Thursday, September 19, 2024
Homeलेख"म्हातारे नको, ज्येष्ठ व्हा!"

“म्हातारे नको, ज्येष्ठ व्हा!”

व्हाटस्अपवर आलेल्या संदेशांचे वाचन करीत असताना एका सुंदर संदेशाने लक्ष वेधले. त्यात लिहिले होते, “म्हातारे नको, ज्येष्ठ व्हा!” हा संदेश वाचत असताना विचारांची आवर्तने सुरु झाली….

खरं म्हणजे, आपण पन्नाशीत प्रवेश करताच निवृत्तीचे विचार आपल्या डोक्यात शिरतात, अस्वस्थ करतात. काही जणांच्या मुलांची लग्नं व्हायची असतात. अनेक जणांची मुलं नोकरी, व्यवसायात पुरती स्थिरावलेली नसतात. अनेकांनी इच्छित तीर्थयात्रा आटोपलेल्या असतात, तर काही जणांना इच्छा असूनही आर्थिक परिस्थिती, पुरेसा वेळ अशा कारणांमुळे तीर्थयात्रा राहून गेलेली असते. तशात निवृत्तीचा दिवस खुणावत असतो. एकदा का संभाव्य निवृत्ती मनापासून स्वीकारली की, मग सुरू होतो, आकडेमोडीचा खेळ.निवृत्तीनंतर हातात पडणारी रक्कम आणि पूर्ण करावयाच्या गरजा यांचा ताळमेळ बसवताना नाकीनऊ येतात.

सर्वात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे वेळेचा. निवृत्तीनंतर काय करावे? वेळ कसा घालवावा? नोकरी असताना वेळ नसतो आणि निवृत्तीनंतर वेळच वेळ असतो. हातात असलेला वेळ कसा घालवावा हा यक्षप्रश्न निवृत्तीची चाहूल लागल्यापासून सर्वांनाच सतावत असतो.

काही व्यक्ती अशाही असतात की, निवृत्ती म्हणजे विरक्ती असे समजणारे! जसे आपण सेवेतून निवृत्त होत आहोत, तसेच आपण संसाराच्या मायाजालातून निवृत्त होत आहोत ! सगळ्या जबाबदाऱ्यांमधून दूर जाण्याचा ते विचार करतात. परंतु तसे नाही, संसार हे असे चक्रव्यूह आहे, त्यातून बाहेर पडणे भल्याभल्यांना जमत नाही. एका जबाबदारीतून मुक्त झालो असे वाटत असतानाच नवीन काम समोर ऊभे ठाकते. आजकाल बहुतेक कुटुंबातील मुलगा आणि सून दोघेही कामानिमित्त दिवसभर बाहेर असतात. त्यांच्या पश्चात नातवंडांची जवाबदारी साहजिकच कुटुंबातील ज्येष्ठांवर येऊन पडते. नातवांच्या बाललीला, त्यांची छोटी मोठी कामे करणे हा फार मोठा विरंगुळा असतो. त्यांच्या मन लुभावणाऱ्या क्रीडा हे परमोच्च आनंदी क्षण असतात. त्यासोबत मुलगा-सून, जावई-मुलगी दिवसभर बाहेर असताना त्यांची लहानसहान कामे करताना ज्येष्ठांना आनंद तर मिळतोच पण बाहेर असणाऱ्या मुलांनाही एक फार मोठा आधार असल्याची आनंददायी अनुभूती होते. आपणास कुणी तरी सहकारी आहे, जो आपली कामे तन्मयतेने, तत्परतेने, आपुलकीने, जिव्हाळ्याने करतो ही जाणीव दिवसभर काम करून थकलेल्या मुलांच्या मनात ज्येष्ठांविषयी आदर उत्पन्न करणारी तर असतेच. परंतु, सोबत त्यांच्या बाहूंना बळ देणारी, चेतनामय, स्फूर्तीदायक असते. पैसा असताना घरातली सारी कामे बाई लावून करुन घेता येतात, पण अशा विकतच्या सेवेतून ती आपुलकी, तो जिव्हाळा, तो मायेचा स्पर्श मिळत नाही जो ज्येष्ठांनी केलेल्या कामात असतो. त्याचवेळी ज्येष्ठ व्यक्तींच्या मनात मी निवृत्त झालोय, म्हातारा झालोय, आता कशाला पुन्हा त्या चक्रव्युहात अडकायचे ही भावना  शिरली की, मनामध्ये, शरीरात एक नकारात्मक उर्जा प्रवेश करते.

निवृत्तीनंतर अशी छोटी मोठी कामे करताना स्वतःच्या आवडीच्या छंदाकडे लक्ष दिले पाहिजे, असे छंद जोपासले पाहिजेत. अशा छंदामुळे आयुष्य सुसह्य होते, सकारात्मक होते. नोकरी करत असताना आवडीच्या छंदाकडे दुर्लक्ष झालेले असते. कुणाला भजनाची, कुणाला लेखनाची, कुणाला गायनाची, कुणाला वाद्य वाजवण्याची आवड असते. वाचनाची आवड असणारांची संख्या भरपूर आहे. असे कितीतरी आवडीचे छंद असताना अनेकांचे तिकडे दुर्लक्ष झालेले असते. त्यामुळे निवृत्ती म्हणजे आपल्या आवडत्या छंदांना पुनरुज्जीवित करण्याची एक सर्वोत्तम संधी आहे असे समजून ती संधी सहर्ष स्वीकारली पाहिजे.

वयाची साठी म्हणजे जणू छोट्या मोठ्या आजाराचे माहेरघर !  एकदा का आजार मानवाच्या शरीरात शिरले की, ते मानवाच्या अंतापर्यंत त्याच्या सोबतीला असतात. त्यामुळे प्रत्येकाने पन्नाशीनंतर असे कोणतेही आजार होऊ नयेत ही काळजी घेतली पाहिजे. खरं म्हणजे, निवृत्ती म्हणजे संसाराबाबतीत जशी विरक्ती नसावी तशीच संसाराबद्दल अतिरिक्त आसक्तीही नसावी. ह्या गोष्टी आचरणात आणल्या तर निवृत्ती नंतरच्या जीवनात मनसोक्त मजा लुटता येईल ,एक आगळे वेगळे समाधान मिळेल. ‘विरक्ती आणि आसक्ती’ यांच्या मधील सुवर्णमध्य म्हणजे ‘जेवढ्यास तेवढे’ अशी भूमिका घेणे गरजेचे असते.

आपण म्हातारा या साडेतीन अक्षराला चौकोनाचे स्वरूप देऊ या . म्हणजे म्हातारा या शब्दातील जो अर्धा किंवा लंगडा ‘म’ आहे ना, त्याला आपण पूर्णत्व बहाल करू या .म्हणजे म्हातारा हा शब्द झाला ‘महातारा’ ! महातारा किती छान संकल्पना आहे ना!

तेंव्हा महाताऱ्यांनो, चला,उठा. पसरवा अनुभवाचा लख्ख प्रकाश! करा सारी सृष्टी प्रकाशमान ! …

By नागेश सू. शेवाळकर, ९४२३१३९०७१

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

श्रीकांत चव्हाण on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
सुधीर थोरवे on दूरदर्शनची पासष्टी
अंकुश खंडेराव जाधव on देवेंद्र भुजबळ यांची फेर निवड
लता छापेकर on माझी जडणघडण : १६
Ravindra तोरणे on 🌺मोदक🌺