मोरोक्को हा देश म्हणजे निसर्गाने दिलखुलास वाटलेले सौंदर्य ! सुंदर आणि नयनरम्य असे समुद्र किनारे आणि सुंदर उंच नारळासारखी झाडी रस्त्यांचे आणि शहराचे सौंदर्य अधिकच खुलवतात.
क्षेत्रफळाने छोटासा असलेला हा देश पर्यटकांसाठी मात्र पर्वणी ठरतो हे अगदी खरं आहे, प्रत्यक्ष अनुभव कथन करतायत प्रकाश फासाटे…
तुम्ही दोन नद्यांचा जेथे संगम होतो ते दृश्य कधी बघीतलंय का ? नदयांचे ते विस्तृत पात्र, अथांग असा जलाशय, सुंदर नदीचे किनारे, पाण्यावर तरंगणाऱ्या होड्या आणि हिरवीगार झाडी किती मनमोहक असते नाही !!
असच जर दोन मोठ्या समुद्रांचा संगम होत असेल तर त्या जागेबद्दल तुम्हाला काही कल्पना करता येईल का…
जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीवर असाच अथांग महाकाय अश्या दोन समुद्रांचा संगम बघायला मिळणं म्हणजे डोळ्याची पारणे फिटणे म्हणावे लागेल !!!!
जिब्राल्टरची सामुद्रधुनी ही स्पेन आणि आम्ही राहत असलेल्या मोरोक्को या दोन देशामध्ये तयार झालेली सामुद्रधुनी !! याच ठिकाणी दोन समुद्र एकत्र झाले आणि युरोप आणि आफ्रिका हे दोन खंड विभागले गेले.
मोरोक्कोत येऊन जिब्राल्टरची सामुद्रधुनी न बघणं म्हणजे जसे भारतात जाऊन कश्मीर न बघणे असेच म्हणावे लागेल.
आम्ही जेव्हा जाण्याचे नियोजन केले, तेव्हा दोन समुद्र एकत्र होतात हे ऐकून होतो, त्यामुळे मनामध्ये एक ओढ होती की ते दृश्य कसे असेल ? तो नजारा काय असेल ? निसर्गाचे असं नयनरम्य रूप कस दिसत असेल असे अनेक प्रश्न मनामध्ये येत होते.
आमच्या शहारापासून पासून पाचशे किमी प्रवास केला की आम्ही सरळ देशाच्या सीमेपर्यंत पोहचतो.
जिब्राल्टरची सामुद्रधुनी बघण्यासाठी थेट मोरोक्कोची सीमा गाठावी लागते. मोरोक्कोच्या सीमेवर जाण्याकरता आम्हाला दोन मार्ग होते एक म्हणजे सुपरफास्ट ट्रेन तर दुसरा होता लक्झरी बसेस !!
आम्ही मात्र सुपरफास्ट ट्रेनचा मार्गच निवडला कारण ट्रेन खूप कमी वेळात पोहचते आणि प्रवासही आरामात होतो शिवाय सुपरफास्ट ट्रेनच्या प्रवासाचा आगळा वेगळा अनुभव पण घेता येतो.
आमची प्रवासाला सुरवात झाली ती आमचे राहते शहर ‘अल जदीदा ‘ पासून. आपल्या पुण्यापेक्षा लहान असलेले हे शहर पण अगदी छान आणि सुंदर सजवलेले…
प्रवासाला निघायचं म्हंटल की तयारी दोन दिवस आधीच करावी लागते. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही प्रवासात भारतीय जेवण, नाष्टा वेळेवर मिळालं की प्रवासाचा आनंद मनमुराद लुटता येतो हा आमचा आजवरचा अनुभव होता, त्यामुळे आम्ही ती काळजी नेहमी घेतो. प्रवास करतांना आपल्या शरीराची काळजी घेतली म्हणजे मग त्रास होत नाही.
बरोबर दोन वर्षांपूवीची आमची जिब्राल्टरची सहल खूप अविस्मरणीय झाली. सोबत माझी पत्नी आणि मुलगा दोघेही होते.
‘अल जदीदा’ (El jadida) शहरातून सकाळी आठ वाजताची ट्रेन असल्याने आम्ही बरोबर अर्धा तास आधीच स्टेशन वर हजर झालो. इकडे मुळात लोकसंख्या खूप कमी असल्यामुळे गर्दी हा प्रकार बिलकुल नसतो.
तिकीट खिडकीत पुढे जेमतेम चार ते पाच लोक उभी असतात यावरून गर्दीचा अंदाज येईल. रेल्वे आकाराने आपल्या पेक्षा छोट्या असतात, जवळच्या अंतरासाठी ट्रेन मध्ये फर्स्ट क्लास व सेकंड क्लासची बैठक व्यवस्था असते तर ट्रेनला जास्तीत जास्त पाच ते सात बोगी बघायला मिळतात, स्वच्छ सुंदर डबल डेकर ट्रेन बघून प्रवासाला आणखी मजा येते.
दीड तासांचा प्रवास करून आम्ही ‘कासाब्लँका’ (casablanca) या शहरात पोहचलो. येथून आम्हाला पुन्हा ट्रेन बदलून ‘तांजेर ‘ (Tanger) कडे रवाना व्हायचे होते.
‘कासाब्लँका’ हे शहर आपल्या मुंबई सारखं मोरोक्कोची औद्योगिक राजधानी !!
गगनचुंबी इमारती, रस्त्यावरची भरधाव वाहतूक आणि लोकांची गर्दी, पण तरीही सगळे आकर्षक आणि सुंदर दिसणार हे शहर फिरायला मजा येते.
सर्व शहरांचा संपर्क हया शहराशी असल्यामुळे या ठिकाणी खूप पर्यटक, प्रवासी यांची रेलचेल असते. हे शहर म्हणजे मोरोक्कोतील दुसरे सर्वात मोठे शहर. !!!
‘तांजेर’ ला जाण्यासाठी आमची ट्रेन एक तासानंतर होती.
सकाळचा चहा आणि नाष्टा करुपर्यंत एक तास असाच निघून गेला आणि ट्रेन निघण्याची वेळ झाली.
‘तांजेर’ पर्यतचा आमचा प्रवास हा आता आफ्रिका खंडातील सर्वात जलद अशी ट्रेन, अल बोराक (Al boraq) ने होणार होता.सकाळी साडे दहा वाजताची आमची ट्रेन बरोबर वेळेवर निघाली.
ताशी तीनशे वीस किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या ट्रेनचा प्रवास एक वेगळाच थरारक अनुभव होता. फक्त दीड तासात आम्ही तीनशे सत्तर किमी अंतर पार करणार होतो.
आपल्या देशाची सर्वात जलद राजधानी एक्सप्रेसचा वेग ताशी एकशे तीस किमी आहे यावरून अल बोराक ट्रेन किती जलद असेल याचा अंदाज येतो.
अल बोराक ट्रेन ही निघाल्यानंतर दहा मिनिटात वेग घ्यायला सुरवात करते. आत बसून आपल्याला बाहेरच्या वेगाची कल्पना येत नाही पण जेव्हा आतील वेग सूची फलकावर वेगाचा आकडा चमकतो तेव्हा मात्र थोडी भीती वाटते. पण एकंदर हा प्रवास अनुभवण्यात वेगळीच मजा येत होती.
बरोबर दुपारी बारा वाजता आम्ही ‘तांजेर'(tanger) स्टेशन वर पोहचलो. कोणताही थकवा नाही की कंटाळा नाही. जणू काही आता बसलोय आणि लगेच उतरतोय असाच भास झाला इतका आरामदायक प्रवास वाटला.
तांजेर (Tanger )च्या स्टेशनवर येताच ट्रेन ने आपला वेग कमी केला आणि प्रवाश्यांची उतरण्याची गडबड सुरु झाली. या ठिकाणी सर्व जण उतरणार होते.
बोगीतून उतरतांना माझ्या मुलाने मला विचारले, “पप्पा, हा टीसी आता उतरतांना बोगीत काय चेक करतोय ?
त्याला मी सांगितले”, मोरोक्को रेल्वेत प्रत्येक टीसीला प्रवासी बाहेर जाण्याच्या आत संपूर्ण बोगी तपासाव्या लागतात आणि कोणाचीही वस्तू, बॅग विसरली असेल तर ताब्यात घ्यावी लागते किंवा संशयास्पद वस्तू असेल तर तेही लगेच बघावे लागते. आपल्या नोकरीच्या प्रति जबाबदार असण्याचे ते एक उत्तम उदाहरणं होते.
एक विशेष बाब अशी आहे की मोरोक्कोतील दोन शहरावर स्पेन चा ताबा आहे. एक आहे सेवता (ceuta) आणि दुसरे आहे मेलीला !!!
अजूनही ती जागा आमच्या पासून 77 किमी अंतरावर होती, जेथून आम्ही जिब्राल्टरचा नजारा बघणार होतो.
त्या अगोदर आम्ही बुक केलेल्या फ्लॅट वर जाण्याचा निर्णय घेतला कारण आमचा रात्रीचा मुक्काम हा ‘तांजेर’ (tanger ) मध्येच होता.
आम्ही अगोदर बुक केलेल्या फ्लॅट वर पोहचलो.
इकडे तुम्ही कोठेही फिरायला जा, तुम्हाला राहण्यासाठी हॉटेल व्यतिरिक्त वेल फर्निशिड फ्लॅट, बंगलो भाड्याने एक, दोन किंवा पाच दिवसासाठी मिळतात.
याचा फायदा हा होतो की तुम्ही जेवण, नाष्टा तुमच्या आवडीचे बनवू शकता. आम्हाला भारतीय जेवण प्रवासात आवडते त्यामुळे आम्ही सरळ घर भाड्याने घेतो त्यात सर्व सुविधा मिळतात शिवाय घरच्यासारखेही वाटते.याकरिता मात्र तुम्हाला फ्लॅट, घर किंवा बंगला आधी फोन वर बुक करावा लागतो.
तांजेर (Tanger) मधील घरमालकाने दिलेल्या पत्यानुसार आम्ही फ्लॅट वर पोहचलो, अगदी आदरतिथ्याने स्वागत करत त्याने सर्व फ्लॅट दाखवला आणि च्याव्या आमच्या ताब्यात दिल्या. येथे सर्व गोष्टी विश्वासावर चालतात. आता तो थेट फ्लॅट सोडतांनाच परत च्याव्या घ्यायला येणार तो पर्यंत घराची सर्व जबाबदारी आमच्यावर. !!!
आम्ही लगेच फ्रेश झालो आणि दुपारचे बनवून आणलेले जेवण करून थोडा आराम केला
आमचा पुढचा प्रवास हा खासगी टॅक्सी ने होणार होता.
दुपारचे दोन वाजले असतील, कडक ऊन पडले होते पण हवेत कायम गारवा असल्याने इकडे ऊन असूनही भासत नाही आणि नेहमी थंड वाटते
टॅक्सी ने आमचा प्रवास बेलयूनेक ( belyounech ) कडे सुरु झाला.
इकडे चार सीटर टॅक्सी भाड्याने मिळते जी तुम्हाला कोठेही न थांबता सरळ मोरोक्को च्या सीमेवर घेऊन जाते. बहुतेक सर्व शहर इकडे महामार्गांनी जोडली आहेत त्यामुळे शंभर ते एकशे वीस च्या गतीने सर्व वाहने महामार्गांवर धावताना दिसतात. रस्त्यांच्या बाजूला असलेली छोट छोटी घरे आणि सर्वत्र पसरलेली एकसमान हिरवीगार शेती आणि शेतात जागोजागी उभ्या असलेल्या जर्सी गायी अगदी आपण युरोपात आल्या सारखे वाटते आणि तसाही युरोपचा मोठा पगडा यांच्या जीवनशैली वर पडलेला असल्याने सर्व गावे, शहरे, वस्ती, शेती ही युरोपीन पद्धतीची दिसून येते.
एक तासाचा आमचा प्रवास केव्हा संपला कळालेच नाही आम्ही त्या अथांग समुद्रांच्या साक्षीने जमिनीच्या शेवटच्या टोकावर उभे राहिलो त्याच नाव होत
बेलयूनेक (belyounech ) !!
अनेक पर्यटकांची गर्दी आणि टुरिस्ट बसेस त्या ठिकाणी आलेल्या होत्या.
इथूनच आम्ही strait of gibralter
(जिब्राल्टर ची समुद्रधुनी) बघण्याचा आनंद घेणार होतो.
समुद्रातून अगदी समोर 65 km वर जिब्राल्टर हे शहर आणि बाजूला असलेला स्पेन देश !!!
अटलांटिक समुद्र आणि मेडिटेरिअन समुद्र यांचा झालेला मिलाप हे दृश्य च खरं डोळ्यात मावणारे नव्हते.
सर्वत्र नजर संपेपर्यंत दिसणाऱ्या निळ्याभोर पाण्यात जणू आकाश अलगद खाली उतरले की काय असे वाटत होते.
निसर्गातील हे चमत्कार आपल्याला खरंच विचार करायला लावतात. दोन सागरांची भेट पण कसला गर्व नाही की कसला अहंकार नाही !!
संथ पाणी लाटांनी जणू एकमेकांच्या हातात हात घालून तर कधी लाटांची मिठी मारून आपल प्रेम व्यक्त करताना दिसत होत्या, त्यांच्या हया भेटीने मग आनंदी झालेले समुद्री पक्षी सुद्धा त्यांच्या आनंदात सहभागी होऊन त्या
लाटांबरोबर एका लयीमध्ये उडतानाचे दृश्याने खरोखर मंत्रमुग्ध केले.
निसर्गाच्या रूपापुढे आपण कोणीच नाही याचा प्रत्येय तेथे नक्की होतो. ज्या सागराची खोली अथांग आहे, विस्तार नजरेत मावणारा नाही त्या दोन सागरापुढे मला माझे कणभरही अस्तित्व नाही याची जाणीव झाली.
हाच खरा उद्देश असावा निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा !!!
आपल्याला आपण कोणीही नाही याची जाणीव फक्त निसर्गच करून देऊ शकतो. निसर्गाकडे जाऊन आपली बुद्धी, आपला अहंकार याची तुलना निसर्गातील मोठ मोठे चमत्कार, वस्तू घटना यांच्या बरोबर करावी म्हणजे आपल्याला आपली किंमत किती शून्य आहे हे समजते.
मोरोक्को आणि स्पेन या दोन देशांमधील चिंचोळ्या सामुद्रधुनीला जिब्राल्टरची सामुद्रधुनी असे म्हणतात. जिब्राल्टर हे नाव आठव्या शतकातील अरबी सेनापती ‘तारिक’ याच्या नावावरून पडले ज्याने स्पेन काबीज केले. या चिंचोळ्या सामुद्रधुनीला या अगोदर ग्रीक व रोमन लोक ‘हर्क्युलचे द्वार‘ या नावाने संबोधित.
तारिकने स्पेन वर कब्जा केल्यानंतर मोरोक्कोमधून आक्रमण केले. अरबी लोकांनी याचे नवीन नाव जेबेल ए तारिक (तारिकचा दगड) असे केले व नंतर ते स्पॅनिश लोकांनी त्याचा ‘जिब्राल्टर ‘असा अपभ्रंश केला.
भुमध्य समुद्र हा अटलँटिक महासागराचाच एक भाग व पृथ्वीवरील एक प्रमुख समुद्र आहे. हा समुद्र चारही बाजूंनी जमिनीने वेढला गेला असून त्याच्या उत्तरेस युरोप व अनातोलिया तर दक्षिणेस आफ्रिका खंड आहेत. भूमध्य समुद्र पश्चिमेला जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने अटलांटिक महासागरासोबत जोडला गेला आहे. खरं तर अटलांटिक महासागराचाच एक भाग असला तरी बरेचदा भूमध्य समुद्र एक वेगळा पाण्याचा साठा समजला जातो.
24 लाख चौरस किमी इतके पृष्ठभागाचे क्षेत्रफळ असलेल्या भूमध्य समुद्राची सरासरी खोली 1502 मी. तर कमाल खोली 5270 मी. इतकी आहे.
लष्करीदृष्ट्या व आंतरराष्ट्रीय व्यापारीदृष्ट्या या सामुद्रधुनीस फार महत्त्व आहे. सामुद्रधुनी हे नाव पूर्वी विशेषतः जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीसाठीच वापरले जात असे. नंतर मलॅका या सामुद्रधुनीसाठी ते वापरले जाऊ लागले.
भूमध्य समुद्र हा सर्वांत मोठा भूवेष्टित समुद्र जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने पश्चिमेकडील अटलांटिक महासागराशी जोडला गेला आहे. या सामुद्रधुनीतूनच आंतरराष्ट्रीय व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा असा सुएझ कालवा हा सागरीमार्ग जातो. या मार्गावरील जिब्राल्टर हे व्यापारीदृष्ट्या आणि त्याहीपेक्षा लष्करीदृष्ट्या मोक्याचे ठिकाण सध्या युनायटेड किंगडमच्या ताब्यात आहे. जगातील भिन्न राष्ट्रांना जोडणारे एक प्रमुख ‘प्रवेशद्वार’ असा या सामुद्रधुनीचा उल्लेख केला जातो.
खरोखर आपण ज्या प्रदेशात राहतो त्या ठिकाणच्या महत्वाच्या पर्यटन स्थळांना आवर्जून भेट दिलीच पाहिजे म्हणजे खरोखर आपल्या त्या भागात राहण्याचे फलित होते.
कित्येक समाधानाच्या आठवणी मनात साठवून आम्ही संध्याकाळी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो आमचे आणखी पुढील तीन दिवस वेगवेगळी शहर बघण्याचे नियोजन होते. निघतांना मनात निसर्गाच्या विशाल स्वरूपाची जाणीव मात्र सारखी होत होती.

– लेखन : प्रकाश फासाटे. मोरोक्को (नॉर्थ आफ्रिका)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800