काय बाई सांगावं
काम माझ्या बाईचं
तिचं येणं माझ्या घरी
सदा असतं घाईचं
ही झाली,ती राहिली
सांगत बसते घंटाभर
नळ सोडून पुरेपूर
पाणी वापरते हंडाभर
साबणाचं पाणी करून
घसाघसा भांडी घासते
दगडा वरचं दोरीवर
उलटंसुलटं धुणं घालते
सुट्ट्यावर सुट्ट्या तिच्या
नाकी नऊ आणतात
कसे बरे हो नातेवाईक
तिचेचं आजारी पडतात
कढई कुकरचे सदा
हॅंडल ढिल्ले करते
ताराची घासणी तर
काठाभोवती अडकवते
काय माहित असते कुठे
काम करतांना ध्यान
चहाच्या कपाचे रोज
तुटत असतात कान
काही जरी बोललं तरी
राग असतो नाकावर
सोडून देते काम म्हणत
उडवून लावते वाऱ्यावर
विचार केला तर ती ही
दिवसभर खूप राबते
कितीही थकली तरी
संसारासाठी झटते
कधी मला बरं नसलं
विचारते आपुलकीने
राहू द्या बाई मी करते
म्हणत असते प्रेमाने
तेव्हा तिच्या वरचं माझं
प्रेम पुन्हा येतं फुलून
मोलकरणीशी नातं माझं
नेहमीप्रमाणे जातं जुळून
— रचना : सौ.प्रज्ञा कुलकर्णी. वसमत
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
छान रचना.
वास्तववादी छान काव्य. सहज सुलभ शब्द-रचना.