नमस्कार, मंडळी.
आजपासून आपण एक नवीन प्रयोग करीत आहोत, तो म्हणजे “कविता” या सदरात नुसतीच लिखित स्वरूपात कविता प्रसिध्द न करता, जे कवी/कवयित्री आपल्या कविता सादरीकरणाची यू ट्यूब लिंक पाठवतील, ती कवितेच्या शेवटी द्यायची.
आजच्या कवी श्री अजय बिरारी यांच्या कवितेच्या शेवटी त्यांनी सादर केलेली त्यांची कविता अवश्य पहा आणि आपला अभिप्राय कळवा.
धन्यवाद.
आपली
– टीम एनएसटी
मोबाईल वेड
आता मोबाईलविणा, जीव झाला केविलवाणा, बघा बोटे त्यांची सळसळती.
झोप होते अर्धवट, बायको करते कटकट, तिचे शब्द कानी घरंगळती.
ओठांचा चंबू करून, नजरेने तिरक्या पाहून
मान जरा एकीकडे वाकवून, घेती सेल्फी पटापटा काढून.
आता करपल्या डाळी आणि फोडणी झाली काळी, पोळी तव्यावर कशी जळली
या या मोबाईलपायी, हिला सुचेना हो काही बघा मान तिची मुरगळली.
बॅटरी ही झालिया डाऊन, लाईट गेलेली पाहून
काय करू म्हणे जगी राहून, ये रे देवा मदतीला धावून
जीव झाला वेडापिसा, वेळ जाईल आता कसा, दोघे मनातून हळहळली
या या मोबाईलपायी यांना सूचे ना हो काही, बघा मने त्यांची मरगळली
दिनरात मोबाईल वापरून, नेट पॅक गेला हो सरून
आता झाली गत हिची दारूण, लवकर द्या ना रिचार्ज हिला मारून
तिचे हरवले भान आणि कामात नाही ध्यान, वेळ जेवणाचीही टळली
या या मोबाईलपायी, तिला सुचेना हो काही बघा मान तिची मुरगळली
फोनमध्ये तोंडे बसती खूपसून, दोघे कधी बोलत नाहीत हासुन
भांडण करती मात्र ठासून, दूर राहती एकमेकांपासून
एकमेका देती दोष, यांचा हरवला होश, किंमत वेळेची ना यांना कळली
आता मोबाईलविना जीव झाला केविलवाणा बघा मने त्यांची मरगळली
आता मोबाईलविणा, जीव झाला केविलवाणा, बघा बोटे त्यांची सळसळती
झोप होते अर्धवट, बायको करते कटकट, तिचे शब्द कानी घरंगळती
तिच्या शिव्या कानी घरंगळती, तिची फुलं कानी घरंगळती
आता कवितेचे प्रत्यक्ष सादरीकरण….
– रचना : अजय बिरारी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
