही भर पडली आहे. मोबाईल शिवाय जीवन हे अशक्यच आहे. पण या मोबाईलचे चांगले आणि वाईट परिणाम समाजात सर्रास दिसत आहेत. हाच धागा पकडून तंत्रज्ञानाने माणसाच्या जीवनात झालेला बदल लेखकांने यात अचूक टिपला आहे. जर तंत्रज्ञानाचा चांगल्या प्रकारे वापर केला तर जीवन सुखकर होते आणि याचा दुरुपयोग केला तर त्याचे दुष्परिणामही आपल्याला पाहायला मिळतात. मोबाईल आयुष्याचा अविभाज्य घटक बनला असताना त्यातून समाजात आता कशाप्रकारे बदल झाले आहेत ते लेखकाने यात अतिशय खुबीने मांडले आहे.
समजूतदार आसावरी या कथेत इयत्ता चौथीच्या वर्गातील हुशार समजूतदार आणि चुनचुनित मुलीची कहाणी आहे. आत्या आणि आई या दोघींमध्ये झालेल्या दुराव्या बद्दल माहित होताच मोबाईलच्या माध्यमातून आपल्या आत्याशी संवाद साधत अतिशय चपखलपणे या निरागस मुलींनी दोघींनाही मोबाईलच्या माध्यमातून एकत्र आणले. कधीकधी लहान मुले ही मोठ्या माणसासारखे बोलतात. आणि मोठी माणसे लहान मुलासारखे करतात, असे बरेचदा आपल्याला समाजात पहायला मिळते. परंतु मोठ्या माणसांची रुसवे फुगवे समजून घेऊन लहान मुलीने ज्या प्रकारे दोघींना एकत्र आणले, ते लेखकाने अतिशय सुंदररित्या वर्णिले आहे.
हट्टी रितेश या कथेत मोबाईल बघत बघत जेवणाऱ्या छोट्या मुलाची कहाणी लेखकाने यात वर्णिली आहे. मोबाईल शिवाय न जेवणारा रितेश आपल्या हट्टीपणामुळे घरात कुणाचेही ऐकत नसे. मोबाईल शिवाय तो जेवणही करत नसे. मग त्याच्या आजोबांनी मोठ्या युक्तीने त्याच्यापासून मोबाईल कसा दूर केला याचे वर्णन अत्यंत सुंदररीत्या लेखकाने या कथेत केले आहे.
मोबाईल माझा गुरु ही कथा आजी आणि नातीच्या गोड नात्याची आहे. लहान मुले किती निरागस असतात हे या कथेत अतिशय सुंदररित्या सांगितले आहे. दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या प्रयत्नाची ही कहाणी आहे. मोबाईल आपल्याला ज्ञान देतो, माहिती देतो, आपल्याला माहित नसणाऱ्या साऱ्या गोष्टी सांगतो म्हणून तो आपला गुरु आहे असे ही छोटी निरागस मुलगी मानते. मग आजी जशी गुरूंच्या चरणाची पूजा करते, देवाची पूजा करते, तशी तिची नात मी देखील पूजा करणार असा हट्ट करते आणि दुसऱ्या दिवशी अक्षरशः मोबाईलची पूजा करते. तेव्हा घडलेली गंमत या कथेत लेखकाने वर्णन केली आहे.
यातील सर्वच कथा वाचनीय असून मुलांना आवडणाऱ्या मोबाईलशी निगडित आहेत. प्रत्येक कथेत नाविन्य आढळते. त्यामुळे या कथा वाचताना कुठेही निरसता वाटत नाही. मुले आणि मोबाईल यांच्या नात्याची जवळीक या कथांमधून मांडली आहे. तसेच प्रत्येक कथेत बोधप्रत संदेश लेखकाने दिला असल्याने या कथा मुलांना संस्कार मूल्य आणि भावी नागरिक घडण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत.
मासिक ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंड, आजरा यांनी या पुस्तकाची साजेशी बांधणी केली आहे. पुस्तकाची गुणवत्ता आणि पानांचा दर्जा त्यांनी केलेल्या मेहनतीची साक्ष देतो. प्रसिद्ध चित्रकार माननीय श्री. ओमकार महामुनी, यांनी विषयाला अनुरूप काढलेले आकर्षक मुखपृष्ठ व आतील विषयाला अनुरूप सुंदर चित्रे पुस्तकाच्या उंचीत मोलाची भर टाकते. मा. श्री. नागेश शेवाळकर यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा..!
कथासंग्रह- मोबाईल माझा गुरु
लेखक – नागेश शेवाळकर
प्रकाशक – मासिक ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंड, आजरा
— समीक्षक : सचिन बेंडभर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800